करिंथकर यांना दुसरं पत्र
५ कारण आपल्याला माहीत आहे, की आपलं पृथ्वीवरचं घर, म्हणजे हा तंबू जरी पाडण्यात आला,+ तरी आपल्याला देवाकडून एक इमारत मिळणार आहे. एक असं घर, जे हातांनी बांधलेलं नसून,+ स्वर्गात असलेलं आणि सर्वकाळाचं आहे. २ कारण सध्याच्या या घरात* आपण अक्षरशः कण्हतो आणि आपल्यासाठी असलेलं जे स्वर्गातलं आहे, ते घालायची* आपल्याला खूप उत्सुकता आहे,+ ३ म्हणजे, जेव्हा आपण ते घालू, तेव्हा आपण उघडे असे आढळणार नाही. ४ खरं पाहिलं, तर या तंबूमध्ये असलेले आपण ओझ्याखाली दबून जातो आणि कण्हतो, कारण आपल्याला हे काढून टाकायचं नाही, पण ते दुसरं घालायचंही आहे.+ हे यासाठी, की जे मरणारं आहे त्याला जीवनाने कायमचं गिळून टाकावं.+ ५ आता याच गोष्टीसाठी ज्याने आपल्याला तयार केलं, तो देव आहे.+ त्याने आपल्याला येणाऱ्या गोष्टींची हमी* म्हणून त्याची पवित्र शक्ती* दिली आहे.+
६ म्हणूनच, आपण नेहमी धैर्य धरतो आणि ही जाणीव बाळगतो, की जोपर्यंत आपण या शरीराच्या घरात राहतो तोपर्यंत आपण प्रभूपासून दूर आहोत.+ ७ कारण आपण दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे नाही, तर विश्वासाने चालत आहोत. ८ आपण धैर्य धरतो आणि या शरीरात नाही, तर प्रभूसोबत राहणं जास्त पसंत करतो.+ ९ म्हणून, त्याच्या सोबत राहताना काय, किंवा त्याच्यापासून दूर राहताना काय, आपण नेहमीच त्याची स्वीकृती मिळवायचा प्रयत्न करतो. १० कारण आपल्या सगळ्यांनाच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहावं लागेल.* हे यासाठी, की शरीरात असताना प्रत्येकाने ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी केल्या असतील, त्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ मिळावं.+
११ म्हणूनच, प्रभूची भीती बाळगणं गरजेचं आहे हे ओळखून, आम्ही सतत लोकांची मनं वळवतो. हे यासाठी, की त्यांनी आमचं ऐकावं. देव आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो* हे आम्हाला माहीत आहे. पण, तुमच्या विवेकालाही आमची चांगल्या प्रकारे ओळख पटली असेल,* अशी आशा मी बाळगतो. १२ आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला स्वतःची शिफारस करत नाही, तर आमच्याबद्दल बढाई मारायचं तुम्हाला प्रोत्साहन देत आहोत. हे यासाठी, की जे लोक मनातल्या गोष्टींवरून नाही, तर बाहेरच्या स्वरूपावरून बढाई मारतात+ त्यांना उत्तर देणं तुम्हाला शक्य व्हावं. १३ कारण जर आम्ही वेडे झालो होतो,+ तर ते देवासाठी झालो होतो; आणि जर आम्ही समंजस आहोत, तर ते तुमच्यासाठी आहोत. १४ कारण ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं. आम्हाला ही गोष्ट कळून चुकली आहे, की एकच माणूस सगळ्यांसाठी मेला,+ कारण खरंतर सगळे मेलेले होते. १५ आणि तो सगळ्यांसाठी मेला ते या उद्देशाने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही,+ तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावं.
१६ म्हणून आता आम्ही कोणत्याही माणसाकडे मानवी दृष्टिकोनाने पाहत नाही.+ एकेकाळी जरी आम्ही ख्रिस्ताला शारीरिक दृष्टीने ओळखत होतो, तरीसुद्धा आता आम्ही त्याला निश्चितच त्या प्रकारे ओळखत नाही.+ १७ म्हणून, जो ख्रिस्तासोबत ऐक्यात आहे, तो एक नवीन निर्मिती आहे.+ जुन्या गोष्टी गेल्या आहेत, आणि पाहा! नवीन गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत. १८ पण सगळ्या गोष्टी देवाकडून आहेत. त्याने ख्रिस्ताद्वारे स्वतःसोबत आमचा समेट केला+ आणि समेट घडवून आणण्याची सेवा आमच्या हाती सोपवली.+ १९ म्हणजे, देव माणसांचे अपराध न मोजता,+ ख्रिस्ताद्वारे त्यांचा स्वतःसोबत समेट घडवून आणत आहे+ हे घोषित करण्याची सेवा, आणि हा समेटाचा संदेश त्याने आम्हाला सोपवला आहे.+
२० म्हणूनच, आम्ही राजदूत या नात्याने+ ख्रिस्ताऐवजी कार्य करत आहोत,+ जणू देव आमच्याद्वारे लोकांना विनंती करत आहे. ख्रिस्ताऐवजी आम्ही लोकांना अशी विनंती करतो, की “देवासोबत समेट करा.” २१ ज्याला पाप माहीत नव्हतं,+ त्याला देवाने आपल्याकरता पापार्पण म्हणून दिलं.* हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपण देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरावं.+