दुसरी मेंढरे आणि नवा करार
“जे विदेशी . . . , शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात, त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन.”—यशया ५६:६, ७.
१. (अ) योहानाच्या दृष्टान्तानुसार, यहोवाच्या न्यायदंडाचे वारे धरून ठेवले असताना काय साध्य केले जाते? (ब) योहानाने कोणता उल्लेखनीय समुदाय पाहिला?
प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या चवथ्या दृष्टान्तात, ‘देवाच्या इस्राएलच्या’ सर्व सदस्यांवर शिक्का मारण्याचे काम पूर्ण करत असता, यहोवाच्या न्यायदंडाचे विनाशकारी वारे धरून ठेवले असल्याचे प्रेषित योहानाने पाहिले. अब्राहामाच्या संतानाचा प्रमुख भाग असलेल्या येशूद्वारे यांना प्रथम आशीर्वादित केले जाईल. (गलतीकर ६:१६; उत्पत्ति २२:१८; प्रकटीकरण ७:१-४) त्याच दृष्टान्तात, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, . . . मोठा लोकसमुदाय . . . योहानाच्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते: ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.’” (प्रकटीकरण ७:९, १०) “कोकऱ्याकडून, तारण आहे” असे म्हणताना मोठ्या समुदायाला देखील अब्राहामाच्या संतानाकडून आशीर्वादित केले गेले आहे असे ते दर्शवतात.
२. मोठा लोकसमुदाय केव्हा सामोरा आला आणि त्यांची ओळख काय?
२ या मोठ्या लोकसमुदायाची ओळख १९३५ मध्ये झाली, आणि आज त्याची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. मोठ्या संकटातून वाचण्यासाठी चिन्हीत केलेले त्याचे सदस्य, येशू जेव्हा “शेरडांपासून मेंढरे” वेगळे करील तेव्हा सार्वकालिक जीवनासाठी बाजूला केले जातील. मोठ्या लोकसमुदायातले ख्रिस्ती, येशूच्या मेंढवाड्याच्या दाखल्यातील “दुसरी मेंढरे” आहेत. ते परादीस पृथ्वीवर सर्वकाळ राहण्याची आशा धरतात.—मत्तय २५:३१-४६; योहान १०:१६; प्रकटीकरण २१:३, ४.
३. नव्या करारासंबंधी अभिषिक्त ख्रिस्ती आणि दुसरी मेंढरे वेगळे कसे आहेत?
३ एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोकांना, अब्राहामासोबत केलेल्या कराराचा आशीर्वाद नव्या कराराद्वारे दिला जातो. या करारातले भागीदार या नात्याने ते “कृपेच्या अधीन” आणि “ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन” आहेत. (रोमकर ६:१५; १ करिंथकर ९:२१) यास्तव, देवाच्या इस्राएलच्या १,४४,००० सदस्यांनीच येशूच्या मृत्यूच्या स्मारकात बोधचिन्हांचा योग्य तऱ्हेने सहभाग घेतला आहे आणि केवळ त्यांच्याबरोबरच येशूने राज्यासाठी करार केला आहे. (लूक २२:१९, २०, २९, NW) मोठ्या लोकसमुदायातले सदस्य या नव्या करारात भागीदार नाहीत. तथापि, ते देवाच्या इस्राएलसोबत संगती राखतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ‘देशात’ राहतात. (यशया ६६:८) यास्तव, ते देखील यहोवाच्या अपात्री कृपेच्या अधीन आणि ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन आहेत असे म्हणणे योग्य ठरेल. नव्या करारात ते भागीदार नसले, तरी ते लाभाधिकारी आहेत.
“विदेशी” आणि “देवाचे इस्राएल”
४, ५. (अ) यशयाने सांगितल्यानुसार कोणता गट यहोवाची सेवा करील? (ब) मोठ्या लोकसमुदायाच्या संदर्भात यशया ५६:६, ७ ची पूर्णता कशी झाली?
४ संदेष्ट्या यशयाने लिहिले: “परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात, त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांस हर्षित करीन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील.” (यशया ५६:६, ७) त्याअर्थी, इस्राएलमध्ये “विदेशी” अर्थात गैर-इस्राएली यहोवाची उपासना करतील—त्याच्या नामाची आवड धरतील, नियमशास्त्राच्या कराराच्या अटी पाळतील, शब्बाथ पाळतील आणि मंदिरात म्हणजेच देवाच्या ‘प्रार्थनामंदिरात’ बलिदाने अर्पण करतील.—मत्तय २१:१३.
