मार्कने सांगितलेला संदेश
१० तिथून निघाल्यावर येशू यार्देन नदीपलीकडे असलेल्या यहूदीयाच्या सीमेजवळच्या प्रदेशात आला. तिथेसुद्धा लोकांचे मोठे समुदाय त्याच्याकडे आले. मग त्याच्या नेहमीच्या रितीप्रमाणे तो त्यांना पुन्हा शिकवू लागला.+ २ तेव्हा परूशी त्याच्याजवळ आले आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी त्याला विचारलं, की एखाद्या माणसाने आपल्या बायकोला घटस्फोट देणं नियमाप्रमाणे योग्य आहे का?+ ३ त्याने त्यांना विचारलं: “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?” ४ ते म्हणाले: “सोडचिठ्ठी देऊन बायकोला घटस्फोट द्यायची मोशेने परवानगी दिली आहे.”+ ५ पण येशू त्यांना म्हणाला: “मोशेने तुमच्या कठोर वृत्तीमुळे+ तुमच्यासाठी ही आज्ञा लिहिली होती.+ ६ पण देवाने सृष्टीच्या सुरुवातीपासूनच, ‘त्यांना पुरुष आणि स्त्री असं निर्माण केलं.+ ७ म्हणून माणूस आपल्या आईवडिलांना सोडेल,+ ८ आणि तो आणि त्याची पत्नी एकदेह होतील.+ तेव्हा, यापुढे ते दोन नाहीत तर एकदेह असे आहेत.’ ९ म्हणूनच, देवाने जे जोडलंय, ते कोणत्याही माणसाने तोडू नये.”*+ १० मग घरात गेल्यावर शिष्य त्याला याबद्दल प्रश्न विचारू लागले. ११ तो त्यांना म्हणाला: “जो आपल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करतो, तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो.+ १२ आणि जर एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन दुसऱ्याशी लग्न केलं, तर तीही व्यभिचार करते.”+
१३ मग येशूने आपल्या लहान मुलांवर हात ठेवावा, म्हणून लोक त्यांना त्याच्याजवळ आणू लागले. पण शिष्य त्यांना रागावले.+ १४ हे पाहून येशू चिडला आणि त्यांना म्हणाला: “मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. कारण देवाचं राज्य अशांचंच आहे.+ १५ मी तुम्हाला खरं सांगतो, जो एखाद्या लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करत नाही, तो त्यात कधीच जाऊ शकणार नाही.”+ १६ मग त्याने त्या लहान मुलांना आपल्याजवळ घेतलं आणि त्यांच्यावर हात ठेवून तो त्यांना आशीर्वाद देऊ लागला.+
१७ तो तिथून जात होता, तेव्हा एक माणूस धावत आला आणि त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याने त्याला असा प्रश्न विचारला: “हे उत्तम गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?”+ १८ येशू त्याला म्हणाला: “मला उत्तम का म्हणतोस? कारण देवाशिवाय कोणीही उत्तम नाही.+ १९ तुला तर आज्ञा माहीतच आहेत: ‘खून करू नका,+ व्यभिचार करू नका,+ चोरी करू नका,+ खोटी साक्ष देऊ नका,+ फसवणूक करू नका,+ आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा.’”+ २० तेव्हा तो माणूस येशूला म्हणाला: “गुरू, या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासूनच करत आलोय.” २१ येशूने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाला, “तुझ्यात फक्त एका गोष्टीची कमी आहे. म्हणून जा आणि जे काही तुझ्या मालकीचं आहे ते विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि ये, माझा शिष्य हो.”+ २२ पण हे उत्तर ऐकून तो उदास झाला आणि दुःखी होऊन तिथून निघून गेला कारण त्याच्याजवळ बरीच मालमत्ता होती.+
२३ मग सभोवती पाहून येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “खरंच, ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना देवाच्या राज्यात जाणं किती कठीण जाईल!”+ २४ पण शिष्यांना त्याचे हे शब्द ऐकून आश्चर्य वाटलं. तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मुलांनो, देवाच्या राज्यात जाणं खरंच कठीण आहे! २५ श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात जाण्यापेक्षा एका उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.”+ २६ तेव्हा त्यांना आणखीनच आश्चर्य वाटलं आणि ते त्याला* म्हणाले: “मग, कोणाचं तारण होणं शक्य आहे?”+ २७ येशू सरळ त्यांच्याकडे पाहून म्हणाला: “माणसांना हे अशक्य आहे, पण देवाला नाही. देवाला सगळं काही शक्य आहे.”+ २८ पेत्र त्याला म्हणाला: “बघ! आम्ही सगळं काही सोडून तुझ्यामागे आलो आहोत.”+ २९ यावर येशू म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, ज्यांनी माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी घरदार, शेतीवाडी, तसंच बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं सोडून दिली आहेत,+ त्यांच्यापैकी प्रत्येकाला ३० सध्याच्या काळात छळासोबत+ शंभरपटीने घरंदारं, शेतीवाडी, बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं आणि येणाऱ्या जगाच्या व्यवस्थेत* सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. ३१ पण जे पहिले आहेत असे बरेच जण शेवटचे असतील आणि जे शेवटचे ते पहिले असतील.”+
