मार्कने सांगितलेला संदेश
१३ तो मंदिरातून बाहेर जात असताना त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला: “गुरू, पाहा! किती सुंदर दगड आणि इमारती!”+ २ येशू त्याला म्हणाला: “या मोठमोठ्या इमारती पाहतोस ना? पण, या ठिकाणी एकाही दगडावर दगड राहणार नाही, प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”+
३ तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसलेला असताना पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया एकांतात त्याच्याजवळ येऊन म्हणाले: ४ “आम्हाला सांग, या गोष्टी केव्हा होतील आणि या सगळ्या गोष्टींच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?”+ ५ तेव्हा येशू त्यांना सांगू लागला: “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.+ ६ माझ्या नावाने बरेच जण येतील आणि ‘मीच तो आहे,’ असं म्हणून पुष्कळ जणांना फसवतील. ७ शिवाय, जेव्हा तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. या गोष्टी घडणं आवश्यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.+
८ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल,+ आणि ठिकठिकाणी भूकंप होतील; तसंच, दुष्काळही पडतील.+ या सगळ्या गोष्टी संकटांची* फक्त सुरुवात असेल.+
९ पण तुम्ही सांभाळून राहा. लोक तुम्हाला न्यायालयांच्या हवाली करतील+ आणि सभास्थानांत तुम्हाला फटके मारले जातील.+ राज्यपालांना आणि राजांना साक्ष मिळावी, म्हणून माझ्या नावामुळे तुम्हाला त्यांच्यासमोर उभं केलं जाईल.+ १० तसंच, सगळ्या राष्ट्रांत आधी राज्याबद्दलच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा होणं गरजेचं आहे.+ ११ जेव्हा ते तुम्हाला न्यायालयाच्या स्वाधीन करण्यासाठी नेतील, तेव्हा काय बोलावं याबद्दल आधीपासूनच चिंता करू नका. तर, त्या वेळी तुम्हाला जे सुचवलं जाईल तेच बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र शक्ती* आहे.+ १२ शिवाय, भाऊ भावाला आणि बाप आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी धरून देईल, आणि मुलं आईवडिलांविरुद्ध उठतील आणि त्यांना ठार मारण्यासाठी धरून देतील.+ १३ आणि माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील.+ पण जो शेवटपर्यंत धीर धरेल,*+ त्यालाच वाचवलं जाईल.*+
१४ पण उद्ध्वस्त करणारी घृणास्पद गोष्ट+ जिथे असायला नको तिथे उभी असलेली तुम्ही पाहाल (वाचणाऱ्याने हे समजून घ्यावं), तेव्हा जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करावी.+ १५ घराच्या छतावर असलेल्या माणसाने खाली येऊ नये किंवा आपल्या घरातून काही वस्तू घ्यायला घरात जाऊ नये. १६ आणि शेतात असलेल्या माणसाने मागे राहिलेल्या वस्तू, जसं की आपलं बाहेरचं वस्त्र घ्यायला परत जाऊ नये. १७ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांची फार दुर्दशा होईल!+ १८ हे हिवाळ्यात घडू नये म्हणून प्रार्थना करत राहा. १९ कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या सुरुवातीपासून त्या दिवसापर्यंत आलं नव्हतं, आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट+ त्या दिवसांत येईल.+ २० खरं पाहता, जर यहोवाने* ते दिवस कमी केले नसते, तर कोणीच माणूस वाचू शकला नसता. पण देवाने ज्यांना निवडलं आहे, त्या निवडलेल्या लोकांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.+
२१ त्या वेळी जर कोणी तुम्हाला म्हटलं, की ‘पाहा! ख्रिस्त इथे आहे,’ किंवा ‘पाहा! तो तिथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका.+ २२ कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उठतील+ आणि लोकांना, इतकंच काय तर निवडलेल्या लोकांनाही फसवण्यासाठी चिन्हं आणि चमत्कार करतील. २३ पण तुम्ही जागे राहा.+ मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आधीच सांगितल्या आहेत.
२४ पण त्या दिवसांत, त्या संकटानंतर सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही.+ २५ आणि तारे आकाशातून पडू लागतील आणि आकाशातल्या शक्तींना हादरे बसतील. २६ आणि मग, ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगांवर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+ २७ मग तो स्वर्गदूतांना पाठवेल आणि चारही दिशांतून,* पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना गोळा करेल.+
२८ आता अंजिराच्या झाडाच्या या उदाहरणावरून एक गोष्ट समजून घ्या: अंजिराच्या झाडाच्या कोवळ्या फांदीला जेव्हा पालवी फुटते, तेव्हा उन्हाळा जवळ आलाय हे तुम्ही ओळखता.+ २९ त्याच प्रकारे तुम्हीही या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तो दाराशीच आहे हे ओळखा.+ ३० मी तुम्हाला खरं सांगतो, या सगळ्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही.+ ३१ आकाश आणि पृथ्वीही नाहीशी होईल,+ पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.+
३२ त्या दिवसाबद्दल किंवा त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही; स्वर्गदूतांना नाही आणि मुलालाही नाही, तर फक्त पित्याला माहीत आहे.+ ३३ म्हणून सावध राहा, जागे राहा,+ कारण ठरवलेली वेळ केव्हा येईल हे तुम्हाला माहीत नाही.+ ३४ हे परदेशी जाणाऱ्या एका माणसासारखं आहे. त्याने घर सोडून जाण्याआधी आपल्या दासांना अधिकार सोपवून दिला.+ त्याने प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम नेमून दिलं आणि पहारेकऱ्याला जागं राहायची आज्ञा दिली.+ ३५ म्हणून जागे राहा, कारण घराचा मालक नेमका केव्हा परत येईल—संध्याकाळी, मध्यरात्री, पहाट होण्याआधी* की सकाळी, हे तुम्हाला माहीत नाही.+ ३६ नाहीतर तो अचानक परत येईल, तेव्हा तुम्ही झोपेत असल्याचं त्याला दिसेल.+ ३७ जे मी तुम्हाला सांगतो तेच सगळ्यांना सांगतो: जागे राहा.”+