योहानने सांगितलेला संदेश
४ येशू योहानच्या तुलनेत जास्त लोकांना शिष्य बनवत आहे आणि तो त्यांना बाप्तिस्मा देत आहे,+ ही गोष्ट परूश्यांच्या कानावर गेली. हे जेव्हा प्रभूला कळलं, २ (खरंतर, येशू स्वतः बाप्तिस्मा देत नव्हता, तर शिष्य देत होते) ३ तेव्हा त्याने यहूदीया सोडलं आणि तो परत गालीलकडे निघाला. ४ पण त्याला शोमरोनमधून जावं लागणार होतं. ५ त्यामुळे, तो शोमरोनमधल्या सूखार नावाच्या शहरात आला. हे शहर याकोबने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होतं.+ ६ आणि तिथेच याकोबची विहीरसुद्धा होती.+ प्रवास करून थकलेला येशू त्या विहिरीजवळ* जाऊन बसला. तेव्हा दुपारचे सुमारे बारा वाजले होते.*
७ तितक्यात शोमरोनची एक स्त्री तिथे पाणी भरायला आली. येशू तिला म्हणाला: “मला प्यायला पाणी दे.” ८ (कारण त्याचे शिष्य खायच्या वस्तू विकत आणायला शहरात गेले होते.) ९ शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली: “तुम्ही यहुदी असून माझ्याकडे पाणी कसं काय मागता, कारण मी तर एक शोमरोनी स्त्री आहे?” (यहुदी लोक शोमरोनी लोकांशी कोणतेही व्यवहार करत नाहीत.)+ १० येशूने तिला उत्तर दिलं: “तुला देवाच्या मोफत दानाबद्दल माहीत असतं+ आणि ‘मला प्यायला पाणी दे’ असं म्हणणारा मुळात कोण आहे याची तुला जाणीव असती, तर तू स्वतःच त्याला पाणी मागितलं असतं आणि त्याने तुला जीवनाचं पाणी दिलं असतं.”+ ११ ती त्याला म्हणाली: “तुमच्याजवळ तर पाणी काढायला बादलीही नाही आणि विहीरही खूप खोल आहे. तर मग तुम्ही मला हे जीवनाचं पाणी कुठून द्याल? १२ ही विहीर आम्हाला आमचा पूर्वज याकोब याने दिली आहे. तो आणि त्याची मुलं आणि त्याची गुरंढोरंसुद्धा या विहिरीचं पाणी प्यायले. मग, तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठे आहात का?” १३ येशूने तिला उत्तर दिलं: “हे पाणी जो पिईल, त्या प्रत्येकाला पुन्हा तहान लागेल. १४ पण मी दिलेलं पाणी जो पिईल त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही.+ तर, ते पाणी त्याच्यामध्ये, सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या एखाद्या खळखळत्या झऱ्यासारखं होईल.”+ १५ हे ऐकून ती स्त्री त्याला म्हणाली: “मला हे पाणी द्या, म्हणजे मला कधीही तहान लागणार नाही आणि पाणी काढायला पुन्हापुन्हा इथे यावं लागणार नाही.”
१६ तो तिला म्हणाला: “जा आणि आपल्या नवऱ्यालाही इथे बोलावून आण.” १७ तेव्हा ती स्त्री म्हणाली: “मला नवरा नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला: “‘मला नवरा नाही,’ हे तू बरोबर बोललीस. १८ कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरं सांगितलंस.” १९ ती स्त्री त्याला म्हणाली: “प्रभुजी, तुम्ही नक्कीच एक संदेष्टा असाल.+ २० आमच्या पूर्वजांनी तर या डोंगरावर उपासना केली, पण तुम्ही लोक म्हणता की यरुशलेममध्येच उपासना केली पाहिजे.”+ २१ येशू तिला म्हणाला: “बाई, मी तुला सांगतो, अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्ही या डोंगरावर किंवा यरुशलेममध्येही पित्याची उपासना करणार नाही. २२ तुम्ही न जाणता उपासना करता;+ आम्ही आमच्याजवळ असलेल्या ज्ञानाप्रमाणे उपासना करतो. कारण तारण हे यहुद्यांपासूनच सुरू होतं.+ २३ पण, अशी वेळ येत आहे, उलट आली आहे, जेव्हा खरे उपासक पवित्र शक्तीने* आणि सत्याप्रमाणे पित्याची उपासना करतील. कारण खरं पाहिलं तर, पिता अशाच प्रकारे उपासना करणाऱ्यांना शोधतोय.+ २४ देव अदृश्य आहे+ आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी ती पवित्र शक्तीने आणि सत्याप्रमाणे केली पाहिजे.”+ २५ ती स्त्री त्याला म्हणाली: “मसीहा, म्हणजे ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला माहीत आहे. तो येईल तेव्हा तो आमच्यासाठी सगळ्या गोष्टी उघडपणे घोषित करेल.” २६ येशू तिला म्हणाला: “तुझ्याशी बोलणारा, मीच तो आहे.”+
२७ तेवढ्यात त्याचे शिष्य तिथे आले आणि तो एका स्त्रीशी बोलत आहे हे पाहून त्यांना नवल वाटलं. पण, “तुला काही पाहिजे होतं का?” किंवा “तू तिच्याशी का बोलत आहेस?” असं कोणीही त्याला विचारलं नाही. २८ तेव्हा ती स्त्री आपली घागर तिथेच ठेवून शहरात गेली आणि लोकांना म्हणू लागली: २९ “माझ्यासोबत चला आणि त्या माणसाला भेटा. मी केलेलं सगळं काही त्याने मला सांगितलं. तोच तर ख्रिस्त नसावा?” ३० तेव्हा ते शहरातून त्याच्याकडे जायला निघाले.
