वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w03 ८/१५ पृ. १९-२४
  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देव आपल्या लोकांशी कसे वागतो
  • आपण न्यायाने वागले पाहिजे
  • लोक “परमेश्‍वराची वाणी” कशाप्रकारे ऐकू शकतात?
  • दयेची आवड धरणे
  • विनम्रतेने देवासमागमे चालणे
  • धीर धरण्याच्या मनोवृत्तीमुळे आशीर्वाद मिळतात
  • आपण यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवाच्या सेवकांकडे खरी आशा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • संदेष्ट्यांचे अनुकरण करा—मीखा
    आमची राज्य सेवा—२०१४
  • यहोवाचा न्याय व त्याचे नाव उंचावले जाते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
w03 ८/१५ पृ. १९-२४

यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

“नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.

१, २. यहोवाच्या सेवकांपैकी काहीजण हवालदिल का होऊ शकतात, पण कोणती गोष्ट आपल्याला सहायक ठरू शकते?

व्हीरा नावाच्या ७५ वर्षांच्या विश्‍वासू ख्रिस्ती भगिनीची प्रकृती वयोमानाने बरीच खालावली आहे. त्या म्हणतात, “कधीकधी मी खिडकीबाहेर पाहते तेव्हा मला माझे ख्रिस्ती भाऊ व बहिणी घरोघर जाऊन प्रचार करताना दिसतात. त्यांना पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू येतात कारण मलाही त्यांच्यासोबत सेवा करावेसे फार वाटते, पण माझ्या आजारपणामुळे मी यहोवाची तितकी सेवा करू शकत नाही.”

२ तुम्हाला कधी असे वाटले आहे का? अर्थात, यहोवावर प्रेम करणारे सर्वजण साहजिकच त्याच्या नावाने चालू इच्छितात आणि त्याच्या सर्व अपेक्षा देखील पूर्ण करू इच्छितात. पण जर आपली प्रकृती खालावलेली असेल, वय वाढलेले असेल किंवा जर आपल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्‍या असतील तर? अशा परिस्थितीमुळे देवाच्या सेवेत आपल्याला मनापासून जितके करावेसे वाटते, तितके करू न शकल्यामुळे कदाचित आपण थोडेबहुत हवालदिल होत असू. आपण या परिस्थितीत असल्यास, मीखा अध्याय ६ व ७ यांवर विचार करणे आपल्याकरता अतिशय प्रोत्साहनदायक ठरू शकेल. हे अध्याय दाखवतात की यहोवाच्या अपेक्षा वाजवी आणि पूर्ण करता येण्याजोग्या आहेत.

देव आपल्या लोकांशी कसे वागतो

३. यहोवा बंडखोर इस्राएली लोकांशी कशाप्रकारे वागतो?

३ प्रथम आपण मीखा ६:३-५ या वचनांकडे लक्ष देऊन हे पाहू की यहोवा त्याच्या लोकांशी कसे वागतो. मीखाच्या काळातील इस्राएली लोक बंडखोर होते हे आठवणीत असू द्या. तरीसुद्धा यहोवा आपल्या लोकांना अत्यंत कोमलतेने, “हे माझ्या प्रजे” असे म्हणून संबोधतो. तो त्यांना अक्षरशः विनवतो: ‘माझ्या प्रजे, स्मरण कर.’ त्यांना कठोरपणे दोष देण्याऐवजी तो त्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करून त्यांना विचारतो: “मी तुझे काय केले?” इतकेच नव्हे, तर तो त्यांना ‘आपल्याविरुद्ध साक्ष’ (पं.र.भा.) देण्याचेही प्रोत्साहन देतो.

४. यहोवाच्या कोमल उदाहरणाचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

४ देवाने आपल्या सर्वांकरता किती उत्तम उदाहरण मांडले आहे! त्याने मीखाच्या काळातील इस्राएल व यहूदाच्या विद्रोही लोकांना देखील “माझ्या प्रजे” असे संबोधले आणि त्यांना अक्षरशः विनवणी केली. निश्‍चितच आपणही मंडळीतल्या आपल्या बांधवांशी वागताना अशाचप्रकारे कोमलता व दया दाखवली पाहिजे. काहीजणांशी चांगले संबंध ठेवणे तितके सोपे नसते किंवा काहीजण आध्यात्मिकरित्या दुर्बल असतात, हे कबूल आहे. पण जर त्यांचे यहोवावर प्रेम असेल तर आपण निश्‍चितच त्यांना मदत करू इच्छितो आणि कोमलतेने त्यांच्याशी व्यवहार करू इच्छितो.

५. मीखा ६:६, ७ यात कोणता मूलभूत मुद्दा आपल्याला मिळतो?

५ यानंतर आपण मीखा ६:६, ७ या वचनांकडे वळू या. मीखा एकापाठोपाठ एक असे अनेक प्रश्‍न विचारतो: “मी काय घेऊन परमेश्‍वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबलि, एका वर्षाची वासरे घेऊन त्याजपुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या यांनी परमेश्‍वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय?” नाही, ‘हजारो एडके, व तेलाच्या दशसहस्त्र नद्यांनी’ यहोवा संतुष्ट व्हायचा नाही. पण एक गोष्ट आहे जी त्याला संतुष्ट करेल. ती कोणती?

आपण न्यायाने वागले पाहिजे

६. देवाच्या कोणत्या तीन अपेक्षा मीखा ६:८ येथे उल्लेखित आहेत?

६ मीखा ६:८ यातून यहोवा आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो हे आपण शिकू शकतो. मीखा विचारतो: “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?” या तीन अपेक्षांचा संबंध आपल्या भावना, विचार व कृतींशी आहे. आपल्याला हे गुण प्रदर्शित करण्याची इच्छा असली पाहिजे, ते आपण कसे दाखवू शकतो याविषयी आपण विचार केला पाहिजे आणि हे गुण प्रदर्शित करण्याकरता आपण कृती केली पाहिजे. या तीन अपेक्षांविषयी आपण एकाच वेळी चर्चा करू या.

७, ८. (अ) “नीतीने वागणे” याचा काय अर्थ होतो? (ब) मीखाच्या काळात कोणत्या प्रकारचे अन्याय सर्वसामान्य होते?

७ “नीतीने वागणे” याचा अर्थ जे योग्य ते करणे. यहोवा कशाप्रकारे कार्य करतो यावरून आपण ठरवू शकतो की नीतीने वागणे म्हणजे काय? पण मीखाच्या काळातील लोक नीतीने अथवा न्यायाने चालण्याऐवजी अन्याय करत होते. कशाप्रकारे? मीखा ६:१० याकडे लक्ष द्या. या वचनाच्या शेवटी, व्यापारी “उणे माप” अर्थात अगदीच लहान माप वापरत होते असे सांगितले आहे. ११ व्या वचनात म्हटले आहे की ते ‘खोटे वजन’ वापरत होते. आणि १२ व्या वचनानुसार ‘त्यांची जीभ कपटरूप’ होती. अशारितीने मीखाच्या काळातील व्यापार जगात उणे माप, खोटे वजन व कपटी भाषण सर्वसामान्य होती.

८ अशा अन्यायपूर्ण प्रथा केवळ व्यापार जगात होत्या असे नाही. न्यायालयांमध्येही त्या सामान्य होत्या. मीखा ७:३ असे सूचित करते की “सरदार फर्मावितो ते न्यायाधीश लाच घेऊन करितो.” न्यायाधीशांना लाच देऊन त्यांना निर्दोष लोकांवर अन्यायी दंड ठोठावण्यास लावले जात होते. “महाजन, पं.र.भा.” अथवा प्रतिष्ठित नागरिक गुन्हेगारीत सामील होत होते. किंबहुना मीखा म्हणतो की सरदार, न्यायाधीश आणि महाजन मिळून दुष्टतेचे “जाळे विणितात” अर्थात एकत्र मिळून दुष्ट कृत्ये करत होते.

९. दुष्टांच्या अन्यायांमुळे यहुदा व इस्राएलवर काय परिणाम झाला आहे?

९ दुष्ट नेत्यांच्या अन्यायी कृत्यांचा सबंध यहुदा व इस्राएलवर परिणाम झाला होता. मीखा ७:५ म्हणते की न्यायाच्या अभावामुळे सोबत्यांमध्ये, जिवलग मित्रांमध्ये, इतकेच काय तर वैवाहिक सोबत्यांमध्येही अविश्‍वास निर्माण झाला होता. ६ वे वचन असे सूचित करते की यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आईवडील व मुलांसारखी जवळची नाती असूनही ते एकमेकांचा द्वेष करत होते.

१०. सध्याच्या अन्यायाच्या वातावरणात ख्रिस्ती कसे वागतात?

१० आपल्या काळाविषयी काय? आजही आपण अशी परिस्थिती पाहत नाही का? मीखाप्रमाणे आपण देखील आज अन्याय व अविश्‍वासाची परिस्थिती आणि सामाजिक व कौटुंबिक जीवनाची अवनती होताना पाहात आहोत. तरीपण, देवाचे सेवक या नात्याने या अधार्मिक जगात राहताना आपण या जगाच्या अन्यायी व्यवहाराच्या आत्म्याला ख्रिस्ती मंडळीत प्रवेश करू देत नाही. त्याऐवजी आपण प्रामाणिकता व विश्‍वासूपणा यांसारख्या गुणांचे समर्थन करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात हे गुण प्रदर्शित करतो. किंबहुना आपण ‘सर्व बाबतीत चांगले वागतो.’ (इब्री लोकांस १३:१८) न्यायाने व नीतीने वागल्यामुळे एकमेकांवर भरवसा ठेवणाऱ्‍या बंधुसमाजाच्या रूपात आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात याजशी तुम्ही सहमत नाही का?

लोक “परमेश्‍वराची वाणी” कशाप्रकारे ऐकू शकतात?

११. मीखा ७:१२ कशाप्रकारे पूर्ण होत आहे?

११ मीखा भाकीत करतो की अन्यायी परिस्थिती असली तरीसुद्धा सर्वांना न्याय मिळेल. संदेष्टा मीखा भाकीत करतो की लोकांना “दूरदूरच्या समुद्रतीराहून व दूरदूरच्या पर्वतांवरून” यहोवाचे उपासक होण्याकरता एकत्र केले जाईल. (मीखा ७:१२) या भविष्यवाणीच्या शेवटल्या पूर्णतेत कोणतेही एक राष्ट्र नव्हे, तर सर्व राष्ट्रांच्या लोकांना देवाच्या निष्पक्ष न्यायापासून लाभ होत आहे. (यशया ४२:१) हे आज कशाप्रकारे खरे ठरत आहे?

१२. “यहोवाची वाणी” आज लोक कशाप्रकारे ऐकत आहेत?

१२ उत्तरासाठी आपण मीखाच्या याआधीच्या शब्दांवर लक्ष देऊ या. मीखा ६:९ (NW) यात म्हटले आहे: “यहोवाची वाणी नगराला हाक मारते; आणि जो बुद्धिमान तो तुझ्या नावाचे भय धरील.” सर्व राष्ट्रांचे लोक कशाप्रकारे “यहोवाची वाणी” ऐकतात आणि न्यायाने वागण्याशी याचा कशाप्रकारे संबंध आहे? अर्थात, आज सर्वजण शाब्दिक अर्थाने देवाची वाणी ऐकत नाहीत. पण आपल्या जागतिक प्रचार कार्याच्या माध्यमाने यहोवाची वाणी सर्व जातींचे आणि पार्श्‍वभूमीचे लोक ऐकत आहेत. परिणामस्वरूप, जे ऐकतात ते ‘देवाच्या नावाचे भय धरतात,’ म्हणजेच त्याच्याविषयी त्यांना आदर वाटतो. आवेशी राज्य उद्‌घोषक या नात्याने सेवा करण्याद्वारे निश्‍चितच आपण न्यायी व प्रेमळ पद्धतीने कार्य करत आहोत. देवाचे नाव कोणताही पक्षपात न करता सर्वांना सांगण्याद्वारे आपण ‘नीतीने वागतो.’

दयेची आवड धरणे

१३. प्रेमदया व प्रेम यात काय फरक आहे?

१३ यानंतर आपण मीखा ६:८ येथे उल्लेख केलेल्या दुसऱ्‍या अपेक्षेची चर्चा करू. यहोवा आपल्याकडून “आवडीने दया” करण्याची अपेक्षा करतो. “दया” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचे “प्रेमदया” किंवा “एकनिष्ठ प्रीती” असेही भाषांतर केले आहे. प्रेमदया करण्याचा अर्थ इतरांविषयी मनापासून चिंता असणे, त्यांच्याविषयी सहानुभूती व काळजी वाटणे. प्रेमदया केवळ प्रेमापेक्षा वेगळी आहे. ती कशी? प्रेम एक बहुव्यापक शब्द आहे, तो वस्तूंविषयी किंवा विचारांविषयीही वापरता येतो. उदाहरणार्थ, बायबलमध्ये “द्राक्षारस व तेल यांविषयी प्रेम” व “ज्ञानाविषयी प्रेम” असण्याबद्दल सांगितले आहे. (नीतिसूत्रे २१:१७; २९:३, NW) पण प्रेमदया हा शब्द मात्र नेहमी, लोकांच्या खासकरून देवाच्या सेवकांच्या संदर्भात वापरला जातो. म्हणूनच मीखा ७:२० (पं.र.भा.) यात यहोवा देवाची सेवा करणाऱ्‍या ‘अब्राहामाला प्रदर्शित केलेल्या प्रेमदयेविषयी’ सांगितले आहे.

१४, १५. प्रेमदया कशाप्रकारे दाखवली जाते आणि याचा कोणता पुरावा आहे?

१४ मीखा ७:१८ (पं.र.भा.) यानुसार संदेष्टा मीखा म्हणतो, की देवाला “प्रेमदयेची आवड” आहे. मीखा ६:८ यात आपल्याला केवळ प्रेमदया दाखवण्यास नव्हे, तर या गुणाची आवड धरण्यास सांगण्यात आले आहे. या वचनांवरून आपण काय शिकतो? प्रेमदया आपल्याला दाखवायची असते म्हणून स्वेच्छेने आणि बिनशर्त दाखवली जाते. यहोवाप्रमाणे, आपल्यालाही गरजू लोकांना प्रेमदया दाखवल्यामुळे आनंद वाटतो.

१५ आज अशी प्रेमदया देवाच्या लोकांचे ओळखचिन्ह आहे. केवळ एका उदाहरणाचा विचार करा. जून २००१ साली अमेरिकेतील टेक्सास राज्यात क्रांतीवृत्ताचे वादळ आले ज्यामुळे हा प्रदेश पूरग्रस्त झाला. हजारो घरांना नुकसान झाले, यात शेकडो यहोवाच्या साक्षीदारांचीही घरे होती. आपल्या गरजू ख्रिस्ती बांधवांना मदत करण्यासाठी जवळजवळ १०,००० साक्षीदारांनी आपला वेळ व शक्‍ती आनंदाने आणि विनामूल्य खर्च केली. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून, हे स्वयंसेवक अथक परिश्रम करत होते; दिवसरात्र आणि शनिवार-रविवारी देखील मेहनत करून त्यांनी ८ राज्य सभागृहांचे आणि ख्रिस्ती बांधवांकरता ७०० घरांचे निर्माण केले. जे असे कार्य करण्यास असमर्थ होते त्यांनी खाण्या-पिण्याच्या गोष्टी, आवश्‍यक वस्तू आणि पैशांच्या रूपात मदत केली. हे हजारो साक्षीदार आपल्या बांधवांच्या मदतीला का धावून आले? कारण त्यांना ‘दयेची आवड’ आहे. आणि जगभरातील आपले बांधव अशाप्रकारे प्रेमदया दाखवतात हे जाणून किती आनंद वाटतो! होय, ‘आवडीने दया करण्याची’ अपेक्षा एक ओझे नव्हे तर आनंददायक गोष्ट आहे.

विनम्रतेने देवासमागमे चालणे

१६. कोणते उदाहरण देवासोबत नम्रभावाने चालण्याच्या गरजेवर जोर देते?

१६ मीखा ६:८ येथे सापडणारी तिसरी अपेक्षा, ‘देवासमागमे राहून नम्रभावाने चालण्याची’ आहे. याचा अर्थ आपण आपल्या मर्यादा लक्षात घेऊन देवावर विसंबून राहिले पाहिजे. उदाहरणार्थ: वादळातून चालत असताना आपल्या वडिलांचा हात घट्ट धरणाऱ्‍या लहानशा मुलीची कल्पना करा. या मुलीला माहीत असते की तिची शक्‍ती मर्यादित आहे पण तिला आपल्या पित्यावर पूर्ण भरवसा असतो. आपणही आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून आपल्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेवला पाहिजे. आपण हा भरवसा कसा कायम राखू शकतो? एक मार्ग म्हणजे देवाच्या समीप राहणे का सुज्ञतेचे आहे हे नेहमी आठवणीत ठेवण्याद्वारे. मीखा आपल्याला असे करण्याची तीन कारणे सांगतो: यहोवा आपली सुटका करणारा, मार्गदर्शक व संरक्षक आहे.

१७. यहोवाने प्राचीन काळी आपल्या लोकांना कशाप्रकारे सोडवले, त्यांचे मार्गदर्शन व संरक्षण केले?

१७ मीखा ६:४, ५ यानुसार देव म्हणतो: “मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणिले.” होय, यहोवा इस्राएलचा सोडवणारा होता. यहोवा पुढे म्हणतो: “मी तुजपुढे मोशे, अहरोन व मिर्याम यांस पाठवले.” मोशे व अहरोन यांना इस्राएल राष्ट्राचे मार्गदर्शन करण्याकरता उपयोगात आणले गेले आणि इस्राएलच्या स्त्रियांनी विजयोत्सवात नृत्य केले तेव्हा मिर्यामने पुढाकार घेतला. (निर्गम ७:१, २; १५:१, १९-२१; अनुवाद ३४:१०) यहोवाने आपल्या सेवकांद्वारे मार्गदर्शन पुरवले. ५ व्या वचनानुसार यहोवा इस्राएल राष्ट्रास आठवण करून देतो की कशाप्रकारे त्याने बालाक व बलाम यांच्यापासून त्यांचे रक्षण केले होते आणि कशाप्रकारे मवाबातील शिट्टिमातून प्रतिज्ञात देशातील गिलगालपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाच्या शेवटल्या टप्प्यात त्याने इस्राएल लोकांचे रक्षण केले होते.

१८. देव आपला सोडवणारा, मार्गदर्शक व संरक्षक कसा ठरतो?

१८ देवासोबत चालत असताना तो आपल्याला सैतानाच्या जगातून सोडवतो, त्याच्या वचनाच्या व संघटनेच्या माध्यमाने आपले मार्गदर्शन करतो आणि विरोधक आपल्यावर हल्ला करतात तेव्हा सामूहिकरित्या आपले रक्षण करतो. अशारितीने आपल्या प्रवासाच्या या शेवटल्या वादळी टप्प्यातून जात असताना आपल्या स्वर्गीय पित्याचा हात घट्ट धरून ठेवण्याची भरपूर कारणे आपल्याकडे आहेत. आपल्या प्रवासाचा शेवट प्राचीन प्रतिज्ञात देशापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असलेल्या देवाच्या नीतिमान नव्या जगात होईल.

१९. नम्रता व आपल्या मर्यादांचा काय संबंध आहे?

१९ देवासमागमे राहूननम्रभावाने चालल्यामुळे आपल्या परिस्थितीविषयी वास्तववादी दृष्टिकोन राखण्यास आपल्याला मदत मिळते. कारण नम्रभावाने चालणे म्हणजे आपल्या मर्यादांची जाणीव राखणे. वाढते वय किंवा खालावलेली प्रकृती यांमुळे आपण यहोवाच्या सेवेत जे कार्य साधू शकतो त्यांवर मर्यादा येतात. पण निराश होण्याऐवजी आपण आठवणीत ठेवले पाहिजे की देव ‘आपल्याजवळ जे नाही त्यानुसार नव्हे तर जे आहे त्यानुसार’ आपल्या प्रयत्नांचा व अर्पणांचा स्वीकार करतो. (२ करिंथकर ८:१२, NW) यहोवा आपल्याकडून अशी अपेक्षा करतो की आपण त्याची मनापासून सेवा करावी, आपल्या परिस्थितीनुसार होईल तितकी सेवा करावी. (कलस्सैकर ३:२३) आपण मनःपूर्वक आणि आवेशाने होईल तितके देवाच्या सेवेत करतो तेव्हा तो आपल्याला विपुल आशीर्वाद देतो.—नीतिसूत्रे १०:२२.

धीर धरण्याच्या मनोवृत्तीमुळे आशीर्वाद मिळतात

२०. कशाची जाणीव ठेवल्यामुळे आपल्याला मीखासारखी वाट पाहण्याची मनोवृत्ती बाळगण्यास मदत होईल?

२० यहोवाचे आशीर्वाद अनुभवल्याने आपल्याला मीखासारखी प्रवृत्ती प्रदर्शित करण्याचे प्रोत्साहन मिळते. तो असे घोषित करतो: “मी तर परमेश्‍वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन.” (मीखा ७:७) हे शब्द देवासमागमे राहून नम्रभावाने चालण्याशी कशाप्रकारे संबंधित आहेत? वाट पाहण्याची किंवा धीर धरण्याची मनोवृत्ती असल्यास, यहोवाचा दिवस अजून आला नाही असा विचार करून आपण निराश होत नाही. (नीतिसूत्रे १३:१२) खरे सांगायचे तर आपल्या सर्वांनाच वाटते की या दुष्ट जगाचा शेवट लवकर व्हावा. पण प्रत्येक आठवडी हजारो लोक देवासोबत चालण्यास केवळ सुरवात करत आहेत. हे जाणल्यामुळे आपल्याला वाट पाहण्याची मनोवृत्ती राखण्याचे कारण मिळते. या संदर्भात अनेक वर्षांपासून सेवा करणारे एक साक्षीदार म्हणतात: “प्रचार कार्यात मी खर्च केलेल्या ५५ पेक्षा अधिक वर्षांचा विचार केल्यावर मला खात्री वाटते की यहोवाची प्रतीक्षा केल्यामुळे मी काहीही गमावले नाही. उलट कितीतरी दुःखद परिस्थितीतून माझी सुटका झाली.” तुम्हालाही असा अनुभव आला आहे का?

२१, २२. मीखा ७:१४ यातील भविष्यवाणी आपल्या काळात कशाप्रकारे पूर्ण होत आहे?

२१ यहोवासोबत चालल्यामुळे आपल्याला मदत मिळते यात काही वाद नाही. मीखा ७:१४ (NW) येथे मीखाने देवाच्या लोकांची तुलना आपल्या मेंढपाळासोबत सुरक्षितपणे राहणाऱ्‍या मेंढरांशी केली. या भविष्यवाणीच्या मोठ्या पूर्णतेत आध्यात्मिक इस्राएलचे शेषजन तसेच “दुसरी मेंढरे” आपला विश्‍वासू मेंढपाळ यहोवा याजसोबत सुरक्षित राहतात. ते “अरण्यात एकांती—वनराईत” राहतात, अर्थात ते या अतिशय संकटमय व धोकेदायक जगात आध्यात्मिकरित्या अलिप्त राहतात.—योहान १०:१६; अनुवाद ३३:२८; यिर्मया ४९:३१; गलतीकर ६:१६.

२२ मीखा ७:१४ येथे भाकीत केल्यानुसार, यहोवाचे लोक समृद्धीचा आनंद लुटतात. देवाच्या मेंढरांविषयी म्हणजेच लोकांविषयी सांगताना मीखा म्हणतो: “बाशानात व गिलादात त्यांस चरू दे.” बाशान व गिलादातील मेंढरे सुपीक कुरणांत चरत होते व त्यांची भरभराट होत होती, त्याप्रमाणे आज देवाचे लोक देखील आध्यात्मिक समृद्धीचा आनंद लुटतात. देवासोबत नम्रभावाने चालण्याचा हा आणखी एक आशीर्वाद आहे.—गणना ३२:१; अनुवाद ३२:१४.

२३. मीखा ७:१८, १९ यावर विचार करण्याद्वारे आपण कोणता धडा शिकू शकतो?

२३ मीखा ७:१८, १९ येथे संदेष्टा मीखा दाखवतो की जे पश्‍चात्ताप करतात त्यांना यहोवा क्षमा करू इच्छितो. १८ वे वचन सांगते की यहोवा “अधर्माची क्षमा” करतो आणि “अपराध मागे टाकतो.” १९ व्या वचनानुसार तो ‘त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकील.’ यातून आपण कोणता धडा शिकू शकतो? आपण स्वतःला विचारू शकतो की या बाबतीत आपण यहोवाचे अनुकरण करतो का? इतरजण आपल्याविरुद्ध ज्या चुका करतात त्यांची आपण क्षमा करतो का? जेव्हा ते पश्‍चात्ताप करतात आणि समेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा निश्‍चितच आपण त्यांना पूर्णपणे व कायमची क्षमा करण्यात यहोवाच्या स्वेच्छेचे अनुकरण केले पाहिजे.

२४. तुम्हाला मीखाच्या भविष्यवाणीमुळे कोणता फायदा झाला आहे?

२४ मीखाच्या भविष्यवाणीचा विचार करण्याद्वारे आपल्याला कशाप्रकारे फायदा झाला आहे? या भविष्यवाणीने आपल्याला आठवण करून दिली आहे की जे लोक यहोवाजवळ येऊ इच्छितात त्यांना तो खरी आशा देतो. (मीखा २:१-१३) आपल्याला खऱ्‍या उपासनेचे सर्व संभव मार्गांनी समर्थन करण्याचेही प्रोत्साहन मिळाले आहे जेणेकरून आपण सदासर्वकाळ देवाच्या नावाने चालू शकू. (मीखा ४:१-४) आणि आपल्याला आश्‍वासन देण्यात आले आहे की आपली परिस्थिती कशीही असो, आपण यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. होय, मीखाची भविष्यवाणी खरोखर आपल्याला यहोवाच्या नावाने चालत राहण्याचे बळ देते.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• मीखा ६:८ या वचनानुसार यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

• ‘न्यायाने वागण्याकरता’ कशाची आवश्‍यकता आहे?

• आपण ‘आवडीने दया करतो’ हे कसे दाखवू शकतो?

• ‘देवासमागमे राहून नम्रभावाने चालण्यात’ कशाचा समावेश होतो?

[२१ पानांवरील चित्रे]

मीखाच्या काळात अधार्मिक परिस्थिती असूनही त्याने यहोवाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. तुम्ही देखील करू शकता

[२३ पानांवरील चित्र]

सर्व प्रकारच्या लोकांना साक्ष देण्याद्वारे न्यायाने चाला

[२३ पानांवरील चित्रे]

तुम्हाला दया करण्यास आवडते हे इतरांच्या गरजा पूर्ण करण्याद्वारे दाखवा

[२३ पानांवरील चित्र]

आपल्या मर्यादा ओळखून जेवढे शक्य होईल तेवढे करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा