लूकने सांगितलेला संदेश
४ मग पवित्र शक्तीने* परिपूर्ण होऊन येशू यार्देन नदीजवळून निघाला आणि पवित्र शक्तीने त्याला ओसाड रानात नेलं.+ २ तो ४० दिवस तिथे होता. त्यादरम्यान, सैतानाने* त्याची परीक्षा घेतली.+ येशूने काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे ते दिवस संपल्यावर त्याला भूक लागली. ३ तेव्हा सैतान त्याला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर या दगडाला भाकर व्हायला सांग.” ४ पण येशूने उत्तर दिलं: “‘माणसाने फक्त भाकरीनेच जगू नये,’ असं लिहिलंय.”+
५ मग, सैतानाने येशूला एका उंच ठिकाणी नेलं आणि एका क्षणात त्याला जगातली सगळी राज्यं दाखवली.+ ६ तो त्याला म्हणाला: “या सर्वांवरचा अधिकार आणि यांचं वैभव मी तुला देईन. कारण हे सगळं मला सोपवण्यात आलंय+ आणि मला वाटेल त्याला मी ते देतो. ७ त्यामुळे, तू जर एकदा माझी उपासना केलीस, तर हे सगळं तुझं होईल.” ८ येशूने त्याला उत्तर दिलं: “असं लिहिलंय, की ‘तू फक्त तुझा देव यहोवा* याचीच उपासना कर आणि फक्त त्याचीच पवित्र सेवा कर.’”+
९ नंतर, सैतानाने येशूला यरुशलेममध्ये नेलं आणि मंदिराच्या भिंतीवर एका उंच ठिकाणी उभं केलं. मग तो त्याला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर इथून खाली उडी टाक.+ १० कारण असं लिहिलंय, की ‘तो आपल्या स्वर्गदूतांना तुला वाचवायची आज्ञा देईल.’ ११ आणि, ‘तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून घेतील.’”+ १२ तेव्हा, येशूने त्याला उत्तर दिलं: “असं म्हटलंय, की ‘तुझा देव यहोवा* याची परीक्षा पाहू नकोस.’”+ १३ मग या सगळ्या परीक्षा घेऊन झाल्यावर सैतान योग्य संधी मिळेपर्यंत त्याला सोडून निघून गेला.+
१४ नंतर, येशू पवित्र शक्तीच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला.+ तेव्हा आसपासच्या सगळ्या प्रदेशांत त्याच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टींची चर्चा होऊ लागली. १५ मग तो त्यांच्या सभास्थानांत शिकवू लागला आणि सगळे लोक त्याची प्रशंसा करू लागले.
१६ त्यानंतर तो नासरेथला गेला.+ तो तिथेच लहानाचा मोठा झाला होता. शब्बाथाच्या दिवशी, तो आपल्या रिवाजाप्रमाणे सभास्थानात गेला+ आणि वाचायला उभा राहिला. १७ तेव्हा यशया संदेष्ट्याची गुंडाळी त्याच्या हातात देण्यात आली आणि त्याने गुंडाळी उघडून तो भाग काढला, जिथे असं लिहिलं होतं: १८ “यहोवाची* पवित्र शक्ती माझ्यावर आहे, कारण गरिबांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी त्याने माझा अभिषेक केलाय. बंदिवानांना सुटका मिळण्याबद्दल आणि आंधळ्यांना दृष्टी परत मिळण्याबद्दल जाहीर करायला, तसंच जुलूम सहन करणाऱ्यांची सुटका करायला+ १९ आणि यहोवाची* कृपा मिळवायचं वर्ष घोषित करायला त्याने मला पाठवलंय.”+ २० मग त्याने ती गुंडाळी गुंडाळून सेवकाला दिली आणि तो खाली बसला. त्या वेळी सभास्थानांतल्या सगळ्या लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. २१ मग तो त्यांना म्हणाला: “तुम्ही नुकतंच ऐकलेलं हे वचन आज पूर्ण झालंय.”+
२२ तेव्हा ते सगळे त्याची प्रशंसा करू लागले आणि त्याच्या तोंडून निघणारे सुंदर शब्द ऐकून थक्क झाले+ आणि म्हणाले: “हा योसेफचाच मुलगा ना?”+ २३ यावर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही निश्चितच ही म्हण मला लागू कराल, की ‘अरे वैद्या, स्वतःचा इलाज कर. आणि कफर्णहूममध्ये ज्या गोष्टी घडल्याचं आम्ही ऐकलंय, त्या गोष्टी इथे तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.’”+ २४ मग तो पुढे म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, की कोणत्याही संदेष्ट्याला त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारलं जात नाही.+ २५ उदाहरणार्थ, मी तुम्हाला खातरीने सांगतो: एलीयाच्या काळात, जेव्हा साडेतीन वर्षं पाऊस पडला नाही आणि पूर्ण देशात मोठा दुष्काळ पडला,+ तेव्हा इस्राएलमध्ये कित्येक विधवा होत्या. २६ तरीसुद्धा, एलीयाला त्या स्त्रियांपैकी कोणाकडेही पाठवण्यात आलं नाही. तर, फक्त सीदोन देशातल्या सारफथच्या एका विधवेकडे त्याला पाठवण्यात आलं.+ २७ तसंच, अलीशा संदेष्ट्याच्या काळातसुद्धा इस्राएलमध्ये बरेच कुष्ठरोगी होते. पण, त्यांच्यापैकी कोणालाही शुद्ध* करण्यात आलं नाही. तर, फक्त सीरिया देशातल्या नामानला शुद्ध करण्यात आलं.”+ २८ हे ऐकून सभास्थानातले सगळे लोक संतापले.+ २९ ते उठले आणि त्यांनी लगेच त्याला शहराबाहेर नेऊन, ज्या डोंगरावर त्यांचं शहर बांधलेलं होतं त्याच्या कड्याजवळ आणलं. तिथून त्याला खाली ढकलून द्यायची त्यांची इच्छा होती. ३० पण, तो त्यांच्या तावडीतून निसटला आणि आपल्या मार्गाने निघून गेला.+
३१ नंतर तो खाली, गालीलमधल्या कफर्णहूम या शहरात गेला. आणि शब्बाथाच्या दिवशी तो लोकांना शिकवू लागला.+ ३२ त्याची शिकवण्याची पद्धत पाहून ते थक्क झाले,+ कारण तो अधिकार असलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांना शिकवत होता. ३३ तेव्हा, दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलेला एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला:+ ३४ “हे नासरेथच्या येशू,+ आमचं तुझ्याशी काय घेणंदेणं? तू काय आमचा नाश करायला आला आहेस? तू कोण आहेस हे मला चांगलं माहीत आहे. तू देवाचा पवित्र सेवक आहेस!”+ ३५ पण, येशूने त्याला धमकावून म्हटलं: “शांत राहा आणि त्याच्यातून बाहेर निघ!” तेव्हा, त्या दुष्ट स्वर्गदूताने सगळ्या लोकांसमोर त्या माणसाला खाली पाडलं आणि त्याला कोणतीही इजा न करता तो त्याच्यातून निघाला. ३६ हे पाहून ते सगळे चकित झाले आणि एकमेकांना म्हणू लागले: “हा किती अधिकाराने बोलतो आणि याच्याजवळ किती सामर्थ्य आहे! हा दुष्ट स्वर्गदूतांनासुद्धा आज्ञा देतो आणि तेही लगेच त्याचं ऐकतात!” ३७ त्यामुळे आसपासच्या प्रदेशाच्या कानाकोपऱ्यांत त्याच्याबद्दल चर्चा होऊ लागली.
३८ मग सभास्थानातून निघाल्यावर तो शिमोनच्या घरी गेला. तिथे शिमोनची सासू तीव्र तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरं करायची त्याला विनंती केली.+ ३९ म्हणून, त्याने तिच्याजवळ उभं राहून तापाला दटावलं आणि तिचा ताप उतरला. तेव्हा, ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली.
४० मग सूर्य मावळू लागला तेव्हा लोकांनी वेगवेगळ्या आजारांनी पीडित असलेल्या आपल्या घरच्यांना त्याच्याजवळ आणलं आणि त्याने प्रत्येकावर हात ठेवून त्या सगळ्यांना बरं केलं.+ ४१ तेव्हा पुष्कळ लोकांमधून दुष्ट स्वर्गदूत असं म्हणत बाहेर निघाले, की “तू देवाचा मुलगा आहेस.”+ पण, त्याने त्यांना दटावून एकही शब्द बोलू दिला नाही.+ कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहीत होतं.+
४२ मग पहाटे तो एका एकांत ठिकाणी निघून गेला.+ पण लोकांचा समुदाय त्याला शोधत तिथे आला आणि त्याने त्यांना सोडून जाऊ नये, म्हणून लोक त्याला अडवायचा प्रयत्न करू लागले. ४३ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “मला इतर शहरांतही देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवण्यात आलंय.”+ ४४ मग तो जाऊन यहूदीयाच्या सभास्थानांत प्रचार करू लागला.