ईयोब
२ मग एक दिवशी सगळे स्वर्गदूत*+ यहोवासमोर आले+ आणि त्यांच्यासोबत सैतानही यहोवासमोर आला.+
२ तेव्हा यहोवाने सैतानाला विचारलं: “तू कुठून आलास?” सैतानाने यहोवाला उत्तर दिलं: “मी पृथ्वीवर इकडे-तिकडे हिंडून फिरून आलो.”+ ३ मग यहोवा सैतानाला म्हणाला: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष दिलंस का?* पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो सरळ मार्गाने आणि खरेपणाने चालणारा आहे.*+ तो देवाला भिऊन वागतो आणि वाईट गोष्टींचा द्वेष करतो. तू विनाकारण त्याचा नाश करण्यासाठी* मला त्याच्याविरुद्ध भडकवत आहेस,+ पण त्याने अजूनही आपला खरेपणा सोडलेला नाही.”+ ४ पण सैतान यहोवाला म्हणाला: “त्वचेबद्दल त्वचा. माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपल्याकडे असलेलं सर्वकाही देईल. ५ पण आता तू आपला हात पुढे करून त्याच्या शरीराला इजा कर, मग पाहा, तो नक्की तुझ्या तोंडावर तुझी निंदा करेल.”+
६ म्हणून यहोवा सैतानाला म्हणाला: “पाहा! तो तुझ्या हातात आहे.* फक्त त्याचा जीव घेऊ नको!” ७ तेव्हा सैतान यहोवाच्या समोरून* निघून गेला आणि त्याने ईयोबला पायापासून डोक्यापर्यंत भयंकर फोडांनी+ पीडित केलं. ८ तेव्हा ईयोबने अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो राखेत जाऊन बसला.+
९ शेवटी त्याची बायको त्याला म्हणाली: “तुम्ही अजूनही आपला खरेपणा धरून ठेवणार आहात का? देवाची निंदा करा आणि मरा!” १० पण तो तिला म्हणाला: “तू मूर्ख बायकांसारखी बोलत आहेस. आपण खऱ्या देवाकडून फक्त चांगलं तेच घ्यायचं आणि वाईट घ्यायचं नाही का?”+ इतकं सर्व होऊनही ईयोबने आपल्या ओठांनी पाप केलं नाही.+
११ ईयोबवर आलेल्या सर्व संकटांबद्दल त्याच्या तीन मित्रांनी* ऐकलं. तेव्हा ते, म्हणजे अलीफज+ तेमानी, बिल्दद+ शूही+ आणि सोफर+ नामाथी आपापल्या ठिकाणाहून निघाले. त्यांनी ईयोबकडे जाऊन त्याला सहानुभूती दाखवण्यासाठी आणि त्याचं सांत्वन करण्यासाठी एकत्र भेटायचं ठरवलं. १२ जेव्हा त्यांनी त्याला दुरून पाहिलं, तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं नाही. ते मोठमोठ्याने रडू लागले आणि त्यांनी आपले कपडे फाडले. त्यांनी हवेत धूळ उडवली आणि आपल्या डोक्यावरही धूळ टाकली.+ १३ मग ते त्याच्यासोबत सात दिवस आणि सात रात्री जमिनीवर बसले. त्याचं भयंकर दुःख पाहून+ कोणीही त्याच्याशी एक शब्दसुद्धा बोललं नाही.