प्रेषितांची कार्यं
१८ यानंतर, पौल अथेन्सहून निघाला आणि करिंथ शहरात आला. २ तिथे त्याला अक्विल्ला+ नावाचा एक यहुदी माणूस भेटला. मुळात तो पंत इथला राहणारा होता. पण क्लौद्य याने सगळ्या यहुद्यांना रोम सोडून जायचा हुकूम दिल्यामुळे तो नुकताच आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासोबत इटलीहून आला होता. म्हणून पौल त्यांच्याकडे आला ३ आणि त्यांचा एकच व्यवसाय असल्यामुळे तो त्यांच्याच घरी राहून त्यांच्यासोबत काम करू लागला.+ त्यांचा तंबू बनवायचा व्यवसाय होता. ४ दर शब्बाथाच्या दिवशी+ पौल सभास्थानात भाषण देऊन*+ सगळ्या यहुदी आणि ग्रीक लोकांना आपण सांगत असलेल्या गोष्टींची खातरी पटवून द्यायचा.
५ मग सीला+ आणि तीमथ्य+ हे दोघं मासेदोनियाहून आले. तेव्हा पौलने प्रचारकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं. यहुद्यांना साक्ष देऊन येशू हाच ख्रिस्त आहे, याची तो त्यांना खातरी पटवून देऊ लागला.+ ६ पण ते त्याचा विरोध करत राहिले आणि त्याच्याबद्दल बरंवाईट बोलत राहिले. तेव्हा, आपले कपडे झटकून+ तो त्यांना म्हणाला: “तुमच्या रक्ताचा दोष तुमच्याच माथी येवो.+ मी निर्दोष आहे.+ आतापासून मी विदेशी लोकांकडे जाईन.”+ ७ मग त्याने सभास्थान सोडून दिलं आणि तो तीत युस्त नावाच्या एका माणसाच्या घरी गेला. हा देवाचा एक उपासक होता आणि त्याचं घर सभास्थानाला लागून होतं. ८ तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प+ आणि त्याच्या संपूर्ण घराण्याने प्रभूवर विश्वास ठेवला. हे ऐकल्यावर करिंथमधल्या बऱ्याच लोकांनीही विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. ९ शिवाय, रात्रीच्या वेळी प्रभू दृष्टान्तात पौलला म्हणाला: “घाबरू नकोस! बोलत राहा, शांत राहू नकोस! १० कारण मी तुझ्यासोबत आहे.+ त्यामुळे कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तुझं काही नुकसान करणार नाही. कारण या शहरात माझे आणखी बरेच लोक आहेत.” ११ त्यामुळे तो दीड वर्षं तिथे राहून त्यांना देवाचं वचन शिकवत राहिला.
१२ मग, गल्लियो हा अखयाचा राज्यपाल* होता तेव्हा सगळे यहुदी लोक मिळून पौलविरुद्ध उठले. ते त्याला न्यायासनासमोर नेऊन म्हणाले: १३ “हा माणूस, नियमशास्त्राप्रमाणे योग्य नसलेल्या पद्धतीने देवाची उपासना करायला लोकांना शिकवतोय.” १४ पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहुद्यांना म्हणाला: “यहुदी लोकांनो! हा एखाद्या अन्यायाचा किंवा गंभीर अपराधाचा प्रश्न असता, तर मी शांतपणे तुमचं ऐकून घेतलं असतं. १५ पण हा जर शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा प्रश्न असेल,+ तर तुमचं तुम्हीच पाहा. कारण असल्या प्रकरणांत तुमचा न्यायाधीश होण्याची माझी इच्छा नाही.” १६ असं म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिलं. १७ तेव्हा, त्या सगळ्यांनी मिळून सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस+ याला धरलं आणि ते न्यायासनासमोर त्याला मारहाण करू लागले. पण गल्लियो त्यांच्या या प्रकरणात मुळीच पडला नाही.
१८ मग, बरेच दिवस बांधवांसोबत राहिल्यानंतर पौलने त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर तो प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला यांच्यासोबत समुद्रमार्गाने सीरियाला निघून गेला. त्याने एक नवस केला असल्यामुळे किंख्रियामध्ये+ त्याने आपल्या डोक्यावरचे केस कापले. १९ मग इफिसला आल्यावर त्याने त्यांना तिथेच सोडलं. पण तो स्वतः सभास्थानात गेला आणि यहुद्यांसोबत तर्क करू लागला.+ २० ते त्याला आणखी काही दिवस आपल्यासोबत राहायची विनंती करत राहिले, पण तो तयार झाला नाही. २१ उलट, त्यांचा निरोप घेऊन तो म्हणाला: “यहोवाची* इच्छा असेल, तर मी तुमच्याकडे परत येईन.” मग तो इफिसहून समुद्रमार्गाने निघाला २२ आणि खाली कैसरीया इथे आला. त्यानंतर, वर* जाऊन तो मंडळीला भेटला आणि तिथून निघून खाली अंत्युखियाला गेला.+
२३ तिथे काही दिवस राहिल्यानंतर तो तिथून निघाला आणि मग गलतीया आणि फ्रुगिया+ प्रदेशांत ठिकठिकाणी जाऊन त्याने सगळ्या शिष्यांचा विश्वास मजबूत केला.+
२४ तेव्हा, आलेक्सांद्रियाचा रहिवासी असलेला अपुल्लो+ नावाचा एक यहुदी इफिसला आला. तो एक चांगला वक्ता आणि शास्त्रवचनांचा जाणकार होता. २५ या माणसाला यहोवाच्या* मार्गाचं शिक्षण देण्यात आलं होतं* आणि तो पवित्र शक्तीमुळे* खूप आवेशी होता. तो येशूबद्दलच्या गोष्टी अचूकपणे सांगायचा आणि शिकवायचा. पण त्याला फक्त योहानने प्रचार केलेल्या बाप्तिस्म्याबद्दलच माहीत होतं. २६ तो सभास्थानात धैर्याने बोलू लागला. प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला+ यांनी जेव्हा तो शिकवत असलेल्या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांनी त्याला आपल्यासोबत घेतलं. त्यांनी देवाच्या मार्गाबद्दल त्याला आणखी अचूकपणे समजावून सांगितलं. २७ नंतर, त्याने पलीकडे अखयाला जायचा विचार केला. तेव्हा तिथल्या शिष्यांनी त्याचं आनंदाने स्वागत करावं, असं बांधवांनी त्यांना लिहून कळवलं. तिथे पोहोचल्यावर अपुल्लोने देवाच्या अपार कृपेमुळे ज्यांनी विश्वास स्वीकारला होता, त्यांना खूप मदत केली. २८ त्याने जाहीरपणे आणि खूप प्रभावीपणे बोलून यहुद्यांना पूर्णपणे निरुत्तर केलं. तसंच, येशू हाच ख्रिस्त असल्याचं शास्त्रवचनांतून सिद्ध करून दाखवलं.+