लूकने सांगितलेला संदेश
९ मग, त्याने आपल्या १२ प्रेषितांना जवळ बोलावलं. त्याने त्यांना दुष्ट स्वर्गदूत* काढायचा आणि रोग बरे करायचा अधिकार आणि सामर्थ्य दिलं.+ २ मग त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करायला आणि रोग्यांना बरं करायला पाठवलं. ३ तो त्यांना म्हणाला: “प्रवासात आपल्यासोबत काठी, जेवणाची पिशवी, भाकरी आणि पैसे* असं काहीच घेऊ नका. तसंच, दोन जोड कपडेही घेऊ नका.+ ४ ज्या घरात जाल तिथेच मुक्काम करा आणि तिथूनच निघा.+ ५ एखाद्या ठिकाणी लोकांनी तुमचं स्वागत केलं नाही, तर त्यांना साक्ष मिळावी म्हणून त्या शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.”+ ६ मग ते निघाले आणि सगळीकडे आनंदाचा संदेश घोषित करत आणि रोग्यांना बरं करत गावोगावी फिरले.+
७ या सगळ्या गोष्टी प्रांताधिकारी हेरोद* याच्या कानावर आल्या, तेव्हा तो मोठ्या पेचात पडला. कारण योहान मेलेल्यांतून उठला आहे असं काही जण म्हणत होते.+ ८ तर इतर जण म्हणत होते, की एलीया प्रकट झाला आहे. आणि असेही काही होते, जे प्राचीन काळातला एक संदेष्टा उठला आहे असं म्हणत होते.+ ९ तेव्हा हेरोद म्हणाला: “मी तर योहानचं डोकं कापलं होतं.+ मग ज्याच्याबद्दल मी या गोष्टी ऐकतोय तो कोण?” म्हणून त्याला पाहायची हेरोदला इच्छा होती.+
१० मग प्रेषित येशूकडे परत आले आणि आपण केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी त्याला सांगितलं.+ तेव्हा एकांत मिळावा म्हणून तो त्यांना आपल्यासोबत घेऊन बेथसैदा या शहरात निघून गेला.+ ११ पण हे कळताच लोकांचा समुदाय येशूच्या मागे गेला. तेव्हा त्याने आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि तो त्यांना देवाच्या राज्याबद्दल सांगू लागला. तसंच, ज्यांना उपचाराची गरज होती त्यांना त्याने बरं केलं.+ १२ मग संध्याकाळ होऊ लागली, तेव्हा १२ प्रेषित त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “लोकांना पाठवून दे, म्हणजे ते जवळपासच्या खेड्यापाड्यांत जाऊन त्यांच्या राहायची आणि खायची-प्यायची सोय करू शकतील. कारण हे तर एकांत ठिकाण आहे.”+ १३ पण तो त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.”+ तेव्हा ते म्हणाले: “पाच भाकरी आणि दोन मासे यांशिवाय आमच्याजवळ काहीही नाही. आम्ही स्वतःच जाऊन या सगळ्या लोकांसाठी अन्न विकत आणू का?” १४ तिथे जवळजवळ ५,००० पुरुष होते. पण तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “सगळ्यांना पन्नास-पन्नासचे गट करून बसायला सांगा.” १५ त्यांनी तसंच केलं आणि सगळ्यांना खाली बसायला लावलं. १६ त्यानंतर, येशूने त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेतले आणि वर आकाशाकडे पाहून धन्यवाद दिला. मग त्याने भाकरी मोडून लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिल्या. १७ तेव्हा सगळे पोटभर जेवले आणि त्यांनी उरलेलं अन्न गोळा केलं तेव्हा १२ टोपल्या भरल्या.+
१८ नंतर, तो एकांतात प्रार्थना करत होता, तेव्हा शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने त्यांना विचारलं: “मी कोण आहे असं लोक म्हणतात?”+ १९ ते त्याला म्हणाले: “काही जण म्हणतात बाप्तिस्मा देणारा योहान. तर काही जण एलीया म्हणतात आणि इतर जण म्हणतात की जुन्या संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठलाय.”+ २० मग तो त्यांना म्हणाला: “पण तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “तू देवाने पाठवलेला ख्रिस्त आहेस.”+ २१ मग त्याने शिष्यांना कडक शब्दांत सांगितलं, की याबद्दल कोणालाही सांगू नका.+ २२ तो त्यांना असंही म्हणाला: “मनुष्याच्या मुलाला बरंच दुःख सोसावं लागेल. वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री त्याला नाकारतील आणि ठार मारतील.+ पण तिसऱ्या दिवशी त्याला उठवलं जाईल.”+
