पाठ ६७
यरुशलेमच्या भिंती
यरुशलेमच्या भिंती बांधून पूर्ण होण्याच्या काही वर्षांआधी काय घडलं, ते आता आपण पाहू या. पारसमध्ये शूशन शहरात एक इस्राएली पुरुष राहायचा. त्याचं नाव होतं नहेम्या. तो अर्तहशश्त राजाचा एक सेवक होता. एक दिवस नहेम्याचा भाऊ यहूदावरून त्याला भेटायला आला. त्याने नहेम्याला एक वाईट बातमी सांगितली. त्याने म्हटलं: ‘यरूशलेमला परत आलेले लोक सुरक्षित नाहीत. बाबेलच्या लोकांनी यरुशलेम शहराचे जे दरवाजे आणि ज्या भिंती पाडल्या, त्या तशाच अवस्थेत आहेत. त्या पुन्हा बांधल्या गेल्या नाहीत.’ हे ऐकून नहेम्या फार दुःखी झाला. त्याला यरुशलेमला जाऊन तिथल्या लोकांची मदत करायची होती. राजाने त्याला तिथे जाण्याची परवानगी द्यावी, यासाठी त्याने यहोवाकडे प्रार्थना केली.
मग एक दिवस राजाने पाहिलं, की नहेम्या खूप दुःखी आहे. त्याने नहेम्याला विचारलं: ‘तुला मी असं उदास कधीच पाहिलं नाही. काय झालं? सर्वकाही ठीक आहे ना?’ नहेम्याने उत्तर दिलं: ‘माझ्या यरुशलेम शहराची स्थिती फार वाईट आहे. मला तिथली खूप चिंता वाटते आणि म्हणून मी दुःखी आहे.’ राजाने त्याला म्हटलं: ‘मग तुझी काय इच्छा आहे, मी काही मदत करू का?’ नहेम्याने पटकन मनात प्रार्थना केली. मग त्याने राजाला उत्तर दिलं: ‘यरुशलेमच्या पडलेल्या भिंती बांधण्यासाठी, कृपया मला जाऊ द्या.’ अर्तहशश्त राजाने नहेम्याला जाण्याची परवानगी दिली. इतकंच काय, तर नहेम्याने यरुशलेमला सुरक्षित पोचावं, याचीसुद्धा त्याने व्यवस्था केली. यासोबतच त्याने नहेम्याला यहूदाचा राज्यपालही बनवलं. आणि शहराचे दरवाजे बांधण्यासाठी त्याला लाकडंसुद्धा दिली.
यरुशलेमला पोचल्यावर, नहेम्याने शहराच्या पडलेल्या भिंतींचं परीक्षण केलं. मग त्याने सर्व याजकांना आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. नहेम्याने त्यांना म्हटलं: ‘भिंतींची दशा तर फारच वाईट आहे. आपल्याला लगेच कामाला लागलं पाहिजे.’ लोकांनीसुद्धा होकार दिला आणि त्यांनी भिंती बांधण्याचं काम सुरू केलं.
पण इस्राएली लोकांच्या काही शत्रूंनी मात्र त्यांची मस्करी करायला सुरुवात केली. ते शत्रू त्यांना चिडवत म्हणाले: ‘तुम्ही जी भिंत बांधत आहात, त्यावर एक कोल्हा जरी चढला तरी ती पडेल.’ बांधकाम करणाऱ्यांनी त्यांच्या चिडवण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी भिंती बांधण्याचं आपलं काम चालूच ठेवलं. बघता-बघता उंच आणि मजबूत भिंती तयार होत गेल्या.
शत्रू एवढ्यावरच गप्प बसले नाहीत. त्यांनी यरुशलेमवर वेगवेगळ्या दिशांनी अचानक हल्ला करायचं ठरवलं. यहुदी लोकांना जेव्हा याविषयी कळलं, तेव्हा ते घाबरले. पण नहेम्याने त्यांना म्हटलं: ‘घाबरू नका. यहोवा आपल्यासोबत आहे.’ मग नहेम्याने काम करणाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी काहींना नेमलं. यामुळे शत्रू त्यांच्यावर हल्ला करू शकले नाहीत.
शहराच्या दरवाजांचं आणि भिंतींचं बांधकाम फक्त ५२ दिवसांत पूर्ण झालं. या गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी, नहेम्याने सर्व लेव्यांना यरुशलेममध्ये बोलवलं. गाणी गाण्यासाठी नहेम्याने लेव्यांचे दोन गट बनवले. मग या दोन्ही गटांनी एकमेकांच्या उलट दिशेने भिंतींवरून शहराभोवती फेरी मारली. त्यांनी वीणा, झांजा व सारंग्या वाजवून यहोवासाठी गाणी गायली. एका गटासोबत एज्रा तर दुसऱ्या गटासोबत नहेम्या चालत होता. ते दोन्ही गट एकमेकांना मंदिराजवळ येऊन भेटले. त्यानंतर सर्व पुरुषांनी, स्त्रियांनी आणि मुलांनी यहोवाला बलिदानं अर्पण केली. त्यांनी आनंदाने उत्सव साजरा केला. त्यांचा आवाज दूरवर ऐकू जात होता.
“तुझ्यावर चालवण्यासाठी घडवलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही.”—यशया ५४:१७