वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 फेब्रुवारी पृ. ८-१२
  • खंडणी बलिदान—पित्याकडून असलेलं एक “पूर्ण दान”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खंडणी बलिदान—पित्याकडून असलेलं एक “पूर्ण दान”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “तुझे नाव पवित्र मानले जावो”
  • “तुझे राज्य येवो”
  • “तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”
  • खंडणी बलिदानाची तुम्ही कदर करत आहात हे दाखवा
  • खंडणी बलिदानामुळे यहोवाकडून आशीर्वाद मिळतात
  • खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल कदर दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
    बायबल नेमके काय शिकवते?
  • खंडणीमुळे आपले जीवन वाचते —ते कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 फेब्रुवारी पृ. ८-१२
येशू एका लोकसमुदायाला शिकवताना

खंडणी बलिदान—पित्याकडून असलेलं एक “पूर्ण दान”

“प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान  . .  पित्यापासून” आहे.—याको. १:१७.

गीत क्रमांक: २, ५

खंडणी बलिदान पुढील गोष्टींमध्ये कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं . . 

  • देवाच्या नावाच्या पवित्रिकरणात?

  • देव राज्याच्या शासनामध्ये?

  • देवाचा उद्देश पूर्ण करण्यात?

१. खंडणी बलिदानाने आपल्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी शक्य केल्या?

येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानामुळे अनेक आशीर्वाद मिळणं शक्य झालं आहे. खंडणी बलिदानामुळे दुसऱ्‍या मेंढरांतील सदस्यांना भविष्यात देवाच्या कुटुंबाचा एक भाग बनण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच सदासर्वकाळासाठी एक चांगलं आणि आनंदी जीवन जगण्याची आशाही त्यामुळे मिळाली आहे. पण यापेक्षाही अधिक म्हणजे, खंडणी बलिदानाचा संबंध अशा काही मुद्द्‌यांशी आहे, जे मुद्दे स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.—इब्री १:८, ९.

२. (क) स्वर्गातील आणि पृथ्वीवरील कोणत्या महत्त्वपूर्ण मुद्द्‌यांचा येशूने आपल्या प्रार्थनेत समावेश केला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) या लेखात आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?

२ येशूने त्याच्या मृत्यूच्या सुमारे दोन वर्षांआधी शिष्यांना अशा प्रकारे प्रार्थना करण्यास शिकवलं: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्त. ६:९, १०) या लेखात आपण पाहूयात की, खंडणी बलिदान पुढील गोष्टींमध्ये कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं: देवाच्या नावाच्या पवित्रिकरणात, देव राज्याच्या शासनामध्ये आणि देवाचा उद्देश पूर्ण करण्यात.

“तुझे नाव पवित्र मानले जावो”

३. यहोवाचं नाव काय दर्शवतं? सैतानाने यहोवाच्या नावाला कलंक कसा लावला?

३ सर्व प्रथम येशूने, यहोवाचं नाव पवित्र केलं जावं यासाठी प्रार्थना केली. यहोवाचं नाव तो कशा प्रकारची व्यक्‍ती आहे याला दर्शवतं. तोच एक असा आहे जो संपूर्ण विश्‍वात सर्वात शक्‍तिशाली आणि नीतिमान आहे. येशूने त्याला “पवित्र बापा” असंदेखील म्हटलं. (योहा. १७:११) यहोवा देव पवित्र आहे, त्यामुळे तो जे काही करतो आणि जे नियम तो लावून देतो ते सर्व पवित्र आहेत. पण एदेन बागेमध्ये सैतानाने धूर्तपणे, मानवांसाठी स्तर ठरवण्याच्या यहोवाच्या अधिकारावर प्रश्‍न उपस्थित केला. त्याने यहोवाविषयी खोटं सांगितलं आणि त्याच्या नावाला कलंक लावला.—उत्प. ३:१-५.

४. येशूने देवाच्या नावाला पवित्र कसं केलं?

४ याउलट येशूने मात्र यहोवाच्या नावावर खरं प्रेम केलं आणि त्याचं नावं पवित्र करण्यासाठी त्याला जे काही शक्य होतं ते केलं. (योहा. १७:२५, २६) येशूने हे कसं केलं? येशूने त्याच्या वागण्या-बोलण्याद्वारे आणि शिकवण्याद्वारे इतरांना हे समजण्यास मदत केली की यहोवाचे स्तर योग्य आहेत. तसंच, यहोवा आपल्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतो त्या आपल्या भल्यासाठीच आहेत हेही समजण्यास त्याने त्यांना मदत केली. (स्तोत्र ४०:८-१० वाचा.) सैतानाने येशूला त्रास व छळ सहन करण्यास लावलं, आणि शेवटी येशू यातना सोसून मरण पावला. पण तरी येशू शेवटपर्यंत देवाला एकनिष्ठ राहिला. परिपूर्ण मानवांना देवाला पूर्णपणे एकनिष्ठ राहणं शक्य आहे, हे त्याने सिद्ध करून दाखवलं.

५. देवाच्या नावाला पवित्र करण्यात आपण कसा सहभाग घेऊ शकतो?

५ यहोवाच्या नावावर आपणही प्रेम करतो, हे आपण कसं दाखवू शकतो? आपण हे आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवू शकतो. आपण पवित्र असावं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (१ पेत्र १:१५, १६ वाचा.) याचा अर्थ असा की, आपण फक्‍त यहोवाचीच उपासना करावी आणि त्याच्या आज्ञा पूर्ण मनाने पाळाव्यात. विश्‍वासामुळे आपला छळ होतो अगदी तेव्हाही यहोवाने शिकवलेल्या मार्गावर चालत राहण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करतो. यहोवाने ठरवलेल्या स्तरांनुसार जीवन जगल्याने आपण त्याच्या नावाला गौरव देतो. (मत्त. ५:१४-१६) आपण हे सिद्ध करतो की यहोवाचे नियम चांगले आहेत आणि सैतान हा खोटा आहे. हे खरं आहे की आपण अपरिपूर्ण आहोत, त्यामुळे आपल्याकडून चुका या होणारच. पण जेव्हा आपल्या हातून एखादी चूक घडते तेव्हा आपण पश्‍चात्ताप करतो आणि यहोवाच्या नावाला कलंक लागेल अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.—स्तो. ७९:९.

६. आपण अपरिपूर्ण आहोत तरी यहोवा कोणत्या आधारावर आपल्याला नीतिमान म्हणून पाहतो?

६ जेव्हा आपण खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतो तेव्हा यहोवा त्या आधारावर आपल्या पापांची क्षमा करतो; मग आपण अभिषिक्‍त जनांपैकी असो अथवा दुसऱ्‍या मेंढरांमधले. जे यहोवाला आपलं जीवन समर्पित करतात अशांना तो आपले उपासक म्हणून स्वीकारतो. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना तो त्याची नीतिमान मुलं म्हणून, तर दुसऱ्‍या मेंढरांना तो त्याचे नीतिमान मित्र म्हणून स्वीकारतो. (योहा. १०:१६; रोम. ५:१, २; याको. २:२१-२५) त्यामुळे आजही खंडणी बलिदानाच्या आधारावर, आपल्या स्वर्गीय पित्यासोबत एक चांगला नातेसंबंध जोडणं आणि त्याच्या नावाला पवित्र करणं आपल्याला शक्य आहे.

“तुझे राज्य येवो”

७. खंडणीमुळे कोणते आशीर्वाद मिळणं शक्य झालं?

७ येशूने त्याच्या शिष्यांना जी प्रार्थना शिकवली त्यात त्याने म्हटलं: “तुझे राज्य येवो.” पण येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाचा देवाच्या राज्याशी कसा संबंध आहे? देवाचे राज्य किंवा सरकार, हे येशू आणि मानवांतून निवडलेल्या १,४४,००० जनांचे मिळून बनलेले आहे. खंडणी बलिदानामुळे या मानवांना स्वर्गीय पुनरुत्थान मिळणं शक्य होतं. (प्रकटी. ५:९, १०; १४:१) ते येशूसोबत राजे आणि याजक या नात्यानं एक हजार वर्षांसाठी पृथ्वीवर राज्य करतील. या काळादरम्यान यहोवा त्याच्या राज्याद्वारे संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवेल. तसंच सगळ्या मानवजातीलाही तो परिपूर्णतेकडे नेईल. सरतेशेवटी, स्वर्गातील आणि पृथ्वीवरील यहोवाचे सेवक एक कुटुंब असे होतील. (प्रकटी. ५:१३; २०:६) आणि येशू, सैतानाचा व त्याने निर्माण केलेल्या सर्व समस्यांचा नाश करेल.—उत्प. ३:१५.

