अपरिपूर्ण जगात भरवसा
“जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो.” तुमच्या बाबतीतही असंच होतं का? प्रेषित पौलाची हीच समस्या होती आणि तरी देखील तो उल्लेखनीय ख्रिस्ती सचोटी राखणारा मनुष्य होता हे जाणून प्रोत्साहित व्हा. परंतु, हा विरोधाभास वाटत नाही का? रोममधील ख्रिश्चनांना लिहिलेल्या आपल्या पत्रात पौलाने या समस्येची फोड केली: “जे करावेसे वाटत नाही ते जर मी करितो, तर ते कर्म मीच करितो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करिते.” तो कोणत्या पापाचा उल्लेख करत आहे आणि सचोटी रक्षक मनुष्य होण्यासाठी त्याने त्या पापावर कशाप्रकारे मात केली होती?—रोमकर ७:१९, २०.
आपल्या आधीच्या पत्रात पौलाने लिहिले: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” तो ‘एक मनुष्य’ आदाम होता. (रोमकर ५:१२, १४) आदामीय पाप—पहिला मनुष्य, आदाम याचे पाप—मानवी वंशाच्या अपरिपूर्णतांसाठी कारणीभूत आहे आणि सचोटी राखणे खरोखरच आव्हान का आहे याचेही ते एक सबळ कारण आहे.
“मूलभूत पापा”बद्दल पौलाचा दृष्टिकोन सर्व ठिकाणी स्वीकारण्यात येत नाही कारण उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताच्या समर्थनार्थ बायबलमधील निर्मितीचा अहवाल धर्मशास्त्रीय क्षेत्रांत नाकारण्यात आला आहे. रोमकर ५:१२-१४ यावरील केलेल्या आधुनिक भाष्यात असे म्हणण्यात आले आहे की, “विद्वानांनी हा संपूर्ण उताराच काढून टाकला आहे.” तथापि, शेकडो वर्षांपूर्वी बायबलवरील विवेचनांनी वारंवार असे स्पष्ट केले, की “आदामाने जेव्हा पाप केले . . . त्याने त्याच्या पापामुळे आणि परिणामांमुळे त्याच्या सर्व संततीला दूषित केले आहे.”a
सचोटीची मूलभूत हानी
पहिला मनुष्य आदाम याच्या अस्तित्वाला ज्याप्रमाणे आज अनेक जण नाकारतात त्याप्रमाणे मिथ्याची एक कल्पकता म्हणून ते दियाबल सैतानाचे देखील खंडन करतात.b परंतु, उच्चपदस्थ येशू ख्रिस्त आपल्याला सैतानाबद्दल सांगतो, की तो “सत्यात टिकला नाही,” दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास तो अविश्वासू ठरला. (योहान ८:४४) सैतानाने फूस लावल्यानंतर आदाम आणि त्याची पत्नी हव्वा यांनी यहोवाच्या विरोधात बंडाळी केली आणि परीक्षेत त्यांची सचोटी भंग पावली.—उत्पत्ति ३:१-१९.
आपण सर्व जण आदामाचे वंशज असल्याकारणाने आपल्या सर्वांना पाप करण्याचा कल वारसा म्हणून मिळालेला आहे. शलमोन या सुज्ञ पुरुषाने म्हटले: “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.” (उपदेशक ७:२०) तरीही कोणताही मनुष्य विश्वासाच्या पात्र होऊ शकतो. हे कसे शक्य आहे? कारण, सचोटी राखण्यासाठी परिपूर्ण मनुष्य असण्याची काहीएक आवश्यकता नाही.
सचोटीसाठी पाया
इस्राएलचा राजा दावीदाने अनेक चुका केल्या आणि पुराव्यानिशी ज्ञात असलेला त्याचा बथशेबासोबतचा व्यभिचारी नातेसंबंधही त्या चुकांमध्ये समाविष्ट आहे. (२ शमुवेल ११:१-२७) दावीदाने केलेल्या अनेक चुका हे दाखवून देतात, की तो परिपूर्ण मनुष्य नव्हता. तर मग, यहोवाने या मनुष्यात पाहिले तरी काय? दावीदाचा पुत्र शलमोन याला संबोधून यहोवाने म्हटले: “तू आपला बाप दावीद याच्याप्रमाणे खऱ्या मनाने [“सचोटीने”, NW] व सरळतेने माझ्या समक्ष चालशील.” (तिरपे वळण आमचे.) (१ राजे ९:४) दावीदाने अनेक चुका केल्या होत्या तरी देखील त्याची विश्वसनीयता यहोवाने ओळखली होती. का बरे?
