रोमकर यांना पत्र
१० बांधवांनो, इस्राएलचं तारण व्हावं* अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मी देवाकडे याचनासुद्धा करतो.+ २ कारण त्यांच्याबद्दल मी स्वतः साक्ष देतो, की त्यांना देवाबद्दल आवेश तर आहे,+ पण तो अचूक ज्ञानाप्रमाणे नाही. ३ देवाचं नीतिमत्त्व+ न ओळखता स्वतःचंच नीतिमत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे,+ त्यांनी स्वतःला देवाच्या नीतिमत्त्वाच्या अधीन केलं नाही.+ ४ ख्रिस्ताद्वारे नियमशास्त्र पूर्ण झालं,+ यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला नीतिमत्त्व मिळावं.+
५ कारण नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्त्वाबद्दल मोशे असं लिहितो: “जो माणूस या गोष्टी करेल तो त्यांमुळे जगेल.”+ ६ पण विश्वासाद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्त्वाबद्दल असं म्हटलं आहे: “आपल्या मनात असं म्हणू नका,+ की ख्रिस्ताला खाली आणायला ‘स्वर्गात कोण जाईल?’+ ७ किंवा ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणायला ‘अथांग डोहात* कोण उतरेल?’ ”+ ८ पण शास्त्रवचन काय म्हणतं? “वचन तुमच्या जवळ आहे, म्हणजे तुमच्या तोंडात आणि तुमच्या हृदयात आहे”;+ तेच विश्वासाचं “वचन” आहे, ज्याची आम्ही घोषणा करत आहोत. ९ कारण ख्रिस्त हाच प्रभू आहे, असं जर तुम्ही आपल्या तोंडाने जाहीर केलं+ आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं असा मनात विश्वास बाळगला, तर तुमचं तारण होईल.* १० कारण मनात विश्वास बाळगल्यामुळे माणूस नीतिमान ठरतो, पण तोंडाने विश्वास जाहीर केल्यामुळे+ त्याचं तारण होतं. *
११ कारण शास्त्रवचन म्हणतं: “त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणाचीही निराशा होणार नाही.”+ १२ यहुदी आणि ग्रीक यांच्यात काहीच फरक नाही.+ कारण सगळ्यांचा प्रभू एकच असून त्याला हाक मारणाऱ्या* सगळ्यांना तो भरपूर* आशीर्वाद देतो. १३ कारण “जो कोणी यहोवाचं* नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.”*+ १४ पण जर त्यांनी त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही, तर ते त्याला हाक कशी मारतील? आणि ज्याच्याबद्दल त्यांनी कधी ऐकलंच नाही, त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी प्रचार केल्याशिवाय ते कसं ऐकतील? १५ आणि जर त्यांना पाठवण्यात आलं नाही, तर ते प्रचार कसा करतील?+ जसं की लिहिण्यात आलं आहे: “चांगल्या गोष्टींबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्यांचे पाय किती सुंदर आहेत!”+
१६ पण सगळ्यांनीच आनंदाचा संदेश स्वीकारला असं नाही. कारण यशया म्हणतो: “हे यहोवा,* आमच्याकडून ऐकलेल्या गोष्टीवर* कोणी विश्वास ठेवला आहे?”+ १७ तर मग, वचन ऐकल्यावरच विश्वास ठेवला जातो;+ आणि ख्रिस्ताबद्दल प्रचार केल्यावरच वचन ऐकलं जातं. १८ पण मी तुम्हाला विचारतो, त्यांनी संदेश ऐकला नाही का? नक्कीच ऐकला. खरंतर, “संदेश सांगणाऱ्यांचा आवाज सबंध पृथ्वीवर आणि त्यांचा संदेश पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला.”+ १९ पण मग, इस्राएलला समजलं नाही का?+ नक्कीच समजलं. आधी मोशे म्हणतो: “जे राष्ट्र नाही, त्याद्वारे मी तुम्हाला ईर्ष्येला पेटवीन; मी एका मूर्ख राष्ट्राद्वारे तुमचा क्रोध भडकवीन.”+ २० मग, यशया अगदी बेधडकपणे म्हणतो: “जे माझा शोध करत नव्हते, त्यांना मी सापडलो;+ जे माझ्याबद्दल विचारत नव्हते, त्यांना मी प्रकट झालो.”+ २१ पण इस्राएलबद्दल तो म्हणतो: “आज्ञा न मानणाऱ्या आणि हट्टी लोकांसमोर मी दिवसभर हात पसरले.”+