अनुवाद
३१ मग मोशेने जाऊन या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना सांगितल्या. २ तो त्यांना म्हणाला: “आता मी १२० वर्षांचा झालोय.+ यापुढे मी तुमचं नेतृत्व करू* शकणार नाही, कारण यहोवा मला म्हणाला, ‘ही यार्देन नदी ओलांडून तू पलीकडे जाणार नाहीस.’+ ३ तुमचा देव यहोवा तुमच्यापुढे पलीकडे जाईल आणि तो या राष्ट्रांचा तुमच्यासमोर सर्वनाश करेल आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घ्याल.+ यहोवाने सांगितल्याप्रमाणे, यहोशवा तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल.+ ४ यहोवाने सीहोन+ आणि ओग+ या अमोरी राजांचा नाश करताना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या देशासोबत जसं केलं, तसंच तो या राष्ट्रांसोबतही करेल.+ ५ यहोवा तुमच्या वतीने लढून त्यांना हरवेल. मग, मी तुम्हाला दिलेल्या सर्व आज्ञांप्रमाणे तुम्ही त्यांच्यासोबत करा.+ ६ हिंमत धरा आणि खंबीर व्हा.+ त्यांच्यामुळे घाबरून जाऊ नका किंवा त्यांना भिऊ नका.+ कारण तुमचा देव यहोवा तुमच्यासोबत चालत आहे. तो तुम्हाला सोडणार नाही किंवा टाकून देणार नाही.”+
७ मग मोशेने यहोशवाला बोलावलं आणि सर्व इस्राएली लोकांसमोर तो त्याला म्हणाला: “हिंमत धर आणि खंबीर हो,+ कारण यहोवाने या लोकांना जो देश देण्याचं वचन त्यांच्या वाडवडिलांना दिलं होतं, त्या देशात त्यांना तूच घेऊन जाशील आणि तो देश त्यांना वारसा म्हणून देशील.+ ८ यहोवा तुझ्यापुढे चालत आहे आणि तो यानंतरही तुझ्यासोबत राहील.+ तो तुला सोडणार नाही किंवा टाकून देणार नाही. म्हणून घाबरून जाऊ नकोस किंवा भिऊ नकोस.”+
९ मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून काढलं+ आणि यहोवाच्या कराराची पेटी उचलून नेणाऱ्या याजकांना, म्हणजे लेव्यांना, तसंच इस्राएलच्या सर्व वडीलजनांना ते दिलं. १० मग मोशेने त्यांना अशी आज्ञा दिली: “दर सात वर्षांच्या शेवटी, म्हणजे सुटकेच्या वर्षी ठरलेल्या वेळी,+ मंडपांच्या* सणादरम्यान,+ ११ जेव्हा सर्व इस्राएली लोक तुमचा देव यहोवा याने निवडलेल्या ठिकाणी त्याच्यासमोर येतील,+ तेव्हा तुम्ही हे नियमशास्त्र त्यांना वाचून दाखवा, म्हणजे ते सर्व ऐकतील.+ १२ सर्व लोकांना म्हणजे पुरुषांना, स्त्रियांना, लहान मुलांना* आणि तुमच्या शहरांमध्ये* राहणाऱ्या विदेश्यांना एकत्र करा,+ म्हणजे ते ऐकतील आणि तुमचा देव यहोवा याच्याबद्दल शिकून त्याचं भय मानतील आणि या नियमशास्त्रातल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळतील. १३ तेव्हा त्यांची मुलं, ज्यांना हे नियमशास्त्र माहीत नाही ते ऐकतील+ आणि तुम्ही यार्देन पार करून ज्या देशाचा ताबा घेणार आहात, त्या देशात तुमच्या सबंध आयुष्यभर तेही तुमचा देव यहोवा याचं भय मानायला शिकतील.”+
१४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “पाहा, तुझ्या मरणाची वेळ जवळ आली आहे.+ तेव्हा, यहोशवाला बोलव आणि तुम्ही दोघंही भेटमंडपाजवळ जा* म्हणजे मी त्याची नेमणूक करीन.”+ म्हणून मोशे आणि यहोशवा भेटमंडपाजवळ गेले. १५ मग यहोवा मंडपाजवळ ढगाच्या खांबात प्रकट झाला आणि ढगाचा खांब मंडपाच्या प्रवेशाजवळ उभा राहिला.+
१६ यहोवा मोशेला म्हणाला: “पाहा, तुझ्या मरणाची वेळ जवळ आली आहे. आता हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्या देशातल्या परक्या देवांची ते उपासना* करू लागतील.+ ते मला सोडून देतील+ आणि मी त्यांच्यासोबत केलेला माझा करार मोडतील.+ १७ तेव्हा माझा राग त्यांच्यावर भडकेल+ आणि जोपर्यंत त्यांचा नाश होत नाही तोपर्यंत मी त्यांना सोडून देईन+ आणि त्यांच्यापासून माझं तोंड फिरवीन.+ मग त्यांच्यावर खूप संकटं आणि दुःखं आल्यावर+ ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यासोबत नसल्यामुळेच ही सगळी संकटं आपल्यावर येत आहेत.’+ १८ पण त्यांनी इतर देवांकडे वळून जो दुष्टपणा केला आहे, त्यामुळे मी त्या दिवशीही त्यांच्यापासून माझं तोंड फिरवीन.+
१९ आता हे गीत स्वतःसाठी लिहून ठेवा+ आणि इस्राएली लोकांनाही शिकवा.+ या गीतामुळे इस्राएली लोकांना मी दिलेल्या इशाऱ्यांची आठवण व्हावी, म्हणून ते त्यांना तोंडपाठ करायला लावा.*+ २० त्यांच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे,+ मी जेव्हा त्यांना दूध आणि मध वाहत असलेल्या देशात+ घेऊन जाईन, आणि ते खाऊन तृप्त होतील आणि त्यांची भरभराट होईल,*+ तेव्हा ते इतर देवांकडे वळतील आणि त्यांची उपासना करू लागतील. ते माझा अनादर करतील आणि माझा करार मोडतील.+ २१ जेव्हा त्यांच्यावर खूप संकटं आणि दुःखं येतील,+ तेव्हा हे गीत त्यांना मी दिलेल्या इशाऱ्यांची आठवण करून देईल (कारण त्यांच्या वंशजांनी ते विसरायला नको). मी त्यांना वचन दिलेल्या देशात नेण्याआधीच त्यांच्या मनात कशी वृत्ती निर्माण झाली आहे,+ हे मी आधीच ओळखलं आहे.”
२२ त्या दिवशी मोशेने हे गीत लिहिलं आणि ते इस्राएली लोकांना शिकवलं.
२३ मग त्याने* नूनचा मुलगा यहोशवा याची नेमणूक केली+ आणि तो त्याला म्हणाला: “हिंमत धर आणि खंबीर हो,+ कारण मी ज्या देशाबद्दल इस्राएली लोकांना वचन दिलं आहे, त्या देशात तू त्यांना घेऊन जाशील+ आणि मी तुझ्यासोबत असेन.”
२४ मोशेने या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा एका पुस्तकात लिहून काढल्यावर,+ २५ त्याने यहोवाच्या कराराची पेटी उचलून नेणाऱ्या लेव्यांना अशी आज्ञा दिली: २६ “नियमशास्त्राचं हे पुस्तक तुमचा देव यहोवा याच्या कराराच्या पेटीच्या बाजूला ठेवा,+ म्हणजे ते तिथे तुमच्याविरुद्ध साक्ष ठरेल. २७ कारण तुमची बंडखोर+ आणि हट्टी वृत्ती*+ मला चांगली माहीत आहे. मी आज तुमच्यासोबत जिवंत असतानाच जर तुम्ही यहोवाविरुद्ध इतकं बंड करत आहात, तर मी मेल्यावर तुम्ही आणखी किती बंड कराल! २८ तुमच्या वंशांच्या वडीलजनांना आणि तुमच्या अधिकाऱ्यांना माझ्यासमोर एकत्र करा, म्हणजे मी त्यांना या गोष्टी सांगीन आणि स्वर्ग आणि पृथ्वी यांना त्यांच्याविरुद्ध साक्षीदार ठरवीन.+ २९ कारण मला चांगलं माहीत आहे, की मी मेल्यावर तुम्ही नक्की दुष्टपणे वागाल+ आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या मार्गापासून भरकटाल. आणि तुम्ही यहोवाच्या नजरेत जे वाईट आहे ते केल्यामुळे आणि तुमच्या कामांनी त्याला चीड आणल्यामुळे, भविष्यात तुमच्यावर नक्की संकटं येतील.”+
३० मग मोशेने इस्राएलच्या सगळ्या मंडळीला हे गीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकवलं:+