वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ८/१ पृ. १६-२१
  • दुसऱ्‍यांना आदर द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दुसऱ्‍यांना आदर द्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा मानवांचा आदर करतो
  • येशूने इतरांना आदर दाखवला
  • पौलाने आदर दाखवला
  • आपल्या दिवसात आदर दाखवणे
  • यहोवाचा आदर करणे
  • सर्वांस मान द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • जे सन्मानास पात्र आहेत, त्यांना सन्मान द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • आपल्या बंधुभगिनींचा आदर करण्यात तुम्ही पुढाकार घेता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • आशेच्या देवाचा आदर करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ८/१ पृ. १६-२१

दुसऱ्‍यांना आदर द्या

“तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.”—रोमकर १२:१०.

१, २. (अ) आपली नम्रता दाखवण्याकरता आपण काय केले पाहिजे? (ब) बायबलमध्ये “आदर” या शब्दाचा सहसा कोणत्या अर्थाने प्रयोग करण्यात येतो आणि आदर दाखवणे कोणाला जास्त सोपे जाते?

आपल्या आधीच्या लेखात देवाच्या वचनात दिलेल्या पुढील सल्ल्यावर जोर देण्यात आला होता: “तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (१ पेत्र ५:५) नम्रतारूपी कमरबंद बांधण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांना आदर दाखवणे.

२ दुसऱ्‍यांचा सन्मान करणे, त्यांचा मान ठेवणे आणि त्यांची पर्वा करणे हे दाखवण्याकरता बायबलमध्ये “आदर” या शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे. दुसऱ्‍यांशी प्रेमळपणे वागणे, त्यांचा मोठेपणा राखणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांनी आपल्याला केलेली माफक विनंती मान्य करणे यांद्वारे आपण इतरांना आदर दाखवत असतो. नम्र असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी करण्यास सहसा इतके कठीण जाणार नाही. परंतु, मनात गर्व बाळगणाऱ्‍यांना मनापासून आदर दाखवायला कदाचित फारच कठीण जाईल आणि म्हणून खोटी स्तुती करून ते मर्जी मिळवण्याचा आणि आपला स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करतील.

यहोवा मानवांचा आदर करतो

३, ४. यहोवाने अब्राहामाला आदर कसा दाखवला आणि का?

३ आदर दाखवण्यात स्वतः यहोवा देवाने उत्तम उदाहरण मांडले आहे. त्याने मानवांना इच्छा स्वातंत्र्यासह निर्माण केले. तो त्यांना केवळ यांत्रिक मानवांप्रमाणे वागवत नाही. (१ पेत्र २:१६) उदाहरणार्थ, सदोम शहरात दुष्टाईने अगदी कळस गाठल्यामुळे त्या शहराचा नाश करण्यात येईल, असे यहोवाने अब्राहामाला सांगितले तेव्हा अब्राहामाने यहोवाला विचारले: “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाहि संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्‍नास नीतिमान असतील तर त्याचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्‍नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय?” त्या शहरातील ५० धार्मिक लोकांसाठी आपण त्या शहराचा नाश करणार नाही, असे यहोवाने त्याला उत्तर दिले. त्यानंतर अब्राहामाने नम्रपणे पुन्हापुन्हा विनंती केली. सदोम शहरात ४५, ४०, ३०, २०, १० लोक धार्मिक असले तरीही? यहोवाने अब्राहामाला आश्‍वासन दिले, की त्या शहरात फक्‍त दहा धार्मिक लोक असले, तरी तो त्याचा नाश करणार नाही.—उत्पत्ति १८:२०-३३.

४ सदोम शहरात दहा धार्मिक लोक देखील नाहीत हे यहोवाला माहीत होते, तरीसुद्धा अब्राहामाचे ऐकून घेण्याद्वारे त्याला आदर दाखवला, त्याला सन्मानाने वागवले. का? कारण अब्राहामाने “परमेश्‍वरावर विश्‍वास ठेविला आणि अब्रा[हा]माचा हा विश्‍वास परमेश्‍वराने त्याचे नीतिमत्त्व गणिला.” अब्राहामाला “देवाचा मित्र” म्हणण्यात आले होते. (उत्पत्ति १५:६; याकोब २:२३) शिवाय स्वतः अब्राहाम इतरांना आदर देत असल्याचे यहोवाने पाहिले होते. अब्राहाम आणि त्याचा पुतण्या लोट यांच्या गुराख्यांमध्ये जागेवरून तंटा होऊ लागला तेव्हा अब्राहामाने लोटाला पहिल्यांदा निवड करण्याचे सांगून लोटाचा आदरच केला होता. लोटाने आपल्या आवडीनुसार प्रदेश निवडल्यानंतर अब्राहाम त्याच्यापासून वेगळा झाला.—उत्पत्ति १३:५-११.

५. यहोवाने लोटाला आदर कसा दाखवला?

५ अब्राहामाप्रमाणे यहोवाने देखील लोटाचा आदर केला. सदोमचा नाश करण्यापूर्वी यहोवाने लोटाला शहराबाहेरील डोंगराळ प्रदेशात पळ काढण्यास सांगितले. पण आपल्याला शहराबाहेरील डोंगराळ प्रदेशात जाण्याची इच्छा नाही असे त्याने म्हटले; त्याऐवजी जवळच्या सोअर नगरातच राहण्याचे त्याने पसंत केले—ते नगर नाश होणाऱ्‍या प्रदेशाच्या हद्दीत येत होते तरीही. यहोवाने लोटाला म्हटले: “तुझ्या याहि गोष्टीला मी मान्य आहे; तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही.” लोटाच्या विनंतीनुसार करण्याद्वारे यहोवाने त्याला आदर दाखवला.—उत्पत्ति १९:१५-२२; २ पेत्र २:६-९.

६. यहोवाने मोशेला आदर कसा दाखवला?

६ आपल्या लोकांना ईजिप्तच्या दास्यत्वातून काढण्याकरता आणि देवाच्या लोकांना सोडावे असे फारोला सांगण्याकरता यहोवाने मोशेला ईजिप्तमध्ये जाण्यास सांगितले तेव्हा मोशेने म्हटले: “हे प्रभू, मी बोलका नाही.” तेव्हा यहोवाने त्याला आश्‍वासन दिले: “मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलावयाचे ते तुला शिकवीन.” असे आश्‍वासन मिळूनही मोशे मागेपुढे पाहात होता. त्यावेळी यहोवाने मोशेची पुन्हा खात्री पटवली आणि अहरोन या त्याच्या भावाला त्याचा प्रवक्‍ता म्हणून त्याच्यासोबत पाठवले.—निर्गम ४:१०-१६.

७. दुसऱ्‍यांचा आदर करावा असे यहोवाला मनापासून का वाटते?

७ या सर्व घटनांमध्ये यहोवाला इतरांचा, विशेषतः त्याची सेवा करणाऱ्‍यांचा आदर करण्याची मनापासून इच्छा आहे हे त्याने दाखवले. यहोवाच्या मूळ मनसुब्यापेक्षा त्यांची मते भिन्‍न होती, तरीदेखील यहोवाने त्यांच्या विनंतीची दखल घेतली आणि जोपर्यंत त्याच्या मूळ उद्देशाला धक्का पोहंचत नव्हता तोपर्यंत त्याने त्यांना मुभा दिली.

येशूने इतरांना आदर दाखवला

८. खूप आजारी असलेल्या एका स्त्रीला येशूने आदर कसा दाखवला?

८ इतरांना आदर दाखवण्यात येशूने यहोवाचे अनुकरण केले. एकदा येशूभोवती जमलेल्या गर्दीमध्ये १२ वर्षे रक्‍तस्रावाने पीडित असलेली एक स्त्री होती. त्या काळातील वैद्यांना तिला बरे करता आले नव्हते. मोशेच्या नियमशास्त्रानुसार ती स्त्री विधीवत अशुद्ध होती आणि तिला चारचौघांत यायला नको होते. तरीदेखील ती येशूच्या मागे आली आणि तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला आणि ती बरी झाली. मोशेच्या नियमशास्त्राचा भंग का केला, असे म्हणून येशूने तिला सर्वांसमोर हिणवले नाही. त्याउलट परिस्थिती लक्षात घेता त्याने तिला असे म्हणून आदर दाखवला: “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्‍त हो.”—मार्क ५:२५-३४; लेवीय १५:२५-२७.

९. येशूने एका परराष्ट्रीय स्त्रीला आदर कसा दाखवला?

९ एकदा एका कनानी स्त्रीने येशूला म्हटले: “हे प्रभो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” आपण परराष्ट्रीयांसाठी नव्हे, तर इस्राएल लोकांकरता आलो आहोत हे जाणून येशूने म्हटले: “[इस्राएल लोकांच्या] मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना [परराष्ट्रीय लोकांना] घालणे हे ठीक नव्हे!” तेव्हा त्या स्त्रीने येशूला म्हटले: “घरची कुत्रीहि आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात.” तेव्हा येशूने म्हटले: “बाई, तुझा विश्‍वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.” आणि तिची मुलगी बरी झाली. या परराष्ट्रीय स्त्रीचा येशूने तिच्या विश्‍वासामुळे आदर केला. जंगली कुत्री म्हणण्याऐवजी येशूने ‘घरची कुत्री’ हा शब्दप्रयोग करून तिचे मन दुखवले नाही आणि तिच्यावर दया दाखवली.—मत्तय १५:२१-२८.

१०. येशूने त्याच्या शिष्यांना कोणता मोठा धडा शिकवला आणि त्याची आवश्‍यकता का होती?

१० नम्रता आणि इतरांना आदर दाखवणे किती महत्त्वाचे आहे याविषयी येशूने त्याच्या शिष्यांना वारंवार शिकवले, तरी त्यांच्यामध्ये चढाओढ ही होतीच. त्यांच्यामध्ये एकदा वादविवाद झाल्यानंतर येशूने त्यांना विचारले: “तुम्ही . . . कसली चर्चा करीत होता?” ते गप्प राहिले कारण “सर्वात मोठा कोण ह्‍याविषयी त्यांची . . . चर्चा चालली होती.” (मार्क ९:३३, ३४) येशूच्या मरणापूर्वीच्या रात्री देखील “आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्‍याविषयीहि त्यांच्यामध्ये वाद झाला.” (लूक २२:२४) त्यामुळे येशूने वल्हांडणाच्या जेवणाच्या वेळी ‘गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुतले.’ किती मोठा हा धडा! यहोवानंतर संपूर्ण ब्रह्‍मांडात त्याच्या पुत्राचा अर्थात येशूचा क्रमांक लागतो. तरीसुद्धा आपल्या शिष्यांचे पाय धुण्याद्वारे त्याने त्याच्या शिष्यांना इतरांचा आदर करण्याचा धडा शिकवला. त्याने म्हटले: “जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”—योहान १३:५-१५.

पौलाने आदर दाखवला

११, १२. ख्रिस्ती झाल्यानंतर पौलाने कोणता गुण शिकून घेतला आणि शिकलेल्या गुणाचा अवलंब त्याने फिलेमोनच्या बाबतीत कसा केला?

११ येशूचे अनुकरण करत असताना प्रेषित पौलानेही इतरांना आदर दाखवला. (१ करिंथकर ११:१) त्याने म्हटले: “दुसऱ्‍यांपासून गौरव मिळविण्याची खटपट आम्ही करीत नव्हतो; तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्‍या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.” (१ थेस्सलनीकाकर २:६, ७) लालनपालन करणारी दाई लहान मुलांची खूप काळजी घेते. ख्रिस्ती झाल्यानंतर पौलाने नम्रता हा गुण शिकून घेतला आणि आपल्या सहख्रिश्‍चनांना प्रेमाने वागवण्याद्वारे त्याने त्यांचा आदर केला. असे करताना त्याने सहख्रिश्‍चनांच्या स्वतंत्र इच्छेची कदर केली; तो रोममध्ये बंदिवासात असताना घडलेल्या घटनेवरून हे दिसून येते.

१२ अनेसिम या फरार झालेल्या गुलामाने पौलाच्या शिकवणीकडे लक्ष दिले. त्यानंतर तो ख्रिस्ती तर झालाच शिवाय पौलाचा मित्रही बनला. आशिया मायनरमध्ये राहणारा ख्रिस्ती इसम, फिलेमोन हा त्या फरार झालेल्या गुलामाचा मालक होता. अनेसिमची आपल्याला किती मदत झाली याविषयी फिलेमोनला लिहिलेल्या पत्रात पौलाने म्हटले: “त्याला [अनेसिमला] जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.” तरीदेखील पौलाने अनेसिमला फिलेमोनकडे असे म्हणून परत पाठवले: “तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही; ह्‍यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.” आपल्या प्रेषितपणाचा पौलाने गैरफायदा घेतला नाही, तर अनेसिमला रोममध्ये आपल्याकडे न ठेवता त्याला परत पाठवण्याद्वारे पौलाने फिलेमोनला आदर दाखवला. तसेच पौलाने फिलेमोनला असेही सांगितले, की त्याने अनेसिमचा आदर करावा; “दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधु” असे त्याला वागवावे.—फिलेमोन १३-१६.

आपल्या दिवसात आदर दाखवणे

१३. रोमकर १२:१० आपल्याला कोणता सल्ला देते?

१३ देवाचे वचन सल्ला देते: “एकमेकांविषयी आदरभाव दाखविण्यात तत्पर असा.” (रोमकर १२:१०, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.) याचा असा अर्थ होतो, की इतरांनी आपल्याला आदर दाखवावा याची वाट पाहात बसू नये, तर इतरांना आदर दाखवण्यासाठी आपण पहिले पाऊल उचलले पाहिजे. “कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍याचे पाहावे.” (१ करिंथकर १०:२४; १ पेत्र ३:८, ९) त्यामुळे यहोवाचे सेवक कौटुंबिक वर्तुळातील लोकांना, मंडळीतील सहख्रिश्‍चनांना तसेच मंडळीबाहेरच्या लोकांनाही आदर दाखवण्यात तत्पर असतात.

१४. पतिपत्नीमध्ये आदर कसा दाखवला जातो?

१४ बायबल म्हणते: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.” (१ करिंथकर ११:३) ख्रिस्ताने मंडळीला ज्याप्रमाणे वागवले तसे पतीने आपल्या पत्नीला वागवावे अशी यहोवा अपेक्षा करतो. १ पेत्र ३:७ मध्ये पतीला असा सल्ला देण्यात आला आहे, की त्याने पत्नीला ‘स्त्री या नात्याने, अधिक नाजूक व्यक्‍ती’ म्हणून आदराने वागवावे. असे करण्याकरता त्याला आपल्या पत्नीचे मनापासून ऐकावे लागेल आणि तिने सुचविलेल्या गोष्टींची दखल घ्यावी लागेल. (उत्पत्ति २१:१२) तिच्या सूचनेमुळे बायबलच्या तत्त्वांचे उल्लंघन होत नसल्यास तो तिच्या सूचनेला प्राधान्य देतो तसेच तो तिला मदत करतो, प्रेमाने वागवतो. पत्नीने देखील “आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:३३) ती त्याचे ऐकते, प्रत्येक वेळी आपल्याच मनाप्रमाणे व्हावे असा तिचा प्रयत्न नसतो, आपल्या पतीला ती हिणवत नाही आणि क्षुल्लक गोष्टींकरता त्याच्या मागे तगादा लावत नाही. काही गोष्टींत ती पतीपेक्षा वाकबगार असली तरी ती तिच्या पतीवर वर्चस्व गाजवत नाही, तर आपल्या बोलण्याचालण्यातून ती नम्रता दाखवते.

१५. वडीलधाऱ्‍या लोकांची कशाप्रकारे दखल घेतली जावी आणि त्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवावी?

१५ ख्रिस्ती मंडळीत काही लोक खासकरून आदरास पात्र असतात, उदाहरणार्थ वडीलधारी लोक. “पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा; वृद्धाला [किंवा, वृद्धेला] मान दे.” (लेवीय १९:३२) विशेषतः, अनेक वर्षांपासून यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या लोकांना आदर हा दाखवलाच पाहिजे कारण “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीतिसूत्रे १६:३१) आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या सहख्रिस्ती बांधवांना आवश्‍यक तो आदर देण्याच्या बाबतीत पर्यवेक्षकांनी एक चांगले उदाहरण मांडले पाहिजे. अर्थात, वयस्कर लोकांनीही त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या लोकांना विशेषतः कळपात मेंढपाळाचे काम करणाऱ्‍यांना आदराने वागवले पाहिजे.—१ पेत्र ५:२, ३.

१६. पालक आणि मुले एकमेकांचा आदर कसा करतात?

१६ लहान मुलांनी त्यांच्या पालकांचा आदर केला पाहिजे: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख, ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.” तसेच पालकांनीही त्यांच्या लहान मुलांचा आदर केला पाहिजे कारण पालकांना असे सांगण्यात येते: “आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:१-४; निर्गम २०:१२.

१७. “दुप्पट सन्मानास” कोण योग्य आहे?

१७ मंडळीमध्ये कठीण परिश्रम करणाऱ्‍यांनाही आदर दाखवायचा आहे: “जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्‍या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.” (१ तीमथ्य ५:१७) त्यांना आदर दाखवण्याचा एक मार्ग इब्री लोकांस १३:१७ मध्ये दाखवण्यात आला आहे: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा.”

१८. मंडळीबाहेरच्या लोकांशी आपल्याला कसे वागायचे आहे?

१८ मंडळीच्या बाहेर असणाऱ्‍या लोकांना आपण आदर दाखवावा का? होय. कारण आपल्याला असे सांगण्यात आले आहे: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे.” (रोमकर १३:१) जोपर्यंत यहोवा आपल्या राज्याची या पृथ्वीवर स्थापना करीत नाही तोपर्यंत त्याने या सांसारिक अधिकाऱ्‍यांना राज्य करण्याची परवानगी दिली आहे. (दानीएल २:४४) त्यामुळे आपण ‘ज्याला जे द्यावयाचे ते त्याला देतो, ज्याला कर द्यावयाचा त्याला कर देतो; ज्याला जकात द्यावयाची त्याला ती देतो, ज्याचा धाक धरावयाचा त्याचा धाक धरतो व ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान करतो.’ (रोमकर १३:७) आपल्याला “सर्वांस [स्त्रियांना आणि पुरुषांना] मान” द्यायचा आहे.—१ पेत्र २:१७.

१९. आपण इतरांचे “बरे” कसे करू शकतो आणि त्यांना आदर कसा दाखवू शकतो?

१९ मंडळीच्या बाहेर असलेल्यांना आपण आदर दाखवायचा आहे हे खरे असले तरी देवाचे वचन कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व देते त्याकडे लक्ष द्या: “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) अर्थात इतरांचे “बरे” करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे लोकांच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देणे आणि त्या गरजा पूर्ण करणे. (मत्तय ५:३) असे करण्याकरता आपल्याला प्रेषित पौलाच्या सल्ल्याकडे लक्ष द्यावे लागेल: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” आपली ‘सेवा पूर्ण करण्याकरता’ आपण मिळणाऱ्‍या प्रत्येक संधीचा चांगल्याप्रकारे उपयोग करतो तेव्हा सर्वांचे केवळ भलेच करत नसतो, तर आपण त्यांचा आदर देखील करत असतो.—२ तीमथ्य २:१५; ४:५.

यहोवाचा आदर करणे

२०. फारोचे आणि त्याच्या सैन्याचे काय झाले आणि का?

२० यहोवा मानवांचा आदर करतो. त्यामुळे आपणही त्याला आदर दाखवावा हे वाजवीच आहे. (नीतिसूत्रे ३:९; प्रकटीकरण ४:११) यहोवाचे वचन असेही म्हणते: “जे माझा आदर करितात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.” (१ शमुवेल २:३०) देवाच्या लोकांना सोडून देण्यात यावे, असे फारोला सांगण्यात आले तेव्हा त्याने मोठ्या आढ्यतेने असे म्हटले: “हा कोण परमेश्‍वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे?” (निर्गम ५:२) इस्राएल लोकांवर आक्रमण करण्याकरता फारोने त्याचे सैन्य धाडले तेव्हा इस्राएल लोकांकरता यहोवाने लाल समुद्र दुभंगवला. पण ईजिप्तच्या लोकांनी दुभंगलेल्या सुमद्रातून इस्राएलांचा पिच्छा पुरवला तेव्हा यहोवाने पाण्याची भींत पाडली. “फारोचे रथ व त्याची सेना ही [यहोवाने] समुद्रात टाकून दिली.” (निर्गम १४:२६-२८; १५:४) फारोच्या अनर्थकारी नाशास त्याने यहोवाचा उद्दामपणे केलेला अनादरच कारणीभूत ठरला.—स्तोत्र १३६:१५.

२१. यहोवा बेलशस्सराच्या विरोधात का होता आणि त्याचा काय परिणाम झाला?

२१ बेलशस्सर राजाने यहोवाचा आदर केला नाही. एका मेजवानीच्या वेळेस मद्याच्या धुंदीत त्याने येरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या पात्रांतून द्राक्षरस पिण्याद्वारे यहोवाची विडंबना केली. यहोवाचा उपहास करत असताना तो मूर्तिपूजक देवतांची मात्र स्तुती करत होता. पण दानीएल या देवाच्या सेवकाने त्याला म्हटले: “तू आपले मन नम्र केले नाही; तर स्वर्गींच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केला.” त्याच रात्री बेलशस्सरचा वध झाला आणि त्याचे राज्य त्याच्या हातून गेले.—दानीएल ५:२२-३१.

२२. (अ) इस्राएलच्या पुढाऱ्‍यांवर आणि त्यांच्या लोकांवर यहोवाचा क्रोध का भडकला? (ब) यहोवाची कृपापसंती कोणावर होती आणि त्याचा परिणाम काय झाला?

२२ सा.यु. पहिल्या शतकात हेरोद राजा लोकांसमोर भाषण देत होता तेव्हा लोक मोठ्याने असे म्हणू लागले: “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” लोक असे म्हणत होते तेव्हा या बढाईखोर राजाने त्यांना रोखले नाही कारण स्वतःची महिमा व्हावी असेच त्याला वाटत होते. या राजाने “देवाला गौरव दिले नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला.” (प्रेषितांची कृत्ये १२:२१-२३) यहोवाची स्तुती करण्याऐवजी हेरोदाने स्वतःची महिमा करून घेतली आणि त्यामुळे तो मरण पावला. देवाचा पुत्र, येशूला ठार मारण्याचा कट रचण्याद्वारे त्या काळातील धार्मिक पुढाऱ्‍यांनी देवाचा अनादर केला. येशू शिकवत असलेल्या गोष्टी सत्य आहेत हे त्या काळातील काही अधिकाऱ्‍यांना माहीत होते तरी देखील त्यांनी त्याला अनुसरले नाही “कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले.” (योहान ११:४७-५३; १२:४२, ४३) संपूर्ण राष्ट्र या नात्याने त्या लोकांनी यहोवाचा आणि त्याचा नियुक्‍त प्रतिनिधी, येशूचा आदर केला नाही. त्यामुळे यहोवानेही त्यांचा आदर करण्याचे सोडून दिले; त्यांना आणि त्यांच्या मंदिराला विनाशाकरता यहोवाने सोडून दिले. देवाचा आणि त्याच्या पुत्राचा आदर केलेल्या लोकांना मात्र यहोवाने त्यागले नाही.—मत्तय २३:३८; लूक २१:२०-२२.

२३. देवाच्या नवीन जगात जगण्याकरता आपल्याला काय केले पाहिजे? (स्तोत्र ३७:९-११; मत्तय ५:५)

२३ या व्यवस्थीकरणाचा नाश झाल्यानंतर देवाच्या नवीन जगात जगण्याची इच्छा असणाऱ्‍यांनी देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. (योहान ५:२२, २३; फिलिप्पैकर २:९-११) अशाप्रकारे आदर न दाखवणाऱ्‍या लोकांचे “भूतलावरून उच्चाटन होईल.” पण देवाचा आणि ख्रिस्ताचा आदर करणारे, त्यांच्या आज्ञेनुसार चालणारे धार्मिक लोक ‘या भूतलावर टिकून राहतील.’—नीतिसूत्रे २:२१, २२, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.

उजळणी

◻ इतरांना आदर करण्याचा काय अर्थ होतो आणि यहोवाने इतरांचा आदर कसा केला?

◻ येशूने आणि पौलाने इतरांचा आदर कसा केला?

◻ आपल्या दिवसात आपण कोणाला आदर दाखवला पाहिजे?

◻ आपण येशूचा आणि यहोवाचा आदर का केला पाहिजे?

[१७ पानांवरील चित्र]

अब्राहामाने केलेल्या विनंतीची दखल घेऊन यहोवाने त्याचा आदर केला

[१८ पानांवरील चित्र]

यशस्वी विवाहात पतिपत्नी एकमेकांचा आदर करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा