करिंथकर यांना दुसरं पत्र
११ तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा सहन करावा अशी माझी इच्छा आहे. खरंतर, तुम्ही तो सहन करतच आहात! २ देव जसा तुमच्याबद्दल ईर्ष्यावान* आहे तशीच ईर्ष्या मीही तुमच्याबद्दल बाळगतो. कारण तुम्हाला एक पवित्र* कुमारी म्हणून एका पुरुषाला, म्हणजेच ख्रिस्ताला सादर करता यावं, म्हणून मी स्वतः त्याच्याशी तुमचं लग्न ठरवलं आहे.+ ३ पण, ज्याप्रमाणे सापाने धूर्तपणे हव्वाला भुरळ घातली,+ त्याप्रमाणे तुमची मनंही भ्रष्ट होऊन तुम्ही ख्रिस्तासाठी असलेला तुमचा प्रामाणिकपणा आणि पवित्रता* गमावून बसाल, अशी मला भीती वाटते.+ ४ कारण कोणी येऊन, आम्ही घोषित केलेल्या येशूऐवजी दुसऱ्याच येशूबद्दल घोषणा करतो; किंवा तुमच्यात कार्य करत असलेल्या मनोवृत्तीऐवजी* वेगळी मनोवृत्ती तुमच्यात निर्माण करतो; किंवा तुम्ही स्वीकारलेल्या आनंदाच्या संदेशाऐवजी दुसराच संदेश घेऊन कोणी तुमच्याकडे येतो,+ तेव्हा तुम्ही त्याला सहजासहजी मान्य करता. ५ कारण तुमच्या त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही बाबतीत कमी पडलो, असं मला तरी वाटत नाही.+ ६ बोलण्यात जरी मी तरबेज नसलो,+ तरी ज्ञानाच्या बाबतीत मात्र नक्कीच तसा नाही. आणि ही गोष्ट आम्ही सर्व प्रकारे आणि सगळ्या बाबतींत तुम्हाला दाखवून दिली आहे.
७ तुम्हाला मोठेपणा मिळावा म्हणून मी जर कमीपणा घेतला आणि कोणताही मोबदला न घेता तुम्हाला देवाबद्दलचा संदेश आनंदाने घोषित केला,+ तर काही पाप केलं का? ८ तुमची सेवा करण्यासाठी मी इतर मंडळ्यांकडून गरजेच्या वस्तू* घेऊन त्यांचं नुकसान केलं.*+ ९ पण, तुमच्यामध्ये असताना मला गरज पडली, तरी मी कोणावर भार टाकला नाही. कारण मासेदोनियाहून आलेल्या बांधवांनी उदारपणे माझ्या सगळ्या गरजा भागवल्या.+ खरंच, तुमच्यावर कोणत्याही प्रकारे भार न टाकण्याची मी काळजी घेतली आणि पुढेही घेईन.+ १० ख्रिस्ताचं सत्य माझ्यामध्ये असल्याचं जितकं खरं आहे, तितकीच ही गोष्टही खरी आहे, की अखयाच्या प्रदेशांत अशी बढाई मारण्याचं मी सोडणार नाही.+ ११ मी तुमच्यावर भार का टाकला नाही? माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून? माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, हे देवाला माहीत आहे.