३१ इकडे, शिष्य त्याला “रब्बी,*+ काहीतरी खाऊन घे,” असा आग्रह करत होते. ३२ पण तो त्यांना म्हणाला: “माझ्याजवळ असं अन्न आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहीत नाही.” ३३ तेव्हा शिष्य एकमेकांना म्हणू लागले: “कोणी त्याला काहीतरी खायला आणून दिलं की काय?” ३४ येशू त्यांना म्हणाला: “ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करणं+ आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं+ हेच माझं अन्न आहे. ३५ कापणीला अजून चार महिने बाकी आहेत, असं तुम्ही म्हणता ना? मी तुम्हाला सांगतो शेतांकडे पाहा. ती पिकली आहेत* आणि कापणीसाठी तयार आहेत.+ ३६ कापणी करणाऱ्याला आतापासूनच त्याची मजुरी मिळाली आहे. आणि पेरणाऱ्याने आणि कापणी करणाऱ्याने सोबत मिळून आनंद साजरा करावा,+ म्हणून तो सर्वकाळाच्या जीवनाचं पीक गोळा करतोय. ३७ कारण या बाबतीत ही म्हण खरी ठरते, की पेरणी करणारा एक जण आहे आणि कापणी करणारा दुसराच आहे. ३८ तुम्ही ज्यासाठी मेहनत घेतली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हाला पाठवतोय. इतरांनी मेहनत घेतली आणि तुम्ही त्यांच्या मेहनतीचं फळ उपभोगत आहात.”
३९ “मी केलेलं सगळं काही त्याने मला सांगितलं,” अशी साक्ष देणाऱ्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या शहरातल्या बऱ्याच शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.+ ४० म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्यासोबत राहायची विनंती केली आणि तो दोन दिवस तिथे राहिला. ४१ याचा परिणाम असा झाला, की त्याने शिकवलेल्या गोष्टी ऐकून आणखी बऱ्याच जणांनी विश्वास ठेवला. ४२ आणि ते त्या स्त्रीला म्हणाले: “आता आम्ही फक्त तू जे सांगितलंस त्यामुळे विश्वास ठेवत नाही; कारण आम्ही स्वतः आमच्या कानांनी ऐकलंय. आणि हा माणूस खरंच जगाचा तारणारा आहे, याची आम्हाला खातरी पटली आहे.”+
४३ दोन दिवसांनी येशू तिथून निघून गालीलला गेला. ४४ खरंतर त्यानेच अशी साक्ष दिली होती, की संदेष्ट्याचा स्वतःच्या गावात आदर केला जात नाही.+ ४५ तो गालीलमध्ये आला तेव्हा गालीलच्या लोकांनी त्याचं स्वागत केलं. कारण ते जेव्हा सणासाठी यरुशलेमला गेले होते,+ तेव्हा त्याने केलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या.+
४६ मग त्याने जिथे पाण्याचा द्राक्षारस केला होता, त्या ठिकाणी म्हणजे गालीलच्या काना इथे तो पुन्हा आला.+ इथे राजाचा एक अधिकारी होता. त्याचा मुलगा कफर्णहूममध्ये आजारी होता. ४७ या माणसाने ऐकलं, की येशू यहूदीयातून गालीलमध्ये आला आहे. तेव्हा तो येशूकडे गेला आणि त्याने खाली कफर्णहूमला येऊन आपल्या मुलाला बरं करावं, अशी त्याला विनंती केली. कारण, त्याचा मुलगा अगदी मरायला टेकला होता. ४८ पण येशू त्याला म्हणाला: “चिन्हं आणि चमत्कार पाहिल्याशिवाय तुम्ही लोक कधीही विश्वास ठेवणार नाही.”+ ४९ राजाचा अधिकारी त्याला म्हणाला: “प्रभू, माझं लेकरू मरण्याआधी खाली चला.” ५० येशू त्याला म्हणाला: “जा, तुझा मुलगा बरा झालाय.”+ त्या माणसाने येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तो तिथून निघून गेला. ५१ मग तो खाली कफर्णहूमला जात होता, तेव्हा त्याचे दास त्याला भेटायला आले आणि त्याचा मुलगा बरा झाला आहे* असं त्यांनी सांगितलं. ५२ तेव्हा तो नेमका किती वाजता बरा झाला, असं त्याने त्यांना विचारलं. ते म्हणाले: “काल सुमारे एक वाजता* त्याचा ताप उतरला.” ५३ तेव्हा मुलाच्या वडिलांना आठवलं, की अगदी त्याच वेळी येशू म्हणाला होता, “तुझा मुलगा बरा झालाय.”+ त्यामुळे त्याने आणि त्याच्या संपूर्ण घराण्याने येशूवर विश्वास ठेवला. ५४ यहूदीयातून गालीलला आल्यावर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार* होता.+