उपदेशक
८ बुद्धिमान माणसासारखं कोण आहे? समस्येवरचा उपाय* कोणाला माहीत असतो? बुद्धीमुळे माणसाच्या चेहऱ्यावर तेज येतं आणि त्याचा कठोर चेहरा आनंदी दिसू लागतो.
२ मी म्हणतो: “देवाला दिलेल्या शपथेचा+ आदर करून राजाच्या आज्ञा पाळ.+ ३ त्याच्यासमोरून निघून जाण्याची घाई करू नकोस.+ वाईट गोष्टींमध्ये सामील होऊ नकोस;+ कारण त्याला वाटेल तसं तो करू शकतो. ४ राजाचा शब्द पाळावाच लागतो;+ ‘तू हे काय करतोस?’ असं त्याला कोण म्हणू शकतं?”
५ जो आज्ञा पाळतो त्याचं नुकसान होणार नाही.+ कोणत्या वेळी कसं वागायचं, हे बुद्धिमान माणसाला माहीत असतं.+ ६ माणसांना बऱ्याच समस्या असल्या, तरी प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ आणि पद्धत असते.+ ७ काय होणार, हे कोणालाही माहीत नसतं; मग ते कसं होणार, हे त्याला कोण सांगू शकतं?
८ जसं कोणत्याही माणसाचं आपल्या प्राणावर* नियंत्रण नसतं आणि तो त्याला रोखू शकत नाही, तसंच मरणाच्या दिवसावरही त्याची सत्ता नसते.+ जसं युद्धातून परत जाण्याची परवानगी दिली जात नाही, तसंच दुष्टता करणारे तिच्या परिणामांपासून वाचू शकत नाहीत.*
९ मी हे सर्व पाहिलं आणि सूर्याखाली केल्या जाणाऱ्या सर्व कामांवर मनापासून विचार केला. या सबंध काळात माणसाने माणसावर अधिकार गाजवून त्याचं नुकसान* केलं आहे.+ १० मी अशा दुष्टांना पुरलं जाताना पाहिलं, जे पवित्र ठिकाणात ये-जा करायचे. पण ज्या शहरात ते दुष्टपणा करायचे, त्या शहरातले लोक त्यांना लगेच विसरून गेले.+ हेही व्यर्थच आहे.
११ वाईट कृत्याबद्दल लगेच शिक्षा दिली जात नाही,+ तेव्हा माणसांचं मन आणखी वाईट करण्याचं धाडस करतं.+ १२ पापी माणूस शंभर वेळा वाईट कृत्यं करूनही बरीच वर्षं जगला, तरी जे खऱ्या देवाचं भय मानतात त्यांचं भलं होतं, हे मला माहीत आहे; कारण ते खरंच त्याचं भय मानतात.+ १३ पण दुष्टाचं भलं होणार नाही+ आणि सावलीसारखं असलेलं त्याचं आयुष्य तो वाढवू शकणार नाही,+ कारण तो देवाचं भय मानत नाही.
१४ या पृथ्वीवर एक व्यर्थ* गोष्ट घडते: काही नीतिमान माणसांशी असा व्यवहार केला जातो, जणू काही त्यांनी दुष्टता केली आहे.+ आणि काही दुष्टांशी असा व्यवहार केला जातो, जणू काही ते नीतीने वागले आहेत.+ मी म्हणतो, हेही व्यर्थच आहे.
१५ म्हणून मी आनंदी राहण्याचा सल्ला देतो.+ कारण माणसाने खावं-प्यावं आणि आनंदी राहावं, हीच त्याच्यासाठी सूर्याखाली सर्वात चांगली गोष्ट आहे. खऱ्या देवाने त्याला सूर्याखाली दिलेल्या आयुष्यात मेहनत करत असताना, त्याने हेही करावं.+
१६ मी बुद्धी मिळवण्याकडे आणि पृथ्वीवर होणाऱ्या सर्व कामांचं* परीक्षण करण्याकडे आपलं मन लावलं.+ कधीकधी तर मी रात्रंदिवस झोपत नव्हतो.* १७ मग मी खऱ्या देवाच्या सर्व कार्यांवर विचार केला आणि मला जाणीव झाली, की सूर्याखाली जे काही घडतं, ते मानवांना समजू शकत नाही.+ माणसांनी कितीही प्रयत्न केला, तरी त्यांना ते समजू शकत नाही. ती कार्यं जाणून घेण्याइतके आम्ही बुद्धिमान आहोत, असा त्यांनी दावा केला, तरीही त्यांना ती अजिबात समजू शकत नाहीत.+