करिंथकर यांना पहिलं पत्र
२ म्हणूनच बांधवांनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला देवाचं पवित्र रहस्य+ सांगितलं, तेव्हा मी जड भाषेचा वापर केला नाही+ किंवा बुद्धीचा दिखावा केला नाही. २ कारण तुमच्यामध्ये असताना मी येशू ख्रिस्त आणि त्याचं वधस्तंभावर* खिळलं जाणं, यांशिवाय आणखी कोणत्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष न वेधण्याचं ठरवलं.+ ३ आणि मी एखाद्या दुर्बल माणसासारखा, भीतभीत आणि थरथर कापत तुमच्याकडे आलो. ४ आणि मी जे काही बोललो आणि जो संदेश घोषित केला, तो बुद्धिमानांच्या प्रभावशाली शब्दांत केला नाही. खरंतर त्यांतून देवाची पवित्र शक्ती* आणि सामर्थ्य दिसून आलं.+ ५ हे यासाठी, की तुम्ही माणसांच्या बुद्धीवर नाही, तर देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा.
६ आता, जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही बुद्धीच्या गोष्टी सांगतो.+ पण ती या जगाच्या व्यवस्थेची* बुद्धी नाही, किंवा या जगाच्या व्यवस्थेच्या शासकांची, ज्यांचा नाश होणार आहे, त्यांची बुद्धी नाही.+ ७ तर, आम्ही एका पवित्र रहस्यात दडलेल्या देवाच्या बुद्धीबद्दल सांगतो.+ देवाने या जगातल्या व्यवस्था सुरू होण्याआधीच या बुद्धीप्रमाणे कार्य करायचा संकल्प केला होता. ८ ही बुद्धी या जगाच्या व्यवस्थेच्या* शासकांपैकी कोणीही समजू शकला नाही.+ कारण जर त्यांना ती समजली असती, तर त्यांनी आपल्या गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळलं नसतं.* ९ पण जसं लिहिलं आहे: “डोळ्यांनी ज्या पाहिल्या नाहीत आणि कानांनी ज्या ऐकल्या नाहीत आणि माणसाने आपल्या मनात ज्यांची कल्पनाही केली नाही, अशा गोष्टी देवाने आपल्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत.”+ १० देवाने त्या गोष्टी त्याच्या पवित्र शक्तीद्वारे+ आपल्याला प्रकट केल्या आहेत.+ कारण पवित्र शक्ती सगळ्या गोष्टींचा, देवाच्या गहन गोष्टींचाही* शोध घेते.+
११ माणसाच्या मनात काय आहे हे त्याच्या स्वतःच्या मनाशिवाय आणखी कोण समजू शकतं? त्याच प्रकारे, देवाच्या गोष्टी त्याच्या पवित्र शक्तीशिवाय आणखी कोणालाही समजलेल्या नाहीत. १२ आता आपल्याला जगाची वृत्ती नाही, तर देवाकडून असलेली पवित्र शक्ती मिळाली आहे.+ हे यासाठी, की देवाने आपल्याला प्रेमळपणे दिलेल्या गोष्टी आपण जाणून घ्याव्यात. १३ या गोष्टींबद्दलही आपण माणसाच्या बुद्धीप्रमाणे शिकवण्यात आलेल्या शब्दांत नाही,+ तर देवाच्या पवित्र शक्तीने शिकवलेल्या शब्दांत बोलतो.+ अशा प्रकारे, आपण देवाबद्दलच्या गोष्टी, देवापासून असलेल्या शब्दांत* समजावून सांगतो.
१४ पण शारीरिक विचारसरणीचा माणूस, देवाच्या पवित्र शक्तीच्या गोष्टी स्वीकारत नाही. कारण त्याला त्या मूर्खपणाच्या गोष्टी वाटतात. आणि तो त्या जाणून घेऊ शकत नाही, कारण त्या गोष्टींचं परीक्षण पवित्र शक्तीच्या मदतीने केलं जातं. १५ देवासारखी विचारसरणी असलेला* माणूस सगळ्या गोष्टींचं परीक्षण करतो,+ पण त्याचं स्वतःचं परीक्षण कोणत्याही माणसाकडून केलं जात नाही. १६ कारण, “यहोवाचं* मन कोण समजू शकलं आहे, की त्याने त्याला काही शिकवावं?”+ पण आपल्याला ख्रिस्ताचं मन* समजलं आहे.+