८. (क) येशूने आपल्या शिष्यांना देवाच्या राज्याचं महत्त्व कशा प्रकारे समजावून सांगितलं? (ख) आपण देवाच्या राज्याची एकनिष्ठ प्रजा आहोत हे कसं दाखवून देतो?

८ येशूने त्याच्या शिष्यांना देवाच्या राज्याचं महत्त्व समजावून सांगितलं. त्याने हे कसं केलं? बाप्तिस्मा झाल्यानंतर येशूने लगेचच “देवाच्या राज्याची सुवार्ता” सांगण्यास सुरवात केली. तो जिथं-जिथं गेला तिथं-तिथं त्याने सुवार्ता सांगितली. (लूक ४:४३) तसंच त्याने त्याच्या शिष्यांना “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” त्याच्याविषयीची साक्ष पोहचवण्यास सांगितलं. (प्रे. कृत्ये १:६-८) आज जे प्रचारकार्य चालू आहे त्याद्वारे, लोकांना खंडणीविषयी शिकण्याची आणि देवाच्या राज्याची प्रजा होण्याची संधी उपलब्ध आहे. आपणही अभिषिक्‍त जनांना देवाच्या राज्याची सुवार्ता संपूर्ण जगभरात पोहचवण्यासाठी मदत करण्याद्वारे दाखवून देतो की, आपण देवाच्या राज्याची एकनिष्ठ प्रजा आहोत.—मत्त. २४:१४; २५:४०.

“तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”

९. मानवांसाठी असलेला आपला उद्देश यहोवा नक्की पूर्ण करेल अशी खात्री आपण का बाळगू शकतो?

९ येशूने शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेत पुढे म्हटलं: “तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” येशूच्या अशा बोलण्याचा काय अर्थ होता? जेव्हा यहोवा काही वचन देतो किंवा काही बोलतो तेव्हा ते घडतंच. (यश. ५५:११) सैतानाने केलेला बंडदेखील यहोवाची इच्छा पूर्ण होण्यापासून थांबवू शकला नाही. या पृथ्वीसाठी यहोवाची काय इच्छा होती? यहोवाची इच्छा होती की आदाम आणि हव्वेच्या परिपूर्ण मुलांनी ही पृथ्वी भरून जावी. (उत्प. १:२८) जर आदाम आणि हव्वा मुलांविनाच मेले असते, तर देवाची ही इच्छा पूर्ण झाली नसती. त्यामुळे यहोवा देवाने आदाम आणि हव्वेला मुलं होऊ दिली. तसंच यहोवाने खंडणी बलिदानाची तरतूद केली. जो कोणी या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवेल त्याला परिपूर्ण होण्याची आणि सदासर्वकाळ जगण्याची संधी मिळेल. यहोवा सर्व मानवांवर प्रेम करतो आणि त्याने उद्देशिल्याप्रमाणे आपल्याला एक चांगलं जीवन मिळावं अशी त्याची इच्छा आहे.

१०. मृत लोकांना खंडणी बलिदानामुळे कसा फायदा होईल?

१० पण अशा सर्व लाखो लोकांचं काय ज्यांना यहोवा देवाविषयी शिकण्याची कधी संधीच मिळाली नाही आणि ते मरण पावले? खंडणी बलिदानाच्या आधारावर या सर्व लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता त्यांना पुन्हा जीवन देईल आणि त्याच्या उद्देशाविषयी शिकण्याची आणि सदासर्वकाळ जगण्याची त्यांना संधी देईल. (प्रे. कृत्ये २४:१५) यहोवा हा जीवनाचा स्रोत आहे. त्यामुळे जेव्हा तो मृत लोकांना पुन्हा जिवंत करेल तेव्हा तो त्यांचा पिता होईल. (स्तो. ३६:९) येशूनेदेखील त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेत यहोवाला संबोधताना “हे आमच्या स्वर्गातील पित्या” असं म्हटलं: (मत्त. ६:९) यहोवा देवाने मृतांच्या पुनरुत्थानामध्ये येशूला एक खास भूमिका दिली आहे. येशूने म्हटलं “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.”—योहा. ६:४०, ४४; ११:२५.

११. मोठ्या लोकसमुदायासाठी यहोवाची काय इच्छा आहे?

११ यहोवा सर्वांना त्याच्या कुटुंबाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित करतो. येशूने म्हटलं: “जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई.” (मार्क ३:३५) यहोवाने वचन दिलं आहे की सर्व राष्ट्रं, वंश आणि भाषा बोलणाऱ्‍या लोकांमधून अनेक लोक त्याचे उपासक बनतील. बायबलमध्ये त्यांना, “कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय” म्हणण्यात आलं आहे. या मोठ्या लोकसमुदायाचा खंडणी बलिदानावर विश्‍वास आहे, तसंच देवाच्या आज्ञेप्रमाणे वागण्याचीही त्यांची इच्छा आहे. ते यहोवाला गौरव देतात आणि म्हणतात: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून, तारण आहे.”—प्रकटी. ७:९, १०.

१२. मानवांसाठी असलेल्या यहोवाच्या उद्देशाबद्दल येशूने प्रार्थनेमध्ये काय म्हटलं?

१२ येशूने शिकवलेल्या प्रार्थनेवरून आपण यहोवाविषयी आणि आज्ञाधारक मानवांबद्दल असलेल्या त्याच्या उद्देशाविषयी बरंच काही शिकलो. प्रथम आपण हे पाहिलं की, यहोवाच्या नावाला पवित्र करण्यासाठी आणि त्याला गौरव देण्यासाठी आपल्याला जे काही शक्य आहे ते आपण केलं पाहिजे. (यश. ८:१३) आपलं तारण ज्यामुळे शक्य आहे त्या येशूच्या खंडणी बलिदानामुळे देखील यहोवाच्या नावाचा गौरव होतो. खरंतर येशूच्या नावाचा अर्थच “यहोवा तारणारा आहे” असा होतो. दुसरी गोष्ट आपण ही पाहिली की, मानवांना खंडणी बलिदानामुळे मिळणारे सगळे आशीर्वाद देण्यासाठी यहोवा त्याच्या राज्याचा उपयोग करेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्याला याची पूर्ण खात्री आहे की कोणतीही गोष्ट यहोवाच्या इच्छेला पूर्ण होण्यापासून थांबवू शकत नाही.—स्तो. १३५:६; यश. ४६:९, १०.

खंडणी बलिदानाची तुम्ही कदर करत आहात हे दाखवा

१३. आपण बाप्तिस्मा का घेतो?

१३ खंडणी बलिदानाप्रती कदर असल्याचं आपण एका महत्त्वपूर्ण मार्गाने दाखवू शकतो. तो मार्ग म्हणजे खंडणीवर विश्‍वास ठेवून आपलं जीवन यहोवाला समर्पित करणं आणि बाप्तिस्मा घेणं. आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा हे दाखवून देतो की आपण यहोवा देवाचेच आहोत. (रोम. १४:८) तसंच आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा यहोवाकडे शुद्ध विवेकही मागतो. (१ पेत्र ३:२१) आपण यहोवाचे मित्र आहोत याची यहोवा आपल्याला जाणीव करून देतो आणि आपल्याला या गोष्टीची पूर्ण खात्री आहे, की वचन दिलेल्या सर्व गोष्टी तो आपल्याला देईल.—रोम. ८:३२.

एक व्यक्‍ती यहोवाचा साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेतो आणि नंतर तो प्रचारकार्यात सहभाग घेतो

आपण खंडणी बलिदानासाठी कृतज्ञ आहोत हे कसं दाखवू शकतो? (परिच्छेद १३, १४ पाहा)

१४. इतरांवर प्रेम करण्याची आज्ञा यहोवाने का दिली आहे?

१४ यहोवा जे काही करतो ते आपल्यावर असलेल्या त्याच्या अपार प्रेमामुळे करतो. तसंच त्याच्या सर्व उपासकांनी त्याचं अनुकरण करावं अशीही त्याची इच्छा आहे. (१ योहा. ४:८-११) जेव्हा आपण लोकांवर प्रेम करतो, खासकरून आपल्या बंधुभगिनींवर, तेव्हा खंडणी बलिदानाबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण सिद्ध करतो. तसंच आपल्याला यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनण्याची इच्छा आहे हेही आपण दाखवून देतो. (मत्त. ५:४३-४८) बायबलमधील सर्वात मोठ्या दोन आज्ञा म्हणजे, यहोवावर प्रेम करणं आणि इतरांवर प्रेम करणं. (मत्त. २२:३७-४०) आपलं इतरांवर प्रेम आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणं. इतरांवर प्रेम करण्याच्या यहोवाच्या आज्ञेचं जर आपण पालन केलं, तर यहोवाविषयी असलेलं आपलं प्रेम “पूर्णत्व” पावेल.—१ योहा. ४:१२, २०.

खंडणी बलिदानामुळे यहोवाकडून आशीर्वाद मिळतात

१५. (क) आज आपल्याला यहोवाकडून कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळत आहेत? (ख) भविष्यात आपल्याला कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळतील?

१५ जेव्हा आपण खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतो, तेव्हा आपल्या पापांची पूर्णपणे क्षमा मिळवणं आपल्याला शक्य होतं. देवाचं वचन आपल्याला या गोष्टीची खात्री देतं की बलिदानावर विश्‍वास ठेवल्यास आपली “पापे पुसून टाकली” जातील. (प्रेषितांची कृत्ये ३:१९-२१ वाचा.) या लेखात आपण आधी चर्चा केली की, खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा अभिषिक्‍त जनांना दत्तक घेऊन त्यांना आपले पुत्र होण्याकरता निवडतो. (रोम. ८:१५-१७) यहोवा दुसऱ्‍या मेंढरांतील सदस्यांना देखील त्याच्या पृथ्वीवरील कुटुंबाचा भाग होण्याकरता आमंत्रित करतो. दुसऱ्‍या मेंढरांतील हे सदस्य जेव्हा परिपूर्ण होतील तेव्हा त्यांची शेवटली परीक्षा होईल. जर ते यहोवाला पूर्णपणे एकनिष्ठ राहिले, तर तो त्यांचाही आपले पुत्र म्हणून स्वीकार करेल. (रोम. ८:२०, २१; प्रकटी. २०:७-९) यहोवा त्याच्या सर्व मुलांवर नेहमीच प्रेम दाखवत राहील. खंडणी बलिदानामुळे यहोवाचे आशीर्वाद सदासर्वकाळ ते अनुभवत राहतील. (इब्री ९:१२) यहोवाने आपल्या सर्वांना खंडणी बलिदानाची फार मौल्यवान भेट दिली आहे आणि ही भेट आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

१६. खंडणी आपल्याला मुक्‍त कशी करते?

१६ आपण जर आपल्या पापांचा पश्‍चात्ताप केला आणि त्यापासून मागे वळालो, तर यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनण्यापासून सैतान आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रोखू शकत नाही. येशू ‘एकदाच सर्वकाळासाठी’ मरण पावला. त्यामुळे खंडणीचं मोल सदासर्वकाळासाठी दिलं गेलं आहे. (इब्री ९:२४-२६) आदामामुळे मानवजातीवर मृत्यू ओढावला, पण येशूच्या बलिदानामुळे आपल्याला सदासर्वकाळचं जीवन मिळेल. खंडणी आपल्याला सैतानाच्या जगातून आणि मृत्यूच्या भयापासून मुक्‍त करते.—इब्री २:१४, १५.

१७. यहोवाने दाखवलेल्या प्रेमासाठी तुम्ही कृतज्ञ आहात हे तुम्ही कसं दाखवाल?

१७ यहोवा जे वचन देतो ते नेहमीच पूर्ण होतं. ज्या प्रकारे यहोवाने निसर्गामध्ये लावून दिलेले नियम कधीही बदलत नाहीत, त्याचप्रमाणे यहोवादेखील कधीही बदलत नाही. तो आपल्याला कधीही निराश करणार नाही. (मला. ३:६) यहोवाने आपल्याला हे सुंदर जीवन भेट म्हणून दिलं आहे. पण या भेटीपेक्षाही जास्त असं काही तो आपल्याला देतो. तो आपल्यावर त्याचं प्रेम दाखवतो. “देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्‍वास ठेवला आहे. देव प्रीती आहे.” (१ योहा. ४:१६) यहोवाने दिलेला शब्द नेहमीच खरा ठरतो. लवकरच ही पृथ्वी एक सुंदर नंदनवन बनेल. तिच्यामध्ये राहणारे सर्व जण एकमेकांवर प्रेम करतील व यहोवाचं अनुकरण करतील. यहोवाचे स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व सेवक म्हणतील: “धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन.”—प्रकटी. ७:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा