लेवीय
१९ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएलच्या सर्व लोकांना सांग, ‘तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी तुमचा देव यहोवा पवित्र आहे.+
३ तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा आदर केला पाहिजे.*+ तुम्ही माझे शब्बाथ पाळले पाहिजेत.+ मी तुमचा देव यहोवा आहे. ४ निरुपयोगी देवांच्या मागे लागू नका+ आणि साच्यात ओतून स्वतःसाठी धातूचे देव बनवू नका.+ मी तुमचा देव यहोवा आहे.
५ यहोवाला शांती-अर्पण देताना,+ ते अशा प्रकारे द्या, की तुमचा स्वीकार केला जाईल.+ ६ तुम्ही अर्पणाचं मांस अर्पणाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. पण तिसऱ्या दिवशी जे उरेल, ते जाळून टाका.+ ७ जर तिसऱ्या दिवशी अर्पणाचं मांस खाल्लं, तर ही एक घृणास्पद गोष्ट ठरेल आणि देव ते अर्पण स्वीकारणार नाही. ८ ते मांस खाणाऱ्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल, कारण त्याने यहोवाच्या पवित्र अर्पणाचा अनादर केला आहे. त्या माणसाला* ठार मारलं जावं.
९ तुम्ही आपल्या शेतांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या काठावरचं सगळं पीक कापू नका आणि कापणी करताना जे उरेल ते* उचलू नका.+ १० तसंच, तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यांमधली उरलेली द्राक्षं गोळा करू नका, किंवा खाली पडलेली द्राक्षं उचलू नका. तुम्ही ती गरिबांसाठी*+ आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्या विदेश्यांसाठी तशीच राहू दया. मी तुमचा देव यहोवा आहे.
११ तुम्ही चोरी करू नका,+ फसवणूक करू नका+ किंवा एकमेकांशी बेइमानीने व्यवहार करू नका. १२ तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ घेऊन, माझ्या नावाचा अनादर करू नका.+ मी तुमचा देव यहोवा आहे. १३ तू दुसऱ्याशी अप्रामाणिकपणे वागू नकोस+ आणि कोणाला लुबाडू नकोस.+ तू मजुराची मजुरी रात्रभर, दुसरा दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस.+
१४ बहिऱ्या माणसाला शाप देऊ नकोस किंवा आंधळ्यापुढे अडथळा ठेवू नकोस+ आणि तुझ्या देवाचं भय बाळग.+ मी यहोवा आहे.
१५ न्यायनिवाडा करताना अन्याय करू नका. फक्त गरीब आहे म्हणून एखाद्याला दया दाखवू नका आणि श्रीमंताचा पक्ष घेऊ नका.+ तर आपल्या शेजाऱ्याचा न्यायनिवाडा करताना न्यायाने वागा.
१६ तू आपल्या लोकांमध्ये कोणाची बदनामी करत फिरू नकोस.+ तू आपल्या शेजाऱ्याच्या जिवावर* उठू नकोस.*+ मी यहोवा आहे.
१७ आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष करू नकोस.+ तू आपल्या सोबत्याची चूक सुधारायला मागेपुढे पाहू नकोस,+ नाहीतर त्याच्या पापाचा दोष तुझ्यावरही येईल.
१८ तू बदला घेऊ नकोस+ किंवा आपल्या भाऊबंदांबद्दल मनात राग बाळगू नकोस; आपल्या सोबत्यावर स्वतःसारखं प्रेम कर.+ मी यहोवा आहे.
१९ तुम्ही माझे हे नियम पाळा: तुमच्या प्राण्यांपैकी दोन जातींच्या प्राण्यांचा समागम घडवू नका.* तुमच्या शेतांत दोन प्रकारची बियाणी पेरू नका+ आणि दोन प्रकारच्या धाग्यांपासून बनवलेले कपडे घालू नका.+
२० एखाद्या माणसाने एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवले आणि जर ती दासी असून, तिचं लग्न ठरलं असेल, पण तिला अजून सोडवलं नसेल किंवा मुक्त करण्यात आलं नसेल; तर त्या दोघांना शिक्षा दिली जावी. पण त्यांना ठार मारू नये, कारण तिला अजून मुक्त करण्यात आलं नव्हतं. २१ त्याने आपलं दोषार्पण म्हणून एक मेंढा भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवासाठी आणावा.+ २२ त्याने केलेल्या पापाबद्दल याजक दोषार्पणाचा मेंढा अर्पण करून यहोवासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे त्याला त्याच्या पापाबद्दल क्षमा केली जाईल.
२३ मी तुम्हाला देत असलेल्या देशात गेल्यावर जेव्हा तुम्ही फळझाडं लावाल, तेव्हा त्या झाडांना लागलेली फळं, तुम्ही अशुद्ध समजा आणि ती खाण्याची तुम्हाला मनाई आहे. तीन वर्षांपर्यंत ती फळं खाण्याची मनाई असेल. तुम्ही ती खाऊ नका. २४ पण चौथ्या वर्षी, त्यांची सगळी फळं तुम्ही मोठा आनंद साजरा करून यहोवाला अर्पण करा.+ २५ मग पाचव्या वर्षापासून तुम्ही त्यांची फळं खाऊ शकता; असं केलं, तर ती झाडं तुम्हाला खूप फळं देतील. मी तुमचा देव यहोवा आहे.
२६ तुम्ही रक्त असलेलं काहीही खाऊ नका.+
तुम्ही शकुन पाहू नका आणि जादूटोणा करू नका.+
२७ आपल्या डोक्याच्या बाजूचे केस कापू नका* आणि आपल्या दाढीची टोकं कापू नका.+
२८ मेलेल्या माणसासाठी* आपल्या शरीरावर घाव करू नका.+ आपल्या शरीरावर गोंदवून घेऊ नका. मी यहोवा आहे.
२९ आपल्या मुलीला वेश्या बनवून तिचा अपमान करू नका,+ नाहीतर देशात व्यभिचार वाढेल आणि देश अनैतिक कामांनी भरून जाईल.+
३० तुम्ही माझे शब्बाथ पाळले पाहिजेत+ आणि माझ्या उपासना मंडपासाठी आदर दाखवला पाहिजे.* मी यहोवा आहे.
३१ भूतविद्या करणाऱ्यांकडे+ आणि ज्योतिष्यांकडे+ जाऊन अशुद्ध होऊ नका. मी तुमचा देव यहोवा आहे.
३२ पिकलेल्या केसांपुढे उभा राहा+ आणि म्हाताऱ्या माणसाला आदर दाखव.+ तू आपल्या देवाचं भय मानलं पाहिजे.+ मी यहोवा आहे.
३३ जर तुमच्या देशात एखादा विदेशी राहायला आला, तर त्याच्यासोबत वाईट वागू नका.+ ३४ तुमच्यामध्ये राहणारा विदेशी तुमच्यासाठी तुमच्याच देशाच्या रहिवाशासारखा असावा+ आणि तुम्ही त्याच्यावर स्वतःसारखंच प्रेम करावं. कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी म्हणून राहत होता.+ मी तुमचा देव यहोवा आहे.
३५ मोजमाप करण्यासाठी किंवा तोलण्यासाठी तुम्ही चुकीची मापं वापरू नका.+ ३६ तुम्ही अचूक तराजू, अचूक वजनं, अचूक एफा* आणि अचूक हिन* वापरला पाहिजे.+ तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणणारा, मी तुमचा देव यहोवा आहे. ३७ अशा रितीने, तुम्ही माझे सगळे नियम आणि माझे सगळे न्याय-निर्णय पाळले पाहिजेत.+ मी यहोवा आहे.’”