रोमकर यांना पत्र
८ म्हणून, जे ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात आहेत ते शिक्षेसाठी पात्र ठरवले जात नाहीत. २ कारण पवित्र शक्तीचा* जो नियम ख्रिस्त येशूद्वारे जीवन देतो, त्याने तुम्हाला पापाच्या आणि मृत्यूच्या नियमातून स्वतंत्र केलं आहे.+ ३ मानवांच्या दुर्बलतेमुळे+ नियमशास्त्राला जे करता आलं नाही,+ ते देवाने केलं. त्याने पाप दूर करण्यासाठी स्वतःच्या मुलाला माणसाच्या रूपात*+ पाठवलं+ आणि अशा रितीने शरीरातल्या पापाला शिक्षेसाठी पात्र ठरवलं. ४ या उद्देशाने, की आपण आपल्या पापी शरीराच्या नाही, तर पवित्र शक्तीच्या अधीन होऊन+ नियमशास्त्रातले नीतिनियम पाळावेत.+ ५ कारण जे शरीराप्रमाणे चालतात ते शारीरिक गोष्टींकडे मन लावतात.+ पण जे पवित्र शक्तीप्रमाणे चालतात ते देवाच्या गोष्टींकडे* मन लावतात.+ ६ कारण शरीराकडे मन लावल्याने मृत्यू येतो,+ पण पवित्र शक्तीकडे मन लावल्याने जीवन आणि शांती मिळते.+ ७ शरीराकडे मन लावणं हे देवाबरोबर शत्रुत्व आहे.+ कारण शरीर हे देवाच्या नियमाच्या अधीन नाही आणि असूही शकत नाही. ८ म्हणूनच, जे शरीराप्रमाणे चालतात ते देवाचं मन आनंदित करू शकत नाहीत.
९ देवाची पवित्र शक्ती खरोखरच तुमच्यामध्ये राहत असेल, तर तुम्ही शरीराप्रमाणे नाही, तर पवित्र शक्तीप्रमाणे चालत आहात.+ पण, जर एखाद्यामध्ये ख्रिस्ताची मनोवृत्ती नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. १० तुम्ही ख्रिस्तासोबत ऐक्यात असलात,+ तर पापामुळे शरीर जरी मेलेलं असलं, तरी पवित्र शक्ती नीतिमत्त्वामुळे तुम्हाला जीवन देते. ११ तर आता, ज्या देवाने येशूला मेलेल्यांतून उठवलं त्याची पवित्र शक्ती तुमच्यामध्ये राहत असेल, तर ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवणारा देव+ तुमच्यामध्ये राहणाऱ्या त्याच्या पवित्र शक्तीद्वारे, मृत्यूच्या अधीन असलेल्या तुमच्या शरीरांनाही पुन्हा जिवंत करेल.+
१२ म्हणून बांधवांनो, आपण कर्जदार आहोत, पण शरीराप्रमाणे जीवन जगण्यासाठी शरीराचे कर्जदार नाही.+ १३ कारण तुम्ही शरीराप्रमाणे चालत असाल, तर तुमचा मृत्यू ठरलेला आहे. पण जर तुम्ही पवित्र शक्तीद्वारे शरीराच्या कामांना मारून टाकलं,+ तर तुम्ही जिवंत राहाल.+ १४ कारण देवाच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणारे सगळे जण देवाची मुलं आहेत.+ १५ कारण देवाची पवित्र शक्ती आपल्याला दास करत नाही. तसंच, ती आपल्या मनात भीतीही निर्माण करत नाही. उलट, पवित्र शक्तीद्वारे आपल्याला मुलं म्हणून दत्तक घेतलं जातं. आणि याच पवित्र शक्तीद्वारे आपल्याला “अब्बा,* बापा!” अशी हाक मारायची प्रेरणा मिळते.+ १६ ती पवित्र शक्ती आपल्या मनाला साक्ष देते,+ की आपण देवाची मुलं आहोत.+ १७ आणि जर आपण मुलं असू, तर वारसही आहोत. आपण देवाचे वारस+ आणि ख्रिस्तासोबत सहवारस आहोत. पण, त्याच्यासोबत आपला गौरव व्हावा म्हणून+ आधी आपल्याला त्याच्यासोबत दुःखही सोसावं लागेल.+
१८ कारण आपल्या बाबतीत जो गौरव प्रकट केला जाणार आहे, त्याच्या तुलनेत सध्याच्या काळातली दुःखं काहीच नाहीत असं मी मानतो.+ १९ कारण सृष्टी* देवाच्या मुलांच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.+ २० कारण सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आलं,+ पण स्वतःच्या इच्छेने नाही, तर ज्याने तिला स्वाधीन केलं त्याच्या इच्छेने; या आशेच्या आधारावर, की २१ सृष्टीही नाशाच्या गुलामीतून मुक्त केली जाईल+ आणि तिला देवाच्या मुलांचं गौरवी स्वातंत्र्य मिळेल. २२ कारण आपल्याला माहीत आहे, की सगळी सृष्टी आजपर्यंत कण्हत आणि दुःख सोसत आहे. २३ इतकंच नाही, तर प्रथम फळ म्हणजे पवित्र शक्ती मिळालेले आपणसुद्धा मनातल्या मनात कण्हतो.+ पण त्याच वेळी, आपण देवाची मुलं म्हणून दत्तक घेतलं जाण्याची+ आणि खंडणीद्वारे आपल्या शरीरांतून सुटका मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. २४ कारण याच आशेद्वारे आपल्याला पापापासून सोडवण्यात आलं आहे. पण, आशा केलेली गोष्ट डोळ्यांनी पाहिल्यावर तिची आशा राहत नाही. कारण, कोणी एखादी गोष्ट पाहतो, तेव्हा तो तिची आशा करू शकतो का? २५ पण जे पाहिलं नाही+ त्याची जेव्हा आपण आशा धरतो,+ तेव्हा आपण आतुरतेने आणि धीराने त्याची वाट पाहत राहतो.+
२६ तसंच, आपण दुर्बळ असतो तेव्हा पवित्र शक्तीसुद्धा आपल्याला मदत करते.+ कारण समस्या अशी असते, की प्रार्थना करायची गरज आहे हे माहीत असूनही, कशासाठी प्रार्थना करावी हे आपल्याला कळत नाही. पण, जेव्हा आपण कण्हतो आणि आपल्याला शब्दही उच्चारता येत नाहीत,* तेव्हा पवित्र शक्ती स्वतः आपल्यासाठी विनंती करते. २७ आणि, जो हृदय पारखतो+ त्याला पवित्र शक्तीने केलेल्या विनंतीचा अर्थ कळतो, कारण ही पवित्र शक्ती पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे विनंती करते.
२८ आपल्याला माहीत आहे, की जे देवावर प्रेम करतात आणि ज्यांना त्याच्या उद्देशाप्रमाणे बोलावण्यात आलं आहे, त्यांच्या भल्यासाठी देव आपली सगळी कार्यं जुळवून आणतो.+ २९ कारण ज्यांच्याबद्दल त्याने सुरुवातीलाच विचार केला होता, त्यांना त्याने आपल्या मुलासारखंच असण्यासाठी पूर्वीपासून नेमलं होतं.+ हे यासाठी, की त्याचा मुलगा पुष्कळ भावांमध्ये+ प्रथमपुत्र+ असावा. ३० शिवाय, ज्यांना त्याने पूर्वीपासून नेमलं+ त्यांनाच त्याने बोलावलंही.+ आणि ज्यांना त्याने बोलावलं, त्यांनाच त्याने नीतिमानही ठरवलं.+ शेवटी ज्यांना त्याने नीतिमान ठरवलं, त्यांचा त्याने गौरवही केला.+
३१ तर मग, या गोष्टींबद्दल आपल्याला काय म्हणता येईल? जर देव आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरोधात कोण उभं राहू शकतं?+ ३२ त्याने स्वतःच्या मुलालाही राखून ठेवलं नाही, उलट आपल्या सगळ्यांसाठी त्याने त्याला अर्पण केलं.+ तर मग, त्याच्यासोबत तो बाकीच्या सगळ्या गोष्टीही आपल्याला देणार नाही का? ३३ देवाच्या निवडलेल्यांवर कोण आरोप लावू शकतं?+ कोणीच नाही. कारण देव स्वतः त्यांना नीतिमान ठरवतो.+ ३४ कोण त्यांना दोषी ठरवू शकतं? कोणीच नाही. कारण ख्रिस्त येशू मरण पावला, इतकंच नाही, तर त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलं. आणि तो देवाच्या उजवीकडे+ असून आपल्यासाठी विनंतीही करतो.+
३५ ख्रिस्ताच्या प्रेमापासून कोण आपल्याला वेगळं करू शकतं?+ संकट, दुःख, छळ, उपासमार, नग्नता,* धोके किंवा तलवार आपल्याला वेगळं करू शकते का?+ ३६ जसं की शास्त्रातही लिहिण्यात आलं आहे: “तुझ्यामुळे दिवसभर आम्हाला मृत्यूचा सामना करावा लागतो; कत्तल केल्या जाणाऱ्या मेंढरांसारखी आमची स्थिती झाली आहे.”+ ३७ पण, ज्याने आपल्यावर प्रेम केलं त्याच्या मदतीने आपण या सगळ्या गोष्टींवर पूर्णपणे विजय मिळवत आहोत.+ ३८ कारण मला खातरी आहे, की कोणतीही गोष्ट म्हणजे मृत्यू, जीवन, स्वर्गदूत, कोणतंही सरकार, सध्याच्या गोष्टी, भविष्यातल्या गोष्टी, सामर्थ्य,+ ३९ उंची, खोली, किंवा सृष्टीतली दुसरी कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या त्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही, जे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट केलं आहे.