यहोवाचे साक्षीदार—खरे सुवार्तिक
१ येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व शिष्यांवर सुवार्ता सांगण्याची जबाबदारी सोपवली आणि विशेषतः, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास त्याने त्यांना सांगितले. (मत्त. २४:१४; प्रे. कृत्ये १०:४२) त्याच्या आरंभीच्या शिष्यांनी केवळ उपासना स्थळीच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी जेथे कोठे लोक भेटतील तेथे अखंडपणे राज्याविषयी बोलून या बाबतीत एक आदर्श मांडला. (प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०) दोनशे बत्तीस देशांत राज्याच्या संदेशाचा प्रचार केल्याने आणि मागील केवळ तीन वर्षांत दहा लाखाहून अधिक नवीन शिष्यांना बाप्तिस्मा दिल्याने आज यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण खरे ख्रिस्ती सुवार्तिक असल्याचे दाखवून दिले आहे. आपले सुवार्तिक कार्य इतके यशस्वी का झाले आहे बरे?
२ सुवार्ता आपल्याला उत्तेजित करते: सुवार्तिक म्हणजे सुवार्तेचे प्रचारक किंवा संदेशवाहक. त्याअर्थी, यहोवाचे राज्य—दुःखी मानवजातीला देता येणारी एकमेव खरी सुवार्ता घोषित करण्याचा उत्तेजनात्मक विशेषाधिकार आपल्याला लाभला आहे. आगामी परादीसमध्ये, विश्वासू मानवजात असलेल्या नव्या पृथ्वीवर नीतिमत्तेने राज्य करणाऱ्या नव्या आकाशाबद्दल आपल्याला मिळालेल्या आगाऊ ज्ञानाविषयी आपण आवेशी आहोत. (२ पेत्र ३:१३, १७) केवळ आपण ही आशा स्वीकारली आहे आणि ती इतरांना देण्यास आपण उत्सुक आहोत.
३ खरे प्रेम आपल्याला उत्तेजित करते: सुवार्तिक कार्य एक जीवनरक्षक कार्य आहे. (रोम. १:१६) म्हणूनच राज्याच्या संदेशाचा प्रसार करण्यात आपल्याला अमाप आनंद मिळतो. खरे सुवार्तिक या नात्याने आपण लोकांवर प्रेम करतो आणि नेमकी हीच गोष्ट त्यांना—आपल्या कुटुंबीयांना, शेजाऱ्यांना, परिचितांना आणि होता होईल तितक्या अधिकांना सुवार्ता सांगण्यास आपल्याला प्रवृत्त करते. जिवेभावे हे कार्य करणे हीच इतरांसाठी असलेल्या आपल्या खऱ्या प्रेमाची एक सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती होय.—१ थेस्स. २:८.
४ देवाचा आत्मा आपल्याला पाठिंबा देतो: देवाचे वचन आपल्याला याची हमी देते, की आपण राज्याचे बीज पेरण्याचे व त्याला पाणी घालण्याचे आपले काम करतो तेव्हा ‘ते वाढवण्याचे’ काम यहोवा करतो. आज आपल्याला आपल्या संघटनेत नेमके हेच पाहायला मिळते. (१ करिंथ. ३:५-७) सुवार्तिक कार्यात देवाचा आत्माच आपल्याला पाठिंबा देऊन आपणास मोठे यश देतो.—योए. २:२८, २९.
५ ‘सुवार्तिकाचे काम करण्याविषयी,’ २ तीमथ्य ४:५ येथे दिलेल्या उत्तेजनाच्या सुसंगतेत तसेच सर्व लोकांसाठी असलेल्या आपल्या प्रेमामुळे प्रत्येक प्रसंगी राज्याची उत्साहवर्धक सुवार्ता सांगण्यास आपण प्रवृत्त होण्यास हवे; आणि असे करत असताना, यहोवा आपले कार्य या पुढेही आशीर्वादित करील याविषयी आपण विश्वस्त राहू शकतो.