वडिलांनो, भार उचलण्यास इतरांना प्रशिक्षण द्या
यहोवाच्या साक्षीदारांच्या संपूर्ण जगभरातील मंडळ्यांमध्ये, देखरेखीचे काम करण्याकरता बांधवांची अत्यंत गरज आहे. याची तीन कारणे आहेत.
पहिले कारण, जे “क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र” करण्याविषयी यहोवाने दिलेले वचन आज तो पूर्ण करीत आहे. (यशया ६०:२२) त्याच्या अपात्री कृपेमुळे गेल्या तीनएक वर्षांत, दहा लाख नव्या शिष्यांनी यहोवाचे साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेतलेल्या या नवीन लोकांना ख्रिस्ती प्रौढतेप्रत प्रगती करण्यास मदत करण्याकरता जबाबदार बांधवांची आवश्यकता आहे.—इब्री लोकांस ६:१.
दुसरे कारण, अनेक दशकांपासून वडील या नात्याने सेवा करणाऱ्या बांधवांना, वाढत्या वयाने किंवा प्रकृतीच्या समस्यांनी मंडळीतील त्यांच्या कामाचा भार कमी करण्यास भाग पाडले आहे.
तिसरे कारण, अनेक आवेशी ख्रिस्ती वडील आता रुग्णालय संपर्क समिती, प्रादेशिक बांधकाम समिती किंवा संमेलन गृह समिती यांचे सदस्य आहेत. त्यामुळे काही वेळा त्यांना, स्थानीय मंडळीत असलेल्या जबाबदाऱ्या निदान काही वेळा पुरत्या सोडून, संतुलन राखावे लागले आहे.
या सर्व कारणांमुळे मग, आणखी पात्र बांधवांची ही निकडीची गरज कशी काय पूर्ण करता येऊ शकेल? प्रशिक्षणाद्वारे. “इतरांना शिकविण्यास योग्य [होतील] अशा विश्वासू माणसांना” प्रशिक्षण देण्याचे उत्तेजन बायबल, ख्रिस्ती पर्यवेक्षकांना देते. (२ तीमथ्य २:२) एका शब्दकोशानुसार, प्रशिक्षण देणे या क्रियापदाचा अर्थ, एखाद्याला योग्य, पात्र व निपुण बनण्यास शिकवणे. इतर पात्र बांधवांना वडील कशाप्रकारे प्रशिक्षण देऊ शकतात त्याची आपण चर्चा करू या.
यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण करा
येशू ख्रिस्त निश्चितच योग्य, पात्र व निपुण होता—आणि यात खरे तर आश्चर्य करण्यासारखे काही नाही. कारण, स्वतः यहोवा देवाकडून त्याला प्रशिक्षण मिळाले होते! कोणकोणत्या कारणांमुळे त्याचे हे प्रशिक्षण इतके प्रभावी ठरले असावे? येशूने योहान ५:२० येथे तीन कारणांचा उल्लेख केला आहे. “पिता [१] पुत्रावर प्रीति करितो आणि [२] स्वतः जे काही करितो ते सर्व त्याला दाखवितो . . . तो [३] ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील.” (तिरपे वळण आमचे.) प्रत्येक कारणाचे परीक्षण केल्याने आपल्याला प्रशिक्षणाविषयीची अधिक माहिती मिळू शकेल.
येशू पहिल्यांदा काय म्हणाला ते पाहा: “पिता पुत्रावर प्रीति करितो.” सृष्टीच्या अगदी सुरवातीपासूनच यहोवा आणि त्याचा पुत्र येशू यांच्यामध्ये एक घनिष्ठ प्रेमळ नातेसंबंध होता. या नातेसंबंधावर नीतिसूत्रे ८:३० अधिक प्रकाश टाकते: “तेव्हा मी [येशू] त्याच्यापाशी [यहोवा देव] कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे.” (तिरपे वळण आमचे.) यहोवा येशूविषयी नित्य “आनंददायी” होता याबद्दल येशूच्या मनात कसलीही शंका नव्हती. आणि आपल्या पित्याबरोबर काम करताना मिळणारा आनंद येशूनेही स्वतःपुरताच मर्यादित ठेवला नाही. अशाप्रकारे, ख्रिस्ती वडील आणि ते ज्यांना शिक्षण देतात असे बांधव यांच्यामधला तो प्रेमळ, मनमोकळा नातेसंबंध पाहून आपल्यालाही किती आनंद वाटतो!
येशूने दिलेले दुसरे कारण हे, की पिता “स्वतः जे काही करितो ते सर्व त्याला दाखवितो.” या शब्दांवरून आपल्याला नीतिसूत्रे ८:३० येथे जे म्हटले आहे, की यहोवा विश्वाची निर्मिती करत होता तेव्हा येशू “त्याच्यापाशी” होता याची खात्री पटते. (उत्पत्ति १:२६) वडील असलेले बांधव, सेवा सेवक असलेल्या बांधवांच्या अगदी निकट सहवासात कार्य करून, आपली कर्तव्ये उत्तम प्रकारे कशी पार पाडावीत हे त्यांना दाखवून यहोवाच्या उत्कृष्ट उदाहरणाचे अनुकरण करू शकतात. पण, नव्याने नियुक्त केलेल्या सेवा सेवकांनाच फक्त प्रगतीशील प्रशिक्षणाची गरज नसते. अनेक वर्षांपासून अध्यक्षाचे काम करू पाहणाऱ्या विश्वासू बांधवांबद्दल काय ज्यांना कधीच नियुक्त करण्यात आले नाही? (१ तीमथ्य ३:१) वडिलांनी अशा बांधवांना विशिष्ट सल्ला द्यावा जेणेकरून त्यांना समजून येईल, की त्यांनी कोणत्या क्षेत्रात सुधारणा केल्या पाहिजेत.
उदाहरणार्थ, एक सेवा सेवक आपली जबाबदारी अगदी विश्वासूपणे, न चुकता व काळजीपूर्वक पार पाडत असेल. तो एक उत्तम शिक्षक देखील असेल. पुष्कळ बाबतीत तो मंडळीत उत्तम कार्ये करत असेल. परंतु, सहख्रिश्चनांबरोबर व्यवहार करताना तो कदाचित कठोर असेल याची त्याला जाणीव नसेल. अशा वेळी वडिलांनी “ज्ञानी व समंजस” असणे जरूरीचे आहे. (याकोब ३:१३) त्या सेवा सेवकाबरोबर बोलून त्याला त्याची समस्या स्पष्टपणे दाखवण्याद्वारे, त्याला विशिष्ट उदाहरणे देऊन सुधारण्यासाठी व्यावहारिक सूचना देण्याद्वारे वडीलजनांचे त्याच्याप्रती प्रेम दिसून येणार नाही का? वडिलांनी, काळजीपूर्वकपणे ‘मिठाने रूचकर केल्यासारखा सल्ला’ दिला तर त्यांचे बोलणे कदाचित स्वीकारले जाईल. (कलस्सैकर ४:६) अर्थात, सेवा सेवकाने मनमोकळेपणाने व मिळणारा कोणताही सल्ला आनंदाने स्वीकारला तर वडिलांना त्याच्याशी बोलायला अधिकच सोपे जाईल.—स्तोत्र १४१:५.
काही मंडळ्यांत, वडील जन सेवा सेवकांना सातत्याने व्यावहारिक प्रशिक्षण देत आहेत. उदाहरणार्थ, आजारी किंवा वयस्कर बंधूभगिनींना भेटायला जाताना ते आपल्यासोबत योग्यता प्राप्त सेवा सेवकांना घेऊन जातात. अशाप्रकारे सेवा सेवकांना मेंढपाळकत्वाच्या कार्याचा अनुभव मिळू शकतो. अर्थात, सेवा सेवकाला स्वतःची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आणखीनही बरेच मार्ग आहेत.—“सेवा सेवक काय करू शकतात” असे शीर्षक असलेली खालील पेटी पाहा.
येशूच्या प्रशिक्षणाला प्रभावी बनवणारे तिसरे कारण म्हणजे, भवितव्यात होणारी वाढ लक्षात ठेवून यहोवाने येशूला प्रशिक्षण दिले. येशू आपल्या पित्याविषयी म्हणाला की तो आपल्या पुत्राला ‘ह्यांहून मोठी कामे दाखवील.’ पृथ्वीवर असताना येशूला मिळालेल्या अनुभवाने त्याला, भवितव्यातील नेमणूका पार पाडण्यासाठी लागणारे गुण विकसित करायला मदत केली. (इब्री लोकांस ४:१५; ५:८, ९) उदाहरणार्थ, येशूला लवकरच, मरण पावलेल्या कोट्यवधी लोकांचे पुनरुत्थान करून त्यांचा न्यायनिवाडा करण्याची केवढी मोठी जबाबदारी पार पाडायची आहे!—योहान ५:२१, २२.
वडिलांनी आज, भवितव्याचा विचार करून सेवा सेवकांना प्रशिक्षण द्यावे. जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी सध्या कदाचित पुष्कळ वडील व सेवा सेवक असतील, परंतु एखाद्या नवीन मंडळीची स्थापना झाल्यावर पुरेसे वडील व सेवा सेवक असतील का? अनेक मंडळ्या स्थापन करण्यात आल्यावर पुष्कळ वडील व सेवा सेवक असतील का? गेल्या तीन वर्षांत, संपूर्ण जगभरात ६,००० पेक्षा अधिक नवीन मंडळ्या स्थापन करण्यात आल्या. या नवीन मंडळ्यांची काळजी घेण्यासाठी किती तरी वडिलांची व सेवा सेवकांची गरज आहे याचा विचार करा!
वडिलांनो, तुम्ही ज्यांना प्रशिक्षण देत आहात अशा बांधवांबरोबर प्रेमळ व निकटचा नातेसंबंध प्रस्थापित करून यहोवाचे अनुकरण करीत आहात का? आपली जबाबदारी कशी हाताळायची हे तुम्ही त्यांना दाखवत आहात का? भवितव्यात उद्भवू शकणाऱ्या गरजांची तुम्हाला जाणीव आहे का? येशूला प्रशिक्षण देण्याच्याबाबतीत यहोवाने मांडलेल्या उदाहरणाचे अनुकरण केल्याने अनेकांना पुष्कळ आशीर्वाद मिळतील.
जबाबदाऱ्या सोपवण्यास कचरू नका
अनेक भारी जबाबदाऱ्या हाताळण्याची सवय असलेले योग्यता प्राप्त वडील कदाचित इतरांना काही कामे सोपवायला कदाचित कचरतील. आधी त्यांनी काहींना जबाबदाऱ्या देऊनही पाहिले असेल परंतु त्याचा इतका काही चांगला परिणाम त्यांना दिसून आला नसेल. त्यामुळे त्यांना असे वाटत असेल, की ‘एखादे काम चांगल्याप्रकारे व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर ते स्वतःच करा.’ परंतु, कमअनुभवी बांधवांना अनुभवी बांधवांकडून प्रशिक्षण मिळावे या शास्त्रवचनांत व्यक्त केलेल्या यहोवाच्या इच्छेशी अशा वृत्तीचा काही मेळ बसतो का?—२ तीमथ्य २:२.
प्रेषित पौलाचा एक प्रवासी सोबती, योहान मार्क पंफुल्या येथील आपली नेमणूक सोडून घरी परतला तेव्हा पौल निराश झाला. (प्रेषितांची कृत्ये १५:३८, ३९) पण म्हणून पौलाने इतरांना प्रशिक्षण देण्याचे सोडून दिले नाही. तीमथ्य नावाच्या दुसऱ्या एका तरुण बांधवाला पौलाने निवडले आणि त्याला मिशनरी कार्याचे प्रशिक्षण दिले.a (प्रेषितांची कृत्ये १६:१-३) बिरुया येथे मिशनऱ्यांचा कडाडून विरोध झाला तेव्हा पौलाने तेथे जास्त वेळ राहणे सुज्ञपणाचे नव्हते. त्यामुळे, नव्याने स्थापन केलेली मंडळी, सीला नावाचा एक प्रौढ वयस्कर बांधव आणि तीमथ्य यांच्या हवाली करून तो तेथून निघाला. (प्रेषितांची कृत्ये १७:१३-१५) सीलाकडून तीमथ्याने निश्चितच पुष्कळ गोष्टी शिकल्या असाव्यात. नंतर जेव्हा तीमथ्य आणखी जबाबदाऱ्या घेण्यास तयार झाला तेव्हा पौलाने त्याला थेस्सलनायका येथील मंडळीला उत्तेजन देण्यासाठी पाठवले.—१ थेस्सलनीकाकर ३:१-३.
पौल आणि तीमथ्य यांच्यातील नातेसंबंध कामापुरता किंवा निव्वळ औपचारिक नव्हता. त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध होते. करिंथ येथील मंडळीला लिहिताना, पौलाने तीमथ्याला “माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र” म्हटले; तीमथ्याला करिंथला पाठवण्याचा पौलाचा विचार होता. पौलाने पुढे त्याच्याविषयी असे देखील म्हटले, की “ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण [तीमथ्य] तुम्हास देईल.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर ४:१७) पौलाकडून मिळालेले प्रशिक्षण तीमथ्याने अगदी आनंदाने स्वीकारले व आपल्या नेमणुका पार पाडण्यात कुशल झाला. पुष्कळ तरुण बांधव सेवा सेवक, वडील किंवा प्रवासी पर्यवेक्षक बनण्याच्या पात्रतेचे झाले आहेत. पौलाने जशी तीमथ्याच्या बाबतीत आवड घेतली होती त्याचप्रमाणे, या तरुण बांधवांनी, त्यांच्यामध्ये खरी आवड घेऊन त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या काळजीवाहू वडिलांना योग्य प्रतिसाद दिला आहे.
वडिलांनो, इतरांना प्रशिक्षण द्या!
यशया ६०:२२ येथील भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे हे आपण बिनचूक सांगू शकतो. यहोवा, “जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र” करत आहे. त्या राष्ट्रात सुव्यवस्था असेल तरच ते “बलाढ्य” राहील. तेव्हा वडिलांनो, पात्र असलेल्या समर्पित बांधवांना कोणकोणत्या मार्गांनी अधिक प्रशिक्षण देता येईल यावर तुम्हाला विचार करता येईल का? प्रगती करायला कोणत्या प्रकारची सुधारणा करण्याची गरज आहे, याची जाणीव प्रत्येक सेवा सेवकाला आहे याची खात्री करा. आणि बाप्तिस्मा घेतलेल्या तुम्ही बांधवांनो, तुम्हाला मिळत असलेल्या व्यक्तिगत मदतीचा पुरेपूर फायदा घ्या. तुमची क्षमता, तुमचे ज्ञान, तुमचा अनुभव वाढवण्यासाठी तुम्हाला मिळत असलेल्या संधींचा फायदा घ्या. प्रेमळ साहाय्य पुरवण्याच्या या व्यवस्थेवर यहोवा निश्चितच आशीर्वाद देईल.—यशया ६१:५.
[तळटीप]
a नंतर, पौलाने योहान मार्कबरोबर पुन्हा एकदा कार्य केले.—कलस्सैकर ४:१०.
[३० पानांवरील चौकट]
—सेवा सेवक काय करू शकतात
वडिलांनी सेवा सेवकांना प्रशिक्षण दिले पाहिजे परंतु याबरोबरच आपली स्वतःची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सेवा सेवकांनी देखील पुष्कळ गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.
—सेवा सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या नेमणुका, न चुकता विश्वासूपणे पार पाडल्या पाहिजेत. त्यांनी चांगल्या अभ्यासाच्या सवयी विकसित केल्या पाहिजेत. अभ्यास आणि शिकलेल्या गोष्टींचे अनुकरण करण्यावर पुष्कळ प्रमाणावर प्रगती अवलंबून आहे.
—एखादा सेवा सेवक ख्रिस्ती सभेत भाषणाची तयारी करत असतो तेव्हा त्याने, हा भाग आपण कशाप्रकारे सादर करू शकतो यांबद्दलच्या सूचनांसाठी निःसंकोचपणे योग्यता प्राप्त वडिलांना विचारावे.
—आपण देत असलेल्या बायबल आधारित भाषणाकडे बारकाईने लक्ष देऊन सुधारणा करण्यासाठी काही सल्लाही वडिलांनी द्यावा अशी विनंती सेवा सेवक एखाद्या वडिलांकडे करू शकतो.
सेवा सेवकांनी वडिलांकडून सल्ला मागावा, तो स्वीकारावा आणि त्याचे अवलंबन करावे. अशाप्रकारे त्यांची “प्रगती सर्वांस दिसून” येईल.—१ तीमथ्य ४:१५.