लूकने सांगितलेला संदेश
२३ मग ते सगळे उठले आणि त्यांनी येशूला पिलातकडे नेलं.+ २ ते त्याच्यावर आरोप लावू लागले+ आणि म्हणाले, “हा माणूस आमच्या राष्ट्राच्या लोकांना भडकवतो, कैसराला कर देऊ नका असं सांगतो,+ आणि मी ख्रिस्त आणि राजा आहे असं म्हणतो.”+ ३ तेव्हा पिलातने त्याला विचारलं: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?” त्याने उत्तर दिलं: “तुम्ही स्वतःच तसं म्हणताय.”+ ४ मग पिलात मुख्य याजकांना आणि जमलेल्या लोकांना म्हणाला: “मला नाही वाटत या माणसाने कोणताही अपराध केलाय.”+ ५ पण ते आणखीनच जोर देऊन म्हणू लागले: “तो थेट गालीलपासून इथपर्यंत, संपूर्ण यहूदीयातल्या लोकांना शिकवून त्यांना भडकवतो.” ६ हे ऐकून पिलातने हा माणूस गालीलचा आहे का, असं विचारलं. ७ तो हेरोदच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात राहणारा आहे याची खातरी केल्यावर,+ पिलातने त्याला हेरोदकडे पाठवलं. त्या दिवसांत हेरोदही यरुशलेममध्येच होता.
८ हेरोदने येशूला पाहिलं तेव्हा त्याला फार आनंद झाला. त्याने त्याच्याबद्दल पुष्कळ गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणून त्याला बऱ्याच काळापासून येशूला भेटायची इच्छा होती.+ येशूचा एखादा चमत्कार आपल्याला पाहायला मिळेल असं त्याला वाटत होतं. ९ म्हणून तो त्याला बराच वेळ प्रश्न विचारत राहिला. पण येशूने त्याला काहीही उत्तर दिलं नाही.+ १० तरीही मुख्य याजक आणि शास्त्री पुन्हा पुन्हा उभे राहून त्याच्यावर तावातावाने आरोप लावत होते. ११ मग हेरोद आणि त्याच्या सैनिकांनी येशूचा खूप अपमान केला.+ त्यांनी त्याला एक महागाचं रेशमी वस्त्र घालून त्याची थट्टा केली.+ नंतर त्यांनी त्याला पिलातकडे परत पाठवलं. १२ त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले. त्याआधी ते दोघं एकमेकांचे शत्रू होते.
१३ मग पिलातने मुख्य याजकांना, अधिकाऱ्यांना आणि लोकांना एकत्र जमवलं. १४ तो त्यांना म्हणाला: “हा माणूस लोकांना बंड करायला चिथवतो, असं म्हणून तुम्ही याला माझ्याकडे आणलं होतं. पाहा! मी तुमच्यासमोर याची चौकशी केली. पण तुमचे आरोप सिद्ध करणारा एकही पुरावा मला सापडला नाही.+ १५ खरंतर, हेरोदलाही सापडला नाही. म्हणूनच त्याने याला माझ्याकडे परत पाठवून दिलं. मृत्युदंड देण्यासारखा कोणताही गुन्हा याने केलेला नाही. १६ त्यामुळे मी याला फटके मारून*+ सोडून देतो.” १७ *—— १८ पण जमलेले सगळे लोक ओरडू लागले: “याला मारून टाका,* आणि आमच्यासाठी बरब्बाची सुटका करा!”+ १९ (या माणसाला शहरात झालेल्या बंडात सहभागी असल्यामुळे आणि खून केल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आलं होतं.) २० पिलातने पुन्हा एकदा त्यांना विचारलं, कारण त्याला येशूची सुटका करायची इच्छा होती.+ २१ तेव्हा ते मोठमोठ्याने ओरडू लागले: “याला वधस्तंभावर* खिळा! याला वधस्तंभावर खिळा!”*+ २२ मग तिसऱ्यांदा पिलात त्यांना म्हणाला: “पण का? त्याने कोणतं वाईट काम केलंय? मृत्युदंड देण्यासारखं काहीही मला त्याच्यात सापडलं नाही. म्हणून मी त्याला फटके मारून* सोडून देतो.” २३ तेव्हा ते आणखीनच मोठ्याने ओरडून त्याला मृत्युदंड* द्यायची मागणी करू लागले. आणि ते सतत ओरडत असल्यामुळे शेवटी पिलातने हार मानली.+ २४ त्यांची मागणी पूर्ण केली जावी असा निर्णय त्याने सुनावला. २५ ते ज्याची मागणी करत होते आणि जो बंड आणि खून केल्यामुळे तुरुंगात होता, त्या माणसाची त्याने सुटका केली. मग त्यांनी येशूसोबत त्यांच्या इच्छेप्रमाणे करावं, म्हणून पिलातने त्याला त्यांच्या हवाली केलं.
