२ इतिहास
१९ मग यहूदाचा राजा यहोशाफाट सुखरूप* यरुशलेममध्ये आपल्या राजमहालात परत आला.+ २ तेव्हा, दृष्टान्त पाहणाऱ्या हनानीचा+ मुलगा येहू+ हा यहोशाफाट राजाला भेटायला गेला आणि त्याला म्हणाला: “दुष्टाला मदत करणं आणि यहोवाचा द्वेष करणाऱ्यांवर प्रेम करणं तुला योग्य वाटतं का?+ म्हणून आता यहोवाचा राग तुझ्यावर भडकलाय. ३ पण तुझ्यात काही चांगल्या गोष्टी दिसून आल्यात.+ कारण तू देशातून पूजेचे खांब* काढून टाकलेस आणि खऱ्या देवाची सेवा करण्याचा मनाशी ठाम निश्चय केलास.”+
४ यहोशाफाट यरुशलेममध्ये राहायचा. तो पुन्हा बैर-शेबापासून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत राहणाऱ्या लोकांना भेटला.+ आणि त्याने त्यांना आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याच्याकडे परत येण्याचं प्रोत्साहन दिलं.+ ५ त्याने संपूर्ण देशात, म्हणजे यहूदातल्या प्रत्येक तटबंदीच्या शहरात न्यायाधीश नेमले.+ ६ तो न्यायाधीशांना म्हणाला: “तुम्ही जे काही करता ते विचारपूर्वक करा. कारण तुम्ही माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी न्याय करता. आणि तुम्ही जेव्हा न्याय करता, तेव्हा तो तुमच्यासोबत असतो.+ ७ तर आता यहोवाचं भय बाळगा.+ आणि जे काही कराल ते काळजीपूर्वक करा. कारण आपला देव यहोवा हा अन्याय+ आणि पक्षपात करत नाही,+ किंवा लाचसुद्धा घेत नाही.”+
८ यहोशाफाटने यरुशलेममध्येही काही लेव्यांना व याजकांना, तसंच इस्राएलच्या घराण्याच्या काही प्रमुखांना, यहोवाच्या नावाने न्याय करण्यासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांचे खटले सोडवायला नेमलं.+ ९ त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही विश्वासूपणे आणि पूर्ण मनाने* यहोवाचं भय बाळगून असं करा: १० इतर शहरांत राहणारे तुमचे भाऊबंद तुमच्याकडे एखादा खुनाचा खटला घेऊन आले;+ किंवा एखाद्या नियमाबद्दल, आज्ञेबद्दल, कायद्याबद्दल किंवा मग न्याय-निर्णयाबद्दल* प्रश्न विचारायला आले, तर त्यांनी यहोवासमोर दोषी ठरू नये म्हणून त्यांना ताकीद द्या. नाहीतर देवाचा राग तुमच्यावर आणि तुमच्या भाऊबंदांवर भडकेल. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून असं करा. ११ पाहा, मुख्य याजक अमऱ्या याला तुमच्यावर नेमण्यात आलंय. तो तुम्हाला सर्व बाबतींत यहोवाची इच्छा काय आहे ते माहीत करून घ्यायला मदत करेल.+ आणि राजाच्या कामाची देखरेख करण्यासाठी, यहूदाच्या घराण्याचा प्रमुख असलेला इश्माएलचा मुलगा जबद्याह याला नेमण्यात आलंय. आणि लेवी हे तुमच्यासाठी देखरेख करणारे अधिकारी म्हणून सेवा करतील. तेव्हा, हिंमत धरून काम करा! यहोवा भलं करणाऱ्यांसोबत असो.”+