यशया
३७ हिज्कीया राजाने हे ऐकलं, तेव्हा दुःखी होऊन त्याने लगेच आपले कपडे फाडले आणि गोणपाट घालून तो यहोवाच्या मंदिरात गेला.+ २ मग त्याने राजमहालाची व्यवस्था पाहणारा एल्याकीम, सचिव शेबना आणि याजकांचे प्रमुख यांना आमोजच्या मुलाकडे, म्हणजे यशया संदेष्ट्याकडे पाठवलं.+ ते सर्व गोणपाट घालून यशयाकडे गेले, ३ आणि त्याला म्हणाले: “हिज्कीया असं म्हणतो, ‘आजचा हा दिवस अतिशय दुःखाचा, निंदेचा* आणि बदनामीचा दिवस आहे; कारण मुलांना जन्म द्यायची वेळ तर आली आहे, पण जन्म द्यायची ताकदच उरली नाही.+ ४ ज्या रबशाकेला त्याच्या प्रभूने, अश्शूरच्या राजाने जिवंत देवाची निंदा करायला पाठवलंय,+ त्याचे शब्द कदाचित आपला देव यहोवा ऐकेल. आणि त्या शब्दांसाठी आपला देव यहोवा त्याला शिक्षा करेल. म्हणून आता या देशात उरलेल्या लोकांसाठी+ तुम्ही प्रार्थना करा.’”+
५ हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले,+ ६ तेव्हा यशया त्यांना म्हणाला: “तुमच्या प्रभूला सांगा: ‘यहोवा असं म्हणतो, की “अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझी निंदा केली, ते ऐकून+ तू घाबरून जाऊ नकोस.+ ७ मी त्याच्या मनात एक विचार घालीन आणि तो एक बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल.+ नंतर त्याच्याच देशात तो तलवारीने मारला जाईल असं मी करीन.”’”+
८ मग रबशाकेने ऐकलं, की अश्शूरच्या राजाने लाखीशमधून आपला तळ हलवला आहे. तो त्याच्याकडे गेला, तेव्हा राजा लिब्ना+ शहराशी लढाई करत असल्याचा त्याला दिसला. ९ मग अश्शूरच्या राजाला अशी खबर मिळाली, की इथियोपियाचा राजा तिऱ्हाका हा आपल्याशी लढाई करायला आलाय. त्याने हे ऐकलं तेव्हा त्याने आपल्या दूतांना हिज्कीयाकडे परत पाठवलं.+ तो त्यांना म्हणाला: १० “यहूदाचा राजा हिज्कीया याला जाऊन असं सांगा, ‘तुझा देव म्हणतो: “अश्शूरचा राजा यरुशलेमवर कब्जा करू शकणार नाही.” पण त्याच्यावर भरवसा ठेवू नकोस. तो तुला फसवतोय.+ ११ अश्शूरच्या राजांनी बाकीच्या सर्व देशांचा कसा नाश केला, हे तर तुला चांगलंच माहीत आहे.+ मग तू एकटाच कसा काय वाचशील? १२ माझ्या पूर्वजांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला, त्यांचे देव तरी त्यांना वाचवू शकले का?+ गोजान, हारान+ आणि रेसफ ही राष्ट्रं आता कुठे आहेत? तलस्सार इथे राहणारे एदेनचे लोक कुठे आहेत? १३ हमाथचा राजा आणि अर्पादचा राजा यांचं काय झालं? सफरवाईम,+ हेना आणि इव्वा या शहरांच्या राजाचं काय झालं?’”
१४ हिज्कीयाने दूतांच्या हातातली पत्रं घेऊन वाचली. मग तो यहोवाच्या मंदिरात गेला आणि त्याने ती पत्रं यहोवासमोर ठेवली.+ १५ तिथे हिज्कीया यहोवाला अशी प्रार्थना करू लागला:+ १६ “हे सैन्यांच्या देवा यहोवा,+ इस्राएलच्या देवा! तू करुबांच्या वर* विराजमान आहेस! तूच पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांचा खरा देव आहेस. आणि तूच आकाश व पृथ्वी बनवलीस. १७ हे यहोवा, कान लावून ऐक!+ हे यहोवा, डोळे उघड आणि पाहा!+ जिवंत देवाची निंदा करणाऱ्या सन्हेरीबच्या सर्व शब्दांकडे लक्ष दे.+ १८ हे यहोवा! हे खरंय, की अश्शूरच्या राजांनी सर्व देशांचा आणि स्वतःच्या देशाचाही नाश केलाय.+ १९ आणि त्यांनी त्या राष्ट्रांच्या देवांना आगीत फेकून दिलंय.+ कारण ते काही खरे देव नव्हते; माणसांनीच बनवलेल्या+ त्या लाकडाच्या आणि दगडाच्या वस्तू होत्या. म्हणूनच ते त्यांचा नाश करू शकले. २० पण आता हे यहोवा आमच्या देवा! आम्हाला त्याच्या हातून वाचव; म्हणजे, हे यहोवा! पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांना कळून येईल, की फक्त तूच देव आहेस.”+
२१ तेव्हा, आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला असा संदेश पाठवला: “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, की ‘तू अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्याविषयी माझ्याकडे प्रार्थना केलीस,+ २२ म्हणून यहोवा त्याच्याविषयी असं म्हणतो:
“सीयोनची कुमारी तुला तुच्छ समजते, ती तुझी थट्टा करते.
यरुशलेमची मुलगी आपलं डोकं हलवून तुझ्यावर हसते.
२३ तू कोणाची थट्टा केलीस?+ कोणाची निंदा केलीस?
तू कोणाविरुद्ध आवाज चढवून बोललास?+
गर्वाने फुगून तू कोणाकडे बघितलंस?
इस्राएलच्या पवित्र देवाकडे!+
२४ तुझ्या सेवकांद्वारे तू यहोवाची निंदा केलीस+ आणि म्हणालास:
‘माझे असंख्य युद्ध-रथ घेऊन मी पर्वतांवर चढेन,+
लबानोनच्या सर्वात दूरच्या भागांत मी जाईन.
त्याचे मोठमोठे देवदार वृक्ष, चांगली-चांगली गंधसरूची झाडं मी कापून टाकीन.
त्याच्या सर्वात उंच भागांत, घनदाट जंगलांत मी शिरेन.
२५ मी विहिरी खणून तिथलं पाणी पिईन;
माझ्या पायांच्या तळव्यांनी मी इजिप्तचे सगळे झरे* आटवून टाकीन.’
२६ पण तू हे ऐकलं नाहीस का? मी फार पूर्वीच हे ठरवलं होतं,
खूप आधीच मी याची योजना केली होती.+
आणि आता मी ती पूर्ण करीन.+
तू तटबंदीची शहरं उद्ध्वस्त करून त्यांना दगडमातीचा ढिगारा बनवशील.+
२७ तिथे राहणारे हतबल होतील;
भीतीने त्यांचा थरकाप उडेल आणि त्यांना अपमानित केलं जाईल.
ते रानातल्या झाडपाल्यासारखे होतील; हिरव्या गवतासारखे दुर्बळ होतील.
पूर्वेकडच्या वाऱ्याने सुकून गेलेल्या छतावरच्या गवतासारखे ते होतील.
२९ तू माझ्यावर भडकलास+ आणि तुझी डरकाळी माझ्या कानांपर्यंत पोहोचली;+
म्हणून आता मी तुझ्या नाकात माझी वेसण, आणि तुझ्या तोंडात माझा लगाम घालीन.+
आणि ज्या रस्त्याने तू आलास, त्याच रस्त्याने मी तुला परत मागे घेऊन जाईन.”
३० आणि तुझ्यासाठी* हे चिन्ह असेल: या वर्षी तुम्ही आपोआप उगवलेलं* धान्य खाल; आणि दुसऱ्या वर्षी त्यातून अंकुरलेलं धान्य खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही धान्याची पेरणी आणि कापणी कराल. तसंच, तुम्ही द्राक्षमळे लावाल आणि त्यांचं फळ खाल.+ ३१ यहूदाच्या घराण्यातले जे वाचतील,+ ते झाडाप्रमाणे खोलवर मूळ धरतील आणि फळ देतील. ३२ कारण उरलेले लोक यरुशलेममधून बाहेर निघतील आणि बचावलेले लोक सीयोन डोंगरातून बाहेर पडतील.+ सैन्यांचा देव यहोवा आपल्या आवेशामुळे हे घडवून आणेल.+
३३ अश्शूरच्या राजाविषयी यहोवा असं म्हणतो:+
“तो या शहरात येणार नाही,+
तो एक बाणसुद्धा मारणार नाही,
किंवा ढाल घेऊन सामना करणार नाही,
आणि वेढा घालण्यासाठी दगडमातीचा ढिगाराही रचणार नाही.”’+
३४ ‘ज्या रस्त्याने तो आलाय, त्याच रस्त्याने तो परत मागे जाईल.
तो या शहरात पाऊलसुद्धा ठेवू शकणार नाही,’ असं यहोवा म्हणतो.
३६ मग यहोवाच्या स्वर्गदूताने जाऊन अश्शूरी लोकांच्या छावणीतल्या १,८५,००० सैनिकांना ठार मारलं. लोक पहाटे उठले, तेव्हा त्यांना सगळीकडे मृतदेह पडलेले दिसले.+ ३७ त्यामुळे अश्शूरचा राजा सन्हेरीब परत निनवेला निघून गेला+ आणि तिथेच राहिला.+ ३८ एकदा सन्हेरीब राजा, निस्रोख या आपल्या दैवताच्या मंदिरात नमन करत होता. तेव्हा अद्रम्मेलेक व शरेसर या त्याच्या मुलांनी त्याला तलवारीने ठार मारलं.+ त्यानंतर ते अरारात देशात पळून गेले.+ आणि त्याचा मुलगा एसर-हद्दोन+ हा त्याच्या जागी राजा बनला.