वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ९/१ पृ. ८-१३
  • तरुणांनो—जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुणांनो—जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जगाचा आत्मा ओळखणे
  • जगाचा आत्मा प्रदर्शित करणाऱ्‍या गोष्टी
  • जगाच्या आत्म्याचा धिक्कार
  • “वेगळा आत्मा” दाखवणे
  • तुम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करीत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • युवकहो—तुम्ही कशाचा पाठलाग करीत आहात?
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • जगाचा नव्हे, देवाचा आत्मा मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ९/१ पृ. ८-१३

तरुणांनो—जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करा

“आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे.”—१ करिंथकर २:१२.

१, २. (अ) जगातले तरुण आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांतील तरुण यांत कोणता फरक दिसून येतो? (ब) आपल्यातील बऱ्‍याच तरुणांचा आपल्याला का अभिमान वाटतो?

“आपली तरुण पिढी ही निरुत्साही, झिडकारलेली आणि विद्रोही पिढी आहे.” हे विधान द सन-हेरल्ड या ऑस्ट्रेलियन दैनिकात करण्यात आले. सदर दैनिकात हेही सांगण्यात आले होते की, “न्यायालयीन अहवालांनुसार गंभीर स्वरूपाच्या हिंसाचाराच्या आरोपाखाली न्यायालयात दाखल होणाऱ्‍या तरुण मुलामुलींची संख्या [मागच्या वर्षापेक्षा] २२ टक्क्यांनी वाढली आहे. . . . लहान मुलांमधील आत्महत्येचे प्रमाण ६० च्या दशकाच्या तुलनेत तिप्पट झाले आहे. . . . शिवाय, दोन पिढ्यांतील विसंवादाची दरी कमालीची रुंदावली असून असंख्य तरुण आज अंमली पदार्थ, मद्य व आत्मनाशाच्या गर्तेत ओढले जात आहेत.” पण ही परिस्थिती कोणत्या एकाच देशापुरती सीमित नाही. सबंध जगातले पालक, शिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ तरुण पिढीची ही दैनावस्था पाहून हळहळताहेत.

२ या जगातल्या अधिकांश तरुणांच्या तुलनेत यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांतील नीतिप्रिय तरुण किती वेगळे आहेत! अर्थात तेही काही परिपूर्ण नाहीत. ‘तरुणपणाच्या वासनांवर’ मात करण्यासाठी त्यांनाही कठीण प्रयत्न करावा लागतो. (२ तीमथ्य २:२२) पण एकंदर पाहिल्यास या तरुणांनी मोठ्या धैर्यशीलपणे नीतीच्या मार्गाने चालण्याचा निर्धार केला आहे; जगाकडून येणाऱ्‍या दबावाखाली ते झुकले नाहीत. सैतानाच्या ‘डावपेचांविरुद्ध’ लढा देऊन त्यांवर मात करत असलेल्या तुम्हा सर्व तरुणांचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो! (इफिसकर ६:११) प्रेषित योहानाप्रमाणे आम्हालाही असे म्हणावेसे वाटते: “तरुणांनो [आणि तरुणींनो], मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहा. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.”—१ योहान २:१४.

३. “आत्मा” या शब्दाचा काय अर्थ आहे?

३ पण, त्या दुष्टाविरुद्ध तुम्हाला पुढेही जिंकत राहायचे असेल तर बायबलमध्ये सांगितलेल्या ‘जगाच्या आत्म्याचा’ तुम्हाला सर्व शक्‍तीनिशी प्रतिकार करावा लागेल. (१ करिंथकर २:१२) एका ग्रीक शब्दकोशानुसार, “आत्मा” या शब्दाचा अर्थ “एखाद्या व्यक्‍तीला व्यापून असणारी किंवा त्याच्यावर नियंत्रण करणारी प्रवृत्ती किंवा प्रेरक शक्‍ती,” असा होतो. उदाहरणार्थ, चिडखोर स्वभावाच्या माणसाठायी वाईट “आत्मा” किंवा वृत्ती आहे असे म्हणतात. तुमचा “आत्मा,” अर्थात तुमची मनोवृत्ती किंवा तुमचा स्वभाव तुम्हाला विशिष्ट निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो; तुमच्या शब्दांचा आणि कृतींचा तो प्रेरक असतो. आणि विशेष म्हणजे, केवळ एखाद्या व्यक्‍तीमध्येच नव्हे, तर कधीकधी अनेक लोकांच्या समूहामध्ये देखील एक विशिष्ट प्रकारचा “आत्मा” दिसून येतो. प्रेषित पौलाने ख्रिस्तीजनांच्या एका समूहाला असे लिहिले: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.” (फिलेमोन २५) मग, या जगात कशाप्रकारचा आत्मा दिसून येतो? “सगळे जग त्या दुष्टाला,” अर्थात दियाबल सैतानाला “वश झाले आहे;” त्यामुळे जगाचा आत्मा चांगला असेल अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो?—१ योहान ५:१९.

जगाचा आत्मा ओळखणे

४, ५. (अ) इफिस मंडळीतले लोक ख्रिस्ती बनण्यापूर्वी कोणत्या आत्म्याच्या प्रभावाखाली होते? (ब) “अंतरिक्षातील राज्याचा अधिपति” कोण आहे, आणि ‘अंतरिक्ष’ म्हणजे काय?

४ पौलाने लिहिले: ‘तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्‍यामुळे मृत झालेले होता; त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्‍या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याचा अधिपती ह्‍याच्या धोरणाप्रमाणे चालत होता; त्या लोकांत आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरुप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व स्वभावत: इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देवाने आपणाला जिवंत केले.’—इफिसकर २:१-५.

५ ख्रिस्ती बनण्यापूर्वी इफिसमधील ख्रिस्ती आपल्या अज्ञानामुळे “अंतरिक्षातील राज्याचा अधिपति,” दियाबल सैतान याच्या मागे चालत होते. हे ‘अंतरिक्ष’ म्हणजे सैतान व त्याच्या दुरात्म्यांच्या राहण्याचे कोणते खरोखरचे स्थान नाही. पौलाने हे शब्द लिहिले तेव्हा दियाबल सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अद्यापही स्वर्गात जाण्याची परवानगी होती. (पडताळा ईयोब १:६; प्रकटीकरण १२:७-१२.) ‘अंतरिक्ष’ म्हणजे सैतानाच्या जगातला व्यापक आत्मा किंवा मनोवृत्ती. (पडताळा प्रकटीकरण १६:१७-२१.) अंतरिक्षाप्रमाणे हा आत्मा देखील सर्वव्याप्त आहे.

६. ‘अंतरिक्षातील राज्य’ म्हणजे काय आणि आज त्याचा प्रभाव बऱ्‍याच तरुण लोकांवर कशाप्रकारे झाला आहे?

६ पण ‘अंतरिक्षातील राज्य’ म्हणजे काय? या ‘अंतरिक्षाचा’ लोकांवर जो मोठा प्रभाव पडतो त्याला हे सूचित करत असावे. पौलाने म्हटले की हा आत्मा ‘आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत कार्य करतो.’ तेव्हा, जगाचा आत्मा हा आज्ञा मोडण्याच्या व विद्रोह करण्याच्या प्रवृत्तीला जन्म देतो; मित्रांकडून येणारा दबाव हा त्यातलाच एक प्रकार. एक तरुण साक्षीदार मुलगी म्हणते, “शाळेत जो तो शिक्षकांविरुद्ध बंड करण्याचे प्रोत्साहन देत असतो. तुम्ही नियम तोडण्याची जराशी हिंमत केली तरी मुलं तुम्हाला मानतात.”

जगाचा आत्मा प्रदर्शित करणाऱ्‍या गोष्टी

७-९. (अ) आजच्या तरुणांच्या कोणत्या काही गोष्टींतून जगाचा आत्मा प्रदर्शित होतो? (ब) आपल्याकडे तुम्हाला यांपैकी काही गोष्टी आढळल्या आहेत का?

७ आजच्या तरुण पिढीच्या कोणत्या काही गोष्टींतून जगाचा आत्मा प्रदर्शित होतो? बेईमान आणि बंडखोर वृत्तीतून. एका नियतकालिकाच्या वृत्तानुसार ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत असताना कॉपी केल्याचे कबूल केले. याशिवाय थिल्लर, विचकट संभाषण आणि टोमणेबाजी देखील सर्वसामान्य आहे. एक प्रसंगी आपला न्याय्य संताप व्यक्‍त करण्यासाठी ईयोब व प्रेषित पौल देखील ज्याप्रकारे बोलले होते, त्याला काहीजण कदाचित टोमणेबाजी म्हणतील. (ईयोब १२:२; २ करिंथकर १२:१३) पण, आजकालच्या तरुण पिढीच्या लोकांमध्ये जी टोमणेबाजी ऐकायला मिळते ती अतिशय अपमानास्पद असते.

८ जगाचा आत्मा ज्या आणखी एका गोष्टीतून दिसून येतो ती म्हणजे मनोरंजनातील अतिरेक. नाइटक्लब्स, रेव्ह्स,a आणि उच्छृंखल चैनबाजीचे इतरही प्रकार तरुण लोकांत फार लोकप्रिय आहेत. तसेच, अतिशय विचित्र प्रकारचा पेहरावही या मुलांमध्ये सर्रास पाहायला मिळतो. ढगळ कपडे घालण्याच्या हिप-हॉप स्टाइल्स, शरीरावर ठिकठिकाणी टोचून घेण्याच्या विचित्र फॅड्‌स, यांसारख्या गोष्टींतून आजकालचे तरुण जगाचा बंडखोर आत्मा प्रदर्शित करतात. (पडताळा रोमकर ६:१६.) जगाचा आत्मा प्रदर्शित करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे चैनीच्या वस्तू मिळवण्याचा ध्यास. एका शैक्षणिक पत्रकानुसार, “उत्पादक लहान मुलांवर पदोपदी आपल्या असंख्य दिलखेचक विक्रीतंत्रांचा व अगणित उत्पादनरूपी अस्रांचा भडिमार करत आहेत.” अमेरिकेतील युवक माध्यमिक शाळेतून बाहेर पडतो, तोपर्यंत त्याने टीव्हीवर ३,६०,००० जाहिराती पाहिलेल्या असतात. जाहिरातींसोबतच मित्रमैत्रिणी देखील तुमच्यावर विशिष्ट वस्तू विकत घेण्याचा दबाव आणू शकतात. चौदा वर्षांची एक मुलगी सांगते, “सर्वजण विचारत असतात, ‘कोणत्या ब्रँडचं स्वेटर आहे, जॅकेट, जीन्स कोणत्या कंपनीची आहे?’”

९ हानीकारक संगीताच्या माध्यमानेही सैतान अनैतिकतेला चालना देतो; याची बायबलच्या इतिहासात उदाहरणे आहेत. (पडताळा निर्गम ३२:१७-१९; स्तोत्र ६९:१२; यशया २३:१६.) त्यामुळे आजही, अगदी उघडपणे अश्‍लील नसली—तरी लैंगिक भावना उत्तेजित करणारी गीते, त्यांतील बीभत्स भाषा, तसेच बेताल आणि प्रक्षोभक चालींचे संगीत लोकप्रिय आहे यात काय आश्‍चर्य? जगाच्या अनैतिक आत्म्याचे आणखी एक प्रमाण म्हणजे लैंगिक अनैतिकता. (१ करिंथकर ६:९-११) द न्यूयॉर्क टाइम्स यातील वृत्तानुसार: “अनेक किशोरवयीन मुलेमुली लैंगिक संबंध ठेवणे अनिवार्य समजू लागली आहेत . . . माध्यमिक शाळेत मोठ्या वर्गांतल्या दोन तृतियांश पेक्षा अधिक मुलामुलींनी आपले कौमार्य गमावले आहे.” द वॉल स्ट्रीट जर्नल यात दिलेल्या प्रमाणांनुसार ८-१२ च्या वयोगटांतील मुले “लैंगिकरित्या पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय होत आहेत.” नुकतेच सेवानिवृत्त झालेले शालेय सल्लागार म्हणतात: “आता तर सहावीतही काही गरोदर मुली दिसू लागल्या आहेत.”b

जगाच्या आत्म्याचा धिक्कार

१०. ख्रिस्ती कुटुंबातील काही तरुण कशाप्रकारे जगाच्या आत्म्याला वश झाले आहेत?

१० दुःखाने म्हणावे लागते, पण काही ख्रिस्ती तरुण या जगाच्या आत्म्याला वश झाले आहेत. एक जपानी तरुणी असे कबूल करते, “आईवडील आणि ख्रिस्ती बांधवांसमोर मी चांगली वागायचे. पण बाहेर मात्र मी वेगळेच जीवन जगत होते.” केनियाची एक तरुणी म्हणते: “काही काळापर्यंत मी दुटप्पी जीवन जगत होते; पार्ट्या, रॉक म्युझिक, वाईट मुलांशी दोस्ती, हे सर्व चुकीचं आहे हे माहीत असूनही मी असं समजून दुर्लक्ष करत राहिले, की आज न उद्या हे सर्व आपोआपच बंद होईल. पण तसं झालं नाही. मी आणखीनच बिघडत गेले.” जर्मनीची एक तरुणी सांगते, की “वाईट मुलामुलींशी मैत्री केल्यामुळे मी वाहवत गेले. पुढे मला सिगारेटचं व्यसन लागलं. मला माझ्या आईवडिलांचं मन दुखावेल असं काहीतरी करायचं होतं, पण मीच दुखावले गेले.”

११. दहा हेरांनी वाईट वृत्त आणले तेव्हा कालेब लोकांच्या दबावात येण्याचे कशाप्रकारे टाळू शकला?

११ तरीसुद्धा, जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करणे, इतकेच काय त्याचा धिक्कार करणेही अशक्य नाही. प्राचीन काळातील कालेब याचे उदाहरण लक्षात घ्या. दहा भित्र्या हेरांनी वचनयुक्‍त देशाविषयी वाईट वृत्त दिले तेव्हा यहोशवासोबत कालेबनेही दबावाला बळी पडून, चार लोक म्हणतील तेच खरे अशी वृत्ती दाखवली नाही. उलट त्यांनी निर्भयतेने म्हटले: “चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्‍वर आमच्यावर प्रसन्‍न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्‍या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल.” (गणना १४:७, ८) कालेब त्या लोकांच्या दबावाचा प्रतिकार का करू शकला? यहोवाने कालेबविषयी म्हटले: “त्याच्यासंगती वेगळा आत्मा” आहे.—गणना १४:२४, पं.र.भा.

“वेगळा आत्मा” दाखवणे

१२. संभाषणाच्या बाबतीत “वेगळा आत्मा” दाखवणे का महत्त्वाचे आहे?

१२ आजदेखील “वेगळा आत्मा” किंवा वेगळी मनोवृत्ती—जगापेक्षा वेगळी मनोवृत्ती—दाखवण्यासाठी धैर्य आणि सामर्थ्य लागते. असे करण्याचा एक मार्ग म्हणजे टोमणेबाजी, अर्थात अपमानास्पद भाषण न करणे. सांगण्यासारखी एक गोष्ट अशी की टोमणेबाजी या अर्थाचा सारकॅस्मॉस हा ग्रीक शब्द मुळात एका ग्रीक क्रियापदावरून आला आहे, ज्याचा अर्थ “कुत्र्यांसारखे मांस ओरबाडणे” असा होतो. (पडताळा गलतीकर ५:१५.) कुत्रा जसा हाडावरचे मांस दाताने ओढून काढतो, तसेच टोमणेबाजीतून केलेला “विनोद” इतरांच्या स्वाभिमानाच्या चिंध्या करू शकतो. पण कलस्सैकर ३:८ असे सांगते, की “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा.” आणि नीतिसूत्रे १०:१९ म्हणते: “फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.” कोणी तुमचा अपमान केल्यास, ‘त्याच्याकडे दुसरा गाल करण्याइतके’ आत्मनियंत्रण ठेवा; वाटल्यास, तुमचा अपमान करणाऱ्‍याशी तुम्ही एकांतात शांतपणे बोलू शकता.—मत्तय ५:३९; नीतिसूत्रे १५:१.

१३. भौतिक संपत्तीच्या बाबतीत तरुणांना समतोल दृष्टिकोन कसा बाळगता येईल?

१३ “वेगळा आत्मा” दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे भौतिक संपत्तीविषयी समतोल दृष्टिकोन बाळगणे. अर्थात, आपल्याजवळ चांगल्या वस्तू असाव्यात असे तर सर्वांनाच वाटते. स्वतः येशू ख्रिस्ताजवळही एक उंची कापड होते हे आपल्याला माहीतच आहे. (योहान १९:२३, २४) पण ज्याअर्थी आपण त्या वस्तू मिळवण्याच्या व्यतिरिक्‍त आणखी कशाचाच विचार करू शकत नाही, ज्याअर्थी आपल्या आईवडिलांना न परवडणाऱ्‍या वस्तू घेऊन देण्यासाठी आपण त्यांचा सतत पिच्छा पुरवतो, किंवा ज्याअर्थी केवळ इतर मुलांजवळ आहे म्हणून आपल्याजवळही असावे अशी वृत्ती आपण बाळगतो, त्याअर्थी जगाचा आत्मा आपल्यावर नकळत नियंत्रण करू लागला आहे असे समजावे. बायबल म्हणते: “जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.” लक्षात ठेवा, जगाच्या भौतिकवादी आत्म्याच्या नियंत्रणात येऊ नका! आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानायला शिका.—१ योहान २:१६; १ तीमथ्य ६:८-१०.

१४. (अ) यशयाच्या काळात देवाच्या लोकांनी मनोरंजनाच्या बाबतीत कशाप्रकारे अतिरेक केला? (ब) नाइटक्लब्स व बेफाम पार्ट्यांमध्ये काही ख्रिस्ती तरुणांना कोणत्या धोकेदायक गोष्टींना तोंड द्यावे लागले?

१४ करमणुकीचीही योग्य जागा ओळखणे महत्त्वाचे आहे. भविष्यवक्‍ता यशया याने असे म्हटले: “जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात त्यांस धिक्कार असो. वीणा, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षारस हीच त्यांची मेजवानी; पण ते परमेश्‍वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत, ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत.” (यशया ५:११, १२) दुःखाची गोष्ट म्हणजे काही ख्रिस्ती तरुणांनी देखील अशाप्रकारच्या अनैतिक करमणुकीत सहभाग घेतला. नाईटक्लब्समध्ये नेमके काय चालते, असे जेव्हा काही ख्रिस्ती तरुणांना विचारण्यात आले तेव्हा एका तरुण बहिणीने सांगितले: “सहसा तिथे मारामाऱ्‍या होतात. मी स्वतः कितीदा अशा भांडणांत अडकले.” एक बांधव म्हणतो: “दारू पिणं, सिगारेटी ओढणं अशाप्रकारच्या गोष्टी सर्रास चालतात.” दुसऱ्‍या एका तरुण बांधवानेही सांगितले: “मुलं दारू पिऊन झिंगतात, अगदी वेड्यांसारखी वागतात! शिवाय ड्रग्स, आणि अशाचप्रकारच्या बऱ्‍याच वाईट गोष्टी तिथे चालतात. तिथे जाऊनही आपल्यावर काही वाईट परिणाम होणार नाही असं कोणी समजत असेल तर तो त्याचा गैरसमज आहे.” तर मग, बायबल अशाप्रकारच्या रंगेलपणाला किंवा ‘बेफामपणाला’ ‘देहाची कर्मे’ म्हणते हे योग्यच नाही का?—गलतीकर ५:१९-२१; बाइंग्टन, रोमकर १३:१३.

१५. मनोरंजनाविषयी बायबलचा संतुलित दृष्टिकोन कसा आहे?

१५ अशाप्रकारचे हानीकारक मनोरंजन टाळल्यामुळे तुमचे जीवन अगदीच नीरस होईल अशातला भाग नाही. आपण एका ‘आनंदी देवाचे’ उपासक आहोत आणि तुम्ही तुमच्या तारुण्याचा पुरेपूर आनंद लुटावा अशी त्याचीही इच्छा आहे. (१ तीमथ्य १:११, NW; उपदेशक ११:९) पण बायबल ताकीद देते: “ज्याला ख्यालीखुशाली [“करमणूक,” लाम्सा] आवडते तो दरिद्री होतो.” (नीतिसूत्रे २१:१७) होय, तुम्ही जीवनात करमणुकीलाच सर्वात जास्त महत्त्व देऊ लागलात, तर आध्यात्मिक दृष्ट्या दरिद्री व्हाल. तेव्हा, मनोरंजनाचे प्रकार निवडताना बायबलची तत्त्वे डोळ्यासमोर असू द्या. करमणुकीचे असे अनेक प्रकार आहेत जे तुमच्या व्यक्‍तिमत्त्वावर विघातक नव्हे तर रचनात्मक परिणाम करतील.c—उपदेशक ११:१०.

१६. ख्रिस्ती तरुण स्वतःचा वेगळेपणा कसा दाखवू शकतात?

१६ पेहराव-श्रृंगाराच्या बाबतीतही, जगातले लोकप्रिय फॅड्‌स न अनुसरता शालीनता दाखवल्यास तुमचा वेगळेपणा स्पष्ट दिसून येईल. (रोमकर १२:२; १ तीमथ्य २:९) तसेच, संगीताचा प्रकार निवडण्याच्या बाबतीतही. (फिलिप्पैकर ४:८, ९) एका ख्रिस्ती तरुणीने कबूल केले, “माझ्याजवळ असलेल्या कॅसेट खरं तर फेकून देण्याच्या लायकीच्या आहेत, पण काय करू, मला त्या खूप आवडतात!” आणखी एका तरुणाने मान्य केले की “माझ्यासाठी संगीत एक मोहजाळ आहे कारण मी मुळातच एक संगीतप्रेमी आहे. विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकणे बरोबर नाही अशी मला स्वतःला जाणीव झाली किंवा माझ्या आईवडिलांनी ते माझ्या लक्षात आणून दिले तर मला अक्षरशः माझं मन मारावं लागतं, कारण मनातल्या मनात मला ते संगीत खूप आवडतं.” तरुणांनो, “[सैतानाच्या] युक्‍तींविषयी अजाण” राहू नका! (२ करिंथकर २:११, पं.र.भा.) तो संगीताच्या माध्यमाने ख्रिस्ती तरुणांना यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे! वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनांत याआधी रॅप, हेव्ही मेटल आणि ऑल्टर्नेटिव्ह रॉक संगीताविषयी चर्चा करण्यात आली आहे.d पण संगीताच्या दुनियेत निघणाऱ्‍या प्रत्येक नव्या प्रकारच्या व शैलीच्या संगीताविषयी वॉच टावर प्रकाशनांत विवरण देणे शक्य नाही. म्हणून संगीत निवडताना ‘विवेकाने’ व “समंजसपणाने” तुम्ही स्वतः निर्णय घेतला पाहिजे.—नीतिसूत्रे २:११.

१७. (अ) पोर्नेइया म्हणजे काय आणि यात कोणत्या प्रकारची कृत्ये सामील आहेत? (ब) नैतिकतेच्या बाबतीत देवाची काय इच्छा आहे?

१७ शेवटचा मुद्दा असा की तुम्ही नैतिक दृष्ट्या निष्कलंक राहिले पाहिजे. बायबल निग्रहाने सांगते: “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा.” (१ करिंथकर ६:१८) जारकर्म या अर्थाचा मूळ ग्रीक शब्द आहे पोर्नीया. हा शब्द वैवाहिक संबंधांबाहेरच्या अशा सर्व अवैध लैंगिक कृत्यांना सूचित करतो ज्यांत जननेंद्रियांचा उपयोग केला जातो. यात मुखीय संभोग आणि जननेंद्रियांना मुद्दामहून स्पर्श करणेही सामील आहे. बऱ्‍याच ख्रिस्ती तरुण-तरुणींनी असे समजून अशाप्रकारची कृत्ये केली की हे जारकर्म नाही. पण देवाचे वचन अगदी स्पष्टपणे सांगते: “कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. . . . पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.”—१ थेस्सलनीकाकर ४:३-५.

१८. (अ) तरुण स्वतःला जगाच्या आत्म्यामुळे दूषित होण्यापासून कसे बचावू शकतात? (ब) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा करण्यात येईल?

१८ यहोवाच्या मदतीने, तुम्ही या जगाच्या आत्म्यामुळे दूषित होण्याचे निश्‍चितच टाळू शकता! (१ पेत्र ५:१०) अर्थात, सैतान कधीकधी अतिशय घातक प्रकारच्या जाळ्यांत मोठ्या बेमालूमपणे आपल्याला अडकवतो, त्यामुळे वेळीच धोका ओळखून सावध होण्यासाठी चांगली समजबुद्धी असणे आवश्‍यक आहे. तरुणांना आपल्या ज्ञानेंद्रियांना विकसित करण्यासाठी मदत मिळावी या दृष्टीनेच पुढील लेख तयार करण्यात आला आहे.

[तळटीपा]

a रात्रभर चालणाऱ्‍या डान्स पार्ट्या. यावर अधिक माहितीकरता सावध राहा! जानेवारी ८, १९९८ च्या अंकातील “तरुण लोक विचारतात . . . रेव्ह्स अनापायकारक मौज आहे का?” हा लेख पाहा.

b जवळपास ११ वर्षांच्या मुली.

c उदाहरणांसाठी, तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकातील पृष्ठे २९६-३०३ पाहा.

d wtsbr पृष्ठ ३६ पाहा.

उजळणीचे प्रश्‍न

◻ “जगाचा आत्मा” म्हणजे काय आणि लोकांवर त्याचा कसा प्रभाव होतो?

◻ आजच्या तरुणांच्या कोणत्या काही गोष्टींतून जगाचा आत्मा दिसून येतो?

◻ संभाषण व मनोरंजन यांबाबतीत ख्रिस्ती तरुण “वेगळा आत्मा” कसा दाखवू शकतात?

◻ नैतिकता आणि संगीत यांबाबतीत ख्रिस्ती तरुण “वेगळा आत्मा” कसा दाखवू शकतात?

[९ पानांवरील चित्र]

अनेक तरुण आपल्या वर्तनातून दाखवून देतात की ते जगाच्या आत्म्याला वश झाले आहेत

[१० पानांवरील चित्र]

संगीताच्या बाबतीत विचारपूर्वक निवड करा

[११ पानांवरील चित्र]

जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करायला धैर्य लागते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा