प्रेषितांची कार्यं
२८ किनाऱ्यावर सुखरूप पोहोचल्यावर आम्हाला समजलं, की त्या बेटाचं नाव मिलिता+ आहे. २ बेटावरचे लोक* आमच्याशी खूप दयाळूपणे* वागले. पाऊस आणि गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवली आणि आमचं सगळ्यांचं स्वागत केलं. ३ पण पौलने काही काटक्या गोळा करून विस्तवात टाकल्या, तेव्हा एक विषारी साप उष्णतेमुळे बाहेर निघाला आणि त्याने पौलच्या हाताला विळखा घातला. ४ बेटावरच्या लोकांनी त्याच्या हातावर लोंबकळत असलेला विषारी साप पाहिला, तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले: “हा माणूस नक्कीच खुनी असावा. म्हणून समुद्रातून सुखरूप वाचल्यावरही न्याय* त्याला जिवंत राहू देत नाही.” ५ पण त्याने तो साप आगीत झटकून टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही. ६ त्यांना वाटत होतं, की आता त्याचं शरीर सुजेल किंवा तो अचानक मरून पडेल. पण पुष्कळ वेळानंतरही त्याला काहीच झालं नाही, तेव्हा त्यांनी आपलं मत बदललं आणि हा एक देव आहे असं ते म्हणू लागले.
७ तिथेच जवळपास, बेटाचा प्रमुख पुब्ल्य याच्या मालकीच्या जमिनी होत्या. त्याने आमचं स्वागत केलं आणि तीन दिवस आमचा पाहुणचार केला. ८ मग असं झालं, की पुब्ल्यचे वडील तापाने आणि जुलाबाने आजारी असल्यामुळे बिछान्यावर पडून होते. पौलने त्यांच्याजवळ जाऊन प्रार्थना केली आणि आपले हात त्यांच्यावर ठेवून त्यांना बरं केलं.+ ९ त्यानंतर, बेटावरचे इतर आजारी लोकही त्याच्याकडे येऊ लागले आणि त्याने त्यांना बरं केलं.+ १० त्यांनी बऱ्याच भेटवस्तू देऊन आमचा सन्मान केला. आम्ही परत प्रवासाला निघालो तेव्हा आम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांनी जहाजात भरल्या.
११ तीन महिन्यांनी, आम्ही आलेक्सांद्रियाच्या एका जहाजाने निघालो. संपूर्ण हिवाळ्यात हे जहाज त्या बेटावरच होतं. जहाजाच्या समोरच्या बाजूला झ्यूसच्या मुलांचं चिन्ह होतं. १२ मग सुराकूस बंदरात नांगर टाकून आम्ही तीन दिवस तिथेच मुक्काम केला. १३ तिथून निघून आम्ही रेगियोन इथे आलो. दुसऱ्या दिवशी, दक्षिणेकडचा वारा वाहू लागल्यामुळे त्याच दिवशी आम्ही पुत्युला इथे पोहोचलो. १४ इथे आमची बांधवांशी भेट झाली आणि त्यांनी आग्रह केल्यामुळे आम्ही सात दिवस त्यांच्याकडे मुक्काम केला. मग आम्ही रोमला जायला निघालो. १५ जेव्हा बांधवांना आम्ही आल्याची बातमी मिळाली, तेव्हा ते अप्पियाची बाजारपेठ आणि तीन धर्मशाळा इथपर्यंत आम्हाला भेटायला आले. त्यांना पाहताच पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला.+ १६ शेवटी आम्ही रोमला पोहोचलो, तेव्हा पौलला एकटं राहायची परवानगी देण्यात आली. आणि त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी एका सैनिकाला नेमण्यात आलं.
१७ पण तीन दिवसांनी, त्याने यहुद्यांमधल्या प्रमुख पुरुषांना आपल्याकडे बोलावून घेतलं. ते सगळे एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, आपल्या लोकांविरुद्ध किंवा आपल्या वाडवडिलांच्या रितीरिवाजांविरुद्ध मी काहीही केलेलं नाही.+ तरीही मला यरुशलेममधून एक कैदी म्हणून रोमी लोकांच्या हाती सोपवण्यात आलं.+ १८ खरंतर, माझी न्यायचौकशी केल्यावर+ मृत्युदंड देण्यासारखं काहीच न सापडल्यामुळे त्यांना माझी सुटका करायची होती.+ १९ पण यहुद्यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यामुळे मला कैसराकडे न्याय मागण्याशिवाय पर्याय नव्हता.+ पण मला माझ्या देशावर काही आरोप लावायचा होता, म्हणून मी हे केलं, असं नाही. २० आणि याच कारणामुळे, मी तुमची भेट घेऊन तुमच्याशी बोलायची विनंती केली. कारण इस्राएलने ज्याची आशा धरली होती, त्याच्यामुळेच आज मी या साखळीने बांधलेलो आहे.”+ २१ ते त्याला म्हणाले: “आम्हाला यहूदीयाहून तुझ्याबद्दल कोणतीच पत्रं आलेली नाहीत. शिवाय, तिथून आलेल्या बांधवांपैकीही कोणी तुझ्याबद्दल काही कळवलं नाही किंवा वाईट बोललं नाही. २२ पण या बाबतीत तुझे विचार तुझ्याकडूनच ऐकणं आम्हाला योग्य वाटतं. कारण सगळीकडे लोक या पंथाविरुद्ध बोलतात,+ हे आम्हाला माहीत आहे.”
२३ मग, त्याला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरवला. आणि तो राहत असलेल्या ठिकाणी आणखी मोठ्या संख्येने लोक जमले. तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याने त्यांना देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष देऊन समजावून सांगितलं. तसंच, त्यांना येशूबद्दल खातरी पटवून देण्यासाठी+ त्याने मोशेच्या नियमशास्त्रातून+ आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांतून+ बरेच पुरावे दिले. २४ त्याने सांगितलेल्या गोष्टींवर काही लोकांनी विश्वास ठेवला. पण इतर जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. २५ त्यांचे आपसातच मतभेद झाल्यामुळे ते निघून जाऊ लागले. तेव्हा पौल त्यांना म्हणाला:
“पवित्र शक्तीने* यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या वाडवडिलांना जे म्हटलं ते योग्यच होतं: २६ ‘या लोकांकडे जाऊन त्यांना सांग: “तुम्ही ऐकाल तर खरं, पण तुम्हाला अर्थ कळणार नाही. आणि तुम्ही पाहाल तर खरं, पण तुम्हाला दिसणार नाही.+ २७ कारण या लोकांची मनं कठोर झाली आहेत, ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये आणि आपल्या कानांनी ऐकू नये. तसंच, त्यांच्या मनाने याचा अर्थ समजून घेऊ नये आणि त्यांनी मागे फिरू नये आणि मी त्यांना बरं करू नये, म्हणून ते असं करतात.” ’+ २८ तेव्हा हे जाणून घ्या, की देवाकडून मिळणाऱ्या तारणाचा संदेश विदेशी लोकांकडे पाठवण्यात आलाय.+ ते नक्कीच तो ऐकतील.”+ २९ *—
३० त्याने भाड्याने घेतलेल्या घरात तो आणखीन दोन वर्षं राहिला.+ तिथे त्याच्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं तो आनंदाने स्वागत करायचा. ३१ तो त्यांना देवाच्या राज्याचा प्रचार करायचा आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अगदी मोकळेपणाने* शिकवायचा.+