५ आपल्या दिवसात, जे “विदेशी [यहोवाच्या] चरणी जडले आहेत“ तेच मोठा लोकसमुदाय आहेत. देवाच्या इस्राएलसोबत ते यहोवाची सेवा करतात. (जखऱ्या ८:२३) देवाच्या इस्राएलसारखीच ग्रहणीय बलिदाने ते अर्पण करतात. (इब्री लोकांस १३:१५, १६) ते देवाच्या आत्मिक मंदिरात, त्याच्या ‘प्रार्थनामंदिरात’ उपासना करतात. (पडताळा प्रकटीकरण ७:१५.) ते साप्ताहिक शब्बाथाचे पालन करतात का? अभिषिक्त किंवा दुसऱ्या मेंढरांना देखील शब्बाथ पाळण्याची आज्ञा दिलेली नाही. (कलस्सैकर २:१६, १७) तथापि, पौल अभिषिक्त हिब्रू ख्रिश्चनांना म्हणाला: “देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेहि, जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा, आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.” (इब्री लोकांस ४:९, १०) जेव्हा या हिब्रू लोकांनी स्वतःला ‘देवाच्या नीतिमत्वाला’ अधीन केले आणि नियमशास्त्राच्या कर्मांवरून स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करण्यापासून विसावा घेतला तेव्हा ते ‘शब्बाथाच्या विसाव्यात’ आले. (रोमकर १०:३, ४) अभिषिक्त विदेशी ख्रिस्ती स्वतःला यहोवाच्या नीतिमत्वाला अधीन करून तोच विसावा उपभोगतात. मोठा लोकसमुदाय त्यांच्यासोबत त्या विसाव्यात सामील होतो.
६. दुसरी मेंढरे आज नव्या करारास कशी दृढ धरून ठेवतात?
६ शिवाय, प्राचीन काळातल्या विदेश्यांनी नियमशास्त्राचा करार दृढ धरून ठेवला त्याचप्रमाणे दुसरी मेंढरे नव्या करारास दृढ धरून ठेवतात. कोणत्या प्रकारे? त्याचे भागीदार होऊन नव्हे, तर त्याच्याशी संबंधित असलेल्या नियमांना अधीनता दाखवून आणि त्याच्या व्यवस्थांपासून लाभ मिळवून. (पडताळा यिर्मया ३१:३३, ३४.) आपल्या अभिषिक्त सहकाऱ्यांप्रमाणे, यहोवाचा नियम ‘दुसऱ्या मेंढरांच्या हृदयपटलावर’ लिहिलेला आहे. ते यहोवाच्या आज्ञांना आणि तत्त्वांना अतिप्रिय मानतात व त्यांचे पालन करतात. (स्तोत्र ३७:३१; ११९:९७) अभिषिक्त ख्रिश्चनांनुसार ते यहोवाला ओळखतात. (योहान १७:३) सुंतेविषयी काय? नवा करार करण्याच्या सुमारे १,५०० वर्षांआधी मोशेने इस्राएलांना असा आग्रह केला: “तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा.” (अनुवाद १०:१६; यिर्मया ४:४) नियमशास्त्रासोबतच शारीरिक सुंतेचे बंधन रद्द झाले असले, तरी अभिषिक्त जणांनी त्याचप्रमाणे दुसऱ्या मेंढरांनी सुद्धा आपल्या अंतःकरणाची “सुंता” करायलाच हवी. (कलस्सैकर २:११) शेवटी, येशूने सांडलेल्या ‘कराराच्या रक्ताच्या’ आधारे यहोवा दुसऱ्या मेंढरांच्या चुकांची क्षमा करतो. (मत्तय २६:२८; १ योहान १:९; २:२) यहोवा ज्याप्रमाणे १,४४,००० जणांना आत्मिक पुत्र म्हणून दत्तक घेतो त्याप्रमाणे तो यांना दत्तक घेत नाही. परंतु, तो दुसऱ्या मेंढरांना नीतिमान ठरवतो ज्याप्रमाणे अब्राहामाला देवाचा मित्र म्हणून नीतिमान ठरवले होते.—मत्तय २५:४६; रोमकर ४:२, ३; याकोब २:२३.
७. अब्राहामाप्रमाणे नीतिमान ठरवलेल्या दुसऱ्या मेंढरांसाठी आज कोणत्या आशेचा मार्ग खुला आहे?
