मत्तयने सांगितलेला संदेश
१७ सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना आपल्यासोबत एका उंच डोंगरावर नेलं. तिथे त्यांच्याशिवाय आणखी कोणीच नव्हतं.+ २ मग त्यांच्यासमोर त्याचं रूपांतर झालं. त्याचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागला आणि त्याचे कपडे प्रकाशासारखे तेजस्वी* दिसू लागले.+ ३ आणि पाहा! मोशे आणि एलीया येशूसोबत बोलत असताना त्यांना दिसले. ४ तेव्हा पेत्र येशूला म्हणाला: “प्रभू, बरं झालं आम्ही आलो. तुझी इच्छा असेल, तर मी इथे तीन तंबू टाकतो; एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी.” ५ तो बोलतच होता, तितक्यात एका तेजस्वी ढगाने त्यांना झाकून टाकलं आणि त्या ढगातून असा आवाज ऐकू आला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.+ तुम्ही त्याचं ऐका.”+ ६ हे ऐकून शिष्य खूप घाबरले आणि पालथे पडले. ७ तेव्हा येशू त्यांच्याजवळ आला आणि त्यांना स्पर्श करून म्हणाला: “उठा, घाबरू नका.” ८ त्यांनी वर पाहिलं तेव्हा तिथे येशूशिवाय आणखी कोणीही नव्हतं. ९ ते डोंगरावरून खाली येत होते, तेव्हा येशूने त्यांना अशी आज्ञा दिली, “मनुष्याच्या मुलाला मेलेल्यांतून उठवलं जात नाही, तोपर्यंत हा दृष्टान्त कोणालाही सांगू नका.”+
१० पण शिष्यांनी त्याला विचारलं: “मग शास्त्री असं का म्हणतात, की आधी एलीया आला पाहिजे?”+ ११ यावर तो म्हणाला: “एलीया खरोखरच येतोय आणि तो सर्व गोष्टी पूर्वीसारख्या व्यवस्थित करेल.+ १२ पण मी तर तुम्हाला सांगतो, की एलीया आधीच आलाय आणि त्यांनी त्याला ओळखलं नाही. उलट, त्याच्यासोबत त्यांनी वाटेल तसं केलं.+ त्याच प्रकारे, मनुष्याचा मुलगाही त्यांच्याकडून छळ सोसणार आहे.”+ १३ तेव्हा शिष्यांच्या लक्षात आलं, की तो बाप्तिस्मा देणाऱ्या योहानबद्दल बोलत आहे.
१४ ते जमलेल्या लोकांजवळ+ आले, तेव्हा एक माणूस येशूजवळ आला आणि गुडघे टेकून त्याला म्हणाला: १५ “प्रभू, माझ्या मुलावर दया करा. कारण तो आजारी आहे आणि त्याला झटके येतात. तो बऱ्याचदा आगीत आणि बऱ्याचदा पाण्यात पडतो.+ १६ मी त्याला तुमच्या शिष्यांकडे आणलं होतं. पण ते त्याला बरं करू शकले नाहीत.” १७ तेव्हा येशूने उत्तर दिलं: “हे विश्वास नसलेल्या भ्रष्ट पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? त्याला इथे माझ्याजवळ आणा.” १८ मग येशूने दुष्ट स्वर्गदूताला* दटावलं तेव्हा तो त्याच्यातून निघाला आणि त्याच वेळी तो मुलगा बरा झाला.+ १९ नंतर, शिष्य एकांतात येशूजवळ येऊन म्हणाले: “आम्ही त्याला का काढू शकलो नाही?” २० तो त्यांना म्हणाला: “तुमचा विश्वास कमी असल्यामुळे. कारण मी तुम्हाला खरं सांगतो, की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याइतकाही विश्वास असला, तर तुम्ही या डोंगराला ‘इथून तिथे जा’ असं म्हणाल आणि तो जाईल. आणि कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नसेल.”+ २१*——
२२ मग ते गालीलमध्ये एकत्र जमले होते, तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मनुष्याच्या मुलाचा विश्वासघात करून त्याला लोकांच्या हवाली केलं जाईल.+ २३ ते त्याला ठार मारतील आणि तिसऱ्या दिवशी त्याला उठवलं जाईल.”+ हे ऐकून त्यांना खूप दुःख झालं.
२४ मग ते कफर्णहूम इथे आले, तेव्हा मंदिराचा कर* गोळा करणारी माणसं पेत्रकडे येऊन म्हणाली: “तुमचा गुरू मंदिराचा कर भरत नाही का?”+ २५ तो म्हणाला: “हो, भरतो.” पण, घरात आल्यावर तो काही बोलायच्या आधीच येशू त्याला म्हणाला: “शिमोन, तुला काय वाटतं? पृथ्वीवरचे राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात? आपल्या मुलांकडून की परक्यांकडून?” २६ त्याने “परक्यांकडून” असं उत्तर दिलं, तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मग साहजिकच मुलांना कर भरायची गरज नाही. २७ पण आपल्यामुळे त्यांना अडखळण व्हायला नको,+ म्हणून समुद्रावर जा आणि गळ टाक. जो पहिला मासा गळाला लागेल त्याच्या तोंडात तुला एक चांदीचं नाणं* सापडेल. ते घेऊन तुझा आणि माझा कर भर.”