२ इतिहास
६ त्या वेळी शलमोन म्हणाला: “यहोवाने म्हटलं होतं, की तो गडद अंधारात राहील.+ २ पण मी तुझ्यासाठी एक भव्य मंदिर बांधलंय, तुझ्यासाठी एक कायमचं निवासस्थान बांधलंय.”+
३ मग राजा मागे वळला आणि तिथे उभ्या असलेल्या इस्राएलच्या संपूर्ण मंडळीला त्याने आशीर्वाद दिला.+ ४ तो म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा याची स्तुती होवो. त्याने स्वतः आपल्या मुखाने माझे वडील दावीद यांना वचन दिलं होतं आणि स्वतःच्या हातांनी त्याने ते पूर्णही केलंय. त्याने म्हटलं होतं: ५ ‘ज्या दिवशी मी माझ्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणलं, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या नावाच्या गौरवासाठी घर बांधायला मी इस्राएलच्या कोणत्याही वंशातलं शहर निवडलं नाही.+ शिवाय माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होण्यासाठी मी कोणत्याही माणसाला निवडलं नाही. ६ पण आता, मी माझ्या नावाच्या गौरवासाठी यरुशलेम शहर+ निवडलंय आणि माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करायला दावीदला निवडलंय.’+ ७ इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी एक घर* बांधायची माझे वडील दावीद यांची मनापासून इच्छा होती.+ ८ पण यहोवा माझ्या वडिलांना, दावीदला म्हणाला, ‘तुला माझ्या नावाच्या गौरवासाठी एक घर बांधायची मनापासून इच्छा आहे आणि तुझी ही इच्छा चांगलीच आहे. ९ असं असलं, तरी तू माझ्यासाठी घर बांधणार नाहीस; तर तुला जो मुलगा होईल तो माझ्या नावाच्या गौरवासाठी घर बांधेल.’+ १० यहोवाने दिलेलं हे वचन त्याने पूर्ण केलंय. कारण यहोवाने वचन दिल्याप्रमाणे+ मी माझ्या वडिलांच्या, दावीदच्या जागी इस्राएलच्या राजासनावर बसलो.+ आणि इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मी मंदिरही बांधलं. ११ तसंच, यहोवाने इस्राएली लोकांसोबत जो करार केला होता, तो करार असलेली पेटी+ मी तिथे ठेवली आहे.”
१२ मग शलमोन इस्राएलच्या संपूर्ण मंडळीपुढे यहोवाच्या वेदीसमोर उभा राहिला. आणि त्याने आपले हात वर आकाशाकडे पसरले.+ १३ (शलमोनने तांब्याचं एक व्यासपीठ बनवून ते अंगणाच्या+ मधे ठेवलं होतं, आणि तो त्यावर उभा होता. ते व्यासपीठ पाच हात* लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच होतं.) इस्राएलच्या सर्व मंडळीसमोर गुडघे टेकून त्याने आपले हात वर आकाशाकडे पसरले.+ १४ आणि तो म्हणाला: “हे इस्राएलच्या देवा यहोवा! स्वर्गात आणि पृथ्वीवर तुझ्यासारखा कोणीही देव नाही; तू आपला करार पाळतोस आणि तुझ्या मार्गांवर पूर्ण मनाने चालणाऱ्या आपल्या सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतोस.+ १५ तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं वचन पूर्ण केलंस.+ तू स्वतः आपल्या मुखाने वचन दिलं होतं आणि आज तू स्वतःच्या हाताने ते पूर्ण केलंस.+ १६ आता हे इस्राएलच्या देवा यहोवा तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं हे वचन पूर्ण कर. तू म्हणाला होतास: ‘तुझ्या मुलांनी जर आपल्या वागणुकीकडे लक्ष दिलं आणि ते तुझ्यासारखंच माझ्या नियमांनुसार माझ्यासमोर चालत राहिले,+ तर इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ १७ तर आता हे इस्राएलच्या देवा यहोवा! तू तुझ्या सेवकाला, दावीदला दिलेलं हे वचन खरं ठरो.
१८ पण देव खरोखर पृथ्वीवर माणसांसोबत राहील काय?+ पाहा! आकाशात आणि आकाशांच्या आकाशातही तू मावू शकत नाहीस,+ तर मी बांधलेल्या या मंदिरात तू कसा मावणार!+ १९ आता हे माझ्या देवा यहोवा, तुझ्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि तो कृपेसाठी करत असलेल्या विनंतीकडे लक्ष दे. तुझा हा सेवक मदतीसाठी करत असलेला धावा आणि तो तुझ्यासमोर करत असलेली प्रार्थना ऐक. २० ज्या स्थानाविषयी तू म्हणाला होतास, की ते तुझ्या नावाने ओळखलं जाईल त्या स्थानावर,+ म्हणजे या मंदिरावर दिवसरात्र तुझी नजर असू दे. आणि तुझा सेवक या स्थानाकडे वळून प्रार्थना करेल, तेव्हा तू ती ऐक. २१ तुझा सेवक जेव्हा मदतीसाठी विनंती करेल आणि तुझे इस्राएली लोक या स्थानाकडे वळून कळकळीची प्रार्थना करतील,+ तेव्हा तू ती ऐक; स्वर्गातल्या आपल्या निवासस्थानातून तू ती विनंती ऐक+ आणि त्यांना क्षमा कर.+
२२ एखाद्या माणसाला, आपल्या सोबत्याविरुद्ध पाप केल्याबद्दल शपथ* घ्यायला लावण्यात आली आणि त्या शपथेच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारलेली असताना जर तो या मंदिरात तुझ्या वेदीसमोर आला,+ २३ तर तू स्वर्गातून ऐक आणि आपल्या सेवकांचा न्याय कर. दुष्टाला त्याच्या दुष्ट कामांबद्दल शिक्षा कर व त्याचा गुन्हा त्याच्याच माथ्यावर मार.+ आणि नीतिमानाला निर्दोष घोषित करून त्याच्या नीतिमान कार्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ दे.+
२४ आणि तुझे इस्राएली लोक तुझ्याविरुद्ध पाप करत राहिल्यामुळे शत्रूंकडून त्यांचा पराभव झाला,+ आणि त्यांनी पुन्हा तुझ्याकडे वळून जर तुझ्या नावाचा गौरव केला+ आणि तुझ्या या मंदिरात प्रार्थना करून+ तुझ्याकडे कृपेची भीक मागितली,+ २५ तर तू स्वर्गातून आपल्या इस्राएली लोकांचं ऐक+ आणि त्यांच्या पापांची क्षमा कर आणि जो देश तू त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आण.+
२६ ते तुझ्याविरुद्ध पाप करत राहिल्यामुळे+ जर आकाशाची दारं बंद होऊन पाऊस पडला नाही,+ पण तू त्यांना नम्र व्हायला* लावल्यामुळे त्यांनी या स्थानाकडे वळून प्रार्थना केली व तुझ्या नावाचा गौरव केला आणि त्यांनी आपला पापी मार्ग सोडून दिला,+ २७ तर तू स्वर्गातून त्यांचं ऐक आणि तुझ्या सेवकांच्या, तुझ्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा कर. ज्या चांगल्या मार्गाने त्यांनी चाललं पाहिजे तो मार्ग त्यांना शिकव;+ आणि तुझ्या लोकांना तू वारसा म्हणून दिलेल्या तुझ्या देशात पाऊस पाड.+
२८ देशात जर दुष्काळ पडला,+ रोगाची साथ+ पसरली, पिकांना करपून टाकणारा उष्ण वारा आला, पिकांना बुरशी लागली,+ टोळधाड किंवा पीक फस्त करणारे नाकतोडे+ आले, किंवा देशातल्या एखाद्या शहराला त्यांच्या शत्रूंनी वेढा घातला,+ त्यांच्यावर इतर कुठलीही पीडा आली किंवा रोगराई पसरली,+ २९ आणि त्यांच्यापैकी कोणत्याही माणसाने किंवा तुझ्या सगळ्या इस्राएली लोकांनी या मंदिराकडे आपले हात पसरून प्रार्थना+ किंवा कृपेसाठी कोणतीही विनंती+ केली (कारण प्रत्येकाला आपल्या यातना आणि आपलं दुःख माहीत असतं),+ ३० तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ ती ऐक. त्यांना क्षमा कर+ आणि प्रत्येकाला आपल्या कामांप्रमाणे प्रतिफळ दे; कारण तू प्रत्येकाचं मन ओळखू शकतोस (तूच फक्त माणसाचं मन खऱ्या अर्थाने ओळखू शकतोस).+ ३१ म्हणजे मग तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात ते जोपर्यंत राहतील, तोपर्यंत ते तुझ्या मार्गांवर चालत राहून तुझं भय बाळगतील.
३२ तसंच, तुझ्या इस्राएली लोकांपैकी नसलेला विदेशी माणूस जर तुझ्या महान नावाविषयी,* तुझ्या सामर्थ्यशाली हाताविषयी आणि तुझ्या पराक्रमी बाहूविषयी ऐकून दूरच्या देशातून आला,+ आणि त्याने तुझ्या या मंदिराकडे वळून प्रार्थना केली,+ ३३ तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून ती ऐक. आणि तो विदेशी जी काही विनंती करेल ती तू पूर्ण कर. म्हणजे तुझ्या इस्राएली लोकांप्रमाणेच पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना तुझं नाव समजेल+ आणि ते तुझं भय बाळगतील. तसंच, मी बांधलेल्या या मंदिराला तुझं नाव देण्यात आलंय हेसुद्धा त्यांना समजेल.
३४ तू आपल्या लोकांना त्यांच्या शत्रूंशी लढायला कुठेही पाठवलं+ आणि त्यांनी जर तू निवडलेल्या या शहराकडे आणि मी तुझ्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून+ तुला प्रार्थना केली,+ ३५ तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना आणि कृपेसाठी त्यांनी केलेली विनंती ऐक आणि त्यांना मदत कर.*+
३६ त्यांनी जर तुझ्याविरुद्ध पाप केलं (कारण असा कोणताही माणूस नाही जो पाप करत नाही),+ आणि तुझा राग त्यांच्यावर भडकला व तू त्यांना शत्रूच्या हाती दिलं, आणि शत्रूने त्यांना बंदी करून एखाद्या जवळच्या किंवा दूरच्या देशात नेलं;+ ३७ आणि बंदी करून नेलेल्या देशात ते जर भानावर आले आणि शत्रूंच्या देशात ते तुझ्याकडे वळले आणि ‘आम्ही पाप केलं आणि चुकीचं वागलो; आम्ही दुष्टपणे वागलो,’ असं म्हणून त्यांनी तुझ्याकडे कृपेची भीक मागितली,+ ३८ आणि ज्या देशात त्यांना बंदी करून नेण्यात आलं, त्या देशात असताना+ ते जर पूर्ण मनाने आणि जिवाने तुझ्याकडे वळले,+ आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे व तू निवडलेल्या शहराकडे आणि मी तुझ्या नावाच्या गौरवासाठी बांधलेल्या मंदिराकडे वळून त्यांनी प्रार्थना केली,+ ३९ तर स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व कृपेसाठी त्यांनी केलेली विनंती ऐक आणि त्यांना मदत कर.*+ तुझ्याविरुद्ध पाप केलेल्या तुझ्या लोकांना क्षमा कर.
४० आता हे माझ्या देवा, या ठिकाणी* केल्या जाणाऱ्या प्रार्थना कृपा करून ऐक आणि त्यांकडे तुझं लक्ष असू दे.*+ ४१ तर आता हे यहोवा देवा, तू तुझ्या या विसाव्याच्या ठिकाणी ये!+ तू तुझ्या सामर्थ्याच्या प्रतिकासह, म्हणजे तुझ्या कराराच्या पेटीसह ये! हे यहोवा देवा, तुझे याजक तारणाचं वस्त्र धारण करोत, आणि तुझ्या चांगुलपणामुळे तुझे विश्वासू जण आनंद करोत.+ ४२ हे यहोवा देवा, तुझ्या अभिषिक्तापासून तोंड फिरवू नकोस!+ तुझा सेवक दावीद याच्यावर असलेल्या तुझ्या एकनिष्ठ प्रेमाची तुला नेहमी आठवण राहो.”+