दावीदाने शलमोनाला पुढील प्रमाणे सांगितले तेव्हा त्याने वरील प्रश्नाचे उत्तर दिले: “परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात.” (१ इतिहास २८:९) दावीदाने चुका केल्या खऱ्या, पण तो नम्र मनुष्य होता आणि योग्य ते करण्याची त्याची इच्छा होती. त्याने वारंवार वाग्दंडाचा आणि सुधारणेचा स्वीकार केला—खरोखरच, असे करण्याची त्याने मागणी केली होती. त्याने केलेली विनंती अशी होती: “हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा.” (स्तोत्र २६:२) निश्चितपणे दावीदाला शुद्ध करण्यात आले होते. उदाहरणार्थ, बथशेबासोबतच्या त्याच्या पापाचा परिणाम त्याला त्याच्या जीवनाच्या शेवटापर्यंत भोगावा लागला. तरी सुद्धा, आपल्यावरील पातकाचा दोष उडवून लावण्याचा त्याने कधीही प्रयत्न केला नाही. (२ शमुवेल १२:१-१२) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो कधीही खऱ्या उपासनेपासून ढळला नाही. यास्तव दावीदाचा खरा, मनःपूर्वक खेद आणि पश्चात्ताप यामुळे देखील त्याच्या पातकांची क्षमा करायला आणि सचोटी रक्षक मनुष्य म्हणून त्याचा स्वीकार करायला यहोवा तयार होता.—स्तोत्र ५१ देखील पाहा.
परीक्षेत विश्वसनीय
येशूची सचोटी भंग करण्यासाठी दियाबल सैतानाने त्याची परीक्षा घेतली. त्याला कष्टात आणि दुःखात देखील सचोटी कायम ठेवायची होती, उलटपक्षी आदामाच्या सचोटीची परीक्षा परिपूर्ण मनुष्य या नात्याने केवळ ईश्वरी नियमाचे पालन करण्याचे सांगण्याद्वारे पाहण्यात आली होती. याखेरीज, आपल्या सचोटीवर मानवी कुटुंबाचा उद्धार अवलंबून आहे हे माहीत असल्यामुळे येशूवर तणाव होता.—इब्री लोकांस ५:८, ९.
येशूची सचोटी भंग करण्याचा सैतानाने चंग बांधला होता; तो अतिशय कमजोर असताना सैतान त्याच्यापाशी गेला—त्यावेळी येशूने अरण्यात ४० दिवस मनन आणि उपास केला होता. त्याने येशूची तीन वेळा परीक्षा घेतली—धोंड्यांच्या भाकरी करायला सांगितले; मंदिराच्या शिरोभागावरून उडी टाकायला सांगितली, देवदूत मध्यस्थी करून त्याला वाचवतील आणि अशा प्रकारे त्याच्या मशिहत्वाचे अलौकिक चिन्ह देण्याचेही त्याने त्याला सांगितले व एकदा आपल्या ‘पाया पडून नमन’ केल्याच्या मोबदल्यात या जगाच्या सर्व देशांचे राजत्व देण्याचेही त्याने कबूल केले. परंतु, येशूने प्रत्येक मोहपाश धुडकावून लावला आणि यहोवाप्रती आपली सचोटी कायम ठेवली.—मत्तय ४:१-११; लूक ४:१-१३.
ईयोबाची सचोटी
परीक्षेतही ईयोबाने राखलेली सचोटीतील दृढता सर्वज्ञात आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, आपल्यावर येणाऱ्या आपत्तीमागील कारणाची त्याला कल्पना नव्हती; तो देवाची सेवा स्वार्थी कारणास्तव करत आहे आणि जीवन वाचवण्यासाठी तो त्याची सचोटी सोडून देईल, असा सैतानाने आपल्याविषयी खोटा आरोप केल्याची ईयोबाला काडीमात्र कल्पना नव्हती. सैतान चुकीचा होता हे दाखवून देण्यासाठी देवाने ईयोबाला अगदी असाह्य अनुभवांतून जाऊ दिले.—ईयोब १:६-१२; २:१-८.
तीन खोटे मित्र प्रवेशतात. त्यांनी हेतुतः देवाचे दर्जे आणि उद्देश गैरपद्धतीने प्रस्तुत केले. काय चालले आहे, हे ईयोबाच्या पत्नीला देखील समजले नाही; तिच्या पतीला जेव्हा उत्तेजनाची सर्वात अधिक गरज होती अगदी त्याचवेळी मात्र ती मदत करू शकली नाही. (ईयोब २:९-१३) ईयोब अढळ राहिला. “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही. मी धार्मिक आहे हे माझे म्हणणे मी धरून राहणार, ते मी सोडावयाचा नाही; माझ्या आयुष्यातील कोणत्याहि दिवसाविषयी माझे मन मला खात नाही.”—ईयोब २७:५, ६.
ईयोबाचे उल्लेखनीय उदाहरण तसेच बायबलमध्ये नमूद करण्यात आलेल्या अनेक विश्वासू पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या सचोटीने सैतानाला लबाड शाबीत केले.
सचोटी आणि ख्रिस्ती सेवाकार्य
निव्वळ आपल्या स्वतःचे समाधान व्हावे म्हणून यहोवा सचोटीच्या या गुणाला महत्त्व देतो का? नाही. मानवजातीसाठी सचोटीचे व्यक्तिगत महत्त्व आहे. हे आपल्या लाभासाठीच होते कारण येशूने आपल्याला असा बोध केला, की आपण ‘यहोवा देवावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती करावी.’ खरोखरच, ही सर्वात “मोठी व पहिली आज्ञा” आहे आणि सचोटी रक्षक पुरुष, स्त्री किंवा मूलंही या आज्ञेचे पालन करू शकतात. (मत्तय २२:३६-३८) सचोटीने जीवन व्यतीत करण्यात काय समाविष्ट आहे आणि त्यामुळे मिळणारी प्रतिफळे कोणती आहेत?
सचोटी राखणाऱ्या माणसावर भरवसा टाकला जाऊ शकतो; त्यावर त्याचा सोबतीच भरवसा टाकणार नाही तर त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वतः देव सुद्धा त्याच्यावर भरवसा टाकेल. त्याचे शुद्ध मन त्याच्या कार्याद्वारे उघड होते; त्याच्याठायी कोणत्याही प्रकारची दांभिकता नसते. तो फसविणारा किंवा भ्रष्ट नसतो. प्रेषित पौलाने अशा प्रकारे म्हटले: “आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही; तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सद्सद्विवेकाला आपणास पटवितो.”—२ करिंथकर ४:२.
याकडे लक्ष द्या, की प्रेषित पौल, ख्रिस्ती सेवाकार्यात समाविष्ट होणाऱ्या प्रवृत्तींचा उल्लेख करतो. एखाद्या ख्रिस्ती सेवकाचे हात शुद्ध नसल्यास, तो सचोटीचा मनुष्य नसल्यास तो इतरांची सेवा तरी कशी करू शकेल? आयरीश धार्मिक संप्रदायाच्या मठाधिपतीने अलीकडेच राजीनामा दिला तो या मुद्याचे चांगल्या प्रकारे वर्णन करतो. द इन्डिपेन्डन्ट वृत्तपत्रानुसार तो हे मान्य करतो की, “एका दुर्व्यवहारी पाळकाने मुलांशी केलेला दुर्व्यवहार पूर्वीच उघड झाला होता तरी देखील त्याने त्याला मुलांसोबत काम करण्याची परवानगी दिली.” अहवालाने असे सांगितले, की हा दुर्व्यवहार २४ पेक्षा अधिक वर्षांपर्यंत चालला होता. सदर पाळकाला चार वर्षांचा तुरुंगवास झाला खरा, पण त्या पाळकाच्या पर्यवेक्षकाकडे कार्यवाही करण्यासाठी पुरेशी नैतिक सचोटी नव्हती त्यामुळे सदर पाळकाने त्या वर्षांच्या दरम्यान केलेल्या अत्याचारामुळे मुलांना झालेल्या यातनांचा जरा विचार करा!
सचोटीची—प्रतिफळे
प्रेषित योहान हा निर्भीड मनुष्य होता. योहान आणि त्याचा भाऊ याकोब यांच्या ज्वलंत आवेशामुळे येशूने त्यांना “गर्जनेचे पुत्र” असे संबोधले. (मार्क ३:१७) उल्लेखनीय सचोटीचा मनुष्य योहानाने पेत्रासोबत यहुदी शासकांना स्पष्ट सांगितले, की येशूसोबत असताना आपण जे पाहिले आणि ऐकले त्याविषयी ‘न बोलणे त्याला शक्य नाही.’ प्रेषितांप्रमाणे योहानाने देखील असे म्हटले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ४:१९, २०; ५:२७-३२.
असे वाटते, की योहान नव्वदीच्या उत्तरार्धात असताना “देवाचे वचन व येशूविषयी साक्ष ह्याखातर” त्याला पात्म बेटावर बंदिवासात टाकण्यात आले. (प्रकटीकरण १:९) आपले सेवाकार्य आता संपले आहे, असा त्याने कदाचित स्वतःच्या वयोमानाकडे पाहून विचार केला असावा. परंतु, प्रकटीकरणाच्या चित्तथरारक दृष्टान्ताविषयी लिहिण्याची नियुक्ती केवळ त्याच्यासारख्या सचोटी राखणाऱ्या मनुष्याला देणेच शक्य होते. योहानाने त्याला दिलेली नियुक्ती विश्वासूपणे पार पाडली. त्याच्यासाठी तो किती मोठा विशेषाधिकार होता! त्यानंतर त्याला आणखी विशेषाधिकार देण्यात आले. नंतर, संभाव्यपणे इफिसच्या आसपास असताना त्याने स्वतःच्या शुभवर्तमानाचा अहवाल तसेच तीन पत्रे देखील लिहिली. अशा प्रकारच्या महान विशेषाधिकारांमुळे त्याच्या ७० वर्षांच्या निष्ठावंत आणि विश्वसनीय सेवेचे सार्थक झाले होते!
सचोटी रक्षक मनुष्य झाल्याने फार मोठे समाधान प्राप्त होते. देवाच्या नजरेत विश्वासपात्र असणे म्हणजे सार्वकालिक प्रतिफळ होय. आज, खऱ्या उपासकांचा “मोठा लोकसमुदाय” सार्वकालिक जीवनाच्या भवितव्यासह शांतीच्या आणि व्यवस्थेच्या नवीन जगात प्रवेश करण्यासाठी तयार होत आहे. (प्रकटीकरण ७:९) या व्यवस्थीकरणाच्या परीक्षा आहेत; शिवाय सैतान आपल्यावर अनेक आव्हानात्मक परिस्थिती आणेलही तरी देखील नैतिकतेच्या बाबतीत सचोटी फार महत्त्वाची आहे आणि उपासनेतही ती उंचावली पाहिजे. परंतु, या गोष्टीची खात्री बाळगा की यहोवा जी शक्ती देतो तिच्या साह्याने तुम्ही विजयी होऊ शकता!—फिलिप्पैकर ४:१३.
वर्तमान आणि भविष्य या दोन्ही काळांविषयी बोलत असताना स्तोत्रकर्ता यहोवाला आभारप्रदर्शनाच्या प्रार्थनेत जे म्हणतो त्याद्वारे तो आपल्या सर्वांना खात्री देतो: “मला तर तू माझ्या सात्विकपणात स्थिर राखितोस, मला तू आपल्या सन्मुख सर्वकाळ ठेवितोस. . . . परमेश्वर . . . धन्यवादित आहे. आमेन, आमेन.”—स्तोत्र ४१:१२, १३.
[तळटीपा]
a ऑथोराइज्ड व्हर्शनच्या अनुसार, विविध लेखकांद्वारे संक्षिप्त विवेचनासहित, आमचा प्रभू आणि तारक येशू ख्रिस्ताचा नवा करार (इंग्रजी) याची टिपणी.
b सैतानाच्या नावाचा अर्थ “विरोधक” असा होतो. “दियाबल” याचा अर्थ “निंदक” असा होतो.
[४ पानांवरील चित्र]
दावीदाने चुका केल्या तरी आपण विश्वासाच्या पात्र असल्याचे त्याने दाखवून दिले
[५ पानांवरील चित्र]
विश्वासूपणाचे सर्वोत्तम उदाहरण येशूने घालून दिले
[७ पानांवरील चित्र]
विश्वासू असल्यामुळे फार मोठे समाधान मिळते