अनुवाद
२२ तुम्हाला तुमच्या भावाचा वाट चुकलेला बैल किंवा मेंढरू दिसलं, तर त्याच्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करू नका.+ त्याला आपल्या भावाकडे नक्की घेऊन जा. २ पण तुमचा भाऊ जवळ राहत नसेल किंवा तो प्राणी कोणाचा आहे हे तुम्हाला माहीत नसेल, तर जोपर्यंत तुमचा भाऊ त्याला शोधत येत नाही, तोपर्यंत त्या प्राण्याला आपल्याच घरी ठेवा. मग तुम्ही तो आपल्या भावाला परत करा.+ ३ तुमच्या भावाचं गाढव, त्याचे कपडे, किंवा त्याचं हरवलेलं काहीही तुम्हाला सापडलं, तर त्याच्या बाबतीत असंच करा. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.
४ जर तुमच्या भावाचं गाढव किंवा बैल तुमच्यासमोर रस्त्यावर पडला, तर तुम्ही मुद्दामहून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही त्या प्राण्याला उभं करण्यासाठी तुमच्या भावाला नक्की मदत करा.+
५ स्त्रीने पुरुषाचे कपडे घालू नयेत किंवा पुरुषाने स्त्रीचे कपडे घालू नयेत. कारण जो कोणी असं करतो, तो तुमचा देव यहोवा याच्या नजरेत घृणास्पद आहे.
६ रस्त्याने जात असताना जर तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर एखाद्या पक्ष्याचं घरटं दिसलं आणि त्यात पिल्लं किंवा अंडी असली आणि जर पिल्लांची आई त्यांच्यावर किंवा अंड्यांवर बसली असली, तर तुम्ही आईला तिच्या पिल्लांसोबत घेऊ नका.+ ७ तुम्ही ती पिल्लं घेऊ शकता पण पिल्लांच्या आईला मात्र नक्की जाऊ द्या. असं केलंत तर तुमचं भलं होईल आणि तुम्हाला मोठं आयुष्य लाभेल.
८ तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा छताला कठडाही बनवा,+ नाहीतर कोणी छतावरून पडलं तर त्याचा रक्तदोष तुमच्या घरावर येईल.
९ तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यात दोन प्रकारची बियाणी पेरू नका,+ नाहीतर तुम्ही पेरलेल्या बियाण्यांपासून जे काही उगवेल ते आणि द्राक्षमळ्याचं उत्पन्नही पवित्र ठिकाणासाठी जप्त केलं जाईल.
१० जमिनीची नांगरणी करताना बैलाला आणि गाढवाला एकत्र जुंपू नका.+
११ लोकर आणि मलमल एकत्र विणून तयार केलेले कपडे घालू नका.+
१२ तुम्ही जे वस्त्र पांघरता, त्याच्या चारही टोकांना गोंडे लावा.+
१३ जर एखादा पुरुष लग्नानंतर आपल्या बायकोशी संबंध ठेवल्यावर तिचा द्वेष करू लागला,* १४ आणि तिच्या चारित्र्याबद्दल भलतेसलते आरोप करून जर तो असं म्हणून तिची बदनामी करू लागला, की ‘मी या स्त्रीशी लग्न केलं, पण तिच्याशी संबंध ठेवल्यावर ती कुमारी नसल्याचं मला कळलं,’ १५ तर तिच्या आईवडिलांनी, ती कुमारी असल्याचा पुरावा शहराच्या फाटकाजवळ बसणाऱ्या वडीलजनांकडे न्यावा. १६ मुलीच्या पित्याने वडीलजनांना म्हणावं, ‘मी या माणसाशी माझ्या मुलीचं लग्न करून दिलं, पण आता त्याला ती नकोशी झाली आहे,* १७ आणि तो तिच्यावर भलतेसलते आरोप लावून म्हणतोय, की “तुमची मुलगी कुमारी नसल्याचं मला कळलंय.” तर हा घ्या पुरावा, माझ्या मुलीच्या कुमारीपणाचा.’ मग त्यांनी शहराच्या वडीलजनांसमोर ते वस्त्र पसरावं. १८ तेव्हा शहराच्या वडीलजनांनी+ त्या माणसाला शिक्षा करावी.+ १९ त्यांनी त्याच्याकडून चांदीचे १०० शेकेल* दंड घ्यावा आणि तो मुलीच्या पित्याला द्यावा, कारण त्या माणसाने इस्राएलच्या कुमारीची बदनामी केली आहे.+ ती पुढेही त्याची बायको राहील आणि तो आयुष्यभर तिला घटस्फोट देऊ शकणार नाही.
२० पण जर त्याचा आरोप खरा ठरला आणि ती मुलगी कुमारी असल्याचा कोणताही पुरावा नसला, २१ तर त्यांनी त्या मुलीला तिच्या पित्याच्या घराच्या प्रवेशाजवळ आणावं आणि तिच्या शहराच्या पुरुषांनी तिला दगडमार करून ठार मारावं. कारण तिने आपल्या पित्याच्या घरात असताना व्यभिचार करून,*+ इस्राएलमध्ये एक लाजिरवाणं कृत्य केलं आहे.+ तुम्ही आपल्यामधून अशा वाईट गोष्टी काढून टाका.+
२२ एखादा पुरुष दुसऱ्या माणसाच्या बायकोशी संबंध ठेवताना सापडला, तर त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीलाही ठार मारलं जावं.+ तुम्ही इस्राएलमधून अशा वाईट गोष्टी काढून टाका.
२३ एखाद्या कुमारीचं लग्न ठरलं असेल आणि ती दुसऱ्या एखाद्या माणसाला शहरात सापडली आणि त्याने तिच्याशी संबंध ठेवले, २४ तर तुम्ही त्या दोघांनाही शहराच्या फाटकाजवळ आणून दगडमार करून ठार मारा. ती मुलगी शहरात असून मदतीसाठी ओरडली नाही म्हणून तिला, आणि त्या माणसाने आपल्या शेजाऱ्याच्या बायकोची अब्रू लुटली म्हणून त्याला ठार मारा.+ तुम्ही आपल्यामधून अशा वाईट गोष्टी काढून टाका.
२५ पण जर त्या माणसाला, ती लग्न ठरलेली मुलगी शहराबाहेर सापडली आणि त्याने बळजबरी करून तिच्याशी संबंध ठेवले, तर फक्त त्या माणसालाच ठार मारलं जावं. २६ त्या मुलीला मात्र काहीही करू नका. तिने मृत्युदंडाची शिक्षा मिळण्यासारखं काहीच केलेलं नाही. एखादा माणूस दुसऱ्यावर हल्ला करून त्याचा खून करतो,+ त्यासारखाच हा प्रकार आहे. २७ कारण त्याने तिला शहराबाहेर गाठलं आणि ती मदतीसाठी ओरडली, पण तिला वाचवण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं.
२८ जिचं अजून लग्न ठरलेलं नाही, अशी कुमारी एखाद्याला सापडली आणि त्याने बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवले आणि ते दोघं पकडले गेले,+ २९ तर त्या माणसाने मुलीच्या वडिलांना चांदीचे ५० शेकेल द्यावेत आणि ती त्याची बायको होईल.+ त्याने तिची अब्रू लुटल्यामुळे, तो तिला आयुष्यभर घटस्फोट देऊ शकणार नाही.
३० कोणीही आपल्या वडिलांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवू नयेत, नाहीतर तो आपल्या वडिलांचा अपमान करेल.+