२ इतिहास
१४ मग अबीयाचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात+ दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा आसा हा राजा बनला. आसाच्या शासनकाळात देशात दहा वर्षं शांती टिकून राहिली.
२ आसाने आपला देव यहोवा याच्या नजरेत जे चांगलं आणि योग्य तेच केलं. ३ त्याने परक्या दैवतांच्या वेदी पाडून टाकल्या+ आणि उच्च स्थानं* काढून टाकली. तसंच, त्याने पूजेच्या स्तंभांचा चुराडा केला+ आणि पूजेचे खांबही* तोडून टाकले.+ ४ शिवाय, त्याने यहूदाच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या देवाची, यहोवाची उपासना करायला आणि त्याच्या आज्ञा व नियमशास्त्र पाळायला सांगितलं. ५ अशा प्रकारे, त्याने यहूदाच्या सगळ्या शहरांमधून उच्च स्थानं व धूपस्तंभ काढून टाकले;+ त्याच्या शासनकाळात राज्यात शांती टिकून राहिली. ६ देशात शांती असल्यामुळे त्याने यहूदामध्ये तटबंदी असलेली शहरं बांधली.+ या काळात त्याच्याशी कोणीही युद्ध करायला आलं नाही. कारण यहोवाने त्याला त्याच्या सगळ्या शत्रूंपासून विसावा दिला होता.+ ७ आसा यहूदाच्या लोकांना म्हणाला होता: “चला आपण ही शहरं बांधू. त्यांच्याभोवती भिंती व बुरूज बांधू+ आणि त्यांना दरवाजे व त्या दरवाजांना अडसर बसवू. आपण आपला देव यहोवा याचा शोध केल्यामुळे हा देश अजूनही आपल्या अधिकाराखाली आहे. आपण देवाचा शोध केला म्हणून त्याने सर्व शत्रूंपासून आपल्याला विसावा दिलाय.” त्यामुळे शहरांचं बांधकाम करण्यात ते यशस्वी झाले.+
८ आसाच्या सैन्यात यहूदातली ३,००,००० माणसं होती; त्यांच्याकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. तसंच, त्याच्या सैन्यात बन्यामीन वंशातले २,८०,००० शूर योद्धेही होते आणि त्यांच्याकडे धनुष्यं आणि छोट्या ढाली* होत्या.+
९ नंतर, इथियोपियाचा जेरह हा १०,००,००० सैनिक आणि ३०० रथ घेऊन त्यांच्याशी लढायला आला.+ तो मारेशा+ इथे पोहोचला, १० तेव्हा आसा त्याचा सामना करायला गेला. आणि त्याने मारेशातल्या सफाथा खोऱ्यात आपलं सैन्यदल तैनात केलं. ११ मग आसाने आपला देव यहोवा याला अशी प्रार्थना केली:+ “हे यहोवा! तू कोणालाही मदत करू शकतोस, मग ते शक्तिशाली* असोत किंवा कमजोर असोत.+ हे आमच्या देवा यहोवा! आम्हाला मदत कर, कारण आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवलाय.+ आणि आम्ही तुझ्या नावाने या मोठ्या सैन्याशी लढायला आलो आहोत.+ हे यहोवा! तूच आमचा देव आहेस. नश्वर माणसाला तुझ्यावर विजय मिळवू देऊ नकोस.”+
१२ तेव्हा यहोवाने आसा आणि यहूदासमोर इथोपियाच्या सैन्याचा पराभव केला, आणि इथोपियाच्या लोकांनी पळ काढला.+ १३ आसाने आणि त्याच्या लोकांनी गरारपर्यंत+ त्यांचा पाठलाग केला. त्या वेळी इथोपियाच्या सैन्याचा पूर्णपणे नाश झाला, त्यातला एकही जिवंत राहिला नाही. कारण, यहोवाने आणि त्याच्या सैन्याने त्यांना पूर्णपणे चिरडून टाकलं होतं. त्यानंतर यहूदाचे लोक खूप मोठ्या प्रमाणात लुटीचा माल घेऊन गेले. १४ गरारच्या आसपासच्या सगळ्या शहरांनाही यहोवाची मोठी दहशत बसली होती. म्हणून ते त्या शहरांचाही नाश करू शकले. तिथे लुटण्यासारखं बरंच काही असल्यामुळे त्यांनी ती सगळी शहरं लुटली. १५ याशिवाय, त्यांनी गुरंढोरं राखणाऱ्यांच्या तंबूंवरही हल्ला केला आणि मेंढरांचे पुष्कळ कळप आणि उंट लुटले. त्यानंतर ते यरुशलेमला परत गेले.