१ शमुवेल
१४ एक दिवस शौलचा मुलगा योनाथान+ आपली शस्त्रं वाहणाऱ्या सेवकाला म्हणाला: “चल, आपण पलीकडे पलिष्टी सैनिकांच्या चौकीकडे जाऊ.” पण याबद्दल त्याने आपल्या वडिलांना काहीही सांगितलं नाही. २ त्या वेळी शौल गिबा+ शहराच्या बाहेर मिग्रोन इथे डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता. आणि त्याच्यासोबत जवळजवळ ६०० माणसं होती.+ ३ (त्या वेळी, अहीटूबचा+ मुलगा अहीया याने एफोद वस्त्र+ घातलं होतं. अहीटूब हा ईखाबोदचा+ भाऊ आणि फिनहासचा+ मुलगा होता. तर, फिनहास हा शिलो+ इथे याजक म्हणून यहोवाची सेवा करणाऱ्या एलीचा+ मुलगा होता.) पण योनाथान गेला आहे हे त्या माणसांना माहीत नव्हतं. ४ पलिष्टी सैनिकांच्या चौकीकडे जाण्यासाठी योनाथान ज्या घाटामधून जात होता, त्याच्या दोन्ही बाजूंना दोन सुळके* होते. एकाचं नाव बोसेस, तर दुसऱ्याचं नाव सेने असं होतं. ५ एक सुळका उत्तरेकडे मिखमाशसमोर खांबासारखा उभा होता आणि दुसरा सुळका दक्षिणेकडे गेबासमोर+ होता.
६ योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला: “चल, आपण पलीकडे त्या सुंता न झालेल्या+ माणसांच्या चौकीकडे जाऊ. कदाचित यहोवा त्यांना आपल्या हाती देईल. कारण, यहोवाला जर आपल्याला विजय मिळवून द्यायचा असेल, तर कोणतीही गोष्ट त्याला रोखू शकत नाही; मग आपण जास्त असोत किंवा कमी.”+ ७ त्यावर त्याचा शस्त्रवाहक त्याला म्हणाला: “तुझ्या मनाला जसं योग्य वाटतं तसं कर. तू म्हणशील तिथे आपण जाऊ. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या मागे येईन.” ८ मग योनाथान त्याला म्हणाला: “चल, आपण पलीकडे त्या माणसांकडे जाऊ, म्हणजे ते आपल्याला पाहतील. ९ ते जर आपल्याला म्हणाले, की ‘तिथेच थांबा! आम्ही येतो तिकडे,’ तर मग आपण तिथेच थांबायचं. वरती त्यांच्याकडे जायचं नाही. १० पण ते जर म्हणाले, की ‘या, आमच्यावर हल्ला करा!’ तर आपण वर त्यांच्याकडे जाऊ. कारण यहोवा नक्की त्यांना आपल्या हाती देईल, याची ती खूण असेल.”+
११ मग ते दोघं पलिष्टी सैनिकांच्या चौकीकडे, दिसेल अशा ठिकाणी जाऊन उभे राहिले. त्यांना पाहताच पलिष्टी सैनिक म्हणाले: “ते पाहा! बिळांत लपून बसलेली ती इब्री माणसं आता बाहेर यायला लागली आहेत.”+ १२ तेव्हा चौकीतले सैनिक योनाथानला आणि त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाले: “इथे वर आमच्याकडे या! चांगलाच धडा शिकवतो तुम्हाला!”+ ते ऐकताच योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला: “ये माझ्यामागे. कारण यहोवा नक्कीच त्यांना इस्राएलच्या हाती देईल.”+ १३ मग योनाथान आपल्या हातापायांवर कडा चढून गेला. त्याच्या मागोमाग त्याचा शस्त्रवाहकही गेला. योनाथान पलिष्टी सैनिकांची कत्तल करू लागला. आणि त्याच्यामागे त्याचा शस्त्रवाहक जिवंत राहिलेल्या सैनिकांना ठार मारत गेला. १४ योनाथानने आणि त्याच्या शस्त्रवाहकाने जो पहिला हल्ला केला, त्यात त्यांनी सुमारे अर्ध्या एकर जमिनीच्या पट्ट्यात* जवळजवळ २० माणसांना ठार मारलं.
१५ तेव्हा पलिष्ट्यांच्या छावणीत आणि चौकीत असलेल्या सैनिकांचा, इतकंच नाही तर लूटमार करणाऱ्या टोळ्यांचाही+ थरकाप उडाला. तसंच जमीन हादरू लागली, आणि देवाने सगळ्या पलिष्टी सैनिकांमध्ये मोठी दहशत पसरवली. १६ इकडे, बन्यामीनच्या प्रदेशात गिबामध्ये+ शौलचे जे पहारेकरी होते त्यांनी पाहिलं, की पलिष्टी लोकांच्या छावणीत सगळीकडे खळबळ माजू लागली आहे.+
१७ तेव्हा शौल आपल्यासोबत असलेल्या माणसांना म्हणाला: “लोकांची मोजणी करा आणि आपल्यामधून कोण गेलंय ते बघा.” त्यांनी लोकांना मोजलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की योनाथान आणि त्याचा शस्त्रवाहक त्यांच्यामध्ये नाहीत. १८ शौल मग अहीयाला+ म्हणाला: “खऱ्या देवाच्या कराराची पेटी इथे आण!” (कारण त्या वेळी,* खऱ्या देवाच्या कराराची पेटी इस्राएली लोकांबरोबर होती.) १९ शौल याजकाशी बोलत असताना पलिष्ट्यांच्या छावणीतली खळबळ वाढतच चालली होती. तेव्हा शौल याजकाला म्हणाला: “तू जे करत आहेस ते करायचं थांबव.”* २० मग शौल आणि त्याच्यासोबतचे सर्व सैनिक एकत्र आले आणि युद्ध करायला पलिष्ट्यांच्या छावणीत गेले. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं, की पलिष्टी लोक एकमेकांवरच तलवार चालवत आहेत आणि छावणीत मोठा गोंधळ उडाला आहे. २१ तसंच, जे इब्री लोक आधी पलिष्टयांच्या बाजूने झाले होते आणि पलिष्ट्यांच्या छावणीत गेले होते, ते आता शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांना येऊन मिळत आहेत. २२ पलिष्टी लोकांनी पळ काढला आहे ही गोष्ट जेव्हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात लपून बसलेल्या सर्व इस्राएली माणसांनी+ ऐकली, तेव्हा तेसुद्धा युद्धात उतरले आणि पलिष्टी लोकांचा पाठलाग करू लागले. २३ अशा प्रकारे, यहोवाने त्या दिवशी इस्राएली लोकांना वाचवलं;+ युद्ध थेट बेथ-आवेनपर्यंत+ चाललं.
२४ पण त्या दिवशी इस्राएली माणसं खूप गळून गेली होती. कारण शौलने लोकांना अशी शपथ घातली होती: “संध्याकाळ होण्याआधी आणि मी माझ्या शत्रूंचा सूड घेण्याआधी कोणी अन्नाचा एक कणही खाल्ला तर त्याला शाप लागेल!” त्यामुळे कोणीच काही खाल्लं नव्हतं.+
२५ मग सगळे इस्राएली सैनिक* रानात पोहोचले; तिथे जमिनीवर मध पडला होता. २६ ते रानात पोहोचले तेव्हा जमिनीवर मध ठिबकत असल्याचं त्यांनी पाहिलं. पण कोणीही तो खाल्ला नाही, कारण घातलेल्या शपथेची त्यांना भीती होती. २७ पण आपल्या वडिलांनी लोकांना घातलेल्या शपथेबद्दल योनाथानला काहीच माहीत नव्हतं.+ म्हणून त्याने आपल्या हातातल्या काठीचं टोक पुढे करून मधाच्या पोळ्यात घातलं. मग मध हातात घेऊन त्याने तो खाल्ला तेव्हा त्याचे डोळे टवटवीत झाले. २८ तेव्हा सैनिकांमधल्या एकाने योनाथानला म्हटलं: “तुझ्या वडिलांनी आम्हाला शपथ घालून असं बजावलंय, की ‘आज कोणी अन्नाचा एक कणही खाल्ला तर त्याला शाप लागेल!’+ आणि म्हणून लोक इतके गळून गेले आहेत.” २९ पण योनाथान म्हणाला: “माझ्या वडिलांनी देशावर मोठं संकट आणलंय. मी फक्त थोडासा मध चाखला तर पाहा, माझे डोळे किती टवटवीत झालेत! ३० तर मग शत्रूंकडून मिळालेल्या लुटीतून जर आज लोकांना मनसोक्त खाऊ दिलं असतं, तर किती बरं झालं असतं!+ मग पलिष्ट्यांच्या आणखी कितीतरी लोकांना आपल्याला मारता आलं असतं.”
३१ त्या दिवशी इस्राएली लोक मिखमाशपासून अयालोनपर्यंत+ पलिष्ट्यांना मारत गेले. लोक फार थकून गेले होते. ३२ म्हणून ते अधाशीपणे लुटीच्या मालावर तुटून पडले. त्यांनी गुरंढोरं आणि मेंढरं जमिनीवरच कापली आणि ते रक्तासकट मांस खाऊ लागले.+ ३३ शौलला कोणीतरी सांगितलं: “पाहा! लोक रक्तासकट मांस खाऊन यहोवाविरुद्ध पाप करत आहेत.”+ तेव्हा शौल म्हणाला: “तुम्ही विश्वासघात केलाय. आत्ताच्या आत्ता एक मोठा दगड लोटून इकडे आणा.” ३४ शौल पुढे म्हणाला: “लोकांकडे जा आणि सगळ्यांना सांगा, की ‘प्रत्येकाने आपला बैल किंवा मेंढरू इकडे आणून या दगडावर कापावं आणि मगच ते खावं. पण रक्तासकट मांस खाऊन कोणीही यहोवाविरुद्ध पाप करू नये.’”+ म्हणून त्या रात्री प्रत्येकाने आपापला बैल तिथे आणून कापला. ३५ मग शौलने यहोवासाठी एक वेदी बांधली.+ त्याने यहोवासाठी बांधलेली ही पहिली वेदी होती.
३६ त्यानंतर शौल म्हणाला: “आपण रात्री पलिष्ट्यांचा पाठलाग करू आणि दिवस उजाडेपर्यंत त्यांची लुटालूट करू. त्यांच्यातल्या एकालाही आपण जिवंत सोडायचं नाही.” त्यावर ते म्हणाले: “तुला जसं योग्य वाटतं तसं कर.” मग याजक म्हणाला: “आपण या ठिकाणी खऱ्या देवाचा सल्ला घेऊ.”+ ३७ तेव्हा शौलने देवाला विचारलं: “मी पलिष्ट्यांचा पाठलाग करू का?+ तू त्यांना इस्राएलच्या हाती देशील का?” पण त्या दिवशी देवाने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. ३८ म्हणून शौल म्हणाला: “लोकांच्या सर्व प्रमुखांनो, इकडे या. आणि आज काय पाप घडलंय ते शोधून काढा. ३९ कारण ज्याने इस्राएलला वाचवलं त्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ घेऊन मी सांगतो, की तो माझा स्वतःचा मुलगा योनाथान जरी असला, तरी त्याला मारून टाकलं जाईल.” पण लोकांनी त्याला काहीच उत्तर दिलं नाही. ४० मग तो सर्व इस्राएली लोकांना म्हणाला: “तुम्ही एका बाजूला उभे राहा, आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला उभे राहतो.” त्यावर लोक शौलला म्हणाले: “तुला योग्य वाटतं तसं कर.”
४१ शौल मग यहोवाला म्हणाला: “हे इस्राएलच्या देवा, थुम्मीमच्या साहाय्याने आम्हाला उत्तर दे.”+ तेव्हा योनाथान आणि शौल निवडले गेले, आणि लोक सुटले. ४२ मग शौल म्हणाला: “पाप करणारा मी आहे की माझा मुलगा योनाथान, हे पाहण्यासाठी चिठ्ठ्या टाका.”+ तेव्हा योनाथानच्या नावाची चिठ्ठी निघाली. ४३ मग शौल योनाथानला म्हणाला: “बोल, काय केलंस तू?” त्यावर योनाथान म्हणाला: “मी माझ्या हातातल्या काठीने फक्त थोडासा मध घेऊन चाखला.+ हे पाहा, मी तुमच्यासमोर आहे! मी मरायला तयार आहे!”
४४ तेव्हा शौल म्हणाला: “योनाथान, आता जर तुला मृत्यूची शिक्षा झाली नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो.”+ ४५ पण लोक शौलला म्हणाले: “ज्याने इस्राएलला एवढा मोठा विजय मिळवून दिला,+ त्या योनाथानला आता मृत्यूची शिक्षा होणार का? नाही, असं मुळीच व्हायला नको. जिवंत देव यहोवाची शपथ, त्याच्या केसालाही धक्का लागायला नको. कारण त्याने देवाच्या मदतीनेच आज आपल्याला विजय मिळवून दिलाय!”+ असं म्हणून लोकांनी योनाथानला वाचवलं आणि त्याला मृत्यूची शिक्षा झाली नाही.
४६ त्यानंतर शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग करायचं सोडून दिलं. आणि पलिष्टी लोकही आपल्या प्रदेशात निघून गेले.
४७ शौलने इस्राएलवर आपलं राज्यपद आणखी बळकट केलं. आणि तो आसपासच्या सगळ्या शत्रूंशी लढला. त्याने मवाबी,+ अम्मोनी,+ अदोमी+ आणि पलिष्टी+ लोकांशी, तसंच सोबाच्या+ राजांशी युद्ध केलं. तो जिथे-जिथे गेला तिथे-तिथे त्याने आपल्या शत्रूंना हरवलं. ४८ त्याने मोठ्या शौर्याने लढून अमालेकी+ लोकांवर विजय मिळवला आणि इस्राएलला लुटारूंपासून वाचवलं.
४९ शौलच्या मुलांची नावं योनाथान, इश्वी आणि मलकीशुवा+ अशी होती. त्याला दोन मुलीही होत्या. त्याच्या मोठ्या मुलीचं नाव मेरब,+ तर लहानीचं नाव मीखल+ होतं. ५० शौलच्या बायकोचं नाव अहीनवाम होतं. ती अहीमासची मुलगी होती. शौलच्या सेनापतीचं नाव अबनेर+ होतं. तो शौलचा काका नेर याचा मुलगा होता. ५१ शौलच्या वडिलांचं नाव कीश+ होतं. आणि अबनेरचा पिता नेर+ हा अबीएलचा मुलगा होता.
५२ शौल जिवंत होता तोपर्यंत पलिष्टी लोकांशी त्याचं भयंकर युद्ध होत राहिलं.+ म्हणून एखादा शूर किंवा बलवान माणूस शौलला दिसला, की तो त्याला आपल्या सैन्यात भरती करायचा.+