३२ मग, वर यरुशलेमकडे जाताना येशू त्यांच्यापुढे चालत होता. हे पाहून त्याचे शिष्य आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागून येणारे लोक घाबरले. तेव्हा पुन्हा एकदा त्याने आपल्या १२ शिष्यांना बाजूला नेलं आणि लवकरच ज्या गोष्टी त्याच्यासोबत घडणार होत्या, त्यांबद्दल तो त्यांना सांगू लागला:+ ३३ “पाहा! आपण वर यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या मुलाला मुख्य याजकांच्या आणि शास्त्र्यांच्या हवाली केलं जाईल. ते त्याला मृत्युदंड सुनावतील आणि विदेश्यांच्या हाती सोपवतील. ३४ ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील आणि त्याला फटके मारतील. मग ते त्याला ठार मारतील, पण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल.”+
३५ जब्दीची मुलं याकोब आणि योहान+ त्याच्याजवळ येऊन म्हणाली: “हे गुरू, आम्ही जे काही मागू त्याप्रमाणे तू आमच्यासाठी करावं अशी आमची इच्छा आहे.”+ ३६ तो त्यांना म्हणाला: “मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?” ३७ ते म्हणाले: “तुझ्या राज्यात* आमच्यापैकी एकाला तुझ्या उजवीकडे आणि दुसऱ्याला तुझ्या डावीकडे बसू दे.”+ ३८ पण येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही काय मागत आहात याची तुम्हाला कल्पना नाही. जो प्याला मी पीत आहे तो तुम्हाला पिता येईल का? आणि जो बाप्तिस्मा मी घेतोय तो तुम्हाला घेता येईल का?”+ ३९ ते म्हणाले, “हो घेता येईल.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा प्याला तर प्याल आणि जो बाप्तिस्मा मी घेतोय तोही घ्याल,+ ४० पण माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसायचा अधिकार देणं माझ्या हातात नाही. ज्यांच्यासाठी तो राखून ठेवलाय त्यांनाच तो मिळेल.”
४१ ही गोष्ट बाकीच्या दहा जणांनी ऐकली तेव्हा त्यांना याकोब आणि योहान यांचा खूप राग आला.+ ४२ पण येशू त्यांना आपल्याजवळ बोलावून म्हणाला: “विदेश्यांमध्ये ज्यांना राजे म्हणतात ते त्यांच्यावर सत्ता चालवतात आणि महत्त्वाच्या पदांवर असलेले त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हाला माहीत आहे.+ ४३ पण तुमच्यामध्ये असं व्हायला नको. उलट, ज्याला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे,+ ४४ आणि ज्याला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने सर्वांचा दास झालं पाहिजे. ४५ कारण, मनुष्याचा मुलगाही सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला+ आणि बऱ्याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”+
४६ मग ते यरीहोला आले. नंतर तो, त्याचे शिष्य आणि लोकांचा एक मोठा समुदाय यरीहोमधून बाहेर जात होता, तेव्हा बार्तीमय (तीमयचा मुलगा), हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.+ ४७ नासरेथकर येशू तिथून जात आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला: “हे येशू, दावीदच्या मुला,+ माझ्यावर दया कर!”+ ४८ बरेच जण त्याला दटावून गप्प राहायला सांगू लागले. पण तो आणखीनच मोठ्याने ओरडू लागला: “हे दावीदच्या मुला, माझ्यावर दया कर!” ४९ तेव्हा येशू थांबला आणि म्हणाला: “त्याला बोलवा.” म्हणून त्यांनी आंधळ्या माणसाला बोलावून म्हटलं: “भिऊ नकोस! ऊठ, तो तुला बोलवतोय.” ५० तेव्हा आपल्या अंगावरचं वस्त्र टाकून तो लगेच उठला आणि येशूजवळ गेला. ५१ मग येशू त्याला म्हणाला: “मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा माणूस त्याला म्हणाला: “हे गुरू,* माझी दृष्टी परत येऊ दे.” ५२ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “जा. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय.”+ आणि लगेचच त्याची दृष्टी परत आली+ आणि तो येशूच्या मागे चालू लागला.