२६ ते त्याला तिथून घेऊन जात होते, तेव्हा त्यांना मूळचा कुरेनेचा असलेला शिमोन शेतांतून शहराकडे येताना दिसला. त्यांनी त्याला धरलं आणि त्याने येशूचा वधस्तंभ उचलून त्याच्यामागे चालावं, म्हणून तो त्याच्या खांद्यावर ठेवला.+ २७ लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागून येत होता. त्यात बऱ्याच स्त्रियाही होत्या. त्या दुःखाने छाती बडवून त्याच्यासाठी रडत होत्या. २८ येशू त्या स्त्रियांकडे वळून म्हणाला: “यरुशलेमच्या मुलींनो, माझ्यासाठी रडू नका. उलट स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा.+ २९ कारण पाहा! असे दिवस येत आहेत जेव्हा लोक म्हणतील, ‘ज्यांनी मुलांना जन्म दिला नाही आणि दूध पाजलं नाही अशा वांझ स्त्रिया सुखी आहेत!’+ ३० मग ते पर्वतांना म्हणू लागतील, ‘आमच्यावर पडा!’ आणि टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हाला झाकून टाका!’+ ३१ झाड हिरवंगार असताना जर ते अशा गोष्टी करत आहेत, तर मग सुकल्यावर ते काय करतील?”
३२ त्याच्यासोबत आणखी दोन गुन्हेगारांनाही मृत्युदंड देण्यासाठी नेलं जात होतं.+ ३३ मग, ‘कवटी’ नावाच्या ठिकाणी पोहोचल्यावर+ त्यांनी त्याला तिथे वधस्तंभावर खिळलं. त्या गुन्हेगारांनाही वधस्तंभांवर लटकवण्यात आलं होतं; एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुसऱ्याला डावीकडे.+ ३४ येशू म्हणाला: “बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.” मग त्यांनी त्याचे कपडे आपसात वाटून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या.+ ३५ लोक हे पाहत उभे होते. पण अधिकारी त्याची थट्टा करून म्हणत होते: “याने दुसऱ्यांना वाचवलं. हा जर देवाचा निवडलेला, ख्रिस्त असेल तर आता त्याने स्वतःला वाचवून दाखवावं.”+ ३६ सैनिकसुद्धा त्याच्याजवळ जाऊन आणि त्याला आंबलेला द्राक्षारस+ देऊन त्याची थट्टा करू लागले. ३७ ते म्हणाले: “जर तू यहुद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.” ३८ तसंच, त्याच्या डोक्याच्या वर असं लिहिण्यात आलं: “हा यहुद्यांचा राजा आहे.”+
३९ मग त्याच्याशेजारी लटकवण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी एक त्याची निंदा करू लागला+ आणि म्हणाला: “ख्रिस्त आहेस ना तू? मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव!” ४० तेव्हा दुसरा त्याला दटावून म्हणाला: “तुलाही तीच शिक्षा झाली आहे, तरी तुला देवाची जराही भीती वाटत नाही का? ४१ आपल्याला मिळालेली शिक्षा तर योग्यच आहे. कारण आपण जे केलं, त्याचंच फळ भोगतोय. पण या माणसाने तर काहीच गुन्हा केलेला नाही.” ४२ मग तो म्हणाला: “येशू, तू राजा होशील तेव्हा+ माझी आठवण ठेव.” ४३ तेव्हा तो त्याला म्हणाला: “आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात* असशील.”+
४४ आता दुपारचे सुमारे बारा* वाजले होते आणि तरीसुद्धा, संपूर्ण पृथ्वीवर सुमारे तीन वाजेपर्यंत* अंधार पसरला.+ ४५ कारण सूर्याने प्रकाश दिला नाही. मग मंदिराच्या पवित्र स्थानाचा पडदा+ मधोमध, खालपर्यंत फाटला.+ ४६ आणि येशूने मोठ्याने ओरडून हाक मारली आणि तो म्हणाला: “बापा, मी आपलं जीवन तुझ्या हाती सोपवतो.”+ असं म्हणून त्याने प्राण सोडला.*+ ४७ घडलेल्या या सगळ्या गोष्टी बघून सैन्याच्या अधिकाऱ्याने देवाचा गौरव केला आणि तो म्हणाला: “हा माणूस खरंच नीतिमान होता.”+ ४८ जमलेल्या लोकांच्या समुदायाने या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवत आपापल्या घरी गेले. ४९ आणि त्याच्या ओळखीचे सगळे लोक काही अंतरावर उभे होते. तसंच, ज्या स्त्रिया गालीलहून त्याच्यासोबत आल्या होत्या, त्यासुद्धा तिथे होत्या आणि त्यांनीही या गोष्टी पाहिल्या.+
५० न्यायसभेचा सदस्य असलेला योसेफ नावाचा एक माणूस होता. तो चांगला आणि नीतिमान होता.+ ५१ (या माणसाने त्यांच्या कटाला आणि कृत्याला पाठिंबा दिला नव्हता.) तो अरिमथाई, या यहूदीयातल्या शहराचा राहणारा होता आणि देवाच्या राज्याची वाट पाहत होता. ५२ त्याने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली. ५३ मग, येशूचं शरीर खाली उतरवून+ त्याने ते उत्तम प्रतीच्या मलमलीच्या कापडात गुंडाळलं आणि खडकात खोदलेल्या एका कबरेत* ठेवलं.+ तिथे पूर्वी कोणाचाही मृतदेह ठेवण्यात आला नव्हता. ५४ तो तयारीचा दिवस होता+ आणि काही वेळातच शब्बाथाचा दिवस+ सुरू होणार होता. ५५ पण गालीलहून त्याच्यासोबत आलेल्या स्त्रियांनीही जाऊन त्याची कबर* पाहिली आणि त्याचं शरीर कसं ठेवण्यात आलं तेही पाहिलं.+ ५६ मग त्या सुगंधी मसाले आणि सुवासिक तेल तयार करायला परत गेल्या. पण, शब्बाथाच्या दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विश्रांती घेतली.+