२ इतिहास
१५ मग ओदेदचा मुलगा अजऱ्या याच्यावर देवाची पवित्र शक्ती* आली. २ तेव्हा तो आसाला भेटायला गेला आणि त्याला म्हणाला: “हे आसा! आणि यहूदाच्या व बन्यामीनच्या सर्व लोकांनो! मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही जोपर्यंत यहोवासोबत राहाल, तोपर्यंत तो तुमच्यासोबत राहील.+ आणि तुम्ही त्याला शोधलं, तर तो तुम्हाला सापडेल.+ पण जर तुम्ही त्याला सोडून दिलं, तर तोही तुम्हाला सोडून देईल.+ ३ इस्राएली लोक बऱ्याच काळापर्यंत खऱ्या देवाशिवाय होते. त्यांना शिकवण्यासाठी कोणी याजक नव्हता आणि त्यांच्याकडे नियमशास्त्रही नव्हतं.+ ४ पण संकटात सापडल्यावर ते जेव्हा इस्राएलचा देव यहोवा याच्याकडे आले आणि जेव्हा त्यांनी त्याला शोधलं, तेव्हा त्यांना तो सापडला.+ ५ त्या काळात, सर्व प्रदेशांतल्या लोकांमध्ये इतकी खळबळ माजली होती, की कोणीही सुरक्षितपणे प्रवास करू शकत नव्हतं. ६ एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला आणि एक शहर दुसऱ्या शहराला चिरडून टाकत होतं. कारण देवाने त्यांच्यावर सर्व प्रकारची संकटं आणून त्यांना गोंधळात राहू दिलं होतं.+ ७ पण तुम्ही मात्र हिंमत धरा! खचून जाऊ नका,*+ कारण तुम्हाला तुमच्या कामाचं प्रतिफळ मिळेल.”
८ अजऱ्याचे हे शब्द व ओदेद संदेष्ट्याची भविष्यवाणी ऐकताच, आसाला हिंमत मिळाली. आणि त्याने यहूदा व बन्यामीनच्या संपूर्ण प्रदेशातून, तसंच एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याने काबीज केलेल्या शहरांतून सगळ्या घृणास्पद मूर्ती काढून टाकल्या.+ आणि त्याने यहोवाच्या मंदिराच्या द्वारमंडपासमोर असलेली यहोवाची वेदी दुरुस्त केली.+ ९ मग त्याने यहूदा व बन्यामीन इथल्या सर्व लोकांना आणि एफ्राईम, मनश्शे व शिमोन यांच्या प्रदेशांत राहणाऱ्या विदेशी लोकांना एकत्र जमवलं;+ आसाचा देव यहोवा त्याच्यासोबत आहे, ही गोष्ट पाहून हे विदेशी लोक खूप मोठ्या संख्येने इस्राएल सोडून आले होते आणि आसाच्या बाजूने झाले होते. १० ते सर्व, आसाच्या शासनकाळाच्या १५ व्या वर्षातल्या तिसऱ्या महिन्यात यरुशलेममध्ये एकत्र जमले. ११ मग, लुटून आणलेल्या मालातून त्या दिवशी त्यांनी यहोवाला ७०० गुरंढोरं आणि ७,००० मेंढरं अर्पण केली. १२ यासोबतच त्यांनी असा एक करार केला, की ते आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याला पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने शोधतील.+ १३ आणि जो कोणी इस्राएलचा देव यहोवा याला शोधणार नाही, त्याला मारून टाकलं जाईल; मग तो छोटा असो किंवा मोठा, स्त्री असो किंवा पुरुष.+ १४ त्यांनी मोठ्या आवाजात यहोवासमोर शपथ घेतली आणि कर्णे वाजवून व शिंगं फुंकून आनंदाने जयघोष केला. १५ आपण घेतलेल्या शपथेमुळे सर्व यहूदाने जल्लोष केला. कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने शपथ घेतली होती. त्यांनी देवाला मनापासून शोधलं होतं आणि म्हणून तो त्यांना सापडला होता.+ यहोवा त्यांना सर्व शत्रूंपासून विसावा देत राहिला.+
१६ आसा राजाने आपल्या आजीला, म्हणजे माका+ हिलासुद्धा राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. कारण तिने पूजेच्या खांबाची* उपासना करण्यासाठी एक अश्लील मूर्ती बनवली होती.+ तिने बनवलेली ही मूर्ती आसाने फोडली आणि तिचा चुराडा करून ती किद्रोन खोऱ्यात जाळून टाकली.+ १७ पण इस्राएलमधून+ उपासनेची उच्च स्थानं मात्र काढून टाकण्यात आली नव्हती.+ असं असलं, तरी आसाने आयुष्यभर पूर्ण मनाने* देवाची सेवा केली.+ १८ तसंच, त्याने आणि त्याच्या वडिलांनी पवित्र केलेल्या वस्तू, म्हणजे सोनं, चांदी आणि वेगवेगळी भांडी या सर्व वस्तू त्याने खऱ्या देवाच्या मंदिरात आणल्या.+ १९ आसा राजाच्या शासनकाळाच्या ३५ व्या वर्षापर्यंत देशात युद्ध झालं नाही.+