२ इतिहास
१७ मग आसाच्या जागी त्याचा मुलगा यहोशाफाट+ हा राजा बनला. त्याने इस्राएलमध्ये आपलं राज्यपद मजबूत केलं. २ त्याने यहूदातल्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सैन्यदल तैनात केलं. तसंच, त्याचे वडील आसा यांनी काबीज केलेल्या एफ्राईमच्या सगळ्या शहरांत+ आणि यहूदाच्या प्रदेशात त्याने सैनिकांच्या चौक्या उभारल्या. ३ त्याचा पूर्वज दावीद पूर्वी ज्या मार्गांवर चालला,+ त्याच मार्गांवर यहोशाफाटसुद्धा चालत राहिला, म्हणून यहोवा त्याच्यासोबत होता. यहोशाफाट बआल दैवतांच्या नादी लागला नाही, ४ तर तो आपल्या वडिलांच्या देवाकडे वळला.+ त्याने देवाच्या आज्ञा पाळल्या; इस्राएलचे रितीरिवाज पाळले नाहीत.+ ५ म्हणून यहोवाने त्याचं राज्य मजबूत केलं.+ यहूदातले सगळे लोक त्याच्यासाठी नजराणा आणायचे आणि त्याला भरपूर धनसंपत्ती आणि मानसन्मान मिळाला.+ ६ तो मोठ्या धैर्याने यहोवाच्या मार्गांवर चालत राहिला. त्याने यहूदातली उच्च स्थानं* काढून टाकली+ आणि पूजेचे खांबही* तोडून टाकले.+
७ आपल्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी यहोशाफाटने त्याच्या अधिकाऱ्यांना, म्हणजे बेन-हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया यांना बोलावून घेतलं आणि त्यांना यहूदाच्या शहरांमध्ये शिक्षण देण्यासाठी पाठवलं. ८ त्यांच्यासोबत हे लेवीसुद्धा होते: शमाया, नथन्या, जबद्याह, असाएल, शमीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीयाह आणि तोब-अदोनीया. तसंच अलीशामा आणि यहोराम हे याजकही+ त्यांच्यासोबत होते. ९ ते यहूदातल्या लोकांना यहोवाच्या नियमशास्त्राच्या पुस्तकातून शिकवू लागले.+ त्यांनी यहूदाच्या सर्व शहरांमध्ये जाऊन लोकांना शिकवलं.
१० यहूदाच्या आसपासच्या सगळ्या राज्यांना यहोवाची दहशत बसली. आणि त्यांनी यहोशाफाटशी लढाई केली नाही. ११ पलिष्टी लोकांनी यहोशाफाटला नजराणा* म्हणून भेटवस्तू व पैसे दिले. आणि अरबी लोकांनी त्याला आपल्या कळपांतून ७,७०० एडके आणि ७,७०० बकरे दिले.
१२ यहोशाफाट राजा शक्तिशाली होत गेला+ आणि तो यहूदामध्ये मजबूत किल्ले+ व कोठारांची शहरं बांधत राहिला.+ १३ त्याने यहूदाच्या शहरांमध्ये मोठमोठी कामं हाती घेऊन ती पूर्ण केली. यरुशलेममध्ये त्याच्याकडे बरेच सैनिक आणि शूर योद्धे होते. १४ त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांचे गट हे: यहूदाच्या घराण्यातले हजारांवरचे प्रमुख; पहिला प्रमुख अदनाह आणि त्याच्यासोबत त्याचे ३,००,००० शूर योद्धे.+ १५ त्याच्या खालोखाल, यहोहानान प्रमुख आणि त्याच्यासोबत त्याची २,८०,००० माणसं. १६ त्याच्या खालोखाल जिख्रीचा मुलगा अमसिया आणि त्याच्यासोबत त्याचे २,००,००० शूर योद्धे; अमसिया स्वेच्छेने यहोवाच्या सेवेसाठी पुढे आला होता. १७ तसंच, बन्यामीन+ वंशातला शूर योद्धा एल्यादा आणि त्याच्यासोबत त्याची २,००,००० माणसं; या माणसांकडे धनुष्यं आणि ढाली होत्या.+ १८ त्याच्या खालोखाल यहोजाबाद आणि त्याच्यासोबत युद्धासाठी तयार असलेली त्याची १,८०,००० माणसं. १९ हे सगळे राजाची सेवा करायचे. यांशिवाय, राजाने संपूर्ण यहूदामध्ये तटबंदी असलेल्या शहरांतही सैनिक तैनात केले होते.+