१ शमुवेल
१२ शेवटी शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला: “हे पाहा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही केलंय आणि तुमच्यावर शासन करायला एक राजा नेमलाय.+ २ आता हा तुमचा राजा तुमचं नेतृत्व करेल!+ मी तर आता म्हातारा झालोय आणि माझे केसही पिकलेत. पाहा, माझी मुलं तुमच्यामध्ये आहेत,+ आणि मी लहानपणापासून आजपर्यंत तुमचं मार्गदर्शन केलंय.+ ३ मी आता तुमच्यासमोर उभा आहे. माझ्याविरुद्ध कोणाची काही तक्रार असेल, तर त्याने यहोवासमोर आणि त्याच्या अभिषिक्तासमोर बोलावं.+ मी कधी कोणाचा बैल किंवा गाढव घेतलं का?+ कधी कोणाला फसवलंय का, किंवा कोणावर जुलूम केलाय का? किंवा मग, एखाद्यावर अन्याय करण्यासाठी मी कधी कोणाकडून लाच घेतली का?+ मी असं काही केलं असेल, तर त्याची भरपाई मी करीन.”+ ४ त्यावर ते म्हणाले: “तू कधीही आम्हाला फसवलं नाहीस किंवा आमच्यावर जुलूम केला नाहीस. आणि कधीच कोणाकडून काही घेतलं नाहीस.” ५ तेव्हा शमुवेल त्यांना म्हणाला: “तुम्हाला माझ्यामध्ये दोष लावण्यासारखं काहीही आढळलं नाही, आणि यहोवा व त्याचा अभिषिक्त आज याचे साक्षीदार आहेत.” त्यावर ते म्हणाले: “हो, तो साक्षीदार आहे.”
६ मग शमुवेल लोकांना म्हणाला: “ज्याने मोशेला व अहरोनला निवडलं आणि तुमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून बाहेर आणलं,+ तो यहोवा याचा साक्षीदार आहे. ७ तर आता पुढे या. म्हणजे यहोवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या वाडवडिलांसाठी जी नीतीची कार्यं केली, त्यांच्या आधारावर मी यहोवासमोर तुमचा न्याय करीन.
८ याकोब जेव्हा इजिप्तमध्ये गेला+ आणि तुमचे वाडवडील मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले,+ तेव्हा इजिप्तमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि हा देश त्यांना देण्यासाठी+ यहोवाने मोशेला आणि अहरोनला पाठवलं होतं.+ ९ पण तुमचे वाडवडील आपल्या देवाला, यहोवाला विसरून गेले. म्हणून त्याने त्यांना हासोरचा सेनापती सीसरा,+ तसंच पलिष्टी लोक+ आणि मवाबचा राजा+ यांच्या हाती दिलं;*+ आणि त्यांचे हे शत्रू त्यांच्याशी लढले. १० तेव्हा ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले+ आणि म्हणाले: ‘आम्ही पाप केलंय.+ आम्ही यहोवाला सोडून बआल दैवतांची+ आणि अष्टारोथच्या मूर्तींची उपासना केली.+ आता आमच्या शत्रूंपासून आमची सुटका कर, म्हणजे आम्ही तुझी उपासना करू.’ ११ मग यहोवाने यरुब्बाल,+ बदान, इफ्ताह+ आणि शमुवेल+ यांना पाठवलं. आणि तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून तुमच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून त्याने तुमची सुटका केली.+ १२ पुढे अम्मोनी लोकांचा राजा नाहाश+ तुमच्याशी लढाई करायला आला हे पाहून तुम्ही मला म्हणत राहिलात: ‘ते काही नाही, आम्हाला राजा पाहिजे म्हणजे पाहिजे!’+ तुमचा देव यहोवा तुमचा राजा असतानाही+ तुम्ही सारखं-सारखं हेच म्हणत राहिलात. १३ तर आता बघा, तुम्हाला जो राजा हवा होता, जो राजा तुम्ही मागितला होता तो तुमच्यासमोर आहे. पाहा! यहोवाने त्याला तुमचा राजा म्हणून नेमलंय.+ १४ तुम्ही जर यहोवाची भीती बाळगली,+ त्याची उपासना केली+ आणि त्याचं ऐकलं;+ तसंच, यहोवाच्या आज्ञेविरुद्ध जाऊन तुम्ही बंड केलं नाही; आणि तुम्ही व तुमचा राजा यहोवाच्या मार्गावर चालत राहिलात, तर ही चांगली गोष्ट आहे. १५ पण जर तुम्ही यहोवाचं ऐकलं नाही आणि यहोवाच्या आज्ञेविरुद्ध जाऊन बंड केलं, तर यहोवा तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना शिक्षा देईल.+ १६ तर आता पुढे या. आणि यहोवा तुमच्या डोळ्यांसमोर जी अद्भुत गोष्ट करणार आहे ती पाहा. १७ सध्या गव्हाच्या कापणीचा काळ चालू आहे ना? पण बघा, मी यहोवाला अशी विनंती करतो, की त्याने ढगांचा गडगडाट करावा आणि पाऊस पाडावा. मग तुम्हाला कळून येईल, की आपल्यासाठी राजाची मागणी करून तुम्ही यहोवाच्या नजरेत किती वाईट काम केलंय.”+
१८ मग शमुवेलने यहोवाला प्रार्थना केली. आणि त्या दिवशी यहोवाने ढगांचा मोठा गडगडाट करून पाऊस पाडला. त्यामुळे सगळ्या लोकांना यहोवाची आणि शमुवेलची मोठी दहशत बसली. १९ आणि ते शमुवेलला म्हणू लागले: “आपल्या या सेवकांसाठी तुझा देव यहोवा याला प्रार्थना कर,+ म्हणजे आम्ही मरणार नाही. कारण राजाची मागणी करून आम्ही खरंच वाईट काम केलंय आणि स्वतःच्या पापांत आणखी भर घातली आहे.”
२० तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला: “घाबरू नका. हे खरंय की तुम्ही वाईट काम केलंय. पण आता यहोवाच्या मार्गावर चालण्याचं सोडू नका.+ पूर्ण मनाने यहोवाची उपासना करत राहा.+ २१ ज्या निरर्थक* गोष्टींपासून काहीएक फायदा होत नाही,+ आणि ज्या तुम्हाला वाचवू शकत नाहीत त्यांच्यामागे लागू नका.+ कारण त्या निरर्थक* आहेत. २२ यहोवाने स्वतः तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडलंय.+ त्यामुळे यहोवा आपल्या महान नावासाठी+ कधीही त्याच्या लोकांचा त्याग करणार नाही.+ २३ माझ्या बाबतीत म्हणाल, तर तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचं सोडून द्यायचा मी विचारसुद्धा करू शकत नाही; कारण तसं करणं हे यहोवाविरुद्ध पाप करण्यासारखं ठरेल. मी पुढेही तुम्हाला चांगल्या आणि योग्य मार्गावर चालत राहण्याचं मार्गदर्शन देईन. २४ तुम्ही फक्त यहोवाची भीती बाळगा+ आणि विश्वासूपणे* व पूर्ण मनाने त्याची उपासना करा. कारण पाहा, त्याने तुमच्यासाठी किती महान गोष्टी केल्या आहेत!+ २५ पण तुम्ही जर निर्लज्जपणे वाईट गोष्टी करत राहिलात, तर तुमचा आणि तुमच्या राजाचा,+ दोघांचाही नाश केला जाईल.”+