वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ११/१ पृ. ७-१२
  • नैतिक शुद्धतेविषयी देवाचा दृष्टिकोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नैतिक शुद्धतेविषयी देवाचा दृष्टिकोन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रेमळ निर्माणकर्त्याची देण
  • ईश्‍वरी बंधन
  • देवाच्या नीतिनियमांपासून लाभ
  • शुद्ध वर्तनाचा योसेफाला आशीर्वाद
  • ईयोबाचा “डोळ्यांशी करार”
  • चांगल्या चालीची तरुणी
  • एक असा गुलाम ज्याने देवाचं ऐकलं
    बायबलमधून शिकू या!
  • यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • सुबत्तेच्या काळातील प्राणघातक दुष्काळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • योसेफाला तुरुंगात टाकलं जातं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ११/१ पृ. ७-१२

नैतिक शुद्धतेविषयी देवाचा दृष्टिकोन

“परमेश्‍वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभु, म्हणतो; तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.

१, २. (अ) नैतिकतेच्या बाबतीत साधारणतः लोकांचा काय दृष्टिकोन आहे? (ब) नैतिकतेच्या बाबतीत ख्रिश्‍चनांचा काय दृष्टिकोन आहे?

आज जगाच्या अनेक भागांमध्ये, नैतिक चालचलन हा व्यक्‍तिगत मामला समजला जातो. दुसऱ्‍या व्यक्‍तीवरील आपले प्रेम व्यक्‍त करण्यासाठी शरीरसंबंध ठेवण्यात हरकत नाही, ही एकदम नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्यासाठी विवाहित असलेच पाहिजे असे काही नाही, अशी अनेकांची धारणा आहे. कोणाला त्याचा त्रास होणार नसला तर प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागण्यात काहीच चुकीचे नाही असे त्यांना वाटते. त्यांच्या मते, नैतिकतेच्या बाबतीत आणि विशेषकरून शरीरसंबंध ठेवण्याच्या बाबतीत कोणीही कोणावर बंधने घालता कामा नये.

२ परंतु ज्यांनी यहोवाला जाणून घेतले आहे त्यांचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा आहे. ते शास्त्रवचनांतील मार्गदर्शनाचे आनंदाने पालन करतात, कारण यहोवावर त्यांचे प्रेम आहे आणि ते त्याला संतुष्ट करू पाहतात. यहोवाचे देखील त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे तो त्यांच्या भल्याकरता, हिताकरता आणि त्यांना आनंद मिळावा म्हणून मार्गदर्शन देतो हे त्यांना ठाऊक आहे. (यशया ४८:१७) देव हा जीवनाचा स्रोत असल्यामुळे आपल्या शरीराचा उपयोग आपण कसा करावा याबाबतीत आपण त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवले पाहिजे. आणि खासकरून लैंगिक वर्तनाच्या बाबतीत तर त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलेच पाहिजे कारण नवीन जीवनाच्या उत्पत्तीशी याचा फार जवळून संबंध आहे.

प्रेमळ निर्माणकर्त्याची देण

३. ख्रिस्ती धर्मजगतातील बहुतेक लोकांना शरीरसंबंधांविषयी काय शिकवले गेले आहे आणि बायबलमधील शिकवणीशी त्याची तुलना केल्यास काय दिसून येते?

३ परंतु ख्रिस्ती धर्मजगतातील काहींची धारणा आणखी वेगळी आहे. शरीरसंबंध लज्जास्पद आहे, ते पाप आहे. हव्वेने आदामाला मोहविले हेच एदेन बागेतील “मूळ पाप” होते, असे ख्रिस्ती धर्मजगतातील काही लोक मानतात. मात्र ईश्‍वरी प्रेरणेद्वारे लिहिण्यात आलेल्या शास्त्रवचनांनुसार हा दृष्टिकोन चुकीचा आहे. कारण बायबलच्या अहवालात तर पहिल्या मानवी दांपत्याला “आदाम व त्याची बायको” असे म्हटले आहे. (उत्पत्ति २:२५, पं.र.भा.) देवानेच त्यांना मुले जन्माला घालण्यास सांगितले होते; तो म्हणाला होता: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ति १:२८) स्वतःच आदाम आणि हव्वेला बहुगुणित होण्याचा आशीर्वाद देऊन मग ही आज्ञा पाळल्यानंतर देव त्यांना शिक्षा कशी देईल बरे?—स्तोत्र १९:८.

४. देवाने मानवांना लैंगिक क्षमता का दिली?

४ आपल्या पहिल्या पालकांना दिलेल्या त्या आज्ञेवरून शरीरसंबंधांचा मुख्य उद्देश मुले उत्पन्‍न करणे हा आहे असे आपल्याला दिसून येते. नंतर नोहा आणि त्याच्या पुत्रांना देखील हीच आज्ञा देण्यात आली होती. (उत्पत्ति ९:१) परंतु केवळ मुले होण्यासाठीच शरीरसंबंध ठेवावेत असे बंधन देवाच्या विवाहित सेवकांवर नाही हे त्याच्या वचनातून दिसून येते. शरीरसंबंधांनी भावनिक आणि शारीरिक गरजा पूर्ण होतात. त्याचप्रमाणे, वैवाहिक दांपत्याला आनंदही प्राप्त होतो. आणि याद्वारे ते एकमेकांबद्दल गाढ प्रेम असल्याचे व्यक्‍त करू शकतात.—उत्पत्ति २६:८, ९; नीतिसूत्रे ५:१८, १९; १ करिंथकर ७:३-५.

ईश्‍वरी बंधन

५. मानवांमधील लैंगिक संबंधांच्या बाबतीत देवाने कोणती बंधने घातली आहेत?

५ लैंगिकता हे देवाने दिलेले दान असले तरीही यासाठी काही बंधने घातली आहेत. विवाहितांना देखील हेच तत्त्व लागू होते. (इफिसकर ५:२८-३०; १ पेत्र ३:१, ७) विवाहबाह्‍य लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे आहे असे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. देवाने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रात म्हटले होते: “व्यभिचार करू नको.” (निर्गम २०:१४) नंतर, येशूने “जारकर्मे” आणि “व्यभिचार” हे माणसाच्या अंतःकरणातून निघणारे व त्याला मलीन करणारे “वाईट विचार” आहेत असे म्हटले. (मार्क ७:२१, २२) करिंथमधील ख्रिश्‍चनांना असा इशारा देण्यास प्रेषित पौलाला प्रेरणा मिळाली की, “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा.” (१ करिंथकर ६:१८) तसेच इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात पौलाने म्हटले: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.”—इब्री लोकांस १३:४.

६. बायबलमध्ये “जारकर्म” या शब्दाचा काय अर्थ होतो?

६ “जारकर्म” या शब्दाचा काय अर्थ होतो? हा शब्द पोर्निया या ग्रीक शब्दातून आला आहे आणि अविवाहित लोकांमधील लैंगिक संबंधांच्या संदर्भात तो काही वेळा वापरला जातो. (१ करिंथकर ६:९) मत्तय ५:३२ आणि मत्तय १९:९ सारख्या वचनांप्रमाणे इतर ठिकाणी या संज्ञेचा अर्थ फक्‍त अविवाहित लोकांमधील लैंगिक संबंध एवढाच होत नाही तर त्यात व्यभिचार, आप्तसंभोग आणि पशुसंभोग यांचाही समावेश होतो. अविवाहित लोकांमधील मौखिक संभोग, गुदमैथुन तसेच दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या जननेंद्रियांना कामुक भावनेने स्पर्श करणे अशा चाळ्यांना देखील पोर्निया म्हटले जाऊ शकते. देवाच्या वचनात या सर्व गोष्टींचा काही ठिकाणी स्पष्टपणे तर इतर ठिकाणी अप्रत्यक्षपणे धिक्कार करण्यात आला आहे.—लेवीय २०:१०, १३, १५, १६; रोमकर १:२४, २६, २७, ३२.a

देवाच्या नीतिनियमांपासून लाभ

७. नैतिकरित्या शुद्ध राहिल्यामुळे आपल्याला कसा लाभ होतो?

७ लैंगिक वर्तनाविषयी देवाचे मार्गदर्शन पाळणे हे अपरिपूर्ण मानवांकरता एक आव्हान असू शकते. १२ व्या शतकातला यहुदी तत्त्ववेत्ता, मेमोनिडस याने लिहिले: “निषिद्ध आणि अवैध संबंधांविषयी दिलेले नियम तोरह [मोशेचे नियमशास्त्र] यातील सर्वात कठीण नियम आहेत.” असे असले तरीही देवाचे ऐकल्याने आपला पुष्कळ फायदा होऊ शकतो. (यशया ४८:१८) जसे की, लैंगिकरित्या संक्रमित रोगांपासून आपले संरक्षण होऊ शकते. यातल्या काही रोगांवर तर उपचार देखील नाहीत आणि त्यांनी मृत्यूही संभावू शकतो.b तसेच विवाहाआधी गर्भवती होण्याची पाळी येणार नाही. ईश्‍वरी बुद्धीनुसार चालल्याने आपला विवेक देखील शुद्ध राहील. शिवाय, आपला आत्म-सन्मान वाढेल आणि आपले नातेवाईक, वैवाहिक साथीदार, मुले आणि ख्रिस्ती बंधू आणि बहिणीसुद्धा आपला आदर करतील. त्याचप्रमाणे, लैंगिक संबंधांविषयी आपला योग्य, निकोप दृष्टिकोन राहील ज्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. एका ख्रिस्ती स्त्रीने असे लिहिले: “देवाच्या वचनातील सत्य हेच सर्वात मोठे संरक्षण आहे. माझे लग्न अजून झालेले नाही पण ज्या दिवशी माझे लग्न होईल त्या दिवशी मी माझ्या ख्रिस्ती साथीदाराला अभिमानाने सांगीन की माझे चरित्र अजूनही शुद्ध आहे.”

८. आपल्या चांगल्या वर्तनाने शुद्ध उपासनेला कसा हातभार लागेल?

८ शुद्ध चालचलन राखून खऱ्‍या उपासनेविषयी असलेले गैरसमज आपण दूर करू शकतो आणि आपण ज्याची उपासना करतो त्या देवाकडे लोकांना आकर्षित करू शकतो. प्रेषित पेत्राने असे लिहिले: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) यहोवाची सेवा करत नसलेल्या लोकांना आपले शुद्ध वर्तन दिसत नसले किंवा आवडत नसले तरीही आपल्या स्वर्गीय पित्याला ते दिसते, त्याला ते आवडते आणि आपण त्याच्या मार्गदर्शनानुसार राहण्याचा प्रयत्न करतो याचा त्याला आनंदही होतो.—नीतिसूत्रे २७:११; इब्री लोकांस ४:१३.

९. देवाच्या आज्ञांमागील कारण आपल्याला नीट कळले नाही तरीही त्याच्या मार्गदर्शनावर आपला भरवसा का असावा? उदाहरण देऊन सांगा.

९ देवावर आपला विश्‍वास असल्यामुळे, त्याने सांगितलेल्या गोष्टीमागे काय कारण असावे हे आपल्याला कळत नसले तरीही आपली भलाई कशात आहे हे त्यालाच ठाऊक आहे असा आपण भरवसा ठेवतो. मोशेच्या नियमशास्त्रातील एक उदाहरण पाहा. लष्करी छावण्यांसाठी एक नियम असा होता की, त्यांनी आपला मल छावणीच्या बाहेर खड्डा करून झाकून टाकावा. (अनुवाद २३:१३, १४) असा नियम देवाने का दिला असावा हे कदाचित इस्राएली लोकांना कळाले नसेल. इतकेच नव्हे तर त्याची आवश्‍यकता नाही असेही काहींना वाटले असावे. परंतु, वैद्यक शास्त्राने आता हे मान्य केले आहे की, या नियमामुळे पाण्याचा साठा दूषित झाला नसेल आणि कीटकांमुळे होणाऱ्‍या अनेक आजारांपासून लोकांना संरक्षण मिळाले असेल. त्याचप्रमाणे, केवळ विवाहितांनीच लैंगिक संबंध ठेवावेत या बंधनामागे देखील आध्यात्मिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि मानसिक कारणे आहेत. शुद्ध वर्तन राखलेल्या काहींची उदाहरणे आपण आता बायबलमधून पाहू या.

शुद्ध वर्तनाचा योसेफाला आशीर्वाद

१०. योसेफाला मोहविण्याचा प्रयत्न कोणी केला आणि त्याने कसे उत्तर दिले?

१० बायबलमधील याकोबाचा पुत्र योसेफ याच्याविषयी तुम्हाला कदाचित ठाऊक असेल. १७ वर्षांचा असताना तो पोटीफरच्या (फारोचा अंमलदार) घरात दास होता. यहोवाने योसेफाला आशीर्वादित केले आणि कालांतराने तो पोटीफरच्या घराचा कारभारी बनला. तो वीसएक वर्षांचा झाल्यावर “बांधेसूद व देखणा” होता; त्यामुळे पोटीफरच्या पत्नीचा त्याच्यावर डोळा होता आणि ती त्याला मोहविण्याचा प्रयत्न करू लागली. योसेफाने तिला स्पष्टपणे सांगितले की, असे करणे म्हणजे मालकाचा विश्‍वासघात आणि “देवाच्या विरुद्ध पाप” ठरेल. योसेफाने असे का म्हटले असावे?—उत्पत्ति ३९:१-९.

११, १२. जारकर्म आणि व्यभिचार यांचा निषेध करणारा लिखित नियम देवाने दिलेला नसतानाही योसेफाने तसे उत्तर का दिले असावे?

११ कोणाला कळले तर काय होईल, या भीतीने योसेफाने असा निर्णय घेतला नाही हे स्पष्ट दिसून येते. योसेफाचे कुटुंब फार दूरवर राहत होते आणि त्याच्या पित्याला तर तो जिवंत आहे हे देखील माहीत नव्हते. योसेफाने कोणते अनैतिक कृत्य केले असते तर त्याच्या कुटुंबाला थांगपत्ताही लागला नसता. आणि पोटीफर व घरातल्या गडी माणसांनाही ते पाप कळाले नसते कारण पुष्कळदा घरात कोणीच नसायचे. (उत्पत्ति ३९:११) परंतु, हे कृत्य देवापासून लपवता येत नाही याची योसेफाला जाणीव होती.

१२ यहोवाविषयी त्याला जे काही ठाऊक होते त्याच्या आधारे त्याने असा विचार केला असावा. यहोवाने एदेन बागेत काय म्हटले होते हे तर त्याला ठाऊकच असेल: “यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.” (उत्पत्ति २:२४) शिवाय, योसेफाची पणजी सारा हिला मिळवण्याचा प्रयत्न केलेल्या पलिष्टी राजाला यहोवाने काय म्हटले तेसुद्धा त्याला ठाऊक असेल. यहोवाने त्या राजाला म्हटले होते: “तू जी ही स्री आणली आहेस तिजमुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवऱ्‍याची बायको आहे. . . . मजविरुद्ध तुजकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरिलेहि; म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही.” (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति २०:३, ६) यहोवाने कोणताही लेखी नियम दिला नव्हता तरीही विवाहाविषयी त्याचे विचार अगदी स्पष्ट होते. योसेफाच्या विवेकाला हे पटत नसल्यामुळे आणि यहोवाला संतुष्ट करण्याची त्याची इच्छा असल्यामुळे त्याने अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिला.

१३. योसेफाला पोटीफरच्या पत्नीला चुकवणे का शक्य नव्हते?

१३ परंतु, पोटीफरची पत्नी पिच्छा सोडत नव्हती; ती “रोज रोज” योसेफाला तिच्यापाशी निजायला सांगत होती. मग योसेफाने तिला चुकवायचा प्रयत्न का केला नाही? त्या घरात तो दास होता म्हणून घरात राहून काम करणे त्याला भाग होते. पुरातनवस्तुशास्त्राच्या पुराव्यानुसार ईजिप्शियन घरांची रचना अशी होती की, घरातूनच भांडारात जावे लागत होते. त्यामुळे पोटीफरच्या पत्नीला चुकवणे योसेफाला कदाचित अशक्य होते.—उत्पत्ति ३९:१०.

१४. (अ) पोटीफरच्या पत्नीपासून पळ काढल्यावर योसेफाचे काय झाले? (ब) योसेफ विश्‍वासू राहिल्यामुळे यहोवाने त्याला कसा आशीर्वाद दिला?

१४ मग एक दिवस असा आला जेव्हा घरात कोणीच नव्हते. पोटीफरच्या पत्नीने त्याचे वस्त्र धरून म्हटले: “मजपाशी नीज”! पण तो बाहेर पळून गेला. त्याच्या नकाराचा अपमान असह्‍य झाल्याने तिने त्याच्यावर बलात्काराचा आळ घेतला. त्याचा काय परिणाम झाला? योसेफाच्या विश्‍वासूपणाचे त्याला तात्काळ प्रतिफळ मिळाले का? नाही. उलट त्याला तुरुंगात डांबण्यात आले आणि त्याच्या पायांत बेड्या घातल्या गेल्या आणि गळ्यात लोखंडी कडे अडकवले गेले. (उत्पत्ति ३९:१२-२०; स्तोत्र १०५:१८) यहोवाने हा अन्याय पाहिला आणि त्याने योसेफाला तुरुंगातून थेट महालात पोहंचवले. ईजिप्तमध्ये तो राजाच्या खालोखालचा अधिकारी बनला, त्याचे लग्न झाले शिवाय त्याला मुलेही झाली. (उत्पत्ति ४१:१४, १५, ३९-४५, ५०-५२) इतकेच नव्हे तर, योसेफाच्या विश्‍वासूपणाचा हा अहवाल ३,५०० वर्षांआधी देवाच्या सेवकांसाठी लिहून ठेवण्यात आला. देवाच्या नीतिनियमांचे पालन केल्याचा हा केवढा मोठा आशीर्वाद! त्याचप्रमाणे, आजही नैतिकदृष्ट्या विश्‍वासू राहिल्याचे फायदे आपल्याला कदाचित लगेच दिसून येणार नाहीत; पण यहोवाचे आपल्याकडे लक्ष आहे आणि योग्य समयी तो आपल्याला आशीर्वादित करील असा भरवसा आपण ठेवू शकतो.—२ इतिहास १६:९.

ईयोबाचा “डोळ्यांशी करार”

१५. ईयोबाने आपल्या ‘डोळ्यांशी कोणता करार’ केला होता?

१५ ईयोब हा आणखी एक निष्ठावान मनुष्य होता. दियाबलाने ईयोबावर एकावर एक परीक्षा आणल्या तेव्हा ईयोबाने स्वतःच्या मागील जीवनाचा विचार केला. यहोवाच्या एखाद्या तत्त्वाचे (लैंगिक नैतिकतेच्या तत्त्वाचे देखील) उल्लंघन केले असल्यास आपण कठोर शिक्षा भोगायला तयार आहोत असे तो म्हणाला. “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयोब ३१:१) या शब्दांवरून ईयोबाला असे म्हणायचे होते की, देवाला विश्‍वासू राहण्यासाठी त्याने कोणाही स्त्रीकडे कामवासनेने न पाहण्याचा निर्धार केला होता. अर्थात, दररोजच्या जीवनात तर तो स्त्रियांना पाहणारच होता आणि गरज पडल्यास तो त्यांना मदत देखील करणार होता. परंतु, प्रणयभावनेने तो त्यांना पाहणार नव्हता. त्याच्यावर परीक्षा येण्याआधी तो फार धनवान होता; तो “पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.” (ईयोब १:३) परंतु, पैशांच्या जोरावर त्याने कधीच स्त्रियांना आकर्षित केले नाही. तरुण स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवण्याची कल्पना त्याने मनात आणली नाही.

१६. (अ) विवाहित ख्रिश्‍चनांसाठी ईयोब एक चांगले उदाहरण का आहे? (ब) मलाखीच्या दिवसांतल्या पुरुषांचे वर्तन ईयोबापेक्षा वेगळे कसे होते आणि आजच्या लोकांची मनोवृत्ती कशी आहे?

१६ ईयोब, अनुकूल तसेच प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठावान राहिला. यहोवाने हे पाहिले आणि त्याच्यावर आशीर्वाद वर्षिला. (ईयोब १:१०; ४२:१२) ख्रिस्ती विवाहित स्त्री-पुरुषांपुढे ईयोबाचा केवढा उत्तम आदर्श आहे. म्हणूनच यहोवाला तो इतका प्रिय होता! पण आजकाल बहुतेकांचे वर्तन याच्या अगदी उलट आहे; ते मलाखीच्या दिवसांतल्या लोकांसारखे आहेत. त्या वेळी, पुष्कळ पतींनी तरुण स्त्रियांकरता आपल्या पत्नी सोडून दिल्या होत्या याचा मलाखी धिक्कार करत होता. सोडलेल्या पत्नींच्या आसवांनी यहोवाची वेदी जणू भिजली होती. म्हणून आपल्या साथीदारीणीशी ‘विश्‍वासघाताने वर्तलेल्या’ लोकांची देवाने निंदा केली.—मलाखी २:१३-१६.

चांगल्या चालीची तरुणी

१७. शुलेमकरीण ‘बंद असलेल्या बागेसारखी’ कशी होती?

१७ तिसरी निष्ठावान व्यक्‍ती आहे शुलेमकरीण. ती तरुण आणि सुंदर होती म्हणून एक मेंढपाळच नव्हे तर इस्राएलचा धनवान राजा, शलमोन देखील तिच्या प्रेमात पडला. गीतरत्नात सांगितलेल्या मनोरम कहाणीत शुलेमकरीणीने आपली शुद्धता टिकवून दुसऱ्‍या लोकांचा आदर मिळवला. शलमोनाला तिने नकार दिला; तरीही तिची कहाणी लिहून ठेवण्याची प्रेरणा त्याला देवाने दिली. तिचे प्रेम ज्यावर होते तो मेंढपाळ देखील तिच्या शुद्ध वर्तनामुळे तिचा आदर करत होता. एकदा तर त्याने शुलेमकरिणीला “बंद असलेली बाग” म्हटले. (गीतरत्न ४:१२) प्राचीन इस्राएलमध्ये, सुंदर बागांमध्ये विविध प्रकारच्या भाज्या, सुंगधी फुले आणि डौलदार वृक्ष असत. अशा या बागांभोवती सहसा कुंपण किंवा भिंत असायची. त्या बागांमध्ये फाटकाचे कुलुप उघडूनच आत प्रवेश मिळवता येऊ शकत होता. (यशया ५:५) शुलेमकरिणीची नैतिक शुद्धता आणि सौंदर्य अशाच दुर्मिळ बागेसारखी होती असे त्या मेंढपाळाला वाटत होते. ती पूर्णपणे शुद्ध होती. तिचे प्रेम केवळ तिच्या भावी पतीसाठी राखून ठेवलेले होते.

१८. योसेफ, ईयोब आणि शुलेमकरीणीच्या अहवालांवरून आपल्याला काय आठवते?

१८ शुलेमकरीणीने नैतिक शुद्धतेच्या बाबतीत आजच्या ख्रिस्ती स्त्रियांपुढे अप्रतिम उदाहरण मांडले आहे. यहोवाने शुलेमकरीणीचे चांगले वर्तन पाहिले आणि तिची प्रशंसा करून योसेफ व ईयोबाप्रमाणे तिलाही आशीर्वाद दिला. त्यांच्या विश्‍वासूपणाची उदाहरणे आपल्या फायद्याकरता देवाच्या वचनात नमूद केली आहेत. आपल्या विश्‍वासाची कृत्ये आज बायबलमध्ये नमूद केली जात नसली तरी यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालू इच्छिणाऱ्‍या लोकांकरता त्याची एक “स्मरणवही” आहे. यहोवाचे ‘लक्ष’ आपल्यावर आहे आणि आपण चांगले चालचलन ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतो तेव्हा त्याला आनंद होतो हे आपण कधीही विसरता कामा नये.—मलाखी ३:१६.

१९. (अ) शुद्ध चालचलनाबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा? (ब) पुढील लेखात कशाची चर्चा केली जाईल?

१९ विश्‍वास नसलेले लोक आपली थट्टा मस्करी करतील; पण आपण आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याची आज्ञा मानत आहोत याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आपली नीतिमूल्ये उच्च दर्जाची आहेत; ती देवाच्या दर्जांनुसार आहेत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण त्याचे जतन केले पाहिजे. शुद्ध चालचलन ठेवल्यास आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळेल आणि भवितव्यातही असेच अगणित आशीर्वाद मिळत राहण्याची आशा बाळगता येईल. परंतु, चांगले चालचलन ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात काय करता येईल? या महत्त्वाच्या प्रश्‍नाचे उत्तर पुढील लेखात दिले आहे.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज, मार्च १५, १९८३, (इंग्रजी) पृष्ठे २९-३१ पाहा.

b कोणा निर्दोष ख्रिश्‍चनाला विश्‍वासात नसलेल्या आणि देवाच्या मार्गदर्शनानुसार चालत नसलेल्या साथीदाराकडून लैंगिकरित्या संक्रमित होणाऱ्‍या रोगाची लागण झाल्याच्या काही दुःखद घटना घडल्या आहेत.

तुम्हाला स्पष्टीकरण देता येईल का?

• लैंगिक संबंधांबद्दल बायबल काय शिकवते?

• बायबलमध्ये “जारकर्म” हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे?

• शुद्ध चालचलनाचा आपल्याला काय फायदा होतो?

• योसेफ, ईयोब आणि शुलेमकरीण आजच्या ख्रिश्‍चनांसाठी उत्तम उदाहरणे का आहेत?

[९ पानांवरील चित्र]

योसेफाने अनैतिकतेपासून पळ काढला

[१० पानांवरील चित्र]

शुलेमकरीण ‘बंद असलेल्या बागेसारखी’ होती

[११ पानांवरील चित्र]

ईयोबाने “डोळ्यांशी करार” केला होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा