योहानने सांगितलेला संदेश
११ लाजर नावाचा एक माणूस आजारी होता. तो बेथानी या गावाचा होता. मरीया आणि मार्था या त्याच्या बहिणीही त्या गावात राहत होत्या.+ २ ही तीच मरीया होती, जिने प्रभूच्या पायांवर सुगंधी तेल ओतून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले होते.+ आणि तिचाच भाऊ लाजर आजारी होता. ३ म्हणून लाजरच्या बहिणींनी येशूला असा निरोप पाठवला: “प्रभू, तुझा लाडका मित्र आजारी आहे.” ४ पण येशूने हे ऐकलं तेव्हा तो म्हणाला: “या आजारपणाचा शेवट मरणात नाही, तर देवाच्या गौरवात होईल.+ आणि त्याद्वारे देवाच्या मुलाचा गौरव होईल.”
५ येशूचं मार्थावर, तिच्या बहिणीवर आणि लाजरवर प्रेम होतं. ६ पण लाजर आजारी आहे हे ऐकल्यावरही, येशू जिथे होता तिथेच आणखी दोन दिवस राहिला. ७ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “चला आपण यहूदीयात परत जाऊ.” ८ शिष्य त्याला म्हणाले: “रब्बी,*+ अलीकडेच यहूदीयातले लोक तुला दगडमार करणार होते+ आणि तरीही तू तिथे परत जाणार?” ९ येशूने उत्तर दिलं: “दिवसाचे १२ तास असतात, असतात ना?+ एखादा माणूस दिवसाच्या प्रकाशात चालला, तर त्याला ठेच लागत नाही कारण त्याला या जगाचा प्रकाश दिसतो. १० पण जर कोणी रात्री चालत असेल, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्यात प्रकाश नसतो.”
११ या गोष्टी बोलल्यावर तो म्हणाला: “आपला मित्र लाजर झोपलाय.+ पण मी त्याला उठवायला तिथे जातोय.” १२ तेव्हा शिष्य त्याला म्हणाले: “प्रभू, तो झोपला असेल तर बरा होईल.” १३ खरंतर येशू त्याच्या मरणाबद्दल बोलला होता. पण त्यांना वाटलं, की तो विश्रांतीसाठी झोप घेण्याबद्दल बोलत आहे. १४ तेव्हा येशू स्पष्टपणे म्हणाला: “लाजर मेलाय.+ १५ आणि मला आनंद वाटतो, की मी तिथे नव्हतो. कारण आता मी जे करणार आहे, त्यामुळे तुमचा विश्वास आणखी वाढेल. तर चला आपण त्याच्याकडे जाऊ या.” १६ म्हणून थोमा, ज्याला जुळा असंही म्हणायचे, तो इतर शिष्यांना म्हणाला: “चला आपणही जाऊ या, म्हणजे आपल्याला त्याच्यासोबत मरण येईल.”+
१७ येशू बेथानीला पोहोचला तेव्हा लाजरला कबरेत* ठेवून आधीच चार दिवस झाले होते. १८ बेथानी हे यरुशलेमजवळ, म्हणजे तिथून सुमारे तीन किलोमीटर* अंतरावर होतं. १९ बरेच यहुदी लोक मार्था आणि मरीया यांच्या भावाबद्दल त्यांचं सांत्वन करायला आले होते. २० येशू येत आहे हे मार्थाने ऐकलं, तेव्हा ती त्याला भेटायला गेली. पण मरीया+ घरातच बसून राहिली. २१ येशूला भेटल्यावर मार्था म्हणाली: “प्रभू, तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. २२ पण मला अजूनही खातरी आहे की तू देवाकडे जे काही मागशील, ते देव तुला नक्की देईल.” २३ येशू तिला म्हणाला: “तुझा भाऊ उठेल.” २४ मार्था त्याला म्हणाली: “शेवटच्या दिवशी, जेव्हा मेलेल्यांना उठवलं जाईल,* तेव्हा तो उठेल हे मला माहीत आहे.”+ २५ येशू तिला म्हणाला: “मेलेल्यांना उठवणारा आणि त्यांना जीवन देणारा मीच आहे.*+ जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मेला तरी पुन्हा जिवंत होईल. २६ आणि जिवंत असलेला जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो कधीच मरणार नाही.+ यावर तुझा विश्वास आहे का?” २७ ती त्याला म्हणाली: “हो प्रभू, जो जगात येणार होता तो ख्रिस्त, देवाचा मुलगा तूच आहेस यावर माझा विश्वास आहे.” २८ असं म्हणून ती तिथून निघून गेली आणि आपली बहीण मरीया हिला बाजूला घेऊन म्हणाली: “गुरू+ आलाय. तो तुला बोलवतोय.” २९ हे ऐकल्यावर ती लगेच उठून त्याच्याकडे गेली.
३० येशू अजून गावात आला नव्हता, तर मार्था त्याला जिथे भेटली होती, तिथेच होता. ३१ जे यहुदी घरात मरीयाचं सांत्वन करत होते, त्यांनी तिला लगेच उठून बाहेर जाताना पाहिलं आणि तिच्या मागोमाग तेसुद्धा गेले. कदाचित ती रडायला कबरेजवळ*+ जात असेल असं त्यांना वाटलं. ३२ येशू जिथे होता, तिथे आल्यावर मरीया त्याला पाहून त्याच्या पाया पडली आणि म्हणाली: “प्रभू, तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता.” ३३ येशूने तिला आणि तिच्यासोबत आलेल्या यहुद्यांना रडताना पाहिलं, तेव्हा तो दुःखाने व्याकूळ झाला आणि त्याला गहिवरून आलं. ३४ तो म्हणाला: “कुठे ठेवलंय तुम्ही त्याला?” ते म्हणाले: “प्रभू, येऊन पाहा.” ३५ तेव्हा येशू रडू लागला.+ ३६ हे पाहून तिथे असलेले यहुदी म्हणाले: “बघा, याचा त्याच्यावर किती जीव होता!” ३७ पण त्यांच्यापैकी काही जण म्हणाले: “याने आंधळ्या माणसाला दृष्टी दिली,+ मग तो याला मरण्यापासून वाचवू शकला नसता का?”
३८ मग येशू पुन्हा दुःखाने व्याकूळ झाला आणि कबरेजवळ* आला. खरंतर ती एक गुहा होती. तिच्या तोंडावर मोठा दगड लावलेला होता. ३९ येशू म्हणाला: “तो दगड बाजूला करा.” मेलेल्या माणसाची बहीण मार्था त्याला म्हणाली: “प्रभू, आता तर त्याच्या शरीराला दुर्गंधी सुटली असेल, कारण चार दिवस होऊन गेलेत.” ४० येशू तिला म्हणाला: “मी तुला सांगितलं नव्हतं का, की तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरवी सामर्थ्य पाहशील?”+ ४१ तेव्हा त्यांनी दगड बाजूला केला. मग येशू वर स्वर्गाकडे पाहून+ म्हणाला: “बापा, तू माझं ऐकलंस म्हणून मी तुझे उपकार मानतो. ४२ तू नेहमीच माझं ऐकतोस हे तर मला माहीत होतं. पण इथे उभ्या असलेल्या लोकांसाठी मी हे बोललो. तू मला पाठवलंस यावर त्यांनी विश्वास ठेवावा म्हणून मी बोललो.”+ ४३ असं म्हटल्यावर तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “लाजर, बाहेर ये!”+ ४४ तेव्हा जो मेला होता, तो बाहेर आला. त्याच्या हातापायांवर कापडाच्या पट्ट्या गुंडाळलेल्या होत्या आणि त्याचा चेहरा एका कापडाने झाकलेला होता. येशू त्यांना म्हणाला: “त्याला मोकळं करा आणि जाऊ द्या.”
४५ येशूने काय केलं हे पाहून, मरीयाकडे आलेल्या बऱ्याच यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.+ ४६ पण काही जणांनी परूश्यांकडे जाऊन, येशूने जे केलं ते त्यांना सांगितलं. ४७ तेव्हा मुख्य याजक आणि परूशी यांनी न्यायसभा* भरवली. ते म्हणू लागले: “आता आपण काय करायचं? कारण हा माणूस तर पुष्कळ चमत्कार* करतो.+ ४८ जर आपण त्याचं असंच चालू दिलं, तर सगळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागतील. आणि रोमी लोक येऊन आपलं मंदिर* आणि आपलं राष्ट्रही आपल्यापासून हिरावून घेतील.” ४९ पण त्यांच्यापैकी कयफा,+ जो त्या वर्षी महायाजक होता, तो त्यांना म्हणाला: “तुम्हाला काहीच कळत नाही, ५० आणि तुमच्या हेही लक्षात येत नाही, की संपूर्ण राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा, एका माणसाने लोकांसाठी मरावं, हे तुमच्यासाठी चांगलं आहे.” ५१ पण कयफा हे स्वतःच्या मनाने बोलला नाही. तर त्या वर्षी तो महायाजक असल्यामुळे त्याने अशी भविष्यवाणी केली, की येशू संपूर्ण राष्ट्रासाठी मरणार आहे. ५२ आणि फक्त राष्ट्रासाठीच नाही, तर ठिकठिकाणी विखुरलेल्या देवाच्या मुलांना एकत्र करण्यासाठी तो मरणार आहे. ५३ म्हणून, त्या दिवसापासून ते येशूला ठार मारायचा कट रचू लागले.
५४ त्यामुळे, येशूने यहुद्यांच्या सार्वजनिक ठिकाणी जायचं सोडून दिलं. आणि तिथून निघून तो ओसाड रानाजवळच्या प्रदेशात, एफ्राईम+ नावाच्या शहरात गेला आणि तिथे आपल्या शिष्यांसोबत राहू लागला. ५५ आता यहुद्यांचा वल्हांडण सण+ जवळ आला होता. त्यामुळे खेड्यापाड्यांतले बरेच लोक वल्हांडणाआधी स्वतःला नियमाप्रमाणे शुद्ध करायला वर यरुशलेमला गेले. ५६ ते येशूला शोधू लागले आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना विचारू लागले: “तुम्हाला काय वाटतं? तो सणाला येणारच नाही का?” ५७ पण मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी अशी आज्ञा दिली होती, की येशू कुठे आहे हे कोणालाही कळलं तर त्याने लगेच याची खबर द्यावी, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.*