यशया
२ प्रत्येक जण वाऱ्यापासून लपण्याची जागा,*
आणि वादळी पावसापासून मिळणारा आसरा होईल;
तो कोरड्या देशात वाहणारा पाण्याचा झरा,+
आणि रखरखीत जमिनीवर पडलेली मोठ्या खडकाची सावली होईल.
३ तेव्हा, पाहणाऱ्यांचे डोळे कधी बंद होणार नाहीत,
आणि ऐकणाऱ्यांचे कान लक्ष देऊन ऐकतील.
४ उतावळ्या माणसांचं मन ज्ञानाच्या गोष्टींवर मनन करेल,
अडखळत बोलणाऱ्यांची जीभ स्पष्ट बोलेल.+
५ मूर्ख माणसाला यापुढे उदार म्हटलं जाणार नाही,
आणि अनीतीने वागणाऱ्याला प्रतिष्ठित म्हटलं जाणार नाही.
६ कारण मूर्ख माणूस मूर्खपणाच्या गोष्टी बोलेल,
आणि तो मनात दुष्ट योजना आखेल.+
तो लोकांना देवापासून दूर न्यायला*
आणि यहोवाच्या विरोधात वाईट गोष्टी बोलायला असं करेल;
उपाशी लोकांना उपाशी ठेवायला,
आणि तहानलेल्या लोकांना प्यायला काही मिळू नये म्हणून तो असं करेल.
७ अनीतिमान माणसाचे मार्ग दुष्ट असतात.+
खोटं बोलून पीडितांचा नाश करण्यासाठी
तो निर्लज्ज वागणुकीला उत्तेजन देतो;+
गरीब माणूस खरं बोलत असला, तरीही तो असं करतो.
८ पण उदार मनाच्या माणसाचे विचार उदार असतात,
आणि तो उदारता दाखवायचं कधीही सोडत नाही.
९ “स्वस्थ बसलेल्या स्त्रियांनो, उठा आणि मी काय सांगतो ते ऐका!
निश्चिंत असलेल्या मुलींनो,+ मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या!
१० आज तुम्ही निश्चिंत आहात, पण वर्षभरानंतर तुम्ही थरथर कापाल;
कारण द्राक्षांचा हंगाम संपला तरी तुमच्या हाती काहीच लागणार नाही.+
११ हे स्वस्थ बसलेल्या स्त्रियांनो, थरथर कापा!
निश्चिंत असलेल्यांनो, तुम्ही भीतीने थरथर कापा!
आपले कपडे काढून कंबरेला गोणपाट गुंडाळा.+
१२ सुपीक शेतांसाठी आणि फळलेल्या द्राक्षमळ्यांसाठी,
छाती बडवून शोक करा.
१३ कारण माझ्या लोकांची जमीन काट्याकुट्यांनी आणि काटेरी झुडपांनी भरून जाईल;
आनंद साजरा करणारी सर्व घरं,
आणि जल्लोष करणारं शहर+ त्यांनी भरून जाईल.
१४ कारण मजबूत बुरूज ओसाड पडला आहे;
गजबजलेलं शहर रिकामं झालं आहे;+
ओफेल+ आणि पहारेकऱ्यांचा बुरूज हे कायमचे ओसाड पडले आहेत.
ती रानगाढवांची आवडती ठिकाणं,
आणि कळपांची कुरणं बनली आहेत.+
१५ आमच्यावर देवाच्या पवित्र शक्तीचा* वर्षाव होईपर्यंत,+
ओसाड प्रदेश फळबाग बनेपर्यंत,
आणि फळबाग हिरव्यागार जंगलासारखी मानली जाईपर्यंत असं होईल.+
१६ मग ओसाड प्रदेशात न्यायीपणा वस्ती करेल,
आणि फळबागेत नीतिमत्त्व राहील.+
१८ माझे लोक नेहमी शांतीच्या निवासस्थानात राहतील,
जिथे शांती आणि विसावा मिळेल अशा सुरक्षित ठिकाणी ते राहतील.+
१९ पण गारांच्या वर्षावाने जंगलाचा नाश होईल,
आणि शहर जमीनदोस्त होईल.
२० पाण्याजवळ ठिकठिकाणी पेरणी करणाऱ्यांनो, तुम्ही सुखी आहात.
आपल्या बैलाला आणि गाढवाला मोकळं सोडणाऱ्यांनो, तुम्ही आनंदी आहात.”+