याकोब याचं पत्र
३ माझ्या बांधवांनो, तुमच्यापैकी पुष्कळ जणांनी शिक्षक होऊ नये. कारण आपला जास्त कडकपणे न्याय केला जाईल हे आपल्याला माहीत आहे.+ २ मुळात आपण सगळेच बऱ्याच वेळा चुकतो.*+ जर कोणी बोलण्यात चुकत नसेल, तर तो माणूस परिपूर्ण आहे आणि तो आपल्या संपूर्ण शरीराला ताब्यात ठेवू शकतो.* ३ आपण घोड्यांना आपल्या मनासारखं वागवण्यासाठी त्यांच्या तोंडात लगाम घालून त्यांच्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. ४ तसंच जहाजांचाही विचार करा: ती खूप मोठी असतात आणि जोरदार वाऱ्यांनी लोटली जातात. तरी, जहाजाचा चालक अगदी लहानशा सुकाणूने हव्या त्या दिशेला ते वळवतो.
५ त्याचप्रमाणे, जीभसुद्धा शरीराचा अगदी लहानसा अवयव असूनही मोठमोठ्या गोष्टी करते. पाहा, लहानशा ठिणगीने मोठ्या जंगलात केवढा वणवा पेटतो! ६ जीभसुद्धा आगच आहे.+ शरीराच्या सगळ्या अवयवांपैकी जीभ ही सर्व अनीतीचं मूळ* आहे. कारण ती सबंध शरीराला दूषित करते+ आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते आणि गेहेन्नाच्या* आगीप्रमाणे सर्वनाश करते. ७ कारण सर्व प्रकारची जंगली जनावरं आणि पक्षी, सरपटणारे प्राणी आणि समुद्रातले जीव यांना वश केलं जाऊ शकतं आणि माणसाने त्यांना वश केलंही आहे. ८ पण, जिभेला मात्र कोणताही माणूस वश करू शकत नाही. ती अनावर आणि घातक असून जीवघेण्या विषाने भरलेली आहे.+ ९ याच जिभेने आपण आपला पिता, यहोवा* याची स्तुती करतो आणि “देवाच्या प्रतिरूपात” निर्माण करण्यात आलेल्या+ माणसांना शिव्याशापही देतो. १० एकाच तोंडातून आशीर्वाद आणि शाप दोन्ही निघतात.
माझ्या बांधवांनो, असं घडत राहणं योग्य नाही.+ ११ एकाच झऱ्यातून गोड आणि कडू पाणी कधीच निघत नाही, निघतं का? १२ माझ्या बांधवांनो, अंजिराच्या झाडाला जैतून किंवा द्राक्षवेलीला अंजीर कधीच येणार नाहीत, येतील का?+ शिवाय, खाऱ्या पाण्यातून गोड पाणी कधीही मिळू शकत नाही.
१३ तुमच्यापैकी बुद्धिमान आणि समजदार कोण आहे? त्याने बुद्धीमुळे उत्पन्न होणाऱ्या सौम्यतेने चांगली कार्यं करून आपल्या वागणुकीतून हे दाखवावं. १४ पण, तुमच्या मनात तीव्र ईर्ष्या+ आणि द्वेष*+ असेल, तर बढाई मारू नका+ आणि सत्याच्या विरोधात खोटं बोलू नका. १५ ही वरून येणारी बुद्धी नाही, तर या जगाची,+ शारीरिक आणि सैतानी बुद्धी आहे. १६ कारण जिथे ईर्ष्या आणि द्वेष* असतो, तिथे अव्यवस्था आणि प्रत्येक वाईट गोष्टही असते.+
१७ पण वरून येणारी बुद्धी ही सर्वात आधी शुद्ध,+ मग शांतिप्रिय,+ समजूतदार,+ आज्ञाधारक, दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण,+ सर्वांना समान लेखणारी*+ आणि निष्कपट असते.+ १८ शिवाय, नीतिमत्त्वाचं बी शांतिपूर्ण परिस्थितीत पेरलं जातं+ आणि शांतीसाठी झटणाऱ्यांना त्याचं फळ मिळतं.+