फिलिप्पैकर यांना पत्र
३ बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो, की प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा.+ तुम्हाला त्याच-त्याच गोष्टींबद्दल लिहायचा मला कंटाळा येत नाही, कारण त्या तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत.
२ अशुद्ध माणसांपासून* सावध राहा; दुष्ट कामं करणाऱ्यांपासून सावध राहा; जे सुंतेचं* समर्थन करतात* अशांपासून सावध राहा.+ ३ खऱ्या अर्थाने सुंता झालेले आपणच आहोत.+ कारण आपण देवाच्या पवित्र शक्तीने* पवित्र सेवा करतो आणि ख्रिस्त येशूमध्ये अभिमान बाळगतो.+ आणि आपण शारीरिक गोष्टींवर भरवसा ठेवत नाही. ४ अर्थात, शारीरिक गोष्टींवर भरवसा ठेवायला कोणाजवळ कारण असेल, तर ते माझ्याजवळ आहे.
जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल, की त्याच्याजवळ शारीरिक गोष्टींवर भरवसा ठेवायचं कारण आहे, तर माझ्याकडे आणखी जास्त कारणं आहेत: ५ मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला,+ इस्राएल राष्ट्रातला आणि बन्यामीन वंशातला आहे. मी इब्री आईवडिलांपासून जन्मलेला एक इब्री आहे.+ नियमशास्त्राच्या बाबतीत म्हणाल, तर मी एक परूशी आहे.+ ६ आवेशाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर मी मंडळीचा छळ करायचो.+ आणि नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्त्वाच्या बाबतीत म्हणाल, तर मी नियमशास्त्राचं काटेकोर पालन करायचो. ७ तरीसुद्धा, एकेकाळी ज्या गोष्टी माझ्यासाठी फायद्याच्या होत्या, त्यांना मी ख्रिस्तासाठी कवडीमोल लेखलं आहे.*+ ८ इतकंच काय, तर माझा प्रभू ख्रिस्त येशू याच्याबद्दलच्या अनमोल ज्ञानासमोर मी सगळ्या गोष्टींना कवडीमोल लेखतो. त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टींचं नुकसान सहन केलं आहे आणि त्या केरकचरा आहेत असं समजतो. हे यासाठी, की मी ख्रिस्ताला मिळवावं ९ आणि त्याच्यासोबत ऐक्यात असल्याचं दिसून यावं. अर्थात, हे नियमशास्त्राचं पालन करण्याद्वारे मिळणाऱ्या माझ्या स्वतःच्या नीतिमत्त्वामुळे नाही, तर ख्रिस्तावर+ असलेल्या विश्वासाद्वारे+ मिळणाऱ्या, म्हणजेच देवाकडून विश्वासाच्या आधारावर मिळणाऱ्या नीतिमत्त्वामुळे शक्य आहे.+ १० माझा हेतू हाच आहे, की मी स्वतःला त्याच्यासारख्या मृत्यूच्या अधीन करण्याद्वारे+ त्याला आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या* सामर्थ्याला ओळखावं+ आणि त्याच्या दुःखात सहभागी व्हावं.+ ११ हे यासाठी, की कसंही करून, पहिलं पुनरुत्थान* होणाऱ्यांपैकी मी एक असावं.+
१२ मला हे बक्षीस आधीच मिळालं आहे किंवा मी आधीच परिपूर्ण झालो आहे, असं नाही. तर, ज्यासाठी ख्रिस्ताने मला निवडलं+ ते कसंही करून मिळवता यावं, म्हणून मी कसोशीने प्रयत्न करत आहे.+ १३ बांधवांनो, मी ते बक्षीस मिळवलं आहे असं मी मानत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की: मी मागच्या गोष्टी विसरून+ पुढे असलेल्या गोष्टी मिळवायला झटत आहे+ १४ आणि देवाने मला ख्रिस्त येशूद्वारे दिलेल्या स्वर्गातल्या जीवनाचं*+ बक्षीस मिळवायचा कसोशीने प्रयत्न करत आहे.+ १५ त्यामुळे, आपल्यापैकी जे प्रौढ आहेत+ त्यांनी हीच मनोवृत्ती बाळगावी. आणि जर एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनाचा कल वेगळा असेल, तर देव तुम्हाला योग्य मनोवृत्ती प्रकट करेल. १६ म्हणून आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.
१७ बांधवांनो, तुम्ही सर्व जण एकतेने माझं अनुकरण करा.+ आणि आम्ही तुम्हा सर्वांसाठी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे जे चालत आहेत त्यांच्याकडे लक्ष लावा. १८ कारण मी बऱ्याचदा सांगायचो तसंच आताही रडून तेच सांगतो, की असे पुष्कळ आहेत जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे* शत्रू असल्याप्रमाणे वागत आहेत. १९ शेवटी त्यांचा नाश होईल. त्यांचं पोटच त्यांचा देव आहे. त्यांचं वैभव मुळात त्यांची लाज आहे आणि त्यांचं मन पृथ्वीवरच्या गोष्टींकडे लागलेलं आहे.+ २० पण आपलं नागरिकत्व+ मात्र स्वर्गातलं आहे+ आणि आपला तारणकर्ता, जो स्वर्गात आहे त्याची, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.+ २१ त्याच्याकडे सर्व गोष्टी स्वतःच्या अधीन करण्याचं सामर्थ्य आहे.+ त्याच्या या महान शक्तीने तोच आपल्या या दयनीय शरीराचं रूपांतर त्याच्यासारख्या गौरवशाली शरीरात करेल.+