१२ स्वतःला प्रेषित म्हणवणारे काही जण बढाई मारून आमच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच, मी जे काही करत आहे, ते पुढेही करत राहीन.+ हे या उद्देशाने, की त्यांना आमच्याशी बरोबरी करण्याचं कोणतंही निमित्त* मिळू नये. १३ कारण अशी माणसं खोटे प्रेषित आणि फसवणारे कामगार आहेत. ते स्वतःचं खरं रूप लपवून ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचा आव आणतात.+ १४ आणि यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही, कारण सैतान स्वतःसुद्धा एका तेजस्वी स्वर्गदूताचं रूप घेतो.+ १५ त्यामुळे, त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचं रूप घेतलं, तर त्यात विशेष असं काहीच नाही. पण त्यांचा शेवट त्यांच्या कार्यांप्रमाणे होईल.+
१६ मी पुन्हा एकदा तेच म्हणतो: मी मूर्ख आहे असं कोणी समजू नये. आणि समजतही असाल, तर जसं एका मूर्ख माणसाला स्वीकारता तसंच मलाही स्वीकारा, म्हणजे मलासुद्धा थोडी बढाई मारता येईल. १७ या क्षणी, मी बढाई मारून आत्मविश्वासाने जे काही बोलत आहे, ते प्रभूच्या उदाहरणाप्रमाणे नाही, तर एका मूर्ख माणसाप्रमाणे बोलतो. १८ पुष्कळ लोक या जगातल्या* गोष्टींबद्दल बढाई मारत आहेत, त्यामुळे मीसुद्धा बढाई मारीन. १९ तुम्ही इतके “समजदार” आहात, की मूर्ख माणसांचं आनंदाने सहन करता. २० खरंतर, जो कोणी तुम्हाला गुलाम बनवतो, तुमची मालमत्ता हडपतो, तुम्हाला लुबाडतो, तुमच्यावर वर्चस्व गाजवतो आणि तुमच्या तोंडात मारतो त्याचं तुम्ही सहन करता.
२१ असं बोलणं आमच्यासाठी अपमानाचं आहे, कारण काहींच्या मते आम्ही इतके दुबळे आहोत, की आम्हाला आमचा अधिकार नीट चालवता येत नाही.
पण, जर इतर जण बढाई मारू शकतात, तर मीही मारीन. मग कोणाला मी मूर्ख वाटलो तरी चालेल. २२ ते इब्री आहेत का? मीही आहे.+ ते इस्राएली आहेत का? मीही आहे. ते अब्राहामचे वंशज* आहेत का? मीसुद्धा आहे.+ २३ ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का? एका मूर्ख माणसाप्रमाणे मी उत्तर देतो, की मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आहे: मी त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत केली आहे,+ कितीतरी वेळा तुरुंगवास भोगला आहे,+ असंख्य वेळा मारहाण सहन केली आहे आणि कित्येकदा मरतामरता वाचलो आहे.+ २४ पाच वेळा यहुद्यांकडून मला ३९ फटके बसले,+ २५ तीन वेळा मला छड्यांचा मार बसला,+ एकदा दगडमार करण्यात आला,+ तीन वेळा माझं जहाज फुटलं,+ एक संपूर्ण रात्र आणि दिवस मी उघड्या समुद्रावर घालवला; २६ मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरची संकटं, लुटारूंकडून संकटं, माझ्या स्वतःच्या लोकांकडून+ तसंच विदेश्यांकडून आलेली संकटं,+ शहरातली+ आणि ओसाड रानातली संकटं, समुद्रावरची संकटं आणि खोट्या बांधवांनी आणलेली संकटं, हे सगळं मी सोसलं. २७ मी कठोर मेहनत केली, कित्येक रात्री जागून काढल्या,+ तहान आणि भूक सहन केली,+ कित्येकदा उपाशी राहिलो,+ थंडीचा कडाका सोसला आणि अपुऱ्या कपड्यांवर भागवलं. *
२८ बाहेरच्या या सगळ्या गोष्टींसोबतच, सगळ्या मंडळ्यांची चिंतासुद्धा दररोज* माझ्या मनाला सतावत असते.+ २९ एखादा कमजोर झाला, तर मलाही कमजोर झाल्यासारखं वाटत नाही का? एखादा अडखळला तर माझाही जीव जळत नाही का?
३० बढाई मारायचीच असेल, तर मी अशा गोष्टींची बढाई मारीन ज्यांतून माझा दुबळेपणा दिसून येतो. ३१ आपल्या प्रभू येशूचा देव आणि पिता, ज्याची सदासर्वकाळ स्तुती केली जाईल, त्याला माहीत आहे की मी खोटं बोलत नाही. ३२ दिमिष्कमध्ये असताना अरीतास राजाच्या राज्यपालाने मला अटक करण्यासाठी दिमिष्कच्या शहरावर पहारा ठेवला होता. ३३ पण, मला एका टोपलीत* बसवून शहराच्या भिंतीतल्या खिडकीतून खाली उतरवण्यात आलं+ आणि अशा रितीने मी त्याच्या तावडीतून सुटलो.