‘बुद्धीमुळे आपले दिवस बहुगुणित होतील’
जीवनाच्या समस्यांशी झुंजताना बुद्धी एक अत्यावश्यक गुण आहे हे कोणी नाकारणार नाही. खरी बुद्धी म्हणजे ज्ञान आणि समज यांचा योग्य उपयोग करण्याची क्षमता. ती मूर्खपणा, मूढता आणि वेडेपणा याच्या अगदी उलट आहे. त्यामुळे शास्त्रवचने आपल्याला बुद्धी प्राप्त करण्यास आर्जवतात. (नीतिसूत्रे ४:७) नीतिसूत्राचे पुस्तक तर, बुद्धी आणि शिक्षण देण्यासाठीच मुख्यतः लिहिण्यात आले होते. त्याचे सुरवातीचे शब्द असे आहेत: “इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन याची नीतिसूत्रे: ज्ञान [“बुद्धी,” NW] व शिक्षण ही संपादण्यात यावी; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे.”—नीतिसूत्रे १:१, २.
नीतिसूत्राच्या पहिल्या काही अध्यायांमधील विश्वसनीय शिकवणुकींचा आपण विचार करू या. एखादा प्रेमळ पिता आपल्या मुलाला आर्जवतो तसे शलमोन आपल्या वाचकांना शिस्त स्वीकारण्यास व बुद्धीकडे लक्ष देण्यास विनवणी करतो. (अध्याय १ आणि २) यहोवासोबत जवळीक कशी निर्माण करावी आणि आपल्या अंतःकरणाचे रक्षण कसे करावे हे तो आपल्याला दाखवतो. (अध्याय ३ आणि ४) तसेच, आपल्याला नैतिकरित्या शुद्ध राहायला ताकीद देण्यात आली आहे. (अध्याय ५ आणि ६) होय, व्यभिचारी व्यक्तीच्या कारवायांचा खुलासा केल्याने आपल्याला त्याचा किती फायदा होतो. (अध्याय ७) शिवाय, व्यक्तिरूपातील बुद्धीचे आमंत्रण सर्वांना किती आकर्षक आहे! (अध्याय ८) नंतरच्या अध्यायांमध्ये वेगवेगळी संक्षिप्त नीतिसूत्रे देण्याआधी शलमोन राजाने आतापर्यंत चर्चा केलेल्या गोष्टींचा एक उत्तेजनदायक सारांश दिला आहे.—अध्याय ९.
‘ये, माझी भाकर खा आणि माझा द्राक्षारस पी’
नीतिसूत्राच्या पहिल्या भागाची समाप्ती, आधी दिलेल्या सल्ल्याची पुनरुक्ती करणारा नीरस सारांश नाही. तर, तो सुंदर आणि उत्तेजनदायक उदाहरणाच्या रूपात मांडला आहे; तो वाचकाला बुद्धी प्राप्त करण्यास प्रोत्साहन देतो.
बायबलमधील नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या ९ व्या अध्यायाची सुरवात या शब्दांनी केली आहे: “[बुद्धीने] आपले घर बांधिले आहे; [तिने] आपले सात खांब तयार केले आहेत.” (नीतिसूत्रे ९:१) एका विद्वानाच्या मते, “सात खांब” हा शब्दांश “मधोमध अंगण असलेल्या महालाला सूचित करतो; इमारतीच्या दोन्ही बाजूंना तीन आधारस्तंभ आणि तिसऱ्या बाजूला [अर्थात] मुख्यद्वाराच्या समोरील बाजूला एक आधारस्तंभ.” एवढे मात्र खरे की, खऱ्या बुद्धीने अनेक पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी एक मजबूत घर बांधले आहे.
मेजवानीला लागणारे सर्व पदार्थ, अर्थात मांस, द्राक्षारस हे सर्वकाही आहे. भोजनाच्या तयारीकडे व मेजाच्या मांडणीकडे बुद्धीने जातीने लक्ष दिले आहे. “[तिने] आपले पशु कापिले आहेत; [तिने] आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजहि वाढून तयार केले आहे.” (नीतिसूत्रे ९:२) स्पष्टतः, या लाक्षणिक मेजावर आध्यात्मिक प्रबोधन देणारे विचार वाढून ठेवले आहेत.—यशया ५५:१, २.
खऱ्या बुद्धीने तयार केलेल्या मेजवानीसाठी कोणाकोणाला आमंत्रण आहे? “[तिने] आपल्या दासी पाठविल्या आहेत, [ती] नगराच्या उच्च स्थानांवरून ओरडून म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो; जो बुद्धिहीन आहे त्याला [ती] म्हणते, ये, माझी भाकर खा; आणि मी मिसळलेला द्राक्षारस पी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.”—नीतिसूत्रे ९:३-६.
बुद्धीने आपल्या दासींना आमंत्रण देण्याकरता पाठवले आहे. त्या सार्वजनिक ठिकाणी गेल्या आहेत म्हणजे होता होईल तितक्या अधिक लोकांना त्या आमंत्रण देऊ शकतात. हे आमंत्रण, “बुद्धिहीन” किंवा समज नसलेल्या किंवा अननुभवी अशा सर्व लोकांकरता आहे. (नीतिसूत्रे ९:४) आणि त्यांना जीवनाचे आश्वासन देण्यात आले आहे. देवाच्या वचनातली आणि नीतिसूत्राच्या पुस्तकातली बुद्धी जवळजवळ प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. आज, खऱ्या बुद्धीचे संदेशवाहक या नात्याने, यहोवाचे साक्षीदार, जेथे कोठे लोक असतात तेथे त्यांना बायबलचा अभ्यास करायला आमंत्रण देत आहेत. हे ज्ञान घेतल्याने निश्चितच सार्वकालिक जीवन मिळू शकेल.—योहान १७:३.
ख्रिश्चनांनी नम्रतेने बुद्धीची शिस्त स्वीकारली पाहिजे. विशेषकरून तरुण लोकांनी आणि ज्यांनी अलीकडेच यहोवाविषयी शिकायला सुरवात केली आहे त्यांनी हे केले पाहिजे. देवाच्या मार्गांबद्दल फारसा अनुभव नसल्यामुळे ते “बुद्धिहीन” असतील. अर्थात, त्यांचे सर्वच हेतू वाईट असतील अशातला भाग नाही पण यहोवा देवाला संतुष्ट करणारी मनःस्थिती प्राप्त करण्यासाठी वेळ आणि प्रयास लागतो. त्यासाठी आपले विचार, इच्छा, आवडीनिवडी आणि ध्येये देवाच्या अपेक्षेनुसार बदलण्याची गरज आहे. त्यामुळेच, त्यांनी “वचनरूपी निऱ्या दुधाची इच्छा” धरावी हे किती आवश्यक आहे.—१ पेत्र २:२, पं.र.भा.
खरे पाहिले तर, आपण सर्वांनी “प्राथमिक शिकवणीपेक्षा” जास्त शिकू नये का? निश्चितच ‘देवाच्या गहन गोष्टींबद्दल’ आपण आवड निर्माण केली पाहिजे आणि प्रौढ लोकांकरता असलेल्या जड अन्नातून पोषण मिळवले पाहिजे. (इब्री लोकांस ५:१२–६:१; १ करिंथकर २:१०) येशू ख्रिस्त ज्यांच्यावर थेट देखरेख करतो तो ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास’ न चुकता सर्वांकरता वेळोवेळी आध्यात्मिक अन्न देतो. (मत्तय २४:४५-४७) देवाच्या वचनाचा आणि दास वर्गाने पुरवलेल्या बायबल आधारित प्रकाशनांचा मेहनतीने अभ्यास करून आपण बुद्धीच्या मेजावरील मेजवानीचा आस्वाद घेऊ या.
“निंदकाला वाग्दंड करू नको”
बुद्धीच्या शिकवणीमध्ये सुधारणुकीचाही समावेश होतो. बुद्धीचा हा पैलू सर्वांना आवडतोच असे नाही. त्यामुळे, नीतिसूत्रे पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या समाप्तीत अशी ताकीद दिली आहे: “जो निंदकाला सुबोध करतो तो स्वतः अप्रतिष्ठा पावतो, आणि जो दुष्टाला वाग्दंड करतो त्याला कलंक लागतो. निंदकाला वाग्दंड करू नको, केला तर तो तुला द्वेषील.”—नीतिसूत्रे ९:७, ८, पं.र.भा.
निंदकाला कोणी सुधरवण्याचा प्रयत्न करत असेल तर उलट त्याच्याबद्दलच तो मनात राग आणि द्वेष बाळगतो. दुष्ट व्यक्तीला सुधारणुकीचे मोल वाटत नसते. ज्या व्यक्तीला सत्य मुळीच आवडत नाही किंवा जो सतत सत्याची केवळ टीका करत असतो त्याला देवाच्या वचनातील अनोख्या सत्यांविषयी शिकवणे किती मूर्खपणाचे ठरेल! प्रेषित पौल अंत्युखियात प्रचार करत असताना, त्याला काही यहुदी लोक भेटले ज्यांना सत्याविषयी मुळीच कदर नव्हती. ते पौलाचा विरोध करून अपशब्द बोलू लागले व त्याच्याशी वाद करायचा प्रयत्न करू लागले तेव्हा पौलाने फक्त इतकेच म्हटले की, “ज्याअर्थी तुम्ही [देवाच्या वचनाचा] अव्हेर करिता व आपणाला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता त्याअर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो.”—प्रेषितांची कृत्ये १३:४५, ४६.
प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांपर्यंत राज्याची सुवार्ता पोहंचवण्याचे काम करत असताना आपण निंदकांसोबत वाद घालत न बसण्याबद्दल सावध असावे. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सूचना दिली: “घरात जाताना, तुम्हाला शांति असो, असे म्हणा; ते घर योग्य असले तर तुमची शांति त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांति तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका.”—मत्तय १०:१२-१४.
परंतु, ज्ञानवान मनुष्याला वाग्दंड केला तर त्याचा प्रतिसाद निंदकापेक्षा अगदी उलट असतो. शलमोन म्हणतो: “ज्ञानवानाला वाग्दंड कर म्हणजे तो तुला प्रिय मानील. ज्ञानवानाला शिक्षण दे म्हणजे तो आणखी ज्ञानवान होईल.” (नीतिसूत्रे ९:८ब, ९अ) ज्ञानवान मनुष्याला ठाऊक असते की, “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व व शांतिकारक फळ देते.” (इब्री लोकांस १२:११) आपल्याला दिलेला सल्ला जड वाटत असला तरी त्याने जर आपण अधिक ज्ञानवान होणार असू तर त्याचा विरोध का करावा किंवा तो का म्हणून झिडकारावा?
“धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल” असे सुज्ञ राजा म्हणतो. (नीतिसूत्रे ९:९ब) कोणीही इतका ज्ञानी नाही की त्याला शिकण्याची गरज नाही किंवा इतका वयस्कही नाही की त्याला शिकता येत नाही. वयस्क लोक सत्य स्वीकारून यहोवाला आपले जीवन समर्पण करतात ही किती आनंदाची गोष्ट आहे! आपणही शिकण्याची इच्छा ठेवण्याचा आणि मन सतत क्रियाशील ठेवण्याचा प्रयत्न करू या.
“तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील”
सदर विषयाचा मुख्य मुद्दा ठळक मांडून बुद्धी प्राप्त करण्यासाठी प्रथम काय असणे आवश्यक आहे याचाही समावेश शलमोन करतो. तो लिहितो: “परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.” (नीतिसूत्रे ९:१०) खऱ्या देवाबद्दल गाढ, आदरयुक्त श्रद्धा बाळगल्याशिवाय ईश्वरी बुद्धी प्राप्त होऊ शकत नाही. एखाद्या मनुष्याला पुष्कळ ज्ञान असू शकते पण त्याला यहोवाचे भय नसले तर निर्माणकर्त्याचा आदर होईल अशा तऱ्हेने त्या ज्ञानाचा उपयोग करण्यात तो उणा पडेल. ज्ञात वस्तुस्थितींवरून तो चुकीचे निष्कर्षही काढू शकतो आणि शेवटी दुसऱ्यांसमोर स्वतःची फजिती करून घेऊ शकतो. शिवाय, परमपवित्र यहोवाचे ज्ञान, बुद्धीचे खास वैशिष्ट्य असलेली समज प्राप्त करण्यास आवश्यक आहे.
बुद्धीचे प्रतिफळ काय आहे? (नीतिसूत्रे ८:१२-२१, ३५) इस्राएलचा राजा म्हणतो: “माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील.” (नीतिसूत्रे ९:११) बुद्धीसोबत संगत ठेवल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. होय, ‘शहाणपण जीविताचे रक्षण करते.’—उपदेशक ७:१२.
बुद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयास करण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. यावर जोर देऊन शलमोन म्हणाला: “तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू धर्मनिंदा केली तर त्याचे फळ तूच भोगिशील.” (नीतिसूत्रे ९:१२) सुज्ञ व्यक्तीच्या सुज्ञतेचा तिलाच फायदा होतो आणि निंदक स्वतःच्या करणीमुळे त्रास सहन करतो. अर्थात, आपण जे पेरतो तेच कापतो. तेव्हा आपण ‘[बुद्धीकडे, NW] कान लावू या.’—नीतिसूत्रे २:२.
“मूर्ख स्त्री गडबड करणारी असते”
विरोधाभास दाखवण्यासाठी शलमोन पुढे म्हणतो: “मूर्ख स्त्री गडबड करणारी असते; ती भोळेपणाची केवळ मूर्ति असून तिला काही कळत नाही. ती नगराच्या उच्च स्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते; आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्याजवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो.”—नीतिसूत्रे ९:१३-१६अ.
मूर्खपणाची तुलना मोठ्याने बोलणाऱ्या, स्वैराचारी व मूढ स्त्रीशी करण्यात आली आहे. तिने देखील घर बांधले आहे. आणि ती स्वतःहूनच भोळ्यांना आपल्याकडे बोलावते. त्यामुळे वाटसरू स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. ते बुद्धीचे आमंत्रण स्वीकारतील की मूर्खतेचे?
“चोरिलेले पाणी गोड लागते”
बुद्धी आणि मूर्खपणा हे दोघेही ‘इकडे वळा’ असे लोकांना आमंत्रण देतात. परंतु, या आमंत्रणातील आकर्षणे वेगळी आहेत. बुद्धी लोकांना द्राक्षारस, मांस आणि भाकरीच्या मेजवानीचे आमंत्रण देते. पण मूर्खपणाचे आमंत्रण आपल्याला वाईट चालीच्या बाईची आठवण करून देते. शलमोन म्हणतो: “जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते, चोरिलेले पाणी गोड लागते; चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते.”—नीतिसूत्रे ९:१६ब, १७.
“मूर्ख स्त्री” मिश्रित द्राक्षारस देण्याऐवजी चोरलेल्या पाण्याचे आमीष दाखवते. (नीतिसूत्रे ९:१३) शास्त्रवचनांमध्ये, आपल्या प्रिय पत्नीसोबत उपभोगलेल्या लैंगिक सुखाची तुलना, तजेला देणारे पाणी पिण्याशी केली आहे. (नीतिसूत्रे ५:१५-१७) त्यामुळे, चोरलेले पाणी, गुप्तपणे अनैतिक शरीरसंबंध ठेवण्याला सूचित करते. हे पाणी गोड—द्राक्षारसापेक्षाही इष्ट आहे असे दाखवले जाते कारण ते चोरलेले असते व पकडले न जाण्याच्या कल्पनेचा त्यात समावेश असतो. चोरलेली भाकर अप्रामाणिकतेने मिळवलेली असल्यामुळे ती बुद्धीच्या भाकरीपेक्षा व द्राक्षारसापेक्षा जास्त चविष्ट आहे असे भासवले जाते. मना केलेली व गुप्त असलेली गोष्ट आकर्षक समजणे हे मूर्खतेचे लक्षण आहे.
बुद्धीचे आमंत्रण स्वीकारल्यास जीवन मिळेल असे वचन दिले गेले आहे; परंतु, मूर्ख स्त्रीच्या मागे गेल्याने काय परिणाम होईल हे ती सांगत नाही. तथापि, शलमोन अशी ताकीद देतो: “पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही.” (नीतिसूत्रे ९:१८) एका विद्वानाने लिहिले: “मूर्ख स्त्रीचे निवासस्थान घर नाही तर कबरस्थान आहे. कोणी त्यात प्रवेश केला तर तो जिवंत बाहेर येणार नाही.” अनैतिक जीवनशैली सुज्ञपणाची नाही; ती जिवावर बेतणारी आहे.
येशू ख्रिस्त म्हणाला: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) बुद्धीच्या मेजावरील भोजन आपण नेहमी घेत राहू या आणि जीवनाकडे नेणाऱ्या मार्गावरील लोकांपैकी असू या.
[३१ पानांवरील चित्र]
दुसऱ्यांनी दाखवलेल्या चुका बुद्धिमान व्यक्ती स्वीकारते
[३१ पानांवरील चित्र]
बुद्धी प्राप्त करणे प्रत्येकाची व्यक्तिगत जबाबदारी आहे