१ शमुवेल
२३ काही काळाने दावीदला अशी खबर मिळाली, की “पलिष्टी लोक कईला+ शहराशी लढत आहेत आणि खळ्यांतलं* धान्य लुटत आहेत.” २ त्यामुळे दावीदने यहोवाला विचारलं:+ “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू का?” तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “जा, त्या पलिष्ट्यांना मारून टाक आणि कईला शहराचा बचाव कर.” ३ पण दावीदची माणसं त्याला म्हणाली: “इकडे यहूदामध्ये असतानाच आम्हाला इतकी भीती वाटत आहे,+ तर तिकडे कईला शहरात पलिष्टी सैनिकांशी लढायला गेल्यावर आमचं काय होईल!”+ ४ म्हणून दावीदने पुन्हा यहोवाला विचारलं,+ तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “खाली कईला शहराकडे जा. मी पलिष्ट्यांना तुझ्या हाती देईन.”+ ५ तेव्हा दावीद आपली माणसं घेऊन कईला शहराकडे गेला आणि पलिष्ट्यांशी लढला. त्याने तलवारीने मोठ्या प्रमाणात त्यांची कत्तल केली आणि त्यांची गुरंढोरं लुटली. अशा प्रकारे दावीदने कईलाच्या लोकांना वाचवलं.+
६ अहीमलेखचा मुलगा अब्याथार+ जेव्हा कईला इथे दावीदकडे पळून आला होता, तेव्हा त्याच्याजवळ एक एफोद होतं. ७ “दावीद कईलामध्ये आलाय,” असं शौलला सांगण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला: “देवाने त्याला माझ्या हाती दिलंय.*+ दरवाजे आणि अडसर असलेल्या शहरात येऊन दावीदने स्वतःलाच सापळ्यात अडकवलंय.” ८ मग, कईलाला जाऊन दावीदला आणि त्याच्या माणसांना वेढा घालता यावा, म्हणून शौलने आपल्या सगळ्या सैनिकांना युद्धासाठी बोलावलं. ९ शौल आपल्याविरुद्ध कट रचत असल्याचं दावीदला समजलं, तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला: “एफोद इकडे आण.”+ १० मग दावीद बोलला: “हे इस्राएलच्या देवा यहोवा! तुझ्या या सेवकाने असं ऐकलंय, की माझ्यामुळे शौलने कईला शहरात येऊन त्याचा नाश करायचं ठरवलंय.+ ११ तर आता हे इस्राएलच्या देवा यहोवा! कृपा करून तुझ्या या सेवकाला सांग, की कईलाचे पुढारी* मला धरून त्याच्या हाती देतील का? तुझ्या या सेवकाने ऐकल्याप्रमाणे, शौल खरंच इथे येईल का?” तेव्हा यहोवा म्हणाला: “हो तो येईल.” १२ दावीदने विचारलं: “कईलाचे पुढारी मला आणि माझ्या माणसांना धरून शौलच्या हाती देतील का?” त्यावर यहोवाने उत्तर दिलं: “हो, ते तुम्हाला धरून देतील.”
१३ तेव्हा दावीद आणि त्याच्यासोबतचे सुमारे ६०० लोक+ लगेच कईला शहरातून निघाले. आणि जिथे कुठे त्यांना सुरक्षित स्थान मिळालं तिथे ते गेले. इकडे, शौलला खबर मिळाली की दावीद कईला शहरातून पळून गेला आहे. म्हणून त्याने तिथे जाण्याचा बेत रद्द केला. १४ दावीद जीफ+ नावाच्या ओसाड रानातल्या डोंगराळ भागात राहिला. ओसाड रानात तो अशा ठिकाणी राहिला जिथे कोणालाही सहज पोहोचणं शक्य नव्हतं. शौलने रात्रंदिवस त्याचा शोध घेतला,+ पण यहोवाने दावीदला त्याच्या हाती पडू दिलं नाही. १५ दावीद जेव्हा जीफच्या ओसाड रानात होरेश इथे होता, तेव्हा शौल आपला जीव घेण्यासाठी निघाला आहे ही गोष्ट त्याला माहीत होती.*
१६ मग शौलचा मुलगा योनाथान होरेश इथे दावीदला भेटायला गेला. त्याने दावीदला धीर दिला आणि यहोवावरचा त्याचा भरवसा आणखी वाढवला.+ १७ योनाथान त्याला म्हणाला: “घाबरू नकोस. माझे वडील तुला पकडू शकणार नाहीत. तूच इस्राएलचा राजा होशील+ आणि मी तुझ्यापेक्षा दुय्यम पदावर राहीन. ही गोष्ट माझ्या वडिलांनाही माहीत आहे.”+ १८ मग त्या दोघांनी यहोवासमोर एकमेकांसोबत करार केला.+ त्यानंतर, योनाथान आपल्या घरी गेला आणि दावीद होरेशमध्येच राहिला.
१९ नंतर, जीफचे लोक गिबा+ इथे शौलकडे गेले आणि त्याला म्हणाले: “दावीद आमच्या इकडे जवळच्याच प्रदेशात लपून बसलाय.+ तो होरेशमध्ये+ अशा ठिकाणी लपलाय जिथे पोहोचणं सोपं नाही. यशीमोनच्या*+ दक्षिणेकडे असलेल्या हकीला+ टेकडीवर तो लपून बसलाय. २० तर हे राजा! तुम्हाला हवं तेव्हा या. मग आम्ही त्याला धरून तुमच्या हाती देऊ.”+ २१ त्यावर शौल त्यांना म्हणाला: “यहोवाचा आशीर्वाद तुमच्यावर असो. कारण तुम्ही मला सहानुभूती दाखवलीत. २२ आता जा, तो नेमका कुठे लपून बसलाय आणि त्याला तिथे कोणी पाहिलंय ते शोधून काढा. कारण तो खूप चलाख आहे असं मी ऐकलंय. २३ त्याची लपण्याची ठिकाणं कुठे-कुठे आहेत याचा कसून तपास करा आणि पुरावा घेऊन माझ्याकडे या. मग मी तुमच्यासोबत येईन. त्या प्रदेशात तो यहूदाच्या हजार माणसांमध्ये जरी लपून बसला असेल, तरी मी त्याला शोधून काढीन.”
२४ म्हणून ते निघाले आणि जीफला+ गेले. शौल त्यांच्या मागून तिथे गेला. त्या वेळी, दावीद आणि त्याच्यासोबतची माणसं मावोनच्या+ ओसाड रानात होती; मावोन हे यशीमोनच्या दक्षिणेकडे अराबामध्ये+ आहे. २५ मग शौल आपल्या माणसांसोबत दावीदचा शोध घ्यायला तिथे आला.+ दावीदला ही गोष्ट सांगण्यात आली, तेव्हा तो लगेच मावोनच्या ओसाड रानातल्या एका खडकाकडे+ गेला आणि तिथेच राहिला. शौलला हे कळलं, तेव्हा तो दावीदचा पाठलाग करत मावोनच्या ओसाड रानात गेला. २६ शौल डोंगराच्या एका बाजूला पोहोचला तेव्हा दावीद आणि त्याची माणसं डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून लवकरात लवकर दूर जाण्याचा प्रयत्न करत होता.+ पण शौल आणि त्याची माणसं दावीद आणि त्याच्या माणसांना पकडण्यासाठी आणखीनच जवळ येत होती.+ २७ इतक्यात एक दूत निरोप घेऊन आला आणि त्याने शौलला सांगितलं: “लवकर चला! पलिष्ट्यांनी देशावर हल्ला केलाय!” २८ तेव्हा शौलने दावीदचा पाठलाग करायचं सोडून दिलं,+ आणि तो पलिष्ट्यांचा सामना करायला निघून गेला. म्हणूनच त्या जागेला ‘विभागणीचा खडक’ असं नाव पडलं.
२९ त्यानंतर दावीद तिथून निघून एन-गेदीला+ गेला आणि अशा ठिकाणी जाऊन राहिला जिथे कोणालाही सहज पोहोचणं शक्य नव्हतं.