२३ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं+ आणि दररोज आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+ २४ कारण जो आपला जीव वाचवायचा प्रयत्न करतो, तो आपला जीव गमावून बसेल. पण जो माझ्यासाठी आपला जीव गमावतो तो त्याला वाचवेल.+ २५ खरंच, एखाद्या माणसाने सगळं जग मिळवलं, पण आपला जीव गमावला किंवा स्वतःवर नाश ओढवून घेतला तर त्याचा काय उपयोग?+ २६ कारण जर कोणाला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटत असेल, तर मनुष्याचा मुलगा जेव्हा आपल्या गौरवात आणि पित्याच्या आणि पवित्र स्वर्गदूतांच्या गौरवात येईल, तेव्हा त्यालाही त्या व्यक्तीची लाज वाटेल.+ २७ मी तुम्हाला खरं सांगतो, इथे उभे असलेल्यांपैकी काही जण असे आहेत, की जोपर्यंत ते देवाचं राज्य पाहणार नाहीत तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”+
२८ या गोष्टी सांगितल्यावर, जवळपास आठ दिवसांनी येशू डोंगरावर प्रार्थना करायला गेला. त्याने पेत्र, योहान आणि याकोब यांनाही आपल्यासोबत घेतलं.+ २९ तो प्रार्थना करू लागला तेव्हा त्याच्या चेहऱ्याचं रूप बदललं आणि त्याचे कपडे पांढरेशुभ्र होऊन चमकू लागले. ३० आणि पाहा! दोन पुरुष त्याच्याशी बोलत होते. ते मोशे आणि एलीया होते. ३१ त्यांचं रूप फार तेजस्वी होतं. येशू कशा प्रकारे जगातून जाईल आणि हे लवकरच कसं यरुशलेममध्ये घडेल, याबद्दल ते बोलत होते.+ ३२ पेत्रचे आणि त्याच्या सोबत्यांचे डोळे झोपेने जड झाले होते. पण ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांनी त्याचा गौरव पाहिला,+ तसंच त्याच्यासोबत उभ्या असलेल्या दोन पुरुषांनाही पाहिलं. ३३ ते दोन पुरुष येशूला सोडून जाऊ लागले, तेव्हा पेत्र येशूला म्हणाला: “गुरू, बरं झालं आम्ही आलो. आम्हाला तीन तंबू टाकू दे, एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी.” आपण काय बोलत आहोत याची त्याला जाणीव नव्हती. ३४ पण तो या गोष्टी बोलत असतानाच एक ढग खाली उतरला आणि त्याने त्यांना झाकून टाकलं. ढगाने त्यांना वेढलं तेव्हा ते घाबरले. ३५ तेवढ्यात ढगातून असा आवाज+ ऐकू आला: “हा माझा मुलगा आहे, याला मी निवडलंय.+ याचं ऐका.”+ ३६ हा आवाज ऐकू आला तेव्हा येशू एकटाच असल्याचं त्यांना दिसलं. पण ते शांतच राहिले आणि त्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या होत्या त्यांबद्दल काही काळापर्यंत कोणालाही सांगितलं नाही.+
३७ दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली उतरले, तेव्हा लोकांचा एक मोठा समुदाय येशूकडे आला.+ ३८ इतक्यात, लोकसमुदायातला एक माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला: “गुरुजी, कृपा करून माझ्या मुलाला बघा. कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे.+ ३९ एक दुष्ट स्वर्गदूत त्याला धरतो, तेव्हा तो अचानक ओरडू लागतो. मग तो त्याच्या शरीराला पिळवटून टाकतो आणि मुलाच्या तोंडाला फेस येतो. दुष्ट स्वर्गदूत त्याला जखमी करून फार मुश्कीलीने सोडतो. ४० मी त्या दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकायची तुमच्या शिष्यांना विनंती केली होती, पण त्यांना ते जमलं नाही.” ४१ तेव्हा येशूने उत्तर दिलं: “हे विश्वास नसलेल्या भ्रष्ट पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? तुझ्या मुलाला माझ्याजवळ आण.”+ ४२ पण मुलगा येशूजवळ येतच होता इतक्यात दुष्ट स्वर्गदूताने त्याला खाली आपटलं आणि वाईट रितीने त्याच्या शरीराला पिळवटून टाकलं. पण येशूने त्या दुष्ट स्वर्गदूताला दटावलं आणि मुलाला बरं करून त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केलं. ४३ देवाचं हे महान सामर्थ्य पाहून सगळे लोक थक्क झाले.
तो करत असलेली सगळी कार्यं पाहून लोक आश्चर्य करत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: ४४ “लक्ष देऊन ऐका आणि माझे हे शब्द आठवणीत ठेवा. कारण मनुष्याच्या मुलाचा विश्वासघात करून त्याला लोकांच्या हवाली केलं जाईल.”+ ४५ पण तो काय म्हणत होता हे त्यांना समजलं नाही. खरंतर, त्यांना त्याचा अर्थ समजू नये म्हणून या गोष्टी त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. आणि यांबद्दल त्याला विचारण्याचं त्यांना धैर्यही झालं नाही.
४६ मग आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून शिष्यांमध्ये वाद सुरू झाला.+ ४७ तेव्हा त्यांच्या मनातले विचार ओळखून, येशूने एका लहान मुलाला आपल्याशेजारी उभं केलं. ४८ मग तो त्यांना म्हणाला: “जो या लहान मुलाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. आणि जो मला स्वीकारतो, तो ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.+ कारण तुम्हा सगळ्यांमध्ये जो स्वतःला इतरांपेक्षा लहान समजून वागतो तोच श्रेष्ठ आहे.”+
४९ तेव्हा योहान त्याला म्हणाला: “प्रभू, आम्ही एकाला तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूत काढताना पाहिलं. पण तो आपल्यातला नाही, म्हणून आम्ही त्याला अडवायचा प्रयत्न केला.”+ ५० पण येशू म्हणाला: “त्याला अडवायचा प्रयत्न करू नका. कारण जो तुमच्या विरोधात नाही तो तुमच्यासोबत आहे.”
५१ येशूला वर घेतलं जाण्याची वेळ जवळ येऊ लागली,*+ तेव्हा त्याने यरुशलेमला जायचा पक्का निश्चय केला. ५२ म्हणून त्याने आपल्या काही शिष्यांना पुढे पाठवलं. तेव्हा ते शोमरोन्यांच्या एका गावात त्याच्यासाठी तयारी करायला गेले. ५३ पण त्या गावातल्या लोकांनी त्याचं स्वागत केलं नाही.+ कारण त्याने यरुशलेमला जायचा निश्चय केला* होता. ५४ जेव्हा याकोब आणि योहान+ या त्याच्या शिष्यांनी हे पाहिलं तेव्हा ते म्हणाले: “प्रभू, आम्ही स्वर्गातून आग बोलावून त्यांचा नाश करू का?”+ ५५ पण त्याने वळून त्यांना दटावलं. ५६ आणि ते दुसऱ्या गावाकडे निघून गेले.
५७ रस्त्याने जात असताना एक जण त्याला म्हणाला: “तुम्ही जिथेही जाल, तिथे मी तुमच्यामागे येईन.” ५८ पण येशू त्याला म्हणाला: “कोल्ह्यांना राहायला गुहा आणि आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत. पण मनुष्याच्या मुलाला तर डोकं टेकायलाही जागा नाही.”+ ५९ मग तो दुसऱ्या एकाला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” तेव्हा तो माणूस म्हणाला: “प्रभू, आधी मला जाऊन माझ्या वडिलांना पुरू द्या.”+ ६० पण तो त्याला म्हणाला: “जे मेलेले आहेत+ त्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे. पण तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”+ ६१ आणखी एक जण म्हणाला: “प्रभू मी तुमच्यामागे येईन, पण आधी मला माझ्या घरच्यांचा निरोप घ्यायची परवानगी द्या.” ६२ येशू त्याला म्हणाला: “जो नांगराला हात लावल्यावर, मागे सोडलेल्या गोष्टींकडे पाहतो+ तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”+