गलतीकर यांना पत्र
२ मग १४ वर्षांनंतर मी बर्णबासोबत पुन्हा एकदा यरुशलेमला गेलो.+ तीतलाही मी आपल्यासोबत घेतलं.+ २ मी तिथे जावं हे प्रभूने मला प्रकट केल्यामुळे मी गेलो आणि विदेश्यांमध्ये घोषित करत असलेला आनंदाचा संदेश त्यांना सांगितला. पण, ज्यांना खूप आदरणीय समजलं जातं, फक्त त्या बांधवांसमोरच मी या गोष्टी सांगितल्या. मी करत असलेली किंवा आजवर केलेली सेवा* वाया जाणार नाही, याची मला खातरी करायची होती. ३ माझ्यासोबत असलेला तीत+ हा ग्रीक असूनही, त्यालासुद्धा सुंता* करायला भाग पाडण्यात आलं नाही.+ ४ पण हा मुद्दा निघाला, तो फक्त मंडळीत गुपचूप शिरलेल्या खोट्या बांधवांमुळे.+ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे, त्याबद्दल लपूनछपून माहिती काढण्यासाठी+ आणि आम्हाला पूर्णपणे गुलामगिरीत जखडण्यासाठी ते मंडळीत घुसले होते.+ ५ आम्ही त्यांचं ऐकून त्यांच्या अधीन झालो नाही.+ अगदी एका क्षणासाठीही नाही. हे यासाठी, की आनंदाच्या संदेशाचं सत्य तुमच्यामध्ये टिकून राहावं.
६ पण प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या त्या बांधवांबद्दल बोलायचं,+ तर ते तसे असले किंवा नसले, तरी मला काही फरक पडत नाही. कारण देव कोणत्याही व्यक्तीचं बाहेरचं रूप पाहत नाही. खरंतर, खूप आदरणीय मानल्या जाणाऱ्या त्या बांधवांनी मला नवीन असं काहीच सांगितलं नाही. ७ उलट, ज्या प्रकारे पेत्रला सुंता* झालेल्यांकडे पाठवण्यात आलं होतं, त्याच प्रकारे मला सुंता न झालेल्यांना आनंदाचा संदेश सांगायचं काम सोपवण्यात आलं आहे,+ हे त्यांनी पाहिलं. ८ कारण ज्याने पेत्रला सुंता झालेल्यांसाठी प्रेषित होण्याकरता समर्थ केलं, त्यानेच मलाही विदेश्यांसाठी प्रेषित होण्याकरता समर्थ केलं.+ ९ ही गोष्ट त्यांनी पाहिली आणि माझ्यावर अपार कृपा झाली आहे, हे त्यांनी ओळखलं.+ तेव्हा याकोब,+ केफा* आणि योहान, जे मंडळीचे आधारस्तंभ मानले जात होते, त्यांनी या कार्यात आपण सगळे सहभागी* आहोत हे दाखवण्यासाठी बर्णबा आणि माझ्यासोबत+ उजवा हात मिळवला. तसंच, आम्ही विदेश्यांकडे तर त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावं असंही त्यांनी मान्य केलं. १० त्यांनी फक्त इतकीच विनंती केली, की आम्ही गरिबांची आठवण ठेवावी आणि ही गोष्ट करण्याचा मी आजपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलो आहे.+
११ पण केफा*+ अंत्युखियाला आला+ तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला बोललो,* कारण त्याचं चुकलं होतं* हे अगदी स्पष्ट होतं. १२ कारण याकोबकडून+ काही माणसं येण्याआधी तो विदेशी लोकांसोबत बसून जेवायचा.+ पण ती माणसं आल्यावर मात्र त्याने असं करायचं बंद केलं आणि सुंता झालेल्यांच्या भीतीमुळे तो त्यांच्यापासून वेगळा राहू लागला.+ १३ बाकीच्या यहुद्यांनीही त्याच्यासोबत हे ढोंग करायला सुरुवात केली. इतकंच काय, तर बर्णबासुद्धा त्यांचा ढोंगीपणा पाहून त्यांच्यासारखाच वागू लागला. १४ पण त्यांचं हे वागणं आनंदाच्या संदेशाच्या सत्याप्रमाणे नाही हे मी पाहिलं,+ तेव्हा मी त्या सर्वांच्यासमोर केफाला* म्हणालो: “तू यहुदी असून यहुद्यांसारखा वागत नाहीस, विदेश्यांसारखा वागतोस. तर मग तू विदेशी लोकांना यहुद्यांच्या रीतीप्रमाणे चालायला कसा भाग पाडू शकतोस?”+
१५ आपण पापी असलेल्या विदेश्यांपैकी नाही, तर जन्माने यहुदी आहोत. १६ आणि आपण ही गोष्ट ओळखतो की कोणताही माणूस नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे नाही, तर फक्त येशू ख्रिस्तावर+ असलेल्या विश्वासाद्वारे नीतिमान ठरवला जातो.+ म्हणूनच, आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला आहे. हे यासाठी, की नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे नाही तर ख्रिस्तावर असलेल्या विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरवलं जावं. कारण, नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे कोणालाही नीतिमान ठरवलं जाणार नाही.+ १७ पण आता, जर ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरवलं जाण्याचा प्रयत्न करत असतानासुद्धा आपण पापी असल्याचं दिसून आलं, तर याचा अर्थ ख्रिस्त आपल्याला पाप करायला प्रोत्साहन देत आहे का? नक्कीच नाही! १८ ज्या गोष्टी मी एकेकाळी स्वतःच पाडून टाकल्या होत्या, त्या जर मी पुन्हा उभ्या करत असलो, तर मी एक अपराधी असल्याचं दाखवून देतो. १९ कारण नियमशास्त्राद्वारे मी नियमशास्त्राकरता मरण पावलो.+ हे यासाठी, की मी देवासाठी जिवंत व्हावं. २० मला ख्रिस्तासोबत वधस्तंभावर* खिळण्यात आलं आहे.+ मी जो जगत आहे, तो यापुढे मी नसून+ माझ्यासोबत ऐक्यात राहणारा ख्रिस्त आहे. खरंच, या शरीरात जे जीवन मी सध्या जगत आहे, ते देवाच्या मुलावर असलेल्या विश्वासानेच जगत आहे.+ त्याने माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्यासाठी स्वतःला अर्पण केलं.+ २१ देवाची अपार कृपा मी नाकारत* नाही.+ कारण जर माणसाला नियमशास्त्राद्वारे नीतिमान ठरवलं जात असेल, तर मग ख्रिस्ताचं बलिदान व्यर्थ ठरलं आहे.+