७ एक लक्ष चव्वेचाळीस हजार जणांच्या बाबतीत, नीतिमान ठरवले जाण्यामुळे स्वर्गीय राज्यात येशूसोबत राज्य करण्याच्या आशेचा मार्ग खुला होतो. (रोमकर ८:१६, १७; गलतीकर २:१६) दुसऱ्या मेंढरांच्या बाबतीत, देवाचे मित्र म्हणून नीतिमान घोषित केले जाण्यामुळे त्यांना परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा आपलीशी करता येते—एकतर मोठ्या लोकसमुदायाचा भाग बनून हर्मगिदोनातून वाचवले जाऊन किंवा ‘नीतिमानांच्या पुनरुत्थानाद्वारे.’ (प्रेषितांची कृत्ये २४:१५) अशी आशा बाळगणे आणि विश्वाच्या सार्वभौमाचे मित्र असणे, “[त्याच्या] मंडपात . . . वस्ती” करणे हा केवढा मोठा सुहक्क! (स्तोत्र १५:१, २) होय, अभिषिक्त त्याचप्रमाणे दुसरी मेंढरे, येशू अर्थात अब्राहामाच्या संततीद्वारे अद्भुतरितीने आशीर्वादित झाले आहेत.
मोठा प्रायश्चित्ताचा दिवस
८. नियमशास्त्राधीन प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या बलिदानांद्वारे काय पूर्वसूचित केले होते?
८ नव्या कराराची चर्चा करताना, पौलाने नियमशास्त्राधीन वार्षिक प्रायश्चित्ताच्या दिवसाची आठवण आपल्या वाचकांना करून दिली. त्या दिवशी, वेगवेगळे बलिदान अर्पण करण्यात आले—एक लेवीच्या याजकीय वंशासाठी आणि दुसरे गैरयाजकीय १२ वंशांसाठी. हे येशूच्या मोठ्या बलिदानाला पूर्वसूचित करत असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे ज्याचा फायदा स्वर्गीय आशा असलेल्या १,४४,००० जणांना त्याचप्रमाणे पार्थिव आशा असलेल्या लाखो जणांना होतो.a पौलाने दाखवले की, त्याच्या पूर्णतेत येशूच्या बलिदानाचे फायदे नव्या कराराखाली मोठ्या प्रायश्चित्ताच्या दिवसाद्वारे लागू केले जातात. या मोठ्या दिवसाचा महायाजक या नात्याने मानवांसाठी “सार्वकालिक मुक्ति” मिळवण्याकरता येशूने प्रायश्चित्ताचे बलिदान म्हणून आपले परिपूर्ण जीवन अर्पण केले.—इब्री लोकांस ९:११-२४.
९. नव्या करारात असून हिब्रू अभिषिक्त ख्रिश्चन कशाचा भाग बनू शकले?
९ पहिल्या शतकातले अनेक हिब्रू ख्रिश्चन अद्यापही “नियमशास्त्राभिमानी” होते. (प्रेषितांची कृत्ये २१:२०) म्हणून उचितपणे पौलाने त्यांना आठवण करून दिली: “[येशू] नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरिता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनांपासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ति होण्यासाठी मृत्यु झाल्याने, सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे.” (इब्री लोकांस ९:१५) नव्या कराराने हिब्रू ख्रिश्चनांना जुन्या करारातून मुक्त केले की, ज्याद्वारे त्यांची पापी अवस्था उघडकीस आली. नव्या करारामुळेच ते ‘सार्वकालिक वारशाच्या अभिवचनाचे’ भाग बनू शकले.
१०. अभिषिक्त आणि दुसरी मेंढरे देवाचे कशासाठी आभार मानतात?
१० “जो कोणी . . . पुत्रावर विश्वास ठेवतो” त्याला खंडणी बलिदानाचा लाभ होईल. (योहान ३:१६, ३६) पौल म्हणाला: “ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे, तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.” (इब्री लोकांस ९:२८) आज, येशूची वाट पाहणाऱ्यांमध्ये, देवाच्या इस्राएलमधील उर्वरित अभिषिक्त ख्रिस्ती आणि सार्वकालिक जीवनाचा वारसा असलेल्या मोठ्या लोकसमुदायातले लाखो जण सामील आहेत. दोन्ही वर्ग नव्या करारासाठी आणि त्यासोबत असलेल्या जीवनदायी आशीर्वादांसाठी शिवाय, मोठ्या प्रायश्चित्ताच्या दिवसासाठी आणि स्वर्गीय परम पवित्र स्थानातील महायाजक येशू याच्या सेवेसाठी देवाचे आभार मानतात.
पवित्र सेवेत व्यग्र
११. येशूच्या बलिदानाकरवी विवेक शुद्ध केल्याने, अभिषिक्त त्याचप्रमाणे दुसरी मेंढरे आनंदाने काय करतात?
११ हिब्रू लोकांना लिहिलेल्या पत्रात, पौलाने जुन्या कराराधीन पापार्पणांच्या तुलनेत नव्या कराराच्या व्यवस्थेतील येशूच्या बलिदानाच्या श्रेष्ठ मूल्यावर जोर दिला. (इब्री लोकांस ९:१३-१५) येशूचे उत्तम बलिदान “आपली सद्सद्विवेकबुद्धि जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून . . . शुद्ध” करण्यास समर्थ आहे. हिब्रू ख्रिश्चनांसाठी ‘निर्जीव कृत्ये’ म्हणजे ‘पहिल्या कराराखाली झालेली उल्लंघने’ होते. आजच्या ख्रिश्चनांसाठी, ती गतकाळातली पापे आहेत ज्यांसाठी खरा पश्चात्ताप केला असून देवाने त्यांची क्षमा केली आहे. (१ करिंथकर ६:९-११) शुद्ध विवेकाने, अभिषिक्त ख्रिस्ती ‘जिवंत देवाला पवित्र सेवा’ सादर करतात. आणि मोठा लोकसमुदायही तसेच करतो. ‘कोकऱ्याच्या रक्ताद्वारे’ आपले विवेक शुद्ध करून ते देवाच्या आत्मिक मंदिरात “अहोरात्र . . . त्याची [पवित्र] सेवा करितात.”—प्रकटीकरण ७:१४, १५.
१२. आपल्याला ‘विश्वासाची पूर्ण खातरी’ आहे हे आपण कसे दाखवू शकतो?
१२ शिवाय, पौल म्हणाला: “आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.” (इब्री लोकांस १०:२२) आपल्याला ‘विश्वासाची पूर्ण खातरी’ आहे हे आपण कसे दाखवू शकतो? पौलाने हिब्रू ख्रिश्चनांना आग्रह केला: “आपण न डळमळता आपल्या [स्वर्गीय] आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे; आणि प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२३-२५) आपला विश्वास जिवंत असल्यास, आपणही ‘एकत्र मिळणे सोडणार नाही.’ प्रीती आणि सत्कर्मे करावयास आपल्या बांधवांना उत्तेजन देण्यात आणि त्यांच्याकडून उत्तेजन मिळवण्यात त्याचप्रमाणे आपल्या आशेची जाहीर घोषणा करण्याच्या महत्त्वपूर्ण कामासाठी प्रोत्साहन मिळवण्यात आपण आनंद मानू, मग ती आशा पार्थिव असो अथवा स्वर्गीय.—योहान १३:३५.
‘सर्वकाळचा करार’
१३, १४. नवा करार कोणत्या प्रकारे सर्वकाळाचा आहे?
१३ एक लक्ष चव्वेचाळीस हजारांतला शेवटला जण जेव्हा आपली स्वर्गीय आशा प्राप्त करील तेव्हा काय होते? त्यापुढे नवा करार लागू होणार नाही का? त्या वेळी, पृथ्वीवर देवाच्या इस्राएलपैकी एकही शेष जण राहणार नाही. करारातले सर्व भागीदार येशूसोबत “[त्याच्या] पित्याच्या राज्यात” असतील. (मत्तय २६:२९) परंतु, हिब्रू लोकांना लिहिलेल्या पत्रातले पौलाचे शब्द आपल्याला आठवतात: “शांतीच्या देवाने सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ . . . ह्याला मेलेल्यातून परत आणिले.” (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस १३:२०; यशया ५५:३) नवा करार कोणत्या अर्थाने सर्वकाळाचा आहे?
१४ प्रथम, नियमशास्त्राच्या कराराप्रमाणे तो कधीच बदलला जाणार नाही. दुसरी गोष्ट, येशूच्या राजपदासारखेच त्याच्या अंमलबजावणीचे परिणाम कायमचे आहेत. (लूक १:३३ ची तुलना १ करिंथकर १५:२७, २८ याजशी करा.) स्वर्गीय राज्याला यहोवाच्या उद्देशांमध्ये सर्वकाळची जागा आहे. (प्रकटीकरण २२:५) तिसरी गोष्ट, नव्या कराराच्या व्यवस्थेचा दुसऱ्या मेंढरांना लाभ होत राहील. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत, विश्वासू मानव आता करतात त्याचप्रमाणे “अहोरात्र [यहोवाच्या] मंदिरात त्याची [पवित्र] सेवा” करत राहतील. येशूच्या ‘कराराच्या रक्ताच्या’ आधारे क्षमा केलेल्या त्यांच्या गत पापांची यहोवा पुन्हा आठवण करणार नाही. यहोवाचे मित्र म्हणून त्यांची नीतिमान स्थिती कायम राहील आणि त्याचा नियम त्यांच्या हृदयपटलांवर तेव्हाही लिहिलेला असेल.
१५. नव्या जगात यहोवाचा त्याच्या पार्थिव उपासकांसोबत कशाप्रकारचा नातेसंबंध असेल त्याचे वर्णन करा.
१५ त्या वेळी ‘मी त्यांचा देव आहे आणि ते माझे लोक आहेत,’ असे यहोवा या मानवी सेवकांविषयी म्हणू शकेल का? होय. “त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील.” (तिरपे वळण आमचे.) (प्रकटीकरण २१:३) ते “पवित्र जनांची छावणी” होतील, ‘प्रिय नगराचे’ अर्थात येशू ख्रिस्ताच्या स्वर्गीय वधूचे पार्थिव प्रतिनिधी होतील. (प्रकटीकरण १४:१; २०:९; २१:२) येशूने सांडलेल्या ‘कराराच्या रक्तावर’ विश्वास ठेवल्याने आणि स्वर्गीय राजे आणि याजक जे पृथ्वीवर असताना देवाचे इस्राएल होते त्यांच्या अधीन राहिल्याने हे सर्व शक्य होईल.—प्रकटीकरण ५:१०.
१६. (अ) पृथ्वीवर पुनरुत्थान प्राप्त करणाऱ्यांसमोर कोणत्या शक्यता आहेत? (ब) हजार वर्षांच्या शेवटी कोणते आशीर्वाद मिळतील?
१६ पृथ्वीवर पुनरुत्थित केलेल्या मृतांविषयी काय? (योहान ५:२८, २९) अब्राहामाचे संतान, येशूद्वारे “आशीर्वादित” होण्यासाठी त्यांना देखील आमंत्रण दिले जाईल. (उत्पत्ति २२:१८) त्यांना देखील यहोवाचे नाव प्रिय मानावे लागेल, त्याची सेवा करावी लागेल, ग्रहणीय बलिदाने अर्पावी लागतील आणि त्याच्या प्रार्थनामंदिरात पवित्र सेवा करावी लागेल. असे करणारे, देवाच्या विसाव्यात सहभागी होतील. (यशया ५६:७ ८) हजार वर्षांच्या शेवटापर्यंत, सर्व विश्वासू जण येशू ख्रिस्ताच्या आणि त्याच्या १,४४,००० सहकारी याजकांच्या सेवेद्वारे मानवी पूर्णतेच्या स्थितीत आलेले असतील. देवाचे मित्र म्हणून केवळ ते नीतिमान ठरवले जाणार नाहीत तर ते नीतिमान असतील. आदामाकडून वारशाने मिळवलेल्या पाप आणि मृत्यूपासून पूर्णतः मुक्त होऊन ते ‘जिवंत होतील.’ (प्रकटीकरण २०:५; २२:२) केवढा तो आशीर्वाद! आज आपल्या दृष्टिकोनातून, येशूचे आणि १,४४,००० जणांचे याजकीय कार्य त्या वेळी पूर्ण झाले असेल असे दिसते. मोठ्या प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या आशीर्वादांचा सर्वार्थाने अवलंब केलेला असेल. शिवाय, येशू “देवपित्याला राज्य सोपून देईल.” (१ करिंथकर १५:२४) मानवजातीकरता शेवटी परीक्षा असेल, आणि मग सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा सर्वकाळासाठी नाश केला जाईल.—प्रकटीकरण २०:७, १०.
१७. आपल्यासमोर असलेल्या हर्षाचा विचार करता, आपल्यापैकी प्रत्येकाचा काय करण्याचा दृढनिश्चय असावा?
१७ त्या वेळी सुरू होणाऱ्या रंजक युगात ‘सर्वकाळच्या कराराची’ काय भूमिका असेल? ते आपण सांगू शकत नाही. यहोवाने आतापर्यंत जे काही प्रकट केले आहे तेवढे पुरेसे आहे. ते आपल्याला थक्क करून सोडते. जरा विचार करा—“नवे आकाश व नवी पृथ्वी” ह्यांमध्ये सार्वकालिक जीवन! (२ पेत्र ३:१३) ते अभिवचन प्राप्त करण्याची आपली इच्छा कशानेही कमकुवत केली जाऊ नये. दृढ उभे राहणे सोपे नसेल. पौलाने म्हटले: “तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ति करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे.” (इब्री लोकांस १०:३६) परंतु, लक्षात असू द्या की, कोणत्याही समस्येवर मात करावी लागली किंवा कशाही प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावे लागले, तरीसुद्धा आपल्यापुढे असणाऱ्या हर्षाच्या तुलनेत या गोष्टी अगदीच नगण्य आहेत. (२ करिंथकर ४:१७) “नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी” आपण कोणीही असू नये. त्याउलट, “जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी” आहोत असे आपण सिद्ध करू या. (इब्री लोकांस १०:३९) आपण सर्वजण करारांचा देव, यहोवा याच्यावर संपूर्ण भरवसा ठेवू या आणि आपल्या प्रत्येकाला याद्वारे अनंत आशीर्वाद मिळोत!
[तळटीप]
a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित नव्या पृथ्वीवर बचावलेले (इंग्रजी), अध्याय १३ पाहा.
तुम्हाला समजले का?
◻ अभिषिक्त ख्रिश्चनांशिवाय, अब्राहामाच्या संतानाद्वारे कोणाला आशीर्वादित केले जात आहे?
◻ नव्या कराराद्वारे आशीर्वादित झाल्याने दुसरी मेंढरे जुन्या कराराखाली यहुदीय मतानुसारींसारखे कसे आहेत?
◻ मोठ्या प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या व्यवस्थेकरवी दुसरी मेंढरे कसे आशीर्वादित होतात?
◻ पौलाने नव्या करारास ‘सर्वकाळचा करार’ असे का म्हटले?
[२१ पानांवरील चौकट]
मंदिरात पवित्र सेवा
मोठा लोकसमुदाय, अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत यहोवाच्या महान आत्मिक मंदिराच्या पार्थिव अंगणात उपासना करतो. (प्रकटीकरण ७:१४, १५; ११:२) विदेश्यांच्या वेगळ्या अंगणात ते आहेत असा निष्कर्ष काढण्याचे काही कारण नाही. येशू पृथ्वीवर होता तेव्हा, मंदिरात विदेश्यांचे एक अंगण होते. तथापि, शलमोन आणि यहेज्केलच्या मंदिरांच्या ईश्वरप्रेरित नकाशांमध्ये, विदेश्यांच्या अंगणाची काहीच तरतूद नव्हती. शलमोनाच्या मंदिरात एक बाहेरील अंगण होते जेथे इस्राएली आणि यहुदीय मतानुसारी, स्त्री व पुरुष सगळे एकत्र उपासना करत. आत्मिक मंदिराच्या पार्थिव अंगणाचा हा भविष्यसूचक नमुना होता जेथे योहानाने मोठ्या लोकसमुदायाला पवित्र सेवा सादर करत असताना पाहिले.
तथापि, आतील अंगणात जेथे मोठी वेदी होती तेथे केवळ याजक आणि लेवी जाऊ शकत होते; पवित्र स्थानात केवळ याजक जाऊ शकत होते; आणि परम पवित्र स्थानात केवळ महायाजक जाऊ शकत होता. आतील अंगण आणि पवित्र स्थान हे पृथ्वीवरील अभिषिक्त ख्रिश्चनांच्या अनोख्या आध्यात्मिक परिस्थितीला पूर्वचित्रित करत असल्याचे समजले जाते. आणि परम पवित्र स्थान हे स्वर्गास चित्रित करते, जेथे अभिषिक्त ख्रिश्चनांना त्यांच्या स्वर्गीय महायाजकासोबत अमर जीवन मिळते.—इब्री लोकांस १०:१९, २०.
[२३ पानांवरील चित्र]
आपल्यासमोर असलेल्या हर्षाचा विचार करता, “जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी” आपण होऊ या