दावीदचं गीत.
२६ हे यहोवा, माझा न्याय कर, कारण मी खरेपणाने चाललोय;+
मी यहोवावर भरवसा ठेवलाय; माझा भरवसा कधीही ढळला नाही.+
२ हे यहोवा, मला पारख आणि माझी परीक्षा घे;
माझ्या मनातले खोल विचार आणि माझं हृदय शुद्ध कर.+
३ कारण तुझं एकनिष्ठ प्रेम सतत माझ्या डोळ्यांपुढे असतं;
मी तुझ्या खऱ्या मार्गाने चालतो.+
४ फसवणूक करणाऱ्यांसोबत मी राहत नाही,+
ढोंगी लोकांपासून मी दूर राहतो.
५ दुष्टांची संगत मला नकोशी वाटते,+
आणि मी दुर्जनांची सोबत नाकारतो.+
६ हे यहोवा, मी निर्दोषतेने माझे हात धुईन;
मी तुझ्या वेदीभोवती फिरेन.
७ मी मोठ्याने तुझी उपकारस्तुती करीन;+
मी तुझ्या सर्व अद्भुत कार्यांचं वर्णन करीन.
८ हे यहोवा, तू राहत असलेलं घर;+
आणि तुझ्या गौरवाचं ठिकाण मला प्रिय वाटतं.+
९ पापी लोकांसोबत माझा नाश करू नकोस;+
हिंसक लोकांसोबत माझा जीव घेऊ नकोस.
१० त्यांचे हात लाजिरवाणी कृत्यं करतात;
त्यांचा उजवा हात लाचखोरी करतो.
११ पण मी तर नेहमी खरेपणाने चालीन.
मला वाचव आणि माझ्यावर कृपा कर.
१२ मी सुरक्षित ठिकाणी उभा आहे;+
मी मोठ्या मंडळीत यहोवाची स्तुती करीन.+