मत्तयने सांगितलेला संदेश
१९ येशूचं हे सर्व बोलणं संपल्यावर, तो गालीलमधून निघून यार्देन नदीपलीकडे, यहूदीयाच्या सीमेजवळ असलेल्या प्रदेशात आला.+ २ तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्याच्यामागे आले आणि त्याने त्यांना बरं केलं.
३ मग परूशी त्याच्याजवळ आले आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी त्याला विचारलं: “एखाद्या माणसाने कोणत्याही कारणाने आपल्या बायकोला घटस्फोट देणं नियमाप्रमाणे योग्य आहे का?”+ ४ त्याने उत्तर दिलं: “तुम्ही वाचलं नाही का, की निर्माणकर्त्याने सुरुवातीपासूनच त्यांना पुरुष आणि स्त्री असं निर्माण केलं,+ ५ आणि म्हटलं, ‘या कारणामुळे, माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील आणि ते दोघं एकदेह होतील?’+ ६ तर मग, आता ते दोन नाहीत तर एकदेह आहेत. म्हणूनच, देवाने जे जोडलंय, ते कोणत्याही माणसाने तोडू नये.”*+ ७ ते त्याला म्हणाले: “मग एखादा माणूस आपल्या बायकोला सोडचिठ्ठी देऊन तिला घटस्फोट देऊ शकतो, असं मोशेने का सांगितलं?”+ ८ तो त्यांना म्हणाला: “मोशेने तुमच्या कठोर वृत्तीमुळे तुम्हाला तुमच्या बायकांना घटस्फोट द्यायची परवानगी दिली होती,+ पण सुरुवातीपासून असं नव्हतं.+ ९ मी तर तुम्हाला सांगतो, की जो अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय* इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या बायकोला घटस्फोट देतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”+
१० तेव्हा शिष्य त्याला म्हणाले: “नवरा-बायकोच्या नात्याबद्दल जर असं असेल, तर मग लग्न न केलेलंच बरं.” ११ तो त्यांना म्हणाला: “सगळेच जण हा निर्णय घेतात असं नाही, तर ज्यांना ती देणगी मिळाली आहे तेच असा निर्णय घेतात.+ १२ कारण काही असे आहेत, जे जन्मापासूनच नपुंसक आहेत आणि काही असे आहेत ज्यांना माणसांनी नपुंसक बनवलं; आणि असेही काही नपुंसक आहेत ज्यांनी स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःला नपुंसक बनवलंय. ज्याला शक्य आहे त्याने हा निर्णय घ्यावा.”+
१३ मग येशूने लहान मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी, म्हणून लोक आपल्या मुलांना त्याच्याकडे आणू लागले; तेव्हा शिष्य त्या लोकांना रागावले.+ १४ पण येशू म्हणाला: “मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. कारण स्वर्गाचं राज्य अशांचंच आहे.”+ १५ मग त्यांच्यावर हात ठेवून तो तिथून निघाला.
१६ तितक्यात एक जण त्याच्याकडे येऊन म्हणाला: “गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी कोणतं चांगलं काम केलं पाहिजे?”+ १७ तो त्याला म्हणाला: “चांगलं काम कोणतं, हे तू मला का विचारतोस? चांगला फक्त एकच आहे.+ पण जर तुला जीवन मिळवायचं असेल तर आज्ञांचं पालन करत राहा.”+ १८ तो त्याला म्हणाला: “कोणत्या आज्ञा?” येशू म्हणाला: “खून करू नका,+ व्यभिचार करू नका,+ चोरी करू नका,+ खोटी साक्ष देऊ नका,+ १९ आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा+ आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम करा.”+ २० तेव्हा तो तरुण येशूला म्हणाला: “मी तर आधीपासूनच या सगळ्या आज्ञांचं पालन करतो. मग मी आणखी काय केलं पाहिजे?” २१ येशू त्याला म्हणाला: “तुला परिपूर्ण व्हायचं असेल, तर जा आणि तुझी मालमत्ता विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल.+ आणि ये, माझा शिष्य हो.”+ २२ हे ऐकल्यावर तो तरुण दुःखी होऊन निघून गेला, कारण त्याच्याजवळ भरपूर मालमत्ता होती.+ २३ तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, श्रीमंत माणसाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं कठीण जाईल.+ २४ मी तुम्हाला हेही सांगतो, श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात जाण्यापेक्षा एका उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.”+
२५ शिष्यांनी हे ऐकलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “मग, कोणाचं तारण होणं शक्य आहे?”+ २६ येशू त्यांच्यावर नजर रोखून त्यांना म्हणाला: “माणसांना हे अशक्य आहे, पण देवाला सगळं काही शक्य आहे.”+
२७ मग पेत्र येशूला म्हणाला: “बघ! आम्ही सगळं काही सोडून तुझ्यामागे आलो आहोत. मग आम्हाला काय मिळेल?”+ २८ येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा सगळं नवीन केलं जाईल* आणि मनुष्याचा मुलगा आपल्या वैभवी राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्ही, १२ राजासनांवर बसून इस्राएलच्या १२ वंशांचा न्याय कराल.+ २९ आणि माझ्या नावासाठी ज्याने घरदार, शेतीवाडी, तसंच बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं सोडून दिली आहेत, त्या प्रत्येकाला शंभरपटीने हे सगळं आणि सर्वकाळाचं जीवन मिळेल.+
३० पण जे पहिले आहेत असे बरेच जण शेवटचे असतील आणि जे शेवटचे ते पहिले असतील.+