तीमथ्य याला पहिलं पत्र
५ वयस्कर माणसांशी कठोर शब्दांत बोलू नकोस.+ उलट, त्यांना आपल्या वडिलांसारखं समजून प्रेमाने सल्ला दे. तसंच, तरुणांना भाऊ समजून, २ वयस्कर स्त्रियांना आई समजून आणि तरुण स्त्रियांना अगदी शुद्ध मनाने आपल्या बहिणी समजून सल्ला दे.
३ ज्या विधवा खरोखरच विधवा आहेत,* त्यांच्याकडे लक्ष दे.*+ ४ पण जर एखाद्या विधवेला मुलं किंवा नातवंडं असतील, तर त्यांनी आधी आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण देवाची भक्ती करतो हे दाखवावं.+ त्यांनी आपल्या आईवडिलांच्या आणि आजीआजोबांच्या उपकारांची परतफेड करायला शिकावं,+ कारण देवाच्या दृष्टीने हे योग्य आहे.+ ५ जी खरोखरच विधवा असून पूर्णपणे निराधार असते, ती देवावर आशा ठेवते+ आणि रात्रंदिवस त्याला प्रार्थना आणि याचना करत राहते.+ ६ पण जी ऐशआरामाच्या मागे लागते ती जिवंत असूनही मेलेली आहे. ७ त्यामुळे, कोणी त्यांच्याकडे बोट दाखवू नये म्हणून त्यांना या सूचना* देत जा. ८ जो स्वतःच्या माणसांच्या, आणि विशेषतः आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवत नाही, त्याने विश्वास नाकारला आहे. तो विश्वास नसलेल्या माणसापेक्षाही वाईट आहे.+
९ मदतीसाठी असलेल्या यादीत अशाच विधवेचा समावेश करावा, जी कमीतकमी ६० वर्षांची आहे, जी एकाच पतीची पत्नी होती, १० जी चांगली कामं केल्याबद्दल नावाजलेली आहे,+ जिने मुलांचं संगोपन केलं असेल,+ जिने पाहुणचार केला असेल,+ जिने पवित्र जनांचे पाय धुतले असतील,+ जिने दुःखीकष्टी लोकांना मदत केली असेल,+ आणि जिने प्रत्येक चांगल्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं असेल.
११ पण, तरुण विधवांचा यादीत समावेश करू नकोस. कारण जेव्हा त्यांच्या लैंगिक इच्छा त्यांच्या आणि ख्रिस्ताच्या आड येतात, तेव्हा त्यांना लग्न करावंसं वाटू लागतं. १२ आणि सुरुवातीला घेतलेल्या निर्णयाच्या* विरोधात गेल्यामुळे त्या स्वतःवर न्यायदंड ओढवून घेतील. १३ त्याच वेळी, त्यांना रिकामेपणाची आणि घरोघरी फिरण्याची सवय लागते. रिकामेपणासोबतच त्यांना गप्पा मारण्याचीही सवय लागते आणि त्या दुसऱ्यांच्या कामांत लुडबुड करू लागतात.+ तसंच, ज्यांबद्दल त्यांनी बोलायला नको अशा गोष्टींबद्दल त्या बोलू लागतात. १४ म्हणून, माझी अशी इच्छा आहे की तरुण विधवांनी लग्न करावं,+ मुलांना जन्म द्यावा,+ आपलं घरदार सांभाळावं आणि विरोधकांना टीका करायची संधी देऊ नये. १५ काही तर आधीच भरकटून सैतानाच्या मागे गेल्या आहेत. १६ जर विश्वासात असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नातेवाइकांमध्ये विधवा असतील, तर तिने या विधवांना मदत करावी. यामुळे, मंडळीवर भार पडणार नाही आणि मंडळी अशा विधवांना मदत करू शकेल, ज्या खरोखरच विधवा आहेत.*+
१७ जे वडील मंडळीचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात,+ खासकरून जे बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेतात,+ त्यांना दुप्पट मान द्यायच्या योग्य समजलं जावं.+ १८ कारण शास्त्रात असं म्हटलं आहे, “धान्याची मळणी करणाऱ्या बैलाचं तोंड बांधू नका,”+ तसंच, “कामकऱ्याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे.”+ १९ दोन किंवा तीन साक्षीदारांनी पुरावा दिल्याशिवाय कोणत्याही वयस्कर माणसाविरुद्ध* केलेला आरोप खरा मानू नकोस.+ २० जे पाप करत राहतात+ त्यांची सर्वांच्या देखत कानउघाडणी कर,+ म्हणजे बाकीच्या सगळ्यांना इशारा मिळेल.* २१ मी देवासमोर, ख्रिस्त येशूसमोर आणि निवडलेल्या स्वर्गदूतांसमोर तुला ही आज्ञा देतो, की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि कोणताही पक्षपात न करता या सूचनांचं पालन कर.+
२२ कोणत्याही माणसावर आपले हात ठेवायची घाई करू नकोस.*+ तसंच, इतरांच्या पापांत भागीदार होऊ नकोस; स्वतःला शुद्ध ठेव.
२३ यापुढे पाणी पिऊ नकोस,* तर आपल्या पोटाच्या दुखण्यासाठी आणि तू वारंवार आजारी पडत असल्यामुळे, थोडा द्राक्षारस घेत जा.
२४ काही माणसांची पापं जाहीर होतात आणि त्यांचा लगेच न्याय होतो, तर इतर माणसांची पापं नंतर उघड होतात.+ २५ त्याच प्रकारे, चांगली कामंसुद्धा जाहीर होतात+ आणि जी होत नाहीत, तीसुद्धा फार काळ लपून राहत नाहीत.+