इफिसकर यांना पत्र
३ त्यामुळे, मी पौल ख्रिस्त येशूसाठी आणि तुम्हा विदेश्यांसाठी कैदेत आहे.+ २ तुमच्यासाठी देवाच्या अपार कृपेचा कारभार+ जो माझ्यावर सोपवण्यात आला होता, त्याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. ३ म्हणजे, मला एक पवित्र रहस्य प्रकट करण्यात आलं आणि त्याबद्दल मी याआधी थोडक्यात लिहिलंसुद्धा होतं. ४ त्यामुळे तुम्ही हे वाचाल, तेव्हा ख्रिस्ताच्या पवित्र रहस्याबद्दल माझ्या ज्ञानाची तुम्हाला कल्पना येईल.+ ५ पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे रहस्य माणसांना कळवण्यात आलं नव्हतं, जसं ते आज देवाच्या पवित्र शक्तीद्वारे* पवित्र प्रेषितांना आणि संदेष्ट्यांना प्रकट करण्यात आलं आहे.+ ६ ते असं, की विदेशी लोकांनीही ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात यावं आणि आनंदाच्या संदेशाद्वारे सहवारस आणि एकाच शरीरातले अवयव,+ तसंच, आमच्यासोबत अभिवचनाचे भागीदार व्हावं. ७ देवाने मला त्याच्या सामर्थ्याच्या कार्याद्वारे, त्याच्या अपार कृपेचं मोफत दान दिल्यामुळे मी या पवित्र रहस्याचा सेवक बनलो.+
८ मी जो पवित्र जनांपैकी सगळ्यात लहानापेक्षा लहान आहे,+ त्या माझ्यावर ही अपार कृपा करण्यात आली.+ हे यासाठी, की मी ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या असंख्य आशीर्वादांबद्दलचा आनंदाचा संदेश विदेश्यांना सांगावा. ९ तसंच, सगळ्या गोष्टी निर्माण करणाऱ्या देवाने जे पवित्र रहस्य+ बऱ्याच काळांपासून लपवून ठेवलं आहे, ते प्रकट करण्याची व्यवस्था कशा प्रकारे पार पाडण्यात आली, हे मी सगळ्यांना समजावून सांगावं. १० हे यासाठी, की आता मंडळीद्वारे+ स्वर्गातल्या शासनांना आणि अधिकारांना, वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट होणारी देवाची बुद्धी कळवण्यात यावी.+ ११ देवाने ख्रिस्ताच्या, म्हणजेच आपल्या प्रभू येशूच्या बाबतीत केलेल्या त्याच्या सर्वकाळाच्या उद्देशाप्रमाणे हे आहे.+ १२ ख्रिस्ताद्वारेच आपण मोकळेपणाने बोलू शकतो आणि त्याच्यावरच्या आपल्या विश्वासामुळेच आपण धैर्याने देवासमोर जाऊ शकतो.+ १३ म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो, की तुमच्यासाठी मला जी संकटं सोसावी लागत आहेत त्यांमुळे खचून जाऊ नका. कारण ही संकटं तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.+
१४ याच कारणामुळे मी त्या पित्यासमोर गुडघे टेकतो, १५ ज्याच्याकडून स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रत्येक कुटुंबाला नाव मिळालं आहे. १६ मी प्रार्थना करतो, की त्याच्या अपार गौरवाद्वारे त्याने तुम्हाला असं दान द्यावं, की तुमचा आतला माणूस+ त्याच्या पवित्र शक्तीच्या सामर्थ्याने दिवसेंदिवस शक्तिशाली होत जावा. १७ आणि तुमच्या विश्वासाद्वारे, प्रेमाने भरलेल्या तुमच्या मनात ख्रिस्ताने राहावं.+ तसंच, तुम्ही विश्वासाच्या पायावर मुळावलेलं+ आणि स्थिरावलेलं असावं.+ १८ हे यासाठी, की तुम्ही सगळ्या पवित्र जनांसोबत सत्याची रुंदी, लांबी, उंची आणि खोली पूर्णपणे समजून घेण्यासाठी सर्व प्रकारे समर्थ व्हावं; १९ आणि ख्रिस्ताचं प्रेम,+ जे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे ते तुम्ही जाणून घ्यावं. हे यासाठी, की देवाकडून मिळणाऱ्या पूर्णतेने तुम्ही भरून जावं.
२० देव आपल्यामध्ये कार्य करत असलेल्या त्याच्या सामर्थ्याद्वारे,+ आपण मागितलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टींपेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रमाणात आपल्यासाठी करू शकतो.+ २१ त्या देवाला मंडळीद्वारे आणि ख्रिस्त येशूद्वारे युगानुयुग सदासर्वकाळ गौरव मिळत राहो. आमेन.