योग्य अशा विश्वासू माणसांवर जबाबदारी सोपवून दे
“ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे.”—२ तीम. २:२.
१, २. अनेकांचा ते करत असलेल्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
अनेकांना वाटतं की, आपण जे काम करतो त्यावरून आपण महत्त्वाचे आहोत किंवा नाही हे ठरतं. काही संस्कृतींमध्ये जेव्हा एखाद्याची ओळख करून घेतली जाते तेव्हा, “तुम्ही काय काम करता?” असा प्रश्न विचारणं सर्वसामान्य आहे.
२ बायबलमध्ये काही ठिकाणी व्यक्तींची ओळख करून देताना त्यांच्या कामाचाही उल्लेख करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, “मत्तय जकातदार,” ‘शिमोन नावाचा चांभार’ आणि “वैद्य लूक.” (मत्त. १०:३; प्रे. कृत्ये १०:६; कलस्सै. ४:१४) यासोबतच बायबलमध्ये इतर काही ठिकाणी यहोवाच्या सेवकांबद्दल सांगताना, त्यांना मिळालेल्या नेमणुकीचाही उल्लेख करण्यात आला आहे. जसं की राजा दावीद, संदेष्टा एलीया आणि प्रेषित पौल. या विश्वासू पुरुषांनी यहोवाकडून मिळालेल्या नेमणुकीला फार मौल्यवान लेखलं. त्यांच्याप्रमाणेच आपणही यहोवाच्या सेवेत आपल्याला मिळालेल्या नेमणुकीला मौल्यवान समजलं पाहिजे.
३. वयस्कर बांधवांनी तरुणांना प्रशिक्षित करणं गरजेचं का आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
३ आपणही यहोवाची मनापासून सेवा करतो आणि मिळालेल्या नेमणुकीला मौल्यवान लेखतो. आपल्यापैकी अनेकांना आपली नेमणूक फार आवडते, आणि शक्य आहे तोपर्यंत ती नेमणूक पार पाडण्याची आपली इच्छा असते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे वयोमानामुळे पूर्वीप्रमाणे काम करणं आपल्याला शक्य होतं नाही. (उप. १:४) आज प्रचाराचं कार्य मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोहचवण्यासाठी यहोवाची संघटना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. पण कधीकधी वयस्कर बांधवांना तंत्रज्ञानाच्या नवीन पद्धती शिकून घेणं कठीण जातं. (लूक ५:३९) तसंच, वृद्धापकाळात शारीरिक ताकद आणि क्षमता गमावनं हेदेखील साहजिकच आहे. (नीति. २०:२९) त्यामुळे यहोवाच्या लोकांना काही खास प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. म्हणून यहोवाच्या संघटनेत जास्त जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी, वयस्कर बांधवांनी तरुणांना प्रशिक्षित करणं हे व्यावहारिक आहे, आणि असं करणं हा त्यांच्या प्रेमळपणाचा एक पुरावादेखील ठरेल.—स्तोत्र ७१:१८ वाचा.
४. जबाबदारी इतरांवर सोपवून देणं काही जणांना अवघड का जाऊ शकतं? (“काही जण इतरांवर जबाबदारी का सोपवत नाहीत?” ही चौकट पाहा.)
४ आपली जबाबदारी इतरांवर सोपवून देणं, जबाबदारीच्या पदावर असलेल्यांसाठी कदाचित अवघड जाऊ शकतं. कारण, आपल्याला प्रिय असलेली नेमणूक आपण गमावू या विचाराने त्यांना वाईट वाटू शकतं. तसंच त्या नेमणुकीतून मिळणारा आनंद यापुढे आपल्याला मिळणार नाही याचं दुःख त्यांना होऊ शकतं. किंवा कदाचित त्यांना अशीही चिंता वाटते की, इतर जण ही जबाबदारी व्यवस्थित रीत्या हाताळू शकणार नाहीत. आपल्याकडे इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ नाही असाही विचार कदाचित ते करतील. दुसरीकडे पाहता, जेव्हा आपल्यावर अधिक जबाबदारी सोपवण्यात येत नाही तेव्हा तरुण बांधवांनीदेखील धीर दाखवण्याची गरज आहे.
५. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
५ असं असलं तरी, वयस्कर बांधवांनी तरुणांना अधिक जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणं का महत्त्वाचं आहे? आणि ते हे कशा प्रकारे करू शकतात? (२ तीम. २:२) तसंच, अनुभवी व वयस्कर असलेल्या बांधवांसोबत मिळून काम करताना आणि त्यांच्याकडून शिकताना, तरुणांनी योग्य दृष्टिकोन बाळगणं गरजेचं का आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, दाविदाने आपल्या मुलाला एका महत्त्वपूर्ण कामासाठी कसं तयार केलं ते आपण आधी पाहू.
दाविदाने शलमोनाला कामासाठी तयार केलं
६. दाविदाची काय इच्छा होती, आणि यहोवाने त्याला काय सांगितलं?
६ अनेक वर्षं, दाविदाला छळाचा सामना करावा लागला आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहावं लागलं. त्यानंतर तो जेव्हा राजा बनला तेव्हा तो एका आरामदायी राजवाड्यात राहू लागला. त्यामुळे दावीद नाथान संदेष्ट्याला म्हणाला: “मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे.” यहोवासाठी आपण एक सुंदर मंदिर बांधावं अशी दाविदाची फार मनापासून इच्छा होती. त्यामुळे नाथान त्याला म्हणाला: “तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे.” पण यहोवाची इच्छा काही वेगळीच होती. म्हणून यहोवाने नाथान संदेष्ट्याद्वारे दाविदाला सांगितलं: “माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधावयाचे नाही.” संदेष्ट्याद्वारे दाविदाला समजलं की, त्याच्या पुत्रांपैकी एक यहोवासाठी मंदिर बांधेल. पण यहोवा नेहमी दाविदासोबत राहील असंही यहोवाने त्याला कळवलं. मग, या गोष्टी समजल्यानंतर दाविदाने कशी मनोवृत्ती दाखवली?—१ इति. १७:१-४, ८, ११, १२; २९:१.
७. यहोवाने त्याचं मंदिर बनवण्यासाठी दाविदाऐवजी त्याच्या मुलाची निवड केली, यावर दाविदाची काय प्रतिक्रिया होती?
७ यहोवासाठी मंदिर बांधण्याची दाविदाची मनापासून इच्छा होती. त्यामुळे तो हे मंदिर बांधणार नाही हे जेव्हा त्याला समजलं, तेव्हा त्याला नक्कीच खूप वाईट वाटलं असणार. पण तरी हे काम पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या मुलाला, शलमोनाला पूर्णपणे साहाय्य केलं. या कामासाठी लागणाऱ्या मजुरांची त्याने व्यवस्था केली. तसंच, मंदिरासाठी लागणारं लोखंड, तांबं, चांदी, सोनं आणि लाकूड अशी सामग्री त्याने गोळा केली. हे मंदिर शलमोनाने बांधल्यामुळे, या मंदिराला नंतर शलमोनाचं मंदिर म्हणण्यात आलं. पण मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर त्याचं श्रेय कोणाला मिळेल याची दाविदाने पर्वा केली नव्हती. उलट त्याने आपल्या मुलाला प्रोत्साहन दिलं होतं. तो म्हणाला: “माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो, तू कृतार्थ हो, आणि परमेश्वर तुझा देव तुझ्यासंबंधाने म्हणाला आहे त्याप्रमाणे त्याचे मंदिर बांध.”—१ इति. २२:११, १४-१६.
८. (क) यहोवाचं मंदिर बांधण्यासाठी शलमोन अजून तयार नाही, असा विचार दाविदाने का केला असावा? (ख) पण तरीही दाविदाने काय केलं?
८ पहिले इतिहास २२:५ वाचा. यहोवाचं मंदिर बांधण्याचं हे मोठं काम पूर्ण करण्यासाठी आपला मुलगा शलमोन हा अजून तयार नाही, असं कदाचित दाविदाला वाटलं असेल. मंदिर हे “अत्यंत भव्य” असणार होतं आणि शलमोन हा “तरुण व सुकुमार” होता. पण दाविदाला या गोष्टीची पूर्ण खात्री होती की यहोवा शलमोनाला या खास कामात नक्की मदत करेल. त्यामुळे शलमोनाला हे भव्य काम पूर्ण करता यावं यासाठी दाविदाने आपल्या परीने सर्व प्रयत्न केले.
इतरांना प्रशिक्षण देण्यात जो आनंद आहे तो मिळवा
तरुण बांधव जेव्हा अधिक जबाबदाऱ्या हाताळतात तेव्हा त्यांना पाहून आपल्याला आनंद होतो (परिच्छेद ९ पाहा)
९. इतरांवर आनंदाने जबाबदारी सोपवण्यासाठी कोणती गोष्ट वयस्कर बांधवांना मदत करेल? उदाहरण देऊन स्पष्ट करा.
९ आपल्याला मिळालेली जबाबदारी तरुणांवर सोपवण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा वयस्कर बांधवांना निराश होण्याची गरज नाही. कारण, यहोवाचं कार्य हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं आहे याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. तरुण बांधवांना जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित केल्याने यहोवाचं कार्य पूर्ण होण्यास मदत मिळेल. पुढील उदाहरणाचा विचार करा: जेव्हा तुम्ही लहान होता, तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या वडिलांना गाडी चालवताना पाहिलं असेल. जेव्हा तुम्ही थोडे मोठे झालात तेव्हा तुमच्या वडिलांनी तुम्हाला ते गाडी कशी चालवतात त्याबद्दल थोडी माहिती दिली असेल. कालांतराने तुम्हाला गाडी चालवण्याचं लायसन्स मिळालं, आणि तुम्ही स्वतः गाडी चालवू लागलात. पण त्या वेळीही तुमच्या वडिलांनी तुम्हाला गाडी चालवताना काही सूचना दिल्या असतील. कदाचित तुम्ही दोघांनी आळीपाळीने गाडी चालवली असेल. पण जेव्हा तुमचे वडील वृद्ध झाले, तेव्हा कदाचित तुम्हीच जास्त प्रमाणात गाडी चालवली असेल. मग अशा वेळी तुमचे वडील नाराज झाले का? त्यांना वाईट वाटलं का? नाही. उलट जेव्हा तुम्ही स्वतः गाडी चालवून त्यांना इतर ठिकाणी घेऊन गेलात तेव्हा त्यांना नक्कीच आनंद झाला असेल. अगदी याच प्रमाणे वयस्कर बांधव जेव्हा यहोवाच्या संघटनेतील तरुण बांधवांना प्रशिक्षण देतात आणि त्यांना जबाबदाऱ्या हाताळताना पाहतात, तेव्हा त्यांनाही आनंद होतो.
१०. अधिकार आणि मोठेपणाबद्दल मोशेचा दृष्टिकोन कसा होता?
१० इतरांना जेव्हा एखादी नेमणूक दिली जाते किंवा जबाबदारी दिली जाते, तेव्हा त्यामुळे आपण त्यांचा हेवा करू नये. जेव्हा काही इस्राएली लोक संदेष्ट्यांप्रमाणे बोलू लागले तेव्हा मोशेने जी मनोवृत्ती दाखवली, त्यावरून आपण बरंच काही शिकू शकतो. (गणना ११:२४-२९ वाचा.) त्या लोकांनी संदेष्ट्यांप्रमाणे संदेश सांगू नये अशी यहोशवाची इच्छा होती. पण मोशे त्याला म्हणाला: “माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते!” यहोवा आपल्या कामाचं नेतृत्व करत आहे हे मोशेला माहीत होतं. आपण स्वतःसाठी श्रेय आणि मोठेपणा मिळवावा असं मोशेला वाटलं नाही. याउलट यहोवाच्या सर्वच सेवकांना नेमणूक आणि जबाबदारी मिळावी अशी त्याची इच्छा होती. आज आपल्याबद्दल काय? जेव्हा इतरांना यहोवाच्या सेवेत एखादी नेमणूक मिळते तेव्हा आपल्यालाही आनंद होतो का?
११. इतरांवर जबाबदारी सोपवण्याबाबत एक बांधव काय म्हणतात?
११ आज यहोवाच्या संघटनेत असे बरेच बांधव आहेत ज्यांनी यहोवाची अनेक दशकं सेवा केली आहे. तसंच अधिक जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी त्यांनी तरुणांना प्रशिक्षण दिलं आहे. पीटर नावाच्या एका बांधवाचं उदाहरण घ्या. त्यांनी आपल्या ७४ वर्षांच्या पूर्णवेळेच्या सेवेमध्ये, ३५ वर्षं युरोपमधील एका शाखा कार्यालयात सेवा केली आहे. या शाखा कार्यालयात त्यांनी अनेक वर्षं सेवा विभागाचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर या कामासाठी त्यांच्यापेक्षा अधिक तरुण असलेल्या पॉल या बांधवाला नेमण्यात आलं. पॉलने पीटरसोबत त्याच विभागात अनेक वर्षं सेवा केली होती आणि त्याला पीटरकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. मग आपल्यापेक्षा लहान बांधवाला नेमणूक मिळाली म्हणून पीटर यांना वाईट वाटलं का? नाही. ते म्हणतात: “मोठ्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी आपल्याकडे प्रशिक्षित बांधव आहेत आणि ते त्यांच्यावर सोपवलेलं काम सांभाळण्यासाठी फार मेहनत घेतात हे पाहून मला खूप आनंद होतो.”
वयस्कर बांधवांची कदर करा
१२. रहबामच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?
१२ जेव्हा शलमोनाचा मुलगा रहबाम राजा बनला, तेव्हा त्याने त्याला मिळालेल्या या नवीन नेमणुकीबद्दल वयस्कर लोकांकडे सल्ला मागितला. पण नंतर मात्र त्यांचा सल्ला त्याने नाकारला, व त्याऐवजी त्याच्यासोबत जे लहानाचे मोठे झाले होते त्यांच्या सल्ल्यानुसार त्याने कृती केली. याचे परिणाम फार भयंकर झाले. (२ इति. १०:६-११, १९) यावरून आपण कोणता धडा शिकतो? हाच की, जे वयस्कर आहेत आणि ज्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्यांच्याजवळ सल्ला मागणं हे अधिक सुज्ञपणाचं आहे. एखादी गोष्ट पूर्वी ज्या पद्धतीनं केली जात होती अगदी त्याच पद्धतीनं आपल्यालाही करावी लागेल, असा तरुणांनी विचार करू नये. पण यासोबतच, त्यांनी वयस्कर बांधवांच्या सल्ल्यांना मनापासून स्वीकारलं पाहिजे. वयस्कर बांधव ज्या पद्धतीने काम करत होते, ती पद्धत आता काही फायद्याची नाही असा विचार तरुणांनी करू नये.
१३. तरुण बांधव वयस्कर बांधवांसोबत मिळून कशा प्रकारे काम करू शकतात?
१३ कधीकधी तरुणांवर अशी एखादी जबाबदारी सोपवण्यात येते, जी पूर्वी वयस्कर आणि अनुभवी बांधव हाताळत असतील. अशा वेळी वयस्कर बांधवांच्या अनुभवावरून शिकणं हे अधिक शहाणपणाचं ठरेल. याआधी आपण पीटर आणि पॉलचं उदाहरण पाहिलं. पॉलला पीटरच्या जागी सेवा विभागाचा पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी मिळाली. त्याविषयी तो म्हणतो: “पीटरकडून एखाद्या बाबतीत सल्ला मिळावा यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असायचो. आणि माझ्या विभागातील इतरांनीही त्यांच्याकडून सल्ला मागावा यासाठी मी त्यांना उत्तेजन द्यायचो.”
१४. पौल आणि तीमथ्याने ज्या प्रकारे सोबत मिळून काम केलं, त्यावरून आज आपण काय शिकू शकतो?
१४ पौल आणि तीमथ्याचं उदाहरण घ्या. तीमथ्य हा प्रेषित पौलापेक्षा वयानं फार लहान होता. त्या दोघांनी अनेक वर्षं सोबत मिळून काम केलं. (फिलिप्पैकर २:२०-२२ वाचा.) करिंथमधल्या ख्रिश्चनांना पौलाने सांगितलं: “या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हास देईल.” (१ करिंथ. ४:१७) या वचनावरून आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येतं की पौल आणि तीमथ्य यांनी सोबत मिळून काम केलं आणि एकमेकांना मदत केली. पौलाने ‘ख्रिस्तातील त्याची कार्य करण्याची पद्धत’ तीमथ्याला शिकवण्यासाठी वेळ काढला, आणि तीमथ्यानेही पौलाकडून चांगल्या रीतीने शिकून घेतलं. पौलाचं तीमथ्यावर प्रेम होतं आणि तो करिंथमधल्या बंधुभगिनींची आध्यात्मिक रीत्या चांगली काळजी घेईल याची पूर्ण खात्री पौलाला होती. पौलाने मंडळीतील वडिलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. मंडळीमध्ये पुढाकार घेण्यासाठी इतरांना प्रशिक्षित करताना मंडळीतील वडील पौलाच्या या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात.
मंडळीत आपल्या प्रत्येकाची एक महत्त्वाची भूमिका आहे
१५. रोमकर १२:३-५ या वचनांमुळे यहोवाच्या संघटनेत होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यास आपल्याला कशी मदत होते?
१५ आज आपण एका रोमांचक काळात जगत आहोत. यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवरील भाग आज अनेक अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच अर्थ संघटनेत अनेक बदल होत आहेत आणि पुढेही होत राहतील. यातील काही बदलांचा आपल्यावर व्यक्तिगत रीत्या प्रभाव पडतो आणि त्यांच्याशी जुळवून घेणं हे नेहमीच सोपं नसतं. पण आपल्याला काय हवं आहे त्याऐवजी, आपण नम्र वृत्ती बाळगून देवाच्या राज्यासाठी जे चांगलं आहे त्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यामुळे आपल्याला खूप मदत होऊ शकते. जेव्हा आपण असं करतो तेव्हा बंधुभगिनींमध्ये ऐक्य टिकून राहतं. रोममधील ख्रिश्चनांना पौलाने लिहिलं: “मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका.” त्यानंतर पौलाने त्यांना समजावलं की जसे शरीरातील वेगवेगळे भाग वेगवेगळी कार्यं करतात, त्याचप्रमाणे ख्रिस्ती मंडळीतही प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आहे.—रोम. १२:३-५.
१६. यहोवाच्या संघटनेत शांती आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती काय करू शकते?
१६ आपण सर्व जण देवाच्या राज्याला पाठिंबा देण्याचा आणि आपल्याकडून ज्या अपेक्षा केल्या जातात त्या पूर्ण करण्याचा निर्धार करूयात. वयस्कर बांधव तरुणांना प्रशिक्षित करू शकतात. तरुण बांधव योग्य दृष्टिकोन ठेवून अधिक जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पुढे येऊ शकतात, तसंच वयस्कर बांधवांबद्दल ते आदर बाळगू शकतात. संघटनेत बदल होत असताना जेव्हा बांधवांच्या पत्नी त्यांना पूर्णपणे साथ देतात, तेव्हा सर्व बांधव त्यांची कदर आणि प्रशंसा करू शकतात. या विवाहित बहिणी, प्रिस्किल्लाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. ती आपल्या पतीसोबत, अक्विल्लासोबत विश्वासाने सेवा करत राहिली.—प्रे. कृत्ये १८:२.
१७. आपले शिष्य भविष्यात काय करू शकतील अशी येशूला खात्री होती? आणि त्याने शिष्यांना कोणत्या कामासाठी प्रशिक्षित केलं?
१७ इतरांना प्रशिक्षण देण्याबाबत येशू ख्रिस्ताने उत्तम उदाहरण मांडलं. येशूला हे चांगल्या प्रकारे माहीत होतं की जेव्हा तो पुन्हा स्वर्गात जाईल तेव्हा त्याने सुरू केलेलं काम त्याच्या शिष्यांना चालू ठेवावं लागेल. आपले शिष्य अपरिपूर्ण आहेत हे त्याला माहीत होतं. पण त्याला या गोष्टीची पूर्ण खात्री होती की त्याने केलेल्या कार्यापेक्षा त्याचे शिष्य अधिक व्यापक प्रमाणात कार्य करतील. (योहा. १४:१२) त्याने त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केलं त्यामुळे ते राज्याची सुवार्ता जगात दूरवर पोहचवू शकले.—कलस्सै. १:२३.
१८. भविष्यात आपल्या सर्वांकडे कसं काम असेल? आज आपल्याकडे कोणतं काम आहे?
१८ येशूच्या मृत्यूनंतर यहोवाने त्याला पुनरुत्थित केलं आणि त्याच्यावर आणखी काही जबाबदाऱ्या सोपवल्या. यासोबतच यहोवाने त्याला ‘सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य आणि धनीपण या सर्वांहून उंच’ केलं. (इफिस. १:१९-२१) हर्मगिदोन सुरू होण्याआधी जरी आपला मृत्यू झाला, तरी नीतिमान अशा एका नवीन जगात आपल्याला पुन्हा जिवंत केलं जाईल. तसंच तिथे आपल्या सर्वांकडे असं काम असेल ज्यातून आपल्याला खरं समाधान मिळेल. पण आजही आपल्याकडे असं एक रोमांचक काम आहे ज्यात आपण सहभाग घेऊ शकतो. ते काम म्हणजे देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करणं आणि शिष्य बनवणं. आपण तरुण असो अथवा वृद्ध, आपण सर्व जण “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करत राहू शकतो.—१ करिंथ. १५:५८.