अनुवाद
३० मी तुम्हाला सांगितलेले हे सर्व शब्द, म्हणजे तुमच्यासमोर ठेवलेले सर्व आशीर्वाद आणि शाप जेव्हा तुमच्या बाबतीत खरे ठरतील;+ आणि तुमचा देव यहोवा ज्या राष्ट्रांमध्ये तुमची पांगापांग करेल,+ त्या सर्व राष्ट्रांमध्ये तुम्हाला या शब्दांची आठवण होईल;*+ २ आणि जेव्हा तुम्ही तुमचा देव यहोवा याच्याकडे परत याल+ आणि मी आज तुम्हाला देत असलेल्या आज्ञांप्रमाणे, तुम्ही व तुमची मुलं पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने* त्याचं ऐकाल,+ ३ तेव्हा तुमचा देव यहोवा तुम्हाला दया दाखवेल+ आणि बंदिवासातून परत आणेल.+ आणि ज्या राष्ट्रांमध्ये तुमचा देव यहोवा याने तुमची पांगापांग केली होती, त्यांतून तो तुम्हाला पुन्हा गोळा करेल.+ ४ जरी तुम्ही पृथ्वीच्या टोकापर्यंत विखुरलेले असाल, तरी तुमचा देव यहोवा तिथून तुम्हाला गोळा करून परत आणेल.+ ५ तुमच्या वाडवडिलांनी ज्या देशाचा ताबा घेतला होता, त्यात तुमचा देव यहोवा तुम्हाला घेऊन येईल आणि तुम्ही त्याचा ताबा घ्याल. तो तुम्हाला तुमच्या वाडवडिलांपेक्षा जास्त फलदायी करेल आणि तुमची भरभराट होईल.+ ६ तुमचा देव यहोवा तुमचं आणि तुमच्या संततीचं मन शुद्ध* करेल,+ म्हणजे तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने* प्रेम कराल आणि त्यामुळे तुम्ही जगाल.+ ७ मग तुमचा देव यहोवा हे सर्व शाप, तुमचा द्वेष आणि छळ करणाऱ्या तुमच्या शत्रूंवर आणेल.+
८ तेव्हा तुम्ही परत याल आणि यहोवाचं ऐकाल, आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या त्याच्या सर्व आज्ञा पाळाल. ९ तुमचा देव यहोवा तुमच्या सर्व कामांमध्ये तुमची खूप भरभराट करेल.+ तुम्हाला पुष्कळ मुलं होतील आणि तुमची गुरंढोरं व तुमच्या शेताचं पीक खूप वाढेल. कारण तुमचा देव यहोवा याला तुमच्या वाडवडिलांची भरभराट करण्यात जसा आनंद झाला होता, तसाच आनंद त्याला तुमची भरभराट करण्यात होईल.+ १० जर तुम्ही तुमचा देव यहोवा याचं ऐकाल आणि या नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या आज्ञा व कायदे पाळाल आणि तुम्ही तुमचा देव यहोवा याच्याकडे आपल्या पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने* परत याल, तर हे सर्व होईल.+
११ आज मी तुम्हाला देत असलेली आज्ञा तुमच्यासाठी कठीण नाही किंवा तुमच्यापासून फार दूरही नाही.*+ १२ ती आज्ञा स्वर्गात नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल, ‘आम्ही ती ऐकावी आणि पाळावी म्हणून आमच्यासाठी ती आणायला स्वर्गात कोण जाईल?’+ १३ ती समुद्रापलीकडेही नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल, ‘आम्ही ती ऐकावी आणि पाळावी म्हणून आमच्यासाठी ती आणायला समुद्र ओलांडून कोण जाईल?’ १४ कारण नियमशास्त्राचं वचन तुम्ही पाळावं,+ म्हणून ते तुमच्या अगदी जवळ, म्हणजे तुमच्या तोंडात आणि तुमच्या हृदयात आहे.+
१५ पाहा, आज मी तुमच्यासमोर जीवन व सुख आणि मृत्यू व दुःख ठेवत आहे.+ १६ तुमचा देव यहोवा याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला आज देत आहे, त्या जर तुम्ही पाळल्या आणि तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम केलं,+ तसंच, त्याच्या मार्गांनी चालला, त्याचे नियम, त्याचे कायदे आणि त्याचे न्याय-निर्णय पाळले, तर तुम्ही जिवंत राहाल+ आणि फलदायी व्हाल; आणि ज्या देशाचा तुम्ही ताबा घेणार आहात, त्यात तुमचा देव यहोवा तुम्हाला आशीर्वाद देईल.+
१७ पण जर तुमचं मन फिरलं+ आणि तुम्ही ऐकलं नाही आणि मोहात पडून इतर देवांपुढे नमन करून त्यांची उपासना केली,+ १८ तर आज मी तुम्हाला सांगतो, की तुमचा सर्वनाश होईल.+ आणि यार्देन पार करून तुम्ही ज्या देशात जाणार आहात, त्यात तुम्ही जास्त काळ जगणार नाही. १९ स्वर्ग आणि पृथ्वी यांना तुमच्याविरुद्ध साक्षीदार मानून, आज मी तुमच्यासमोर जीवन आणि मृत्यू, तसंच, आशीर्वाद आणि शाप ठेवत आहे.+ तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी+ जीवन निवडावं, म्हणजे तुम्ही जगाल.+ २० म्हणून, तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम करा,+ त्याचं ऐका आणि त्याला धरून राहा,+ कारण तोच तुमचं जीवन आहे. आणि जो देश यहोवाने तुमच्या वाडवडिलांना, म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना देण्याचं वचन दिलं,+ त्यात तुम्हाला त्याच्यामुळेच मोठं आयुष्